Tuesday, June 7, 2022

तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण आरोग्ययंत्रणा बळकट करा - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू





 तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण आरोग्ययंत्रणा बळकट करा 

                 -         राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

प्रायोगिक तत्वावर ग्रामीण भागात टेलिमेडिसीन सेवा  

अमरावती दि. 07 (विमाका): ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषोपचार व कुशल तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान प्रणाली व यंत्रणेचा वापर करावा. धारणी व चिखलदरासारख्या  दुर्गम भागातील रुग्णालयांमध्ये टेलिमेडिसीन प्रणाली सुरळीत व नियमीत करावी. तेथील नागरिकांना मुंबई, पुणे, नागपुर येथील तज्ञ डॉक्टरांचे उपचार मिळवुन द्यावेत त्याचप्रमाणे प्रायोगिक तत्वावर ग्रामीण भागात टेलिमेडिसीन सेवा सुरु होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले.

जलसंपदा राज्यमंत्र्यांनी आरोग्य विभाग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा आढावा शासकीय विश्राम गृहात स्वतंत्र बैठकांद्वारे घेतला. त्यावेळी ते बोलत होते.  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ सुरेंद्र ढोले, चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ संजय पवार, डॉ रविंद्र चव्हाण, चुरणीचे वैद्यकीय अधिक्षक रामदेव वर्मा आदी उपस्थित होते.

योग्य नियोजन करण्यात यावे

राज्यमंत्री श्री कडू म्हणाले की, धारणी चिखलदरा बरोबरच लगतच्या अचलपुर, चांदुर बाजार, अकोट येथील रुग्णालयांतही अद्ययावत तंत्रज्ञान प्रणाली विकसीत करावी.  रुग्णालयांमध्ये डिजीटल कक्षाची उभारणी करण्यात यावी. तांत्रीकदृष्ट्या या कक्षात सर्व सुविधांची निर्मिती करण्यात यावी. सर्व तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधुन दुरदृष्यप्रणालीद्वारे त्यांच्या उपलब्धतेच्या वेळापत्रकानुसार रुग्णांवर उपचार करण्यात यावे. याबाबतचे माहिती देणारे फलक रुग्णालयांमध्ये लावण्यात यावे. बालरोग, स्त्रीरोग, ह्दयरोग, यकृत, मेंदू रोग, मानसिक आजार, जुनाट आजार आदी आजांरावर उपचार करण्याऱ्या तज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात यावे. यासाठी सामाजीक उत्तरदायित्व निधीची मदत घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले. टेलीमेडिसीन सेवा अव्याहत चालण्यासाठी इंटरनेट सेवा सुरळीत असणे आवश्यक आहे. तशी सुविधा उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जलसंपदा राज्यमंत्र्यांनी बांधकाम विभागाच्या विविध कामांचा आढावा घेतला. साबांविचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते. चांदुर बाजार वळण रस्ता, बहिरम वळण रस्ता, अचलपुर बायपास व धारणी खामला रस्ता तसेच मोझरी बहिरम रस्ता निर्मितीच्या कामाची माहिती श्री कडू यांनी घेतली. ही कामे लवकरात लवकर पुर्ण करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.  

                                                        0000000000    

 

Monday, June 6, 2022

श्री रूक्मिणीमातेच्या पालखीचे अमरावतीत भव्य स्वागत

 










श्री रूक्मिणीमातेच्या पालखीचे अमरावतीत भव्य स्वागत

पालकमंत्र्यांसह अनेक मान्यवरांकडून पूजन

लोकसेवेसाठी तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण

 

