Saturday, February 26, 2022

ग्रामीण भागात रस्तेविकासासाठी मोठा निधी; विकासाला गती मिळेल - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत 18 कोटी 23 लक्ष निधीतून जिल्ह्यात रस्ते

  ग्रामीण भागात रस्तेविकासासाठी मोठा निधी; विकासाला गती मिळेल

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 26 : जिल्ह्यात ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, अनेक कामांना चालना मिळाली आहे. ग्रामीण भागात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होऊन विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत मंजूर 3 कोटी 9 लक्ष रूपये निधीतून शिवणगाव ते शिरजगाव मोझरी रस्ता, 2 कोटी  50 लक्ष  रुपये निधीतून नेरपिंगळाई ते आखतवाडा (प्रजिमा 103) रस्ता, एक कोटी 77 लक्ष रुपये निधीतून शिरखेड येथे रा. मा. -300 काटपूर ममदापूर ते शिरखेड रस्ता, 2 कोटी 38 लक्ष रुपये निधीतून कठोरा येथे रा. मा. -298-A कठोरा टाकळी (पिंपरी गोपालपूर) ते व्हीआर रस्ता आदी कामांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

त्याचप्रमाणे, पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने ग्रामसडक योजनेत सुकळी येथे 4 कोटी 47 लक्ष रूपये निधीतून प्र. रा. मा. -14 (चांगापूर) ते कामुंजा रा. मा. 309 (सुकळी ते वनारसी) रस्ता,  गौरखेडा येथे 3 कोटी 62 लक्ष रूपये निधीतून प्र. जि. मा. -24 (निंभोरा) गौरखेडा ते बोरखेडा व्हीआर 82 रस्त्याचे बांधकामाचाही समावेश करण्यात आला आहे.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, पीआय इंडेक्सनुसार ज्या ज्या रस्त्यांसाठी निधीची गरज होती, त्याचा पाठपुरावा करून कामे मंजूर करून घेण्यात आली. जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्तेविकासाला चालना देण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांचे भक्कम जाळे निर्माण होऊन दळणवळणासाठी उत्कृष्ट सुविधा निर्माण होईल व विकासाला गती मिळेल. व्यापक जनहित जोपासण्यासाठी सर्वदूर अनेकविध कामे राबविण्यात येत आहेत. भक्कम पायाभूत सुविधांद्वारे ग्रामीण भागाच्या विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

नेर पिंगळाई येथे साठवण बंधारा

मृद् व जलसंधारण योजनेत 40 लक्ष रुपये निधीतून नेरपिंगळाई येथे साठवण बंधारा बांधकामाचे व अल्पसंख्याकबहुल क्षेत्र विकास कार्यक्रमात 10 लक्ष रूपये निधीतून शेकूमियाँ दर्ग्याच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमीपूजनही पालकमंत्र्यांच्या हस्ते आज झाले. साठवण बंधा-यांमुळे जलसंवर्धन होऊन शेती व गावाला लाभ होतो. बंधा-याचे काम घेताना अधिकाधिक क्षेत्राला लाभ होण्याच्या दृष्टीने नियोजन व जागेची निवड करावी. स्थानिक बांधवांशी सविस्तर चर्चा करून कामे राबविण्यात यावी. इतरही ठिकाणी जलसंवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

000

 

व्यापक सामाजिक हितासाठी संस्थेची वाटचाल आदर्श- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

कठोरा बु. सेवा सहकारी संस्थेच्या इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 

व्यापक सामाजिक हितासाठी संस्थेची वाटचाल आदर्श

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 26 : प्रत्येक कार्यात सर्वांमध्ये सौहार्द कायम ठेवून व्यापक सामाजिक हिताची जोपासना ही अमरावती जिल्ह्याची संस्कृती आहे. सहकाराचे तेच तत्व आहे. या तत्वानुसार कठोरा बु. सेवा सहकारी संस्थेची होत असलेली वाटचाल आदर्श आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज कठोरा येथे केले.

कठोरा बु. सेवा सहकारी संस्थेच्या इमारत व गोडाऊनचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते कठोरा येथे झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, सुनील व-हाडे, भागवतराव खांडे, प्रकाश काळबांडे, सतीश सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.  

सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकरी बांधव व ग्रामीण भागाच्या विकासाला चालना प्रयत्न होत आहे. कठोरा बु. सहकारी सेवा संस्थेकडून उत्कृष्ट उपक्रम राबवले जात आहेत. सहकाराची चळवळ अधिकाधिक दृढ व्हावी. सहकारी संस्थांच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज, लघुउद्योग आदी विविध बाबींनाही चालना मिळावी. जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

जि. प. अध्यक्ष श्री. देशमुख, श्री. काळबांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. जि. प. माजी सभापती जयंतराव देशमुख, हरीभाऊ मोहोड, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशपांडे, अनिल कुचे यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

000

Friday, February 25, 2022

एचआयव्ही बाधितांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्या - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 






एचआयव्ही बाधितांना शासकीय योजनांचा लाभ  मिळवून द्या

-      जिल्हाधिकारी पवनीत कौर

 अमरावती, दि. 25 :  महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक योजनांचा, योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाचा लाभ तातडीने प्रदान करण्यात यावा. एड्स आजाराच्या प्रतिबंधासाठी असलेल्या शासकिय योजनांचा लाभ सर्व लाभार्थ्यांना मिळावेत यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश  जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांनी आज दिले. आरोग्य विभागाद्वारे देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सुविधांचा आढावा श्रीमती कौर यांनी घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कक्षात घेण्यात आलेल्या आढावा बैठकिला मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, अतिरीक्त जिल्हा शल्याचिकित्सक डॉ. प्रदिप नरवने, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ. विद्या वाठोडकर, आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, नेत्र विभाग प्रमुख डॉ. नम्रता सोनवणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे आदी उपस्थित होते.

रुग्णांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा रुग्णालयात उपल्ब्ध कराव्या

रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत श्रीमती कौर यांनी रुग्णासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्या असे निर्देश दिले. रुग्णालयात अतिदक्षता व अपघात विभागातील वैद्यकिय उपकरणे आदी सुस्थितीत असावे. अद्ययावत उपकरणांची देखभाल वेळोवेळी करण्यात यावी. रुग्णालयांत किरकोळ साहित्याची कमतरता निर्माण होऊ देऊ नये असे सांगितले.

 

                                              00000

 

 

 

धारणीच्या 22 वर्षीय तरुणावर नेत्र बुबुळ प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

 









राज्यात प्रथमच जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्र प्रत्यारोपण विभाग सुरु

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी भेट देऊन पाहणी केली

धारणीच्या 22 वर्षीय तरुणावर नेत्र बुबुळ प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

           

 अमरावती दि.25: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्र बुबुळ प्रत्यारोपण विभाग सुरू झाला असून राज्यात प्रथमच शासकीय रुग्णालयात नुकताच नेत्र प्रत्यारोपण विभाग सुरु झाला आहे. अद्ययावत सुविधा व सुसज्ज उपकरणांनी परिपूर्ण असलेल्या नेत्र बुबुळ प्रत्यारोपण विभागात रुग्ण दाखल झाल्यापासून तर घरी जाई पर्यंत सर्व सुविधा व निशुल्क उपचार रुग्णांवर करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील  नेत्र रुग्णांसाठी ही  सुविधा निश्चितच उपयोगाची आहे असे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी पवनीत कौर व मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांनी आज दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्र विभागाला भेट दिली. येथील नव्याने सुरु झालेल्या नेत्र बुबुळ प्रत्यारोपण विभाग व त्यासंबंधी प्रक्रियेची माहिती श्रीमती कौर यांनी घेतली त्यावेळी  त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शामसुंदर निकम, नेत्र विभाग प्रमुख डॉ. नम्रता सोनवणे, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. कुणाल वानखेडे, डॉ. दिप्ती उमरे, जिल्हा नेत्रदान समुपदेशक निलेश ढेंगळे, भरत गोयनका, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.संतोष भोंडवे आदी उपस्थित होते.

हा विभाग सुरू झाल्यावर  प्रथमच धारणीच्या टेंबली गावातील  लखन मधू येवले या बावीस वर्षीय तरुणावर  नेत्रतज्ञ डॉ.पंकज लांडे यांच्या मार्गदर्शनात यशस्वी नेत्र प्रत्यारोपण करण्यात आले. लखन येवले यांना मागील दोन वर्षांपासून दृष्टीदोष होता. यशस्वी शस्त्रक्रियेमुळे दृष्टी परत प्राप्त झाली व हे जग नव्याने पाहता येत असल्यामुळे आनंदीत असल्याची प्रतिक्रिया लखन येवले यांनी यावेळी दिली. श्रीमती कौर यांनी त्या रुग्णाची भेट घेतली व त्याची वैद्यकीय स्थितीची माहिती घेतली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातुन शासकीय रुग्णालयात प्रथमच हा विभाग सुरु झाल्याची व सर्व रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया पुर्णपणे निशुल्क  असल्याची माहीती श्री. निकम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

 

     मेळघाट, चुरणी येथील रुग्णांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते भेट

           जिल्हा सामान्य रुग्णालयात  मोतीबिंदुच्या शस्त्रक्रियेसाठी भरती मेळघाट, चुरणी येथील रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील चार रुग्णांच्या दोनीही डोळयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या सर्व रुग्णांची विचारपुस श्रीमती कौर यांनी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रुग्णांना गुलाबपुष्प व भेटवस्तु प्रदान करण्यात आल्या.  रुग्ण व रुग्णांच्या नातलगांच्या भोजन व निवासाची माहीती श्रीमती कौर यांनी यावेळी घेतली. मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागातुन येणाऱ्या रुग्णांना वारंवार तपासणी करीता रुग्णालयात येण्याचा त्रास होऊ नये यासाठी त्यांना इतर रुग्णांच्या तुलनेत चार ते पाच दिवस जास्त काळ रुग्णालयांत ठेऊन त्यांच्यावर पुर्ण उपचार देण्यात येत असल्याची माहिती डॉ. सोनवणे यांनी दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरातील बाह्य रुग्ण विभागाच्या नविन इमारतीची पाहणी श्रीमती कौर यांनी केली. रुग्णालयांत उपचारासाठी भरती होणाऱ्या रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती यावेळी त्यांनी घेतली.

                                                                     000000

स्वस्त धान्य दुकानातील पॉस मशिनमधिल तांत्रिक अडचणीबाबत निवेदन

 

स्वस्त धान्य दुकानातील पॉस मशिनमधिल

तांत्रिक अडचणीबाबत निवेदन

अमरावती, दि.25: सार्वजनिक वितरण व्यवस्थातंर्गत शिधापत्रिकाधारकांना सरकारी स्वस्त धान्य दुकानातुन पॉसव्दारे लाभार्थ्यांचे थंब अधिप्रमाणित करून मासिक अनुज्ञेय धान्याचे वितरण केले जाते. उक्त प्रकरणी दि.21 फेब्रुवारी 2022 रोजी पासून स्वस्त धान्य दुकानातुन शिधापत्रिकाधारकांना पॉसव्दारे ऑनलाईन पध्दतीने धान्याचे वितरण करताना येत असलेल्या तात्रिक अडचणीचे अनुषंगाने शासन स्तरावरून कार्यवाही सुरू असून पॉस पॉईट ऑफ सेल डिवाइस व्दारे टान्झेक्शन करताना येत असलेली समस्या ही सर्व राज्यांना भेडसावत आहे. आणि एन आय सी कडून सदर तांत्रिक अडचणीचे निराकरण करणे सुरू आहे. तथा सदर समस्येचे निराकरण करणे करीता शासनास दोन किंवा तीन दिवसाचा कालावधी लागणे आवश्यक आहे. करीता शासन स्तरावरून पॉस मशिनमध्ये येत असलेल्या तांत्रिक अडचणीचे निराकरण होई पर्यंत कृपया जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार तथा शिधापत्रिकाधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाख वाहुरवाघ यांनी केले आहे.

0000000

भातकुली तालुका पाणी टंचाई आढावा टंचाई निवारणाची कामे 'मिशन मोड'वर पूर्ण करा - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 





भातकुली तालुका पाणी टंचाई आढावा

 टंचाई निवारणाची कामे 'मिशन मोड'वर पूर्ण करा

 

 - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. २५ : उन्हाळा लक्षात घेता टंचाई निवारणाची कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

 

भातकुली तालुक्यातील पाणी टंचाई आढावा सभा पालक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बचतभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार रवी राणा, उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, हरिभाऊ मोहोड, जयंतराव देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी सरपंच व ग्रामसचिवांशी संवाद साधून प्रत्येक गावाची मागणी जाणून घेतली.

 

'जलजीवन'मध्ये १०५ गावे

 

जलजीवन मिशनमध्ये तालुक्यातील १०५ गावे समाविष्ट आहेत. या कामांना गती द्यावी.  निंदोडी येथे हातपंप, वायगाव येथे वाढीव जलवाहिनी, वाठोडा शुक्लेश्वर येथे हातपंप, रामा येथे वाढीव जलवाहिनी व हातपंप, पूर्णानगर येथे हातपंप, पाटोदा हिंमतपुर येथे वाढीव वाहिनी व हातपंप, निरुळ गंगामाई येथे हातपंप, आंचलवाडी येथे दोन हातपंप, सोनारखेडा येथे पाण्याची टाकी, कामनापूर येथे पाच हातपंप, देवरी येथे टाकी व हातपंप, जळका हिरापूर येथे आवश्यक जलवाहिनी, दगडागड येथे नियमित पुरवठा, वाकी रायपूर येथे हातपंप, विरशी येथे दोन हातपंप, टाकरखेडा संभु येथे पाण्याची टाकी, हातपंप यासह अनेक गावांत पाणी उपलब्धतेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उभारण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

  

'विश्रोळी'बाबत सर्वेक्षण करा

 

'विश्रोळी' प्रकल्पाचे पाणी अनेक ठिकाणी पोहोचत नाही, अशी तक्रार आहे. याबाबत तत्काळ सर्वेक्षण करावे व अडचणी दूर करण्यासाठी भरीव उपाययोजना करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. बोरखेडी येथे गढूळ पाणी येते.  शहानूरचे पाणी सोडले जात नाही. बोअरवेलचे पाणी पुरवले जाते, अशी तक्रार आहे. तिथे आवश्यक उपाययोजना तत्काळ करावी. त्याचप्रमाणे, पाणी सोडण्याचे वेळापत्रक ग्रामीण नागरिकांच्या सोयीनुसार असावे. स्थानिकांच्या मागणी लक्षात घेऊन नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

रस्ता फोडला तर दुरुस्ती लगेच करा

 

वाहिनी टाकताना रस्ता फोडला तर त्याची तत्काळ दुरुस्ती यंत्रणेने करून द्यावी. रस्ते फोडून दुरुस्ती न केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. जीवनोन्नती अभियानात महिला बचत गटांना १ कोटी ७० हजार रुपये कर्ज वितरण भातकुली तालुक्यातील सात गटांना पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. बैठकीला महसूल, पंचायत समिती, जीवन प्राधिकरण आदी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

 

प्रशासनाचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही; दोन दिवसांनी पुन्हा आढावा घेऊ - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे सुस्पष्ट आदेश

 








जिल्हा नियोजन समिती निधीतील जि. प. कडील विकासकामांचा आढावा

 

निविदा प्रक्रिया झालेल्या कामांचे कार्यारंभ आदेश आजच काढा

 

प्रशासनाचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही; दोन दिवसांनी पुन्हा आढावा घेऊ

 

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे सुस्पष्ट आदेश

 

अमरावती, दि. २५ : ग्रामीण भागात विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून मोठ्या प्रमाणावर निधी देऊनही अजूनही अनेक कामांना सुरुवातