Saturday, August 6, 2022

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी


अमरावती दि. 6 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 6 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.69), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.23), अरुणावती (329.86), बेंबळा (266.50), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (346.65), वान (406.85), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.59), पेनटाकळी (557.20), खडकपूर्णा (520.00).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (444.38), चंद्रभागा (503.45), पूर्णा (449.38), सपन (509.50), पंढरी (426.70), गर्गा (344.30), बोर्डीनाला (361.60),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.83), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (391.40), मोर्णा (366.97), उमा (343.35), घुंगशी बॅरेज (254.70), वाशिम जिल्ह्यातील अडाण (380.26), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (402.50), पलढग (401.94), मस (324.50), कोराडी (545.25), मन (373.25), तोरणा (403.50), उतावळी (370.50) आहे.   


000000

Thursday, August 4, 2022

जिल्हास्तरीय नेहरु हॉकी क्रीडा स्पर्धा आयोजन व स्पर्धा नोंदणीबाबत.

 

  

जिल्हास्तरीय नेहरु हॉकी क्रीडा स्पर्धा आयोजन व स्पर्धा नोंदणीबाबत.

 

अमरावती, दि.4: जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, द्वारे जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेचे आयोजन दिनांक 5 ऑगस्ट, 2022 रोजी 15 वर्ष मुले, 17 वर्ष मुली दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी 17 वर्षा आतील मुले या वयोगटात करण्यात आयोजन विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, येथे करण्यात येणार आहे.

15 वर्षाआतील मुलांकरीता वयोमर्यादा दिनांक 01.11.2007 नंतर जन्मलेला असावा. 17 वर्षा आतील मुले व मुलींकरीता 01.11.2005 नंतर जन्मलेला असावा जिल्हास्तर नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन सन 2022-23 ऑनलाईन नेहरु हॉकी क्रीडा स्पर्धा नोंदणी बाबत सर्व अमरावती जिल्ह्यातील शाळा, संस्था, प्राचार्य, मुख्याध्यापक, तालुका संयोजक, शारीरिक शिक्षक यांना विनंती करण्यात येते की, जिल्हास्तर नेहरु हॉकी क्रीडा स्पर्धेकरीता https://amravati.mahadso.co.in/school/ या वेबसाईटवर प्राथमिक नोंदणी (नोदणी शुल्क), खेळाडू नोंदणी, स्पर्धा सहभाग याप्रमाणे नोदणी करण्यात यावी. सदर स्पर्धा आयोजन दि. 5 व 6 ऑगस्ट 2022 या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, येथे वयोगट निहाय आयोजित करण्यात आलेला असून अंतिम नोंदणी दि. 4 ऑगस्ट 2022 सायंकाळी 6 पर्यंत राहील. फक्त ऑनलाईन नोंदणी केलेल्या संघांनाच सहभागी होता येईल. कुठल्याही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही व संघ खेळविला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच ऑनलाईन नोंदणी केल्याची प्रवेशीका हार्ड कॉपी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे दि. 4 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयात जमा करावी. स्पर्धेस येतांना 1) किट, 2) ऑनलाईन प्रवेशीका हार्ड कॉपी, 3) ऑनलाईन ओळखपत्र, 4) जन्म दाखला, 5) आधारकार्ड सोबत घेऊन यावे.

असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी, श्रीमती वर्षा साळवी,यांनी केले आहे.

 

00000

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या गुणवंत विद्यार्थ्याना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचंअर्ज सादर करण्यास मुदतवाढ

 

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या गुणवंत विद्यार्थ्याना परदेशात शिक्षणासाठी 