अमरावती, दि. ६ : विदर्भातील ४२७ वर्षांची प्राचीन परंपरा असलेल्या श्री रुक्मिणी मातेच्या पालखीचे भव्य स्वागत अमरावतीतील बियाणी चौकात करण्यात आले. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, श्री राजराजेश्वर महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखीपूजन व वारकऱ्यांचे स्वागत केले. श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेच्या वतीने तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पायदळ दिंडी पालखीच्या दर्शनासाठी शेकडो अमरावतीकर उपस्थित होते. पालखीच्या स्वागतानिमित्त बियाणी चौकात व्यासपीठ उभारण्यात येऊन श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. त्यासभोवती फुलांच्या माळा, रांगोळ्या, स्वागतफलकांनी संपूर्ण चौक सुशोभित करण्यात आला होता. सुमधूर अभंगवाणी सादर करणाऱ्या संगीत पथकासाठी स्वतंत्र व्यासपीठ उभारण्यात आले होते. अशा उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पालखी चौकात येताच वारकरी व भाविकांनी 'रुक्मिणीवल्लभ कृष्ण हरी'चा एकच जयघोष केला. यावेळी भक्तिमय अभंगवाणी व टाळमृदंगाच्या साथीने आसमंत निनादून गेले होते. कोविड साथीमुळे दोन वर्षाच्या निर्बंध संपल्यानंतर मुक्त वातावरणात पालखीचे अंबानगरीत आगमन झाल्यामुळे वारकरी बांधवांमध्ये उत्साह संचारला होता. श्री राजराजेश्वर माऊली महाराज यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पालखीचे पूजन पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या व विविध मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी श्री विठ्ठल, श्री रूक्मिणीमातेची आरती करण्यात आली. प्रत्येक भाविकाला पालखीचे व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी चौकाच्या मधोमध उभारलेल्या व्यासपीठावर पालखी थांबवून भाविकांना पूजन व दर्शनाची सोय करून देण्यात आली. बाजूला महिला भाविकांनी गोल रिंगण करून विठ्ठलरुक्मिणीच्या नामघोषात फेर धरला. पालकमंत्री श्रीमती ठाकूर याही त्यात सहभागी झाल्या. काहींनी फुगड्याही खेळल्या. श्री पांडुरंग व श्री रुक्मिणीमातेचा जयघोष करत भक्तिरसात भाविक दंग झाले होते. 

 

            राज्यात यंदा सर्वत्र चांगला पाऊस होऊ दे. धनधान्य पिकू दे. बळीराजा समृद्ध होऊ दे. सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थना सर्वांनी विठुराय व रुक्माईचरणी यावेळी केली. या स्वागतसोहळ्याला अनेक पदाधिकारी, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

लोकार्पण झालेल्या तीन रूग्णवाहिकांपैकी एक रुग्णवाहिका पालखीसमवेत जाणार आहे. डॉक्टरसमवेत सर्व उपचार सुविधा त्यात उपलब्ध असतील.

00000

शहरात पाणीपुरवठा सुरू : मजीप्राची माहिती अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

 

शहरात पाणीपुरवठा सुरू : मजीप्राची माहिती

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 6 : अमरावती शहरातील लोअर झोनमधील पाणीपुरवठा आजपासून सुरू करण्यात आला असून, लवकरच संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपकार्यकारी अभियंता अजय वि. लोखंडे यांनी दिली.

            दरम्यान, काही समाजकंटकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून शहराचा पाणी पुरवठा पुन्हा दोन दिवस बंद राहणार असल्याचा चुकीचा संदेश व्हायरल होत आहे. नागरिकांनी या अफवेवर विश्वास ठेवू नये. प्रत्यक्षात शहरातील लोअर झोनमध्ये पाणीपुरवठा सुरू झाला आहे व लवकरच सर्व ठिकाणी पुरवठा पूर्ववत होईल, असे उपकार्यकारी अभियंता श्री. लोखंडे यांनी सांगितले.

                                                                00000

 

स्वराज्य, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा मंगल दिवस - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 








शिवराज्याभिषेक दिन सोहळा

स्वराज्य, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा मंगल दिवस

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. ६ : शिवराज्याभिषेक दिन हा स्वराज्य, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा मंगल दिवस आहे. हा खऱ्या अर्थाने रयतेचा उत्सव आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे सीईओ अविश्यांत पंडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रांगोळ्या आणि फुलांच्या माळांनी सजलेले प्रांगण, छात्रसेनेच्या पथकाची वाद्यवृंदासह सलामी, भगवे फेटे घालून मान्यवरांचा सहभाग, बालशिवाजीच्या रूपात उपस्थित विद्यार्थी, तुतारीचे आसमंत निनादून टाकणारे सूर अशा मराठमोळ्या व मंगलमय वातावरणात सोहळ्याला सुरुवात झाली. ‘गर्जा महाराष्ट्र माझा…’ महाराष्ट्रगीताच्या सुरांनी वातावरण अधिक चैतन्यमय केले. पालकमंत्री श्रीमती ठाकूर, तसेच श्री. पंडा व विविध मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून वंदन केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वराज्याची गुढीही यावेळी उभारण्यात आली.

