Tuesday, October 1, 2019

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रँडमायझेशनची प्रक्रिया
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनचे सरमिसळीकरण पूर्ण  
*अद्ययावत प्रणालीत माहिती सुरक्षित
* संपूर्ण पारदर्शक ऑनलाईन प्रक्रिया
अमरावती, दि. 1 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटच्या सरमिसळीकरणाची (रँडमायझेशन) प्रक्रिया जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात झालेल्या या प्रक्रियेला उमेदवार किंवा त्यांच्या वतीने प्रतिनिधीही उपस्थित होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, इटीपीबीएस व मतपत्रिका नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अजय लहाने, संगणीकीकरण प्रशिक्षण नोडल अधिकारी तथा जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर, अतिरिक्त सूचना अधिकारी मनीष फुलझेले यावेळी उपस्थित होते.
  जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील 2 हजार 628 मतदान केंद्रासाठी 3 हजार 156 बॅलेट युनिट, 3 हजार 174 कंट्रोल युनिट व 3 हजार 622 व्हीव्हीपॅट मशीनचे स्कॅनिंग व सरमिसळीकरण झाले. तसेच आठही विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राकरीता लागणाऱ्या मनुष्यबळाची सुध्दा सरमिसळीकरणाची प्रक्रिया आज झाली. जिल्हास्तरावरील सरमिसळीकरणाची संगणकीकृत प्रक्रिया ऑनलाईन व प्रतिनिधींच्या उपस्थितीत अमरावती विधानसभा मतदारसंघासाठी पूर्ण झाली आहे. सरमिसळीकरणानंतर प्रक्रिया झालेली माहिती आता  ‘लॉक’ व सुरक्षित झाली आहे. त्यात कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. यानंतर दुसऱ्या स्तरावरील इव्हीएमचे सरमिसळीकरण त्या त्या विधानसभा मतदासंघात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पातळीवर होणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतिम दि. 4 ऑक्टोबर आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी दि. 5 ऑक्टोबरला होईल. उमेदवारी मागे घेण्याची तारीख दि. 7 ऑक्टोबर आहे व त्यानंतर चिन्ह वाटपाची प्रक्रिया होणार आहे. मतदानाचा दिनांक 21 ऑक्टोबर तर मतमोजणीचा दिनांक 24 ऑक्टोबर आहे. दि. 27 ऑक्टोबरला निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईल.
ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या तपासणीच्या व प्रत्यक्ष वापराच्या प्रत्येक टप्प्यात मॉकपोलव्दारे उमेदवारांना व मतदारांना प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. ही संपूर्ण पारदर्शक ऑनलाईन प्रक्रिया असून, अद्ययावत प्रणालीत माहिती सुरक्षित असेल, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी सांगितले.
दि. 31 ऑगस्टच्या अंतिम मतदार यादीनुसार 24 लाख 45 हजार 766 मतदार असून त्यात पुरुष 12 लाख 58 हजार 99 व स्त्री मतदार 11 लाख 87 हजार 625 आहेत. इतर मतदार 42 आहेत. मतदान केंद्रे 2 हजार 628 असून त्यातील मुख्य 2 हजार 607 व 21 सहाय्यकारी मतदान केंद्रे आहेत.    

