Tuesday, September 26, 2023

10 ऑक्टोंबरपर्यंत कलम 144 लागू

 10 ऑक्टोंबरपर्यंत कलम 144 लागू

 

               अमरावती, दि. 26:  जिल्हा जातीय व राजकीयदृष्टया संवेदनशील आहे. आगामी काळात 28 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन तसेच ईद ए मिलाद मुस्लीम धर्मियांचा उत्सव आहे. या कालावधीत मिरवणुका, विविध धार्मीक व साजाजिक कार्यक्रम, आंदोलने दरम्यान सामाजिक माध्यमाव्दारे आक्षेपार्ह संदेश प्रसारीत झाल्याने काही ठिकाणी वेगवेगळया कारणावरुन जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच जातीय सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था बाधीत होऊ नये व जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी, यासाठी 10 ऑक्टोंबर 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 चे प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी लागू केले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तींविरुध्द कारवाई करण्यात येईल. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.  

0000

अटल अर्थसहाय्य योजना; अशासकीय सदस्यांच्या नेमणूकीसाठी अर्ज मागविले

 अटल अर्थसहाय्य योजना; अशासकीय सदस्यांच्या नेमणूकीसाठी अर्ज मागविले

 

            अमरावती, दि. 26: सहकार व वस्त्रोद्योग विभागाव्दारे सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना राबविण्यात येते. या योजनेची अमंलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीसाठी नवीन अशासकीय सदस्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छुक पात्र व्यक्तीनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एस. एस. कुंभार यांनी केले आहे.

 

            राज्यस्तरीय समितीच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय समितीसाठी नवीन अशासकीय सदस्याची नियुक्ती करायची आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय व अर्धशासकीय आस्थापनावर, संस्थावर कामकाजाचा अनुभव असणाऱ्या सेवानिवृत्त व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी सहकारी कार्यालयाकडे अटल अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अशासकीय सदस्यपदी नियुक्तीसाठी अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सहकार संकुल पहिला माळा, कांतानगर, अमरावती येथे संपर्क साधावा.

0000

अंमली पदार्थांच्या वापराला प्रतिबंधासाठी सर्व विभागांने पुढाकार घ्यावा;समितीच्या बैठकीत चर्चा

 अंमली पदार्थांच्या वापराला प्रतिबंधासाठी सर्व विभागांने पुढाकार घ्यावा;समितीच्या बैठकीत चर्चा

 

               अमरावती, दि. 26 : अंमली पदार्थ वापराच्या प्रतिबंधाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक आहे. अंमली पदार्थांची विक्री जास्त होणाऱ्या परिसरात संबधित विभागाने वेळोवेळी तपासणी करावी. व्यसनमुक्ती केंद्राशी समन्वय ठेवून या सामाजिक प्रश्नाला आळा घालण्यासाठी  सर्व विभागांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांनी केले.

 

            अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून जिल्हास्तरीय अंमली  पदार्थ विरोधी कार्यकारी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांची पोलिस आयुक्तालयात आज बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसिलदार प्रशांत पडघन, टपाल विभागाचे सहायक अधिक्षक अतुल काळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अरविंद गभणे, कृषी उपसंचालक विभागाचे उज्ज्वल आगरकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.स्वाती सोनोने, अन्न व औषध प्रशासनाचे वैभव सुपसांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

             अंमली पदार्थांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम,  टपालाच्या माध्यमातून अंमली पदार्थांची मागणी व पुरवठा होणार नाही तसेच जिल्ह्यात खसखस किंवा गांजा पिकाची अवैध लागवड होणार नाही याची दक्षता घेणे, व्यसनमुक्ती केंद्रांशी समन्वय राखणे, दाखल झालेल्या व्यक्तींना कोणत्या अंमली पदार्थांचे व्यसन आहे याबाबतची माहिती, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती अभियान राबवणे,  पोलीस, अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो  व राज्य उत्पादन शुल्क यांनी केलेल्या कारवायांच्या माहितीचा डेटाबेस तयार करणे, अंमली पदार्थांविरुध्द गुन्हे व करावयाची कार्यवाहीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

