Wednesday, September 11, 2019

पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने होणार संत्रा फळबागांचे पुनरुज्जीवन



            सहा कोटी रूपयांचा जिल्ह्यात निधी मंजूर

अमरावती, दि. 11 : अपुरा पाऊस व तापमानामुळे नष्ट होत चाललेल्या जिल्ह्यातील संत्रा बागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 
 कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या निर्देशानुसार ६ कोटी रुपये निधी ला फलोत्पादन विभागाने मंजूरी दिली असून त्यातून जुन्या बागा वाचविण्यासाठी विविध उपाय अंमलात येणार आहेत. बदलते पर्यावरण, अपुरा पाऊस व तापमानामुळे जिल्ह्यातील जुन्या संत्रा बागाचे नुकसान होऊन जिल्ह्यातील संत्रा बागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर काही बागा वाळलेल्या आणि अर्धवट जळालेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे या बागा वाचविण्यासाठी रोग ग्रस्त फांद्या कापून काढणे, बोर्डो पेस्ट लावणे, रासायनिक खत देणे, बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी करणे आदी बाबींचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला एक हेक्टर मर्यादेत लाभ देण्यात येणार आहे.
राज्याचे कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी यापूर्वीच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणि मनरेगा अंतर्गत पुन्हा बागनिर्मिती करीता मागेल त्याला मंजूरी ही प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत. 
जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांनी या निर्णयाबद्दल पालकमंत्री डॉ. बोंडे यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत.
00000

Tuesday, September 10, 2019

वरुड-टेंभुरखेडा-गव्हाणकुंड-बहादा-मांगरुळी-हातुर्णा रस्त्याचे भूमिपूजन शेतकरी बांधवांनी गट शेतीकडे वळावे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे





अमरावती, दि. १० :  शेतीच्या विकासासाठी गटशेती ही काळाची गरज असून, त्याकडे शेतकऱ्यांनी वळावे. गटशेतीमुळे एकत्रित , संघटित व्यवसायाचे लाभ मिळतात व शासनाचे  अनुदान व सवलतीचाही लाभ मिळतो, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज गव्हाणकुंड येथे केले.
      वरुड-टेंभुरखेडा-गव्हाणकुंड-बहादा-जरुड-मांगरुळी-काचुर्णा-नांदगांव-हातुर्णा या १४५ कोटी ३२ लक्ष रुपयांच्या रस्ता बांधकामासह एकुण १४७ रुपयांच्या विकासकामांचे भुमिपूजन राज्याचे कृषिमंत्री डॉ. बोंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. बोंडे म्हणाले की, विविध उपक्रमांतून गव्हाणकुंड गावात अनेक विधायक बदल घडून आले. गव्हाण कुंडला ब वर्ग दर्जा मिळून २ कोटी रुपये मिळाले. सौर ऊर्जा प्रकल्प आला. लवकर हे काम सुरू होईल. शेकदरी धरणावरून पाईपलाईनने शेतापर्यंत पाणी जाईल. जिल्ह्याला २०० पॅक हाऊस लक्ष्यांक आहे. त्याचा लाभ अनेकांना मिळेल. 
हातूरणापासून ते टेंभुरखेडा वरुड रस्ता हायब्रीड ऍनुईटीतुन तयार होत आहे. आता शेतकरी बांधवांनी उद्योगप्रवण होणे गरजेचे आहे. त्यासाठी गटशेती हा योग्य मार्ग आहे. संघटित व्यवसायाचे लाभ त्यातून मिळतात. झपाट्याने विकसित होत असलेली नागपूर सारखी बाजारपेठ नजिक आहे. त्यामुळे
शेतीमालावर प्रक्रिया करून चांगला माल चढ्या भावाने विकता येईल. शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालय, प्रॉम कारखाना, संत्रा प्रकल्प असे विविध प्रकल्प परिसरात आकारास येत आहेत.
          शेतकरी बांधवांसह शेतमजूर बांधवांसाठी विमा,शिक्षण, आरोग्य योजना कृषी विभागाकडून राबविण्याचे नियोजन आहे,  असे ही त्यांनी सांगितले.  सरपंच सुमित्रा ताई मुरूमकर यांच्यासह
प्रगती महिला संघाच्या महिला सदस्य उपस्थित होत्या.

घातखेड येथील 'केव्हीके'मध्ये जैविक औषधे निर्मिती प्रयोगशाळेचा शुभारंभ जैविक शेतीला प्रोत्साहन, सूक्ष्म सिंचनाद्वारे शेतीचा विकास -कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे




अमरावती, दि. १० : जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी जैविक निविष्ठा निर्मितीला प्रोत्साहन व सूक्ष्म सिंचनावर भर याद्वारे शेतीचा विकास घडवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज घातखेडा येथे केले.
घातखेडा येथील कृषी विज्ञान केंद्रात जैविक औषधे निर्मिती प्रयोगशाळेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. खासदार नवनीत राणा, संस्थेच्या अध्यक्ष वसुधाताई देशमुख, जि. प. सदस्य प्रकाश साबळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे, डॉ. अर्चना बारब्दे आदी यावेळी उपस्थित होते.
कृषी मंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, ग्राम परिवर्तनासाठी विविध योजनांसह गट शेतीला चालना देण्यात येत आहे. त्यासाठी गट शेतीला अवजार बँक, बी बियाणे, सौर कुंपण आदी अनेक साह्य देण्यात येत आहे. मालावर प्रक्रिया करून तो विकल्यास त्याची किंमत वाढते. त्यामुळे बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग व विपणनाचे जाळे निर्माण करण्यात येत आहे.
शासनाने सूक्ष्म सिंचन वाढविण्यावर भर दिला आहे. त्यासाठी ठिबकवर अनुदान ८० टक्के करण्यात आले. कालव्यात पाणी वाया जाते म्हणून पाईपलाइनने पाणी शेतीला पुरविण्यात येणार आहे. जैविक शेतीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान राबविण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्र हा कृषी विद्यापीठ व नागरिकातील दुवा आहे.  कृषी तज्ज्ञ व संशोधकांची नाळ शेतकऱ्यांशी नाळ जुळलेली पाहिजे.  शेतीचे अद्यावत तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचविले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
खासदार श्रीमती राणा, श्रीमती देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. जलशक्ती अभियानात शेतकरी मेळावाही यावेळी झाला. डॉ. अतुल कळसकर यांनी प्रास्ताविक केले. परिसरातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

०००

Monday, September 9, 2019

‘एमसीएमसी’ सदस्यांचे व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण



अमरावती, दि. 9 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्या (एमसीएमसी) सदस्यांचे व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे प्रशिक्षण आज झाले.
निवडणूक आयोगाचे महासंचालक धीरेंद्र ओझा यांनी  आचारसंहिता, एमसीएमसीची भूमिका, पेड न्यूज व अपेक्षित कार्यवाही, सोशल मीडियावरील प्रसारित मजकूर आदी विविध विषयांवर यावेळी मार्गदर्शन केले.
उमेदवार किंवा पक्षाची प्रत्येक राजकीय जाहिरात पूर्वप्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे अशी कार्यवाही वेळेत होईल व आचारसंहितेचा भंग होऊ नये, यादृष्टीने यंत्रणा सुसज्ज ठेवावी. सोशल मीडियावरील मजकुराचे संनियंत्रण करण्यासाठी अशा माध्यमांच्या प्रशासनाकडून सहकार्य मिळविण्यात येत आहे.  सोशल किंवा कुठल्याही माध्यमातून  आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यावर तत्काळ कार्यवाही व्हावी, असे निर्देश त्यांनी दिले.  
            उप निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, आकाशवाणीचे मुख्य कार्यक्रम अधिकारी एकनाथ नाडगे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांच्यासह विविध कर्मचारी उपस्थित होते.
                                                            00000  

Saturday, September 7, 2019

स्वीप मोहिमेसाठी जिल्हास्तरीय समितीची पुनर्रचना मोहिमेद्वारे सर्वदूर मतदार जागृती करावी - जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री






अमरावती, दि.  6 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वीप मोहिम भारत निवडणूक आयोगाने हाती घेतली असून, मतदार जागृतीच्या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश स्वीप मोहिमेच्या नोडल अधिकारी तथा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी आज येथे दिले.
            स्वीप मोहिमेच्या समिती सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
            उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, सहायक कामगार आयुक्त अनिल कुटे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी मंगला मून, शिक्षणाधिकारी निलिमा टाके,  कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विनोद गवळी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा आदी उपस्थित होते. विविध विभागांच्या माध्यमातून निरनिराळे उपक्रम राबवून मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यांनी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश श्रीमती खत्री यांनी दिले.  
                                                            जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठन
स्वीप मोहिमेच्या प्रभावशाली अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल हे समितीचे अध्यक्ष व जि. प. मुख्य कार्यकारी मनीषा खत्री सदस्य सचिव आहेत. समितीत महापालिका आयुक्त संजय निपाणे, न. प. प्रशासन अधिकारी दीपक कासार, तिवसा न. पं. मुख्याधिकारी सुमेध अलोणे, ग्रामविकास अधिकारी दीपक बांबटकर, शिक्षणाधिकारी निलिमा टाके, प्रिया देशमुख, सहायक कामगार आयुक्त अनिल कुटे, उपनिबंधक संदीप जाधव, महिला व बालकल्याण अधिकारी सुनील मेसरे, समाजकल्याण अधिकारी मंगला मून, आकाशवाणी अधिकारी एकनाथ नाडगे,  धारणी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सुशीलकुमार खिल्लारे, प्रादेशिक अधिकारी सुधीर फुके, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, एनसीसी कमांडर ब्रिगेडीअर संग्राम दळवी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सुधीर फुके, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा, औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र लढ्ढा, रोटरी क्लबचे सारंग राऊत, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक स्नेहल बसुटेकर, एनएसएसचे राजेश बुरंगे, आरोग्य कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांच्यासह जिल्हा आयकॉन प्रतिनिधी म्हणून शुकमणी बाबरेकर व अपूर्वा शेंडे यांचाही समावेश करण्यात आला आहे.
00000

राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



  राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
           निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांनीही राजे उमाजी नाईक यांना पुष्प वाहून आदरांजली वाहिली.



Friday, September 6, 2019

पोलीस विभागाने कम्युनीटी पोलीसींगचे कार्यक्रम राबवावे - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे

पोलीसांच्या 208 निवासस्थान बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन








अमरावती, दि. 6 : अलिकडच्या काळात देश व जागतिक पातळीवर वेगाने होत असलेल्या शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमुळे सर्वसामान्य जनतेत सर्वत्र बदलाचे वारे वेगाने वाहत आहेत. या सकारात्मक बदला बरोबरच गुन्हेगारीचे स्वरुप, दशतवाद, घातपाती कृत्य यामुळे नागरिकांच्या जिवीताचा व मालमत्तेच्या सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे. हे धोके लक्षात घेऊन सामान्य जनतेच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाने कम्युनीटी पोलीसींग अंतर्गत जनजागृती कार्यक्रम राबवावे, असे कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज सांगितले.
            पोलीस अधिक्षक ग्रामीण पोलीस विभागाव्दारे आयोजित बडनेरा जवळील मौजा कोंडेश्वर येथे 208 पोलीस निवासस्थानांच्या बांधकामाचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते कुदळ मारुन व कोनशिलेचे अणावरन करुन आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या भूमीपूजन सोहळ्याला खासदार नवनीत रवि राणा, शिक्षक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष तथा आमदार डॉ. श्रीकांत देशपांडे, आमदार रवि राणा, उपमहापौर संध्याताई टिकले, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस आयुक्त संजय बावीस्कर, पोलीस अधिक्षक हरी बालाजी एन., अपर पोलीस अधिक्षक श्याम घुगे, पोलीस उपायुक्त प्रदीप सुर्यवंशी, शशिकांत सातव यांचेसह पोलीस अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.
            डॉ. बोंडे म्हणाले की, ज्याप्रकारे सैनिक देशाच्या सीमेचे रक्षण करते त्याप्रमाणे पोलीस हे देशाच्या अंतर्गत घडणाऱ्या गुन्हेगारी, आंतकवाद, घातपात आणि जनसामान्यांच्या संरक्षणासाठी काम करते. पोलीस विभाग समाजाकडून एका विशिष्ट शिस्तिचे पालन करुन घेत असतात. पोलीसांच्या कथा आणि व्यथा संदर्भात पूर्णपणे जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले. चोवीस तास काम करणाऱ्या पोलीसांना हक्काचे घर असावे असा मनोदय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा व्यक्त केला असून त्यासाठी पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या अनुषंगाने धोरण आखण्यात आले आहे. पोलीस खाते अधिक सक्षम करण्यासाठी वरिष्ठ पदावर पदोन्नतीसह पोलीसांची रिक्त पदे भरण्यात येत आहे. पोलीसांना गुन्ह्यांचा तपास अधिक जलदगतीने होण्यासाठी अद्ययावत फॉरेन्सिक लॅब अमरावतीत स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीसांच्या भावना व समस्या जाणून घेऊन अनेक वर्षापासून रखडलेले प्रश्न सोडविले आहे. पोलीसांना सन्मानपूर्वक भत्तेवाढ, आरोग्य व कुटूंब कल्याण योजना, निवासासाठी क्वार्टर, पोलीस स्टेशनचे नविणीकरण आदी सुविधा पुरविल्या आहे.
            सर्व सामान्य जनतेत पोलीसांविषयी असलेली भिती घालवून आदर निर्माण करण्यासाठी कम्युनिटी पोलीसींग तसेच सोशल पोलीसींग होणे आवश्यक आहे. पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या गरीब लोकांना गुन्हेगार न समजता सौहार्दपूवर्क वागणूक देऊन त्यांचे म्हणने ऐकून घेतले पाहिजे. लोकांमध्ये जावून त्यांच्या समस्यांचे निराकरण करुन त्यांच्यातील भिती दूर केली पाहिजे. सलोख्याचे वातावरणात ठेवून कायदा व सुव्यवस्थेचे अमंलबाजवणी झाली पाहिजे. पोलीसांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी सोशल रिलेशनशिप संबंधी सातत्याने प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांच्या घरात आनंददायी वातावरण राहण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हींग श्री. श्री. रविशंकर यांचे प्रशिक्षण पोलीसांना व त्यांच्या कुटूंबियांना सुध्दा दिले पाहिजे. ग्रामीण भागात होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस विभागाकडून चौकाचौकात तसेच संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावे व त्याची देखभालीची जबाबदारी संबंधित पोलीस स्टेशनला सोपविण्यात यावी.
            पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी अकरा हेक्टर क्षेत्रफळावर निर्माण होणाऱ्या 208 शासकीय निवासस्थानांच्या बाधकाम हे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावे. याठिकाणी सर्व सोयी- सुविधायुक्त इमारतींचे निर्माण करावे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्ष लागवड सुध्दा करण्यात आली.
            खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत आहे. त्याठिकाणी इमारतींचे दुरुस्ती करुन सर्व सोयी-सुविधायुक्त दर्जेदार पध्दतीची पोलीस ठाणे उभारावे.
            सन 1998 मध्ये पोलीस अधिक्षक ग्रामीण क्षेत्र आणि पोलीस आयुक्तालयाची जिल्हयात स्वतंत्रपणे निर्मिती झाली आहे. तेव्हापासून दोन्ही महत्वाच्या पोलीस विभागांना स्वतंत्र इमारत, परेड ग्राउंड इत्यादी यंत्रणा उभारण्यात आली आहे. पंरतू सदर जागा ही अपूरी पडत असल्यामुळे मौजा कोंडेश्वर येथे 11 हेक्टर जमीनवर सुमारे 44 कोटीचा निधी खर्चून पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण पोलीस मुख्यालय तसेच अधिकारी कर्मचारी यांचेसाठी शासकीय निवासस्थान बांधण्यात येणार आहे. पोलीस क्वार्टरचे बांधकाम कंत्राटदार धनुष्मृती बिल्डकॉन प्रा.लि. तसेच तांत्रिक सल्लागार आणि आर्किटेक्ट एम बी मालेवार डिझाईन्स प्रा. लिमिटेड यांचेकडून होणार आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक हरी बालाजी एन. यांनी प्रास्ताविकातून दिली.
            यावेळी आमदार रवि राणा, आमदार श्रीकांत देशपांडे तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांचीही समायोचित भाषणे झाली. उपस्थितांचे आभार अपर पोलीस अधिक्षक शाम घुगे यांनी मानले. कार्यक्रमाला पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...