00000


Thursday, September 26, 2019

अमरावती विधानसभा मतदारसंघात 3 लाख 45 हजार 597 मतदार

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 



*309 मतदान केंद्रे
अमरावती, दि. 26 : अमरावती विधानसभा मतदारसंघात 3 लाख 45 हजार 597 मतदार असून, त्यात पुरुष मतदार 1 लाख 77 हजार 231 व महिला मतदार 1 लाख 68 हजार 89, इतर मतदार 13 व सेना दलातील मतदार 264 आहेत, असे या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांनी आज पत्रकारांना सांगितले.
निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी उपविभागीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तहसीलदार प्रज्ञा महांडुळे, तहसीलदार संतोष काकडे आदी उपस्थित होते.
श्री. राजपूत म्हणाले की, जुलै महिन्यातील विशेष पुनरीक्षण व निरंतर अद्ययावतीकरणानंतर 2 हजार 687 पुरुष व 1 हजार 448 महिला असे एकूण 4 हजार 135 नवीन मतदार नोंदविण्यात आले आहेत. त्यांना एपिक ओळखपत्र वितरीत करण्यात आले आहे.
मतदारसंघात 291 नियमित व 18 सहाय्यकारी अशी एकूण 309 मतदान केंद्रे असतील. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एका मतदान केंद्रावर 1550 पर्यंत कमाल मतदार संख्या असू शकते. मतदारसंघातील पोलीस, महापालिका यासह सर्व शासकीय यंत्रणांची सभा घेऊन निर्देश दिले आहेत. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी 7 भरारी पथके व 3 स्थिर निरीक्षण पथके नेमली आहेत. निवडणूकीसाठी 340 मतदान पथके गठित केली असून त्यात 1 हजार 360 कर्मचा-यांची नेमणूक केली आहे, असेही श्री. राजपूत म्हणाले.
 मतदान जनजागृतीसाठी स्वीप मोहिमेत कार्यक्रम सुरु आहेत. निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सुसज्ज आहे, असेही त्यांनी सांगितले.

Wednesday, September 25, 2019

मेळघाटातील दुर्गम मतदान केंद्रांसाठी सक्षम संपर्कयंत्रणा उभारावी - विभागीय आयुक्त पीयूष सिंह




विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांच्या उपस्थितीत बैठक


अमरावती, दि. 25 : मेळघाटातील  अतिदुर्गम परिसरातील 133 मतदान केंद्रांवर मोबाईल नेटवर्क मिळत नाही. अशा मतदान केंद्रावर वनविभाग व पोलीस विभागाने संयुक्तपणे त्यांची वायरलेस यंत्रणा वापरुन सक्षम  संपर्क यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी आज येथे दिले.
मेळघाट क्षेत्रातील दुर्गम भागात निवडणूक कार्यासाठी आवश्यक बाबीसंदर्भात वनविभाग, पोलीस विभागाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल,   अतिरिक्त पोलीस अधिक्षक शाम घुगे, उपवनसंरक्षक शिवा बाला, वायरलेस पोलीस अधिक्षक आय.डी. कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी (वायरलेस) एस. टी. हांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, निवडणूक नायब तहसीलदार श्री. चंदनशिवे तसेच महावितरणचे अधिकारी यावेळी बैठकीला उपस्थित होते.
मेळघाटातील दुर्गम भागातील गावामध्ये वॉकी टॉकी कनेक्ट होत आहेत किंवा कसे, हे सर्वप्रथम तपासून घ्यावे व त्यातील त्रुटी दूर कराव्यात. वनविभागाने ही कार्यवाही करावी. त्यानंतर पोलीस विभागाने त्यांची वायरलेस यंत्रणा कार्यान्वित करावी. ही यंत्रणा योग्य पद्धतीने संपर्क राखते किंवा कसे, याबाबत तपासणी घ्यावी. सेक्टर अधिकारी, वनविभागाचे व पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समन्वयाने संपर्क सुविधाची तपासणी करावी. ही सगळी कामे 11 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी दिले.
                                     दीडशे कर्मचा-यांकडून 11 ऑक्टोबरला संयुक्त तपासणी
वनविभाग, पोलीस व निवडणूक कार्यासाठी नेमलेल्या सुमारे दीडशे कर्मचा-यांकडून 11 ऑक्टोबर रोजी संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे, त्याअनुषंगाने सर्व विभागांनी समन्वयाने सोपविलेली कामे पूर्ण होण्यासाठी आजपासूनच कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. नवाल यांनी दिले. ते म्हणाले की, निवडणूकीच्या राष्ट्रीय कार्यात कुठलीही बाधा येणार नाही, यादृष्टीने वनविभागाने त्यांच्या अधिनस्त असणारे सर्व टॉवर व आवश्यक यंत्रणा संपर्कासाठी उपलब्ध करुन द्यावे.
क्षेत्राधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व वनपाल यांच्यात समन्वय असण्यासाठी ट्रायल रन घेण्यात येईल. मतदान केंद्राशी संपर्कासाठी पोलीस व वनविभागाच्या वॉकी टॉकीचा वापर करावा. त्याशिवाय, या परिसरात उंचावरील ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळते. अशी ठिकाणे हेरून त्याचा संपर्क यंत्रणेत समावेश करता येतो किंवा कसे, याचाही पडताळा करावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