 

          औषध विक्रेत्यांकडून अनेकदा प्रिस्किप्शनशिवाय औषधे दिली जातात. बंदी घातलेल्या औषधांतील काही ठराविक घटक असलेली वेगळी औषधेही निरनिराळ्या नावाखाली उपलब्ध असतात. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिक्रिप्शनशिवाय औषधांची विक्री होता कामा नये. याबाबत मेडिकल स्टोअर्सची नियमित तपासणी करावी. टपाल विभागाने पार्सल प्राप्त करणाऱ्याची चौकशी करुन व त्या पार्सलमध्ये काय आहे याची तपासणी करुनच संबंधित व्यक्तीला पार्सल सुपूर्द करावे. बंद पडलेल्या कारखान्यांत अनेकदा रात्रीच्या वेळी अवैध उत्पादन निर्मितीचे प्रकार पूर्वी घडले आहेत. तसे घडू नये, यासाठी वेळोवेळी तपासण्या करण्याचे निर्देश श्री. आठवले यांनी  यावेळी दिले.

 

00000

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

                                                     शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू

 

 अमरावती, दि. 26 :  शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 

             सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात  लागू  करण्यात आला असून तो 8 ऑक्टोंबर  2023 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  नविनचंद्र रेड्डी  यांनी कळविले आहे.

000000

मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणासाठी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध; 29 सप्टेंबरपर्यत हरकती, आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

                          मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणासाठी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध;

29 सप्टेंबरपर्यत हरकती, आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 26 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदारयादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमांतर्गत पूनरिक्षण पूर्व उपक्रमाचा एक भाग म्हणून दि. 29 सप्टेंबरपर्यंत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्यात येत आहे. यासाठी मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणासाठी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत दि. 29 सप्टेंबर 2023 पर्यत हरकती, आक्षेप नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघा अंतर्गत येणाऱ्या एकूण 2657 यादी भागांमध्ये राबविण्यात येत आहे.  कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुर्व पुनरिक्षण उपक्रमाचा एक भाग म्हणुन दि. 29 मे 2023 रोजीच्या भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार दि. 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 पर्यंत मतदारांची पडताळणी करण्यासाठी सर्व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत गृह भेटीचा उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच दि. 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व पुर्नरचना देखील करण्यात येत आहे.

 अमरावती जिल्ह्यातील एकुण 8 विधानसभा मतदार संघामध्ये मिळुन एकत्रितरित्या मतदान केंद्राच्या नावातील बदलाचे एकुण 9 मतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे एकुण 59 मर्ज करण्यात आलेले 8 मतदान केंद्र व भारत निवडणुक आयोगाकडील निर्देशानुसार 2 कि.मी.चे वर अंतर असल्याने व नैसर्गिक अडथळ्यामुळे नव्याने प्रस्तावित मतदार केंद्राची संख्या 7 आहे असे एकुण 83 मतदान केंद्राच्या सुसुत्रीकरण व पुर्नरचनेचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहे. प्रस्तावित बदल हे सर्व विधानसभा मतदार संघाचा मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयाकडून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांचे कार्यालयास मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत भारत निवडणुक आयोग यांचेकडे मंजुरीसाठी पाठविण्याकरीता प्राप्त झालेले आहेत. प्रस्तावित बदल व अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्राची यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. याबाबत कोणत्याही मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी यांना सुचना द्यावयाची असल्यास या कार्यालयात सूचना देऊ शकतात.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि. 17 ऑक्टोंबर 2023 रोजी एकत्रित रित्या प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. नमुद बदलाचे प्रस्ताव भारत निवडणुक आयोगाकडुन मंजूर झाल्यास एकत्रित रित्या प्रसिध्द होणाऱ्या प्रारूप मतदार यादीमध्ये सदरचे बदल अंमलात येतील व त्या आधारे मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व पुर्नरचना देखील अस्तित्वात येईल.  प्रस्तावाबाबत मान्यताप्राप्त राजकीय पक्षाची काही हरकत असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास नोंदविण्यात यावी.

