Monday, January 28, 2019

इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन व जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनातून उद्याचे वैज्ञानिक घडतील - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील





            अमरावती, दि. २८ :  विद्यार्थ्यांच्या मनावर ज्ञानविज्ञानाचे महत्व बिंबवून त्यांना शास्त्र व तंत्र अवगत होण्यासाठी इन्स्पायर अवॉर्ड व विज्ञान प्रदर्शन उपयुक्त आहे. अशा उपक्रमांतून उद्याचे वैज्ञानिक घडतील, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले.  
प्रादेशिक विद्या प्राधिकरण व शिक्षण विभागातर्फे अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन व  जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ येथील पी. आर. पोटे महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद प्रेक्षागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. शिक्षण सभापती जयंतराव देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, माध्यमिक शिक्षणाधिकारी ई. झेड. खान, दिलीप निंभोरकर, मुख्याध्यापक संघाचे रवींद्र कोकाटे, पी. आर. पोटे महाविद्यालयाचे प्राचार्य जी. डी. वाकडे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. खेरडे, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष गजानन बुरघाटे, श्री. बुरंगे, श्री. चोपडे आदी उपस्थित होते.            श्री. पोटे पाटील म्हणाले की, मानवी जीवन प्रगत करण्यात विज्ञानाचे मोठे योगदान आहे. इन्स्पायर अवॉर्ड व विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांना स्फूर्ती देणारे आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी म्हणून सतत असे उपक्रम व्हावेत व अधिकाधिक शाळांनी अशा स्पर्धा, उपक्रमात सहभागी झाले पाहिजे.  मार्च महिन्यात संस्थेतर्फे असा भव्य कार्यक्रम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री. देशमुख म्हणाले की, तिन्ही जिल्ह्यांतून विद्यार्थ्यांचे ४०० चमू या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत, हे आश्वासक आहे. नव्या पिढीला विज्ञानाकडे वळविण्यासाठी असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात. विशाल वाघमारे, प्रवीण दिवे, वीरेंद्र रोडे, संगीता शिंदे, प्रा. श्रीमती नायर, विनायक ताथोड आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन उद्या २९ जानेवारीपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.
 

Sunday, January 27, 2019

जिल्हा कृषी महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

          नवे तंत्रज्ञान व प्रयोगशील शेतीसाठी शेतक-यांना प्रोत्साहित करावे
-         पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

-  हजारो शेतक-यांच्या उपस्थितीत प्रारंभ
- प्रयोगशील शेतक-यांचा गौरव
- महोत्सवात मिळणार प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण
- नानाविध फळे, फुले व पीकांचे प्रदर्शन
- कृषी महाविद्यालयाकडून किचन गार्डनची प्रतिकृती सादर
- अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाचे अनेक कक्ष

अमरावती, दि. 27 : जिल्ह्यात शेतीविकासाची मोठी शक्यता लक्षात घेऊन शासनाकडून अनेक महत्वपूर्ण योजनांची अंमलबजावणी होत आहे. त्यानुसार नवे तंत्रज्ञान व प्रयोगशील शेतीसाठी शेतक-यांना प्रोत्साहित करण्यासाठी कृषी यंत्रणा व विविध घटकांनी काम करावे, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले.

कृषी विभागातर्फे अमरावती जिल्हा कृषी महोत्सवाचा शुभारंभ अत्यंत उत्साहात व हजारो शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत प्रारंभ आज येथील सायन्सकोर मैदानावर झाला. त्यावेळी ते बोलत होते.  जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपसंचालक अनिल खर्चान, जिल्हा कृषीविकास अधिकारी कुर्बान तडवी, राष्ट्रीय अन्नसुरक्षा समितीचे जयंत आमले, शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष अरविंद नळकांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

                   पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, शासनाकडून जलयुक्त शिवार योजना, शेततळे, धडक सिंचन विहिरी, कृषीपंप वितरण आदी योजनांतून सिंचनक्षमता व कृषी उत्पादकतेत भर पडली आहे. त्याला गती देण्यासाठी शेतकरी बांधवांना नव्या तंत्रज्ञानाचा वापर, प्रयोग व पूरक व्यवसायाकडे वळविणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने महोत्सवात पीक व्यवस्थापन, मार्केटिंग, बियाणे निर्मिती, पूरक उद्योग याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण, प्रयोगशील शेतक-यांचा गौरव व प्रेरणादायी अनुभवकथन आदींचा समावेश केला आहे. त्याचा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना निश्चितच लाभ होईल.
          ते  पुढे म्हणाले की, निरनिराळ्या पदव्या मिळवलेले ग्रामीण तरूण नोकरी न करता प्रायोगिक शेतीकडे वळत आहेत, हे निश्चित आश्वासक आहे. शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी त्यांनी शेतीसोबत रेशीम उत्पादन, मधमाशीपालन, बांबूलागवड, बांध वृक्षलागवड असे विविध पूरक व्यवसाय केले पाहिजेत.  सकारात्मक दृष्टीने नव्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे. त्यातून निश्चित यश मिळते. रेशीम उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळविणा-या श्री. खडसे या शेतकरी बांधवाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. नैसर्गिक संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी सहाय्य करू, असेही ते म्हणाले.
श्री. देशमुख म्हणाले की, शेतीत उत्पादनवाढीसह विपणन, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर यासाठी शासनाकडून अनेक उपक्रम राबविण्यात येतात.  महोत्सवातही त्याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती मिळणार आहे. शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा.  श्री. नागरे, श्री. नळकांडे  यांनीही मनोगत  व्यक्त केले.
                                       विविध कक्षांना भेटी
                   महोत्सवातील विविध कक्षांना भेटी देऊन तेथील अधिका-यांकडून माहिती जाणून घेतली व महोत्सवात उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधला.                                                         प्रयोगशील शेतक-यांचा सन्मान
मेळघाटातील डोंगराळ भागात यशस्वी शेती करणारे भुलोरीचे दादू जामुनकर, शेततळ्यात यशस्वी मत्स्यपालन करणारे टिटंबा (ता. धारणी) येथील रामगोपाल मावस्कर यांच्यासह अनेक प्रयोगशील शेतक-यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. प्रयोगशील शेतक-यांशी संवाद साधून त्यांनी माहिती जाणून घेतली व त्यांचे कौतुक केले.
                                     
महोत्सवात विविध योजनांची माहिती देणारी शासकीय दालने, कृषी निविष्ठा कक्ष, कृषी तंत्रज्ञान व सिंचन कक्ष, धान्यमहोत्सव, गृहोपयोगी वस्तू आदी 200 कक्षांचा समावेश आहे. शासकीय विभागांबरोबरच कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी व विविध कंपन्या यांचे कक्ष असून, प्रात्यक्षिकातून माहिती दिली जात आहे.  ज्येष्ठ कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन दि. 31 जानेवारीपर्यंत दररोज मिळणार आहे. जिल्ह्यातील स्थानिक उत्पादने लक्षात घेऊन संत्रा पीकाविषयी रोग व्यवस्थापन, बहार व्यवस्थापन याबाबत स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले आहे. कापूस पीकाविषयी नफ्याची शेती, कृषी क्षेत्रात निर्यातीच्या संधी, कुक्कुटपालन, शेळीपालन, औषधी वनस्पती, मत्स्यपालन, पाणलोट व्यवस्थापन व रेशीम उद्योग आदी विविध विषयांवर अनेक मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्याशिवाय शेतक-यांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणा-या यशोगाथांचे सादरीकरण व अनुभवकथन हा महोत्सवाचा केंद्रबिंदू आहे, असे श्री. इंगळे यांनी प्रास्ताविकात सांगितले. श्री. खर्चान यांनी आभार मानले.






Friday, January 4, 2019

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद
कुशल मनुष्यबळासाठी कौशल्याधारित शिक्षणावर भर
- शिक्षणमंत्री विनोद तावडे
विद्यार्थ्यांना त्यांची आवड लक्षात घेऊन त्या विषयात पारंगत केल्यास ते अधिक परिणामकारपणे व प्रभावीपणे काम करतील. हे लक्षात घेऊन कौशल्याधारित शिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले.
श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आमदार सुनील देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, माजी महापौर मिलींद चिमोटे, प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांच्यासह प्राध्यापकगण व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले की, राज्यात ‘थ्री इडियटस्’मधल्या घोकंपट्टीवाल्या चतुरलिंगमऐवजी ‘रँचो’ निर्माण झाले पाहिजेत. विद्यार्थ्याला कौशल्य प्राप्त असेल तर रोजगार निश्चित मिळतो. हे लक्षात घेऊन तशी अभ्यासक्रमाची रचना केली. विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, संगीत, कला, विज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात रुची असलेल्या विद्यार्थ्यांना त्या त्या क्षेत्रात प्रगती करता यावी असा उपयुक्त कौशल्याधारित अभ्यासक्रम रचना करण्यात आली आहे. त्यासाठी शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. काकोडकर, डॉ. विजय भटकर, सोनम वांगचूक यासारख्या मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. विविध प्रकारचे 605 अभ्यासक्रमांच्या रचनेतून विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचे अनेक पर्याय खुले केले. त्याशिवाय, ओपन एसएससी बोर्डाची निर्मिती करण्यात येईल.
शालेय अभ्यासक्रमात पाचवी व आठवीला परीक्षा घेतली जाईल, तसेच प्राध्यापक भरतीही होणार असल्याचे ते म्हणाले. दुष्काळ जाहीर झालेल्या परिसरातील विद्यार्थ्यांना सवलती लागू करण्यात आल्या असून, त्याची अंमलबजावणी सुरु आहे. जिथे अद्यापही अंमलबजावणी झाली नाही, तिथे तत्काळ अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद
यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना श्री. तावडे यांनी मनमोकळी उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात श्री. तावडे यांचे स्वागत केले व त्यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमात त्यांनी स्टेजवरून खाली उतरून विद्यार्थ्यांत मिसळून श्री. तावडे यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आपला कल जाणून त्यानुसार कौशल्ये प्राप्त करा. तसे शिक्षण उपलब्ध करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. महाविद्यालयात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनींनी श्री. तावडे यांच्यासह सेल्फीही घेतली.
वादविवाद स्पर्धेत मार्गदर्शन
या कार्यक्रमानंतर शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात स्व.मानिकराव धवळे स्मृती वादविवाद स्पर्धेलाही श्री. तावडे यांनी भेट दिली. चांगला वक्ता घडण्यासाठी चांगले वाचन व सामाजिक प्रश्नांचे भान असले पाहिजे. ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी खेळाडू गौरव चांदणे व तेजस्विनी दहिकर यांचा गौरव करण्यात आला.



Sunday, December 30, 2018

नियोजन समितीच्या बैठकीत 2019-20 च्या प्रारूप आराखड्यास मान्यता जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांना समान निधीचे वाटप - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील



          अमरावती, दि. 30 : जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी सन २०१९-२०  या वर्षासाठीच्या प्रारूप आराखड्यास आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्हा व जिल्हा परिषदेच्या सर्व क्षेत्रांत निधीचे समान वाटप व्हावे, या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे, असे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी यावेळी सांगितले.
           जिल्हा नियोजन समितीतर्फे २०१९-२० च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यासाठी बैठक पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, आमदार सर्वश्री वीरेंद्र जगताप, बच्चू कडू, रमेश बुंदेले, श्रीमती यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, आदिवासी प्रकल्प अधिकारी राहुल कर्डिले, महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्यासह नियोजन समितीचे विविध सदस्य व विभागप्रमुख उपस्थित होते.
           सभेच्या प्रारंभी दिवंगत माजी आमदार भैय्यासाहेब ठाकूर आणि संजय बंड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांनी व्हीव्हीपॅट यंत्रणेविषयी माहिती दिली. त्याविषयीची चित्रफीत दाखविल्यानंतर समितीच्या सदस्यांनी व्हीव्हीपॅट मशीनवर चाचणी मतदान करून प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.      
          सभेत दि. 12 जानेवारी 2018 रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त कायम करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने मांडलेल्या आराखड्यानुसार, सर्वसाधारण योजनेत २१२ कोटी 86 लाख रुपये, अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी 98 कोटी 92 लाख, तर आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्रासाठी 149 कोटी 46 लाख रुपये निधीच्या वार्षिक आराखड्यास मान्यता देण्यात आली. जिल्ह्यांतर्गत रस्ते व जिल्हा जोडरस्त्यांच्या नियोजित कामांनाही मान्यता देण्यात आली.
जिल्ह्यात सर्व क्षेत्रांत निधीचे समान वाटपाच्या दृष्टीतून योग्य नियोजन करण्यात आले आहे. कुठलेही क्षेत्र वंचित राहू नये, या भूमिकेतून हा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात आला, असे श्री. पोटे पाटील यांनी यावेळी सांगितले.   
विविध विभागांच्या अनेकविध विकासकामांचा समावेश प्रस्तावित आराखड्यात करण्यात आला आहे. सन २०१८-१९ मधील वार्षिक योजनेत आतापर्यंत झालेल्या खर्चाचा आढावाही घेण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी स्वागत केले. जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

Saturday, December 29, 2018

महसूल क्रीडा स्पर्धेत अमरावती जिल्हा उपविजेता

  


अमरावती, दि. 29 :  विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत अमरावती जिल्ह्याने सर्वसाधारण उपविजेता पद पटकावले आहे.
ही तीनदिवसीय स्पर्धा नुकतीच अकोला येथे झाली. विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांच्या हस्ते गुणवंतांना गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, यवतमाळचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अकोल्याचे पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, वाशिमच्या पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे आदी उपस्थित होते.
स्पर्धेत सांस्कृतिक कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, निकेता जावरकर, अक्षय मंडवे व चमूने उत्कृष्ट कामगिरी बजावली. अमरावतीच्या महिला संघाने खो-खो व थ्रो बॉलमध्ये पहिला क्रमांक पटकावला. ज्योती गणोरकर, पल्लवी गोरले, रक्षा डोल्लवार, मंगला सोळंके, पूजा वाहणे, स्वाती चिंचे, लता पुंड आदी खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.  कबड्डी, फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉलमध्ये अमरावतीला दुसरा क्रमांक मिळाला.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी अजय लहाने, संदीप महाजन, शरद पाटील, व्यंकट राठोड, विनोद शिरभाते आदींनी मार्गदर्शन केले.

Friday, December 28, 2018

प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी - विभागीय आयुक्त पीयुष सिंह



अमरावती, दि. 28 :  प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज येथे दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. सिंह यांनी योजनेच्या कामांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, धारणी येथील प्रकल्प अधिकारी राहूल कर्डिले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनंत भंडारी  यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
            श्री. सिंह म्हणाले की, आवास योजनेचे काम प्राधान्याने हाती घ्यावे. एकही गरजू व्यक्ती या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये. त्यासाठी सर्व परिसरात सर्वेक्षण करावे. नेमून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे.
            नियोजनानुसार निधी प्राप्त असलेल्या प्रकल्पाचे बांधकाम तत्काळ सुरु करावे. त्यासाठीची प्रक्रिया खोळंबून राहता कामा नये. ही कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

ईव्हीएम व्हीव्हीपॅटबाबत नागरिकांसाठी जनजागृती प्रशिक्षण व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिकांद्वारे पारदर्शी प्रक्रियेची खातरजमा -विभागीय आयुक्त पीयुष सिंह










 -मतदान केंद्रनिहाय प्रात्यक्षिकाला सुरवात
जिल्हा प्रशासनाची विशेष मोहीम

अमरावती, दि. 28 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रात्यक्षिकाद्वारे विशेष मोहिम हाती घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती
 करण्यात येत आहे.  मोहिमेदरम्यान नागरिकांनी सहभागी होऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅटसंदर्भात शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज तळवेल येथे केले.
           श्री. सिंह यांच्या उपस्थितीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन प्रात्यक्षिक आज चांदूर बाजार तालुक्यातील तळवेल येथे घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार राजेश चव्हाण यांच्यासह तळवेलचे अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.
           प्रारंभी व्हीव्हीपॅट यंत्रांची माहिती देण्यात येऊन त्यानंतर नागरिकांकडून मतदान करण्यात आले. यावेळी प्रात्यक्षिकात ज्या उमेदवाराला मतदान केले, त्यालाच मत मिळाल्याची खातरजमा नागरिकांना करता आली. तरुण, ज्येष्ठ मतदारांसह महिला मतदारांनी या प्रात्यक्षिकात सहभागी होऊन व्हीव्हीपॅट यंत्रणेच्या विश्वासार्हतेचा पडताळा घेतला व समाधान व्यक्त केले.
ज्या नागरिकांचे मतदान यादीत नाव नाही किंवा नुकतेच ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली, त्यांनी तत्काळ मतदान यादीत नाव नोंदविण्याचे आवाहनही यावेळी श्री. सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. देशमुख म्हणाले की, जनतेच्या मनात कुठलाही संभ्रम राहू नये म्हणून व्हीव्हीपॅट यंत्रणेची तरतूद निवडणूक आयोगाने केली आहे. सर्व शंकांचे निरसन प्रात्यक्षिकातून होऊ शकेल, इतकी ही सुस्पष्ट व पारदर्शी प्रक्रिया आहे. नागरिकांनी त्यात सहभागी होऊन निवडणुकीच्या पवित्र व राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे, असेही ते म्हणाले.
मतदान ते मतमोजणी ही संपूर्ण प्रक्रिया कशी पार पडते, याचा पडताळा या प्रात्यक्षिकातून घेता येणार आहे. पोल सुरू झाल्याची व बंद झाल्याच्या वेळांची नोंदही यंत्रणेत असल्याने ही प्रक्रिया अत्यंत अचूक व पारदर्शी आहे.  जिल्ह्यातील मतदान केंद्रावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.  
जिल्ह्यात 3295 व्हीव्हीपॅट यंत्रे प्राप्त झाली असून, त्याची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण केली आहे.  जनजागृती मोहिमेत पथकातील कर्मचारी फिरत्या वाहनाव्दारे प्रत्यक्ष मतदारांमध्ये जाऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा प्रचार व प्रसार आणि मतदारांकडून प्रत्यक्ष चाचणी मतदान (Mockpoll) होत आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.  
  उपविभागीय अधिकारी श्री. राठोड यांनी यावेळी बॅलेट युनिटमधील मतदान व व्हीव्हीपॅटमध्ये चिठ्ठ्यांद्वारे येणारे मतदान तंतोतंत असल्याचे सर्व नागरिकांसमोर मोजून दाखविले. मतदाराने केलेले मतदान हे त्याच उमेदवाराला व त्याच चिन्हाला दिले जात
असल्याबाबत मतदाराचे पूर्ण समाधान प्रात्यक्षिकाद्वारे करून दिले गेले.  
मतदाराला दिसते आपल्या मतदानाची नोंद
 व्हीव्हीपॅट हे एक प्रिंटर असून मतदाराने आपल्या मताची नोंद त्याद्वारे सुस्पष्ट दिसणार आहे. ईव्हीएमवर मत नोंदविल्यानंतर त्याची प्रतिमा व्हीव्हीपॅटद्वारे सात सेकंद मतदाराला बघता येणार आहे.  या प्रात्यक्षिकाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणेच्या जनजागृती मोहिमेबाबत विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आणि ही मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले.
00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...