Tuesday, September 26, 2023

अंमली पदार्थांच्या वापराला प्रतिबंधासाठी सर्व विभागांने पुढाकार घ्यावा;समितीच्या बैठकीत चर्चा

 अंमली पदार्थांच्या वापराला प्रतिबंधासाठी सर्व विभागांने पुढाकार घ्यावा;समितीच्या बैठकीत चर्चा

 

               अमरावती, दि. 26 : अंमली पदार्थ वापराच्या प्रतिबंधाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक आहे. अंमली पदार्थांची विक्री जास्त होणाऱ्या परिसरात संबधित विभागाने वेळोवेळी तपासणी करावी. व्यसनमुक्ती केंद्राशी समन्वय ठेवून या सामाजिक प्रश्नाला आळा घालण्यासाठी  सर्व विभागांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांनी केले.

 

            अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून जिल्हास्तरीय अंमली  पदार्थ विरोधी कार्यकारी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांची पोलिस आयुक्तालयात आज बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसिलदार प्रशांत पडघन, टपाल विभागाचे सहायक अधिक्षक अतुल काळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अरविंद गभणे, कृषी उपसंचालक विभागाचे उज्ज्वल आगरकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.स्वाती सोनोने, अन्न व औषध प्रशासनाचे वैभव सुपसांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

             अंमली पदार्थांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम,  टपालाच्या माध्यमातून अंमली पदार्थांची मागणी व पुरवठा होणार नाही तसेच जिल्ह्यात खसखस किंवा गांजा पिकाची अवैध लागवड होणार नाही याची दक्षता घेणे, व्यसनमुक्ती केंद्रांशी समन्वय राखणे, दाखल झालेल्या व्यक्तींना कोणत्या अंमली पदार्थांचे व्यसन आहे याबाबतची माहिती, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती अभियान राबवणे,  पोलीस, अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो  व राज्य उत्पादन शुल्क यांनी केलेल्या कारवायांच्या माहितीचा डेटाबेस तयार करणे, अंमली पदार्थांविरुध्द गुन्हे व करावयाची कार्यवाहीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

 

          औषध विक्रेत्यांकडून अनेकदा प्रिस्किप्शनशिवाय औषधे दिली जातात. बंदी घातलेल्या औषधांतील काही ठराविक घटक असलेली वेगळी औषधेही निरनिराळ्या नावाखाली उपलब्ध असतात. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिक्रिप्शनशिवाय औषधांची विक्री होता कामा नये. याबाबत मेडिकल स्टोअर्सची नियमित तपासणी करावी. टपाल विभागाने पार्सल प्राप्त करणाऱ्याची चौकशी करुन व त्या पार्सलमध्ये काय आहे याची तपासणी करुनच संबंधित व्यक्तीला पार्सल सुपूर्द करावे. बंद पडलेल्या कारखान्यांत अनेकदा रात्रीच्या वेळी अवैध उत्पादन निर्मितीचे प्रकार पूर्वी घडले आहेत. तसे घडू नये, यासाठी वेळोवेळी तपासण्या करण्याचे निर्देश श्री. आठवले यांनी  यावेळी दिले.

 

00000

No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...