000000

मेरी माटी मेरा देश; अमृत कलश यात्रा व स्वच्छता पंधरवाडा निमित्य भातकुली नगर पंचायत येथे प्रभात फेरी: मान्यवरांनी दाखविली हिरवी झेंडी

                        मेरी माटी मेरा देश; अमृत कलश यात्रा व स्वच्छता पंधरवाडा निमित्य

भातकुली नगर पंचायत येथे प्रभात फेरी: मान्यवरांनी दाखविली हिरवी झेंडी

 

               अमरावती, दि. 26 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अनुषंगाने, मेरी माटी मेरा देश  अभियान अंतर्गत भातकुली येथील नगर पंचायत येथे अमृत कलश यात्रा व स्वच्छता पंधरवाडा निमित्त आज जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केली. यावेळी नगरपंचायातीचे नगराध्यक्षा योगिता राजु कोलेटके तसेच नगरपंचायत सभापती, उपसभापती, नगरसेवक आदी उपस्थित होते.

 

कलश यात्रा व प्रभात फेरीची सुरुवात शहरातील आठवडी बाजार येथून नगरपंचायत वाचनालय मार्गे जात असताना शहरात ठिकठिकाणी अमृत कलश यात्रेचे पूजन करून वाजत गाजत स्वागत करण्यात आले. अमृत कलश यात्रेचा समारोप महर्षी वाल्मिकी चौक येथे करण्यात आला. कलश यात्रेमध्ये मुख्याधिकारी रविन्द्र पाटील, कार्यालय अधिक्षक मयुर बेहरे, कर निरिक्षक दिपक खोब्रागडे, शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, नगरपंचायतीचे कर्मचारी, सफाई कामगार व गणमान्य व्यक्तींनी विशेष सहभाग घेतला होता.

 

               आपल्या भारत देशाच्या रक्षणासाठी ज्या वीर शूर सैनिकांनी देशासाठी लढत असताना सीमेवर बलिदान दिले त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व त्यांची अमरज्योत ही कायम राहावी या उद्देशाने मेरी माटी मेरी अभियान संपूर्ण भारतात राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज अमृत कलश यात्रा वाजतगाजत भातकुली नगरपंचायती मार्फत काढण्यात आली.

000000


माहिती अधिकार दिनानिमित्त जनजागृतीपर उपक्रम राबवा; राज्य माहिती आयोगाचे आवाहन

                             माहिती अधिकार दिनानिमित्त जनजागृतीपर उपक्रम राबवा;

राज्य माहिती आयोगाचे आवाहन

          अमरावती, दि. 26: माहितीचा अधिकारी अधिनियमाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सर्व शासकीय कार्यालयाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून  जनजागृती मोहिम राबवावी, असे आवाहन राज्य माहिती आयोगाचे उपसचिव देविसिंग डाबेराव यांनी केले आहे.

          माहितीचा अधिकारी अधिनियम, 2005 चे कलम 4अंतर्गत प्रत्येक कार्यालयाने जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांची नावे व पदनाम दर्शविणारे फलक लावणे आवश्यक असून नियमित अद्यावत करणे आवश्यक आहे. माहिती अधिकार अन्वये सादर केलेल्या अर्जात भ्रमणध्वनी, ई-मेल आयडीची नोंद करण्यासंदर्भात अर्जदारांना सूचना द्यावी. तसेच याबाबत मार्गदर्शनपर सुचना कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावण्यात यावे. माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून प्रत्येक कार्यालयाने जनजागृती मोहिम राबवावी, असेही आवाहन पत्रव्दारे करण्यात आले आहे.

000000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...