 छत्रपती शिवराय हे लोककल्याणकारी राज्याची स्थापना करणारे लोकहितैषी सहिष्णू आदर्श राजा म्हणून जगभर वंदिले जातात. त्यांनी जनसामान्यांचे स्वराज्य स्थापन करत  प्रजाहितदक्ष राज्यव्यवस्थेचे उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले. शिवराज्याभिषेक दिन  हा स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा पवित्र दिवस आहे, असे मनोगत पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाला विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

‘क्रेडिट आऊटरिच कॅम्प’द्वारे बुधवारी होणार विविध योजनांचे लाभवितरण

 

आझादी का अमृत महोत्सव

क्रेडिट आऊटरिच कॅम्पद्वारे बुधवारी होणार विविध योजनांचे लाभवितरण

अमरावती, दि. 6 : ‘आयकॉनिक वीकअंतर्गत विविध योजनांचे लाभार्थी व ग्राहकांना मिळणा-या सेवेची परिणामकारता वाढविण्यासाठी आर्थिक संस्था व बँकांच्या सहभागातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यात लीड बँकेतर्फे बुधवारी (दि. 8 जून) सकाळी 10 वाजता नियोजनभवनात ‘क्रेडिट आऊटरिच कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती लीड बँकेचे व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा यांनी दिली.

आर्थिक सेवांप्रति लाभार्थी, ग्राहक यांचा विश्वास वाढविणे, सेवेची परिणामकारता वाढविणे यासाठी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्याचअनुषंगाने बुधवारी कॅम्पचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी नुकतीच निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकही झाली. लीड बँकेचे व्यवस्थापक श्री. झा, नाबार्ड बँकेचे जिल्हा विकास व्यवस्थापक राजेंद्र राहाटे यांच्यासह अनेक बँकर्स उपस्थित होते.

अटल पेंशन योजना, जीवन ज्योती, जीवन विमा, सुकन्या समृद्धी योजना यासह विविध ‘फ्लॅगशिप प्रोग्राम व योजनांच्या लाभाचे प्रत्यक्ष वितरण यावेळी प्रमाणपत्र, धनादेश देऊन करण्यात येणार आहे.  विविध मान्यवर पदाधिकारी, अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी माहिती व्यवस्थापक श्री. झा यांनी दिली.

00000

 

पंतप्रधानांच्या हस्ते ‘आयकॉनिक वीक’चा दिल्लीत शुभारंभ अमरावतीत कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण; सीएभवनात कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

 





आझादी का अमृत महोत्सव

पंतप्रधानांच्या हस्ते ‘आयकॉनिक वीकचा दिल्लीत शुभारंभ

अमरावतीत कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण; सीएभवनात कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

 

अमरावती दि. 6 (विमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘आझादी का अमृत महोत्सव उपक्रमात ‘आयकॉनिक वीकचा शुभारंभ नवी दिल्लीत विज्ञानभवनात आज झाला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण व विशेष कार्यक्रम प्रधान मुख्य प्राप्तीकर आयुक्त कार्यालयातर्फे अमरावतीतील सीएभवनात घेण्यात आला. त्याला शहरातील अनेक मान्यवर, बँकर्स, सीए, अधिवक्ते, आर्थिक विश्लेषक, अभ्यासक आदींची मोठी उपस्थिती होती.

दिल्लीत प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणा-या समारंभाचे थेट प्रसारण देशातील 75 प्रमुख शहरांत करण्यात आले. त्यात अमरावतीचाही समावेश होता. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी सहाय्यकारी ठरणा-या जन-समर्थ पोर्टलचा शुभारंभ यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते झाला. देशातील सर्वच क्षेत्रांत सर्वसमावेशक विकासप्रक्रियेला गती देण्यासाठी जनसमर्थ पोर्टल उपयुक्त ठरेल. विविध मंत्रालयांच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी गरजू व्यक्तींना पोर्टलची मदत होईल. यामुळे योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीसह युवकांमध्ये उद्यमशीलता वाढीस लागेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. 

 प्राप्तीकर उपायुक्त प्रमोद शाहाकार, सह प्राप्तीकर आयुक्त तुषार इनामदार, अमरावती सीए संस्थेचे उपाध्यक्ष विष्णुकांत सोनी, सचिव मधुर झंवर, टॅक्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश मुंधडा, सचिव संदिप अग्रवाल, चेंबर ऑॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष सुरेश जैन, लीड बँकेचे व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा, प्राप्तीकर अधिकारी साधना देवपुजारी, चेतन देशमुख, आलम हुसेन आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय अर्थ मंत्रालय व कॉर्पोरेट कार्य मंत्रालयांतर्गत विविध प्रशासकीय सुधारणा, त्याची देशाच्या आर्थिक विकासातील भूमिका यांचे दर्शन या कार्यक्रमातून घडले. यावेळी डिजीटल प्रदर्शनाचा शुभारंभ व विविध मूल्यांच्या पाच नाण्यांच्या विशेष आवृत्तीचे लोकार्पण पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते झाले. ‘मनी फ्लोज, नेशन ग्रोज हा लघुपटही यावेळी दाखवला गेला.

 

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ, वित्तीय सेवा विभाग, महालेखानियंत्रक, अरूण जेटली राष्ट्रीय वित्तीय प्रबंधन संस्था, अर्थ मंत्रालय, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या विविध विभागांद्वारे आजपासून 11 जूनपर्यंत अनेक कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत, असे श्री. शाहाकार यांनी यावेळी सांगितले.

 

00000

Friday, June 3, 2022

माहेरावरून श्री रुक्मिणीमाता निघाली सासरला श्री रूक्मिणीमातेची पालखी पंढरपूरला मार्गस्थ पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन

 













माहेरावरून श्री रुक्मिणीमाता निघाली सासरला

श्री रूक्मिणीमातेची पालखी पंढरपूरला मार्गस्थ

पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन

 

श्री क्षेत्र कौंडण्यपूर, दि. ३ : विदर्भातील ४२७ वर्षांची प्राचीन परंपरा असलेली श्री रुक्मिणी मातेची पालखी श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे रवाना झाले. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी श्री रुक्मिणीमातेची पालखी खांद्यावर वाहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ केली.

पालखीचा घोडा, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या वारकरी भगिनी, सुशोभित रथ, टाळ-मृदंगाचा निनाद, ‘ज्ञानबा तुकाराम’चा जय घोष अशा उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पालखीने मार्गक्रमण सुरु केले. यावेळी भक्तिमय अभंगवाणी व टाळमृदंगाच्या साथीने आसमंत निनादून गेले होते. कोविड साथीमुळे दोन वर्षाच्या निर्बंध संपल्यानंतर मुक्त वातावरणात पालखी निघाल्यामुळे वारकरी बांधवांमध्ये उत्साह संचारला होता.

पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते प्रारंभी पालखीचे पूजन झाले. पालकमंत्र्यांनी श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी भक्त भगिनींसमवेत फुगडी खेळली व पालखी खांद्यावर वाहून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ केली.

श्री कौंडण्यपूर येथील पालखीला मोठी परंपरा आहे. दोन वर्षानंतर पायी वारी निघत असल्याचा मोठा आनंद आहे. रुक्मिणी माता माहेरवरून सासरला निघाली आहे. ‘राज्यात यंदा सर्वत्र चांगला पाऊस होऊ दे. धनधान्य पिकू दे. बळीराजा समृद्ध होऊ दे. सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे’, अशी प्रार्थना पालकमंत्र्यांनी यावेळी केली.

पालखीच्या स्वागतासाठी अमरावती येथे 6 जूनला कार्यक्रम होईल. यावेळी तीन रूग्णवाहिकांचे लोकार्पणही होणार आहे. त्यातील एक रुग्णवाहिका पालखीसमवेत जाणार आहे. डॉक्टरसमवेत सर्व उपचार सुविधा त्यात उपलब्ध असतील. पालखीसमवेत पाण्याच्या टँकरचेही नियोजन करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ह. भ. प. संजय महाराज ठाकरे, ह. भ. प. नामदेवराव अंबाडकर, ह. भ. प. वसंतराव डाये यांच्यासह अनेक मान्यवर व भक्तगण उपस्थित होते.

00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...