शिष्यवृत्तीचंअर्ज सादर करण्यास मुदतवाढ

अमरावती, दि.4: इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागासवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणा करिता शिष्यवृत्ती निवडीसाठी दिनांक  5 ऑगस्ट 2022  पर्यत अर्ज सादर करण्यासाठी विभागा कडुन मुदत वाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विमुक्त जाती,  भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व  विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्याना परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्या करिता शिष्यवृत्ती देण्यात येते. या करिता विद्यार्थी विजाभज, इमाव व विशेष मागास प्रवार्गातील व महाराष्ट्रातील रहिवासी असावा, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी वय वर्ष 35 व पीएचडीसाठी 40  वर्ष ही कमाल वयो मर्यादा असावी.कुटुंबाचं वार्षीक उत्पन्न रु.8  लाखां पेक्षा जास्त नसावे. तसेच या पुर्वी इतर कोणत्या ही राज्य अथवा केंद्र शासना कडुन परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत ज्या विद्यार्थ्यानी परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम व पीएचडी अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी योजनेचा लाभ घेतला आहे. असे विद्यार्थी पात्र असणार नाही. पुर्णवेळ अभ्यासक्रमाचे प्रवेशित विद्यार्थ्यानाच हि योजना लागु असेल. विद्यार्थ्यानी प्रवेश घेतलेली शिक्षण संस्था ही जगातील क्रमवारीत THE(Times/HigherEducation) किंवा OS (OuacquareiliSymodes) Ranking 200 च्या आत असावी. शिष्यवृत्ती द्या वयाच्या एकुण जागां पैकी 30 टक्के जागा मुलीसाठी राखीव असतील. अन्य अटि व शर्ती  या सविस्तर जाहीरतीमध्ये  तसेच विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग शासन निर्णय दिनांक 11 ऑक्टोबर 2018 मध्ये नमुद केल्याप्रमाणे लागू राहतील.   अर्जाचा नमुना शासन निर्णय शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अटि व  शर्ती तसेच इतर सविस्तार माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी. सा वेबसाईट वरुन अर्ज डाऊन लोड करून तो परिपुर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक 5 ऑगस्ट 2022 पर्यत सादर करावेत. या योजनेच्या माध्यमातुन विद्यार्थ्याना विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पुर्ण रक्कम दिली जाते. वैयक्तिक आरोग्य विमा खर्च, विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DOPT  विभागाने ठरवून  दिलेल्या  दराप्रमाणे अथवा महाराष्ट्र  शासनाने  वेळोवेळी  जाहिर केलेल्या दराप्रमाणे रक्कम निवार्ह भत्ता म्हणुन अनुज्ञेय असेल. विद्यार्थ्यास परदेशात जातांना व  अभ्यासक्रम यशस्वीरित्या पुर्ण केल्यानंतर परत येतांना विमान प्रवासा चा खर्च अनुज्ञेय असेल. तेव्हा या शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यानी दि. 5 ऑगस्ट 2022 पर्यत आपले अर्ज सादर करुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी या योजनेचा लाभ घ्यावा.

असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग श्री. सुनिलवारे यांनी केलेआहे.

000

 

हर घर तिरंगा अभियान

 

 

हर घर तिरंगा अभियान

 

अमरावती, दि. 04 :  हर घर तिरंगा अभियान हा कार्यक्रम शासनाने राबविण्याचे ठरविले आहे. व सदर  अभियान यशस्वी करण्यासाठी टपाल कार्यालयात 25/- रूपयात एक तिरंगा ध्वज उपलब्ध केलेला आहे.खेडोपाडी पोस्टमन  घरोघरी जाऊन हे ध्वज वितरित करणार आहे. या तिरंगा वाटप मोहिमेच्या अंतर्गत अमरावती पोस्टल विभागातील सर्व टपाल कार्यालयाला 14,500 तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्वतंत्र्यदिनी प्रत्येककांनी आपल्या घरावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवावा,

 असे आवाहन शासनाने केले आहे. या अभियानात  कागदी ध्वज किंवा प्लास्टिकचे ध्वज देण्याएवेजी कापडी ध्वज देण्याची योजना शासनाने आखली आहे. या तिरंगा ध्वजाचा आकार 20/30 आहे भारतातील प्रत्येक कानाकोप-यातील गावागावातील घरोघरी तिरंगा ध्वज पोहचविण्याची जवाबदारी शासनाने टपाल खात्यावर सोपवली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत प्रत्येक घरावर तिरंगा दिसणार आहे. घरपोच तिरंगा मिळवण्यासाठी Epost office पोर्टल वर लॉगिन करून ऑर्डर करण्याचे आवाहन मा.अधीक्षक डाकघर आबाराव इंगळे यांनी केले आहे. 

000

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 121 जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 121 जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 

अमरावती, दि.4: नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार अंतर्गत डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 121 जयंती, दिनांक 6 जुलै 2022 ला मोठ्या उत्साहात मा गायत्री बहुउद्देशिय शिक्षण संस्था नवसारी  येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णकुमार अग्रहवाल तसेच प्रमुख वक्ते म्हणून  तुषार भडंग यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.मार्गदर्शनात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी कोण होते तसेच त्यांचा जीवनकाळ या सोबतच भारतात अनेक महापुरुष होऊन गेलेत त्या सर्वांनमध्ये एक सामान्य बाब आहे ती म्हणजे गरिबांसाठी जनसामान्यांसाठी झटण्याची तळमळ याबद्दल सांगण्यात आले. आपण त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनामध्ये महापुरुषांच्या आयुष्यातून धडे घेण्याचे आवाहन प्रमुख अतिथी तुषार भडंग यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता साक्षी कैलास केवटी (तालुका स्वयंमसेवक ने.यु.के.)हिने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार मा गायत्री बहुद्देशीय शिक्षण संस्था येथिल सहशिक्षिका कु.स्नेहल इंगोले यांनी मानले.

0000

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ग्रामीण नागरिकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेत आता ऑनलाईन प्रणाली - जि. प. सीईओ अविश्यांत पंडा

 


स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

ग्रामीण नागरिकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेत आता ऑनलाईन प्रणाली

- जि. प. सीईओ अविश्यांत पंडा

          अमरावती, दि. 4 : जिल्हा परिषदेमधील तक्रारींचा वेळेत निपटारा व्हावा आणि तक्रारदारांना तत्काळ न्याय मिळण्यासाठी ऑनलाइन तक्रार प्रणाली निर्माण करण्यात आली आहे.  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त  येत्या 15 ऑगस्ट रोजी ही प्रणाली कार्यान्वित होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज येथे दिली.