Wednesday, September 18, 2019

2 कोटी 12 लक्ष रुपयाच्या विकास कामाचे पालकमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन






अमरावती, दि. 18 :  वरुड तालुक्यातील लिंगा येथील 2 कोटी 12 लक्ष रुपये निधीच्या विविध विकास  कामांचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते आज भूमीपूजन करण्यात आले.
यावेळी डॉ. वसुधाताई बोंडे, लिंगाच्या सरपंच सतीबाई मेवलिया, भाजपा पदाधिकारी राजकुमार राऊत, ज्योतीताई कुकडे यांचेसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
एकल विहीर ते लिंगा रस्त्याचे रुपये 2 कोटी रुपये निधीतून बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.लिंगा येथे पाण्याच्या टाकीचे व गोविंद सोमकुंवर यांच्या घरापर्यंत रूपये पाच लक्ष रुपये निधीचे रस्ता बांधकाम, तसेच लिंगा येथे व्यायाम शाळेचे रुपये सात लक्ष रुपये निधीचे बांधकाम करणे आदी कामाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला.
रस्तेविकासात राज्यात ऐतिहासिक निर्माण कार्य होत आहे. सर्वदूर पायाभूत सुविधां च्या उभारणीतून राज्याची विकासाकडे वाटचाल होत आहे, असे पालकमंत्री डॉ. बोंडे यांनी यावेळी सांगितले. 

Wednesday, September 11, 2019

पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने होणार संत्रा फळबागांचे पुनरुज्जीवन



            सहा कोटी रूपयांचा जिल्ह्यात निधी मंजूर

अमरावती, दि. 11 : अपुरा पाऊस व तापमानामुळे नष्ट होत चाललेल्या जिल्ह्यातील संत्रा बागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 
 कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या निर्देशानुसार ६ कोटी रुपये निधी ला फलोत्पादन विभागाने मंजूरी दिली असून त्यातून जुन्या बागा वाचविण्यासाठी विविध उपाय अंमलात येणार आहेत. बदलते पर्यावरण, अपुरा पाऊस व तापमानामुळे जिल्ह्यातील जुन्या संत्रा बागाचे नुकसान होऊन जिल्ह्यातील संत्रा बागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर काही बागा वाळलेल्या आणि अर्धवट जळालेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे या बागा वाचविण्यासाठी रोग ग्रस्त फांद्या कापून काढणे, बोर्डो पेस्ट लावणे, रासायनिक खत देणे, बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी करणे आदी बाबींचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला एक हेक्टर मर्यादेत लाभ देण्यात येणार आहे.
राज्याचे कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी यापूर्वीच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणि मनरेगा अंतर्गत पुन्हा बागनिर्मिती करीता मागेल त्याला मंजूरी ही प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत. 
जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांनी या निर्णयाबद्दल पालकमंत्री डॉ. बोंडे यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत.
00000

Tuesday, September 10, 2019

वरुड-टेंभुरखेडा-गव्हाणकुंड-बहादा-मांगरुळी-हातुर्णा रस्त्याचे भूमिपूजन शेतकरी बांधवांनी गट शेतीकडे वळावे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे





अमरावती, दि. १० :  शेतीच्या विकासासाठी गटशेती ही काळाची गरज असून, त्याकडे शेतकऱ्यांनी वळावे. गटशेतीमुळे एकत्रित , संघटित व्यवसायाचे लाभ मिळतात व शासनाचे  अनुदान व सवलतीचाही लाभ मिळतो, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज गव्हाणकुंड येथे केले.
      वरुड-टेंभुरखेडा-गव्हाणकुंड-बहादा-जरुड-मांगरुळी-काचुर्णा-नांदगांव-हातुर्णा या १४५ कोटी ३२ लक्ष रुपयांच्या रस्ता बांधकामासह एकुण १४७ रुपयांच्या विकासकामांचे भुमिपूजन राज्याचे कृषिमंत्री डॉ. बोंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. बोंडे म्हणाले की, विविध उपक्रमांतून गव्हाणकुंड गावात अनेक विधायक बदल घडून आले. गव्हाण कुंडला ब वर्ग दर्जा मिळून २ कोटी रुपये मिळाले. सौर ऊर्जा प्रकल्प आला. लवकर हे काम सुरू होईल. शेकदरी धरणावरून पाईपलाईनने शेतापर्यंत पाणी जाईल. जिल्ह्याला २०० पॅक हाऊस लक्ष्यांक आहे. त्याचा लाभ अनेकांना मिळेल. 
हातूरणापासून ते टेंभुरखेडा वरुड रस्ता हायब्रीड ऍनुईटीतुन तयार होत आहे. आता शेतकरी बांधवांनी उद्योगप्रवण होणे गरजेचे आहे. त्यासाठी गटशेती हा योग्य मार्ग आहे. संघटित व्यवसायाचे लाभ त्यातून मिळतात. झपाट्याने विकसित होत असलेली नागपूर सारखी बाजारपेठ नजिक आहे. त्यामुळे
शेतीमालावर प्रक्रिया करून चांगला माल चढ्या भावाने विकता येईल. शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालय, प्रॉम कारखाना, संत्रा प्रकल्प असे विविध प्रकल्प परिसरात आकारास येत आहेत.
          शेतकरी बांधवांसह शेतमजूर बांधवांसाठी विमा,शिक्षण, आरोग्य योजना कृषी विभागाकडून राबविण्याचे नियोजन आहे,  असे ही त्यांनी सांगितले.  सरपंच सुमित्रा ताई मुरूमकर यांच्यासह
प्रगती महिला संघाच्या महिला सदस्य उपस्थित होत्या.

घातखेड येथील 'केव्हीके'मध्ये जैविक औषधे निर्मिती प्रयोगशाळेचा शुभारंभ जैविक शेतीला प्रोत्साहन, सूक्ष्म सिंचनाद्वारे शेतीचा विकास -कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे




अमरावती, दि. १० : जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी जैविक निविष्ठा निर्मितीला प्रोत्साहन व सूक्ष्म सिंचनावर भर याद्वारे शेतीचा विकास घडवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज घातखेडा येथे केले.
घातखेडा येथील कृषी विज्ञान केंद्रात जैविक औषधे निर्मिती प्रयोगशाळेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. खासदार नवनीत राणा, संस्थेच्या अध्यक्ष वसुधाताई देशमुख, जि. प. सदस्य प्रकाश साबळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे, डॉ. अर्चना बारब्दे आदी यावेळी उपस्थित होते.
कृषी मंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, ग्राम परिवर्तनासाठी विविध योजनांसह गट शेतीला चालना देण्यात येत आहे. त्यासाठी गट शेतीला अवजार बँक, बी बियाणे, सौर कुंपण आदी अनेक साह्य देण्यात येत आहे. मालावर प्रक्रिया करून तो विकल्यास त्याची किंमत वाढते. त्यामुळे बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग व विपणनाचे जाळे निर्माण करण्यात येत आहे.
शासनाने सूक्ष्म सिंचन वाढविण्यावर भर दिला आहे. त्यासाठी ठिबकवर अनुदान ८० टक्के करण्यात आले. कालव्यात पाणी वाया जाते म्हणून पाईपलाइनने पाणी शेतीला पुरविण्यात येणार आहे. जैविक शेतीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान राबविण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्र हा कृषी विद्यापीठ व नागरिकातील दुवा आहे.  कृषी तज्ज्ञ व संशोधकांची नाळ शेतकऱ्यांशी नाळ जुळलेली पाहिजे.  शेतीचे अद्यावत तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचविले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
खासदार श्रीमती राणा, श्रीमती देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. जलशक्ती अभियानात शेतकरी मेळावाही यावेळी झाला. डॉ. अतुल कळसकर यांनी प्रास्ताविक केले. परिसरातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

०००

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...