जिल्हा परिषदेच्या पोर्टलवर आता तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र टॅब निर्माण करण्यात आला आहे. या पोर्टलचा पत्ता complaints.zpamtportal.com असा आहे. जिल्हा परिषदेत ग्रामीण भागातील नागरिक वेगवेगळ्या विभागांकडे तक्रारी नोंदवतात. त्यावर न्याय मिळत नाही. साधे उत्तरही मिळत नाही, अशीही तक्रार होते. हे लक्षात घेऊन ऑनलाईन तक्रार प्रणाली सुरू करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिका-यांनी घेतला आहे.

  या सुविधेमुळे संबधितांनी कोणत्या विभागाकडे काय तक्रार केली आहे, तसेच संबंधित विभागाने त्याचा सात दिवसांच्या आत निपटारा केला आहे किंवा कसे, हे तपासता येणार आहे. जे ग्रामीण बांधव ऑनलाईन तक्रार करू शकत नाहीत, त्यांच्याकडून ऑफलाईन येणा-या तक्रारी दाखल होताच त्या ऑनलाईन केल्या जातील व संबंधित विभागाला त्याचा सात दिवसांत निपटारा करणे आवश्यक राहील. तक्रार प्रलंबित राहिल्यास त्याचे स्पष्टीकरणदेखील संबंधित अधिकारी किंवा कर्मचा-याने मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तक्रारदार यांना देणे आवश्यक आहे. तशीही तरतूद या प्रणालीत आहे.

 

          तक्रारींच्या स्वरूपानुसार वर्गीकरण करण्यात येणार आहे.  प्राधान्याने निराकरण करावयाच्या तक्रारी अ गटात, निराकरणास काहीसा वेळ लागू शकेल अशा तक्रारी ब गटात, ज्या प्रकरणी चौकशी आवश्यक वाटते त्या तक्रारी क गटात टाकण्यात येतील. वर्गीकरणाचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिका-यांचा असेल. या प्रक्रियेचे प्रमुख नोडल अधिकारी हे सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतील. त्याचप्रमाणे, प्रत्येक विभागातील कर्मचा-यांतून विभागनिहाय नोडल अधिकारी नियुक्त केले जातील. 

     ग्रामीण भागातील नागरिकांनी  आपल्या समस्या सोडविण्यासाठी ऑनलाईन तक्रार प्रणालीचा वापर करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंडा यांनी केले आहे. 

 

00000

‘सुपर स्पेशालिटी’त शस्त्रक्रिया यशस्वी आईने किडनी देऊन मुलाचा जीव वाचवला; दोघेही सुखरूप

 







‘सुपर स्पेशालिटी’त शस्त्रक्रिया यशस्वी

आईने किडनी देऊन मुलाचा जीव वाचवला; दोघेही सुखरूप

 

अमरावती, दि. 4 : किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या युवकावर विभागीय संदर्भ रूग्णालयाच्या चमूने किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. या युवकाला त्याच्या आईने किडनी दिली असून, शस्त्रक्रियेनंतर बरे झाल्यानंतर युवकास आज घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी याप्रसंगी उपस्थित राहून युवकाशी संवाद साधून त्याला शुभेच्छा दिल्या. डॉ. श्रीकांत महल्ले, डॉ. मंगेश मेंढे आदी उपस्थित होते. अमर  खराटे हा युवक बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवाशी असून, त्याचे वय 36 वर्ष आहे. त्याच्या आई रत्नमाला खराटे या 58 वर्षांच्या आहेत. श्री. खराटे यांना गत अडीच वर्षांपासून किडनीचा विकार होता. त्यांना शस्त्रक्रियेबाबत सल्ला डॉक्टरांनी दिला होता. अमरच्या आई रत्नमाला खराटे यांनी आपल्या मुलाला किडनी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विभागीय संदर्भ रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित झाले. नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. निखील बडनेरकर यांनी याबाबत मार्गदर्शन केले. 

आवश्यक त्या सर्व तपासण्या होऊन दि. 21  जुलैला अमर यांना विभागीय संदर्भ रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर 22 जुलैला यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर बरे झाल्यामुळे त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. शल्यविशारद डॉ. संजय कोलते, डॉ. राहूल पडोळे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. राहूल धुळे, तसेच बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. प्रणित घोडमारे, डॉ. पौर्णिमा वानखडे, डॉ. बाळकृष्ण बागवाले यांच्या चमूने ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, डॉ. श्रीकांत महल्ले आदींनी  मार्गदर्शन व सहकार्य केले.

 

कोविडकाळानंतर विभागीय संदर्भ रूग्णालयात यशस्वीपणे पूर्ण झालेली ही 14 वी शस्त्रक्रिया आहे. रुग्णालयात तज्ज्ञांची चमू, विशेषोपचार उपलब्ध आहेत. गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी यावेळी केले. 

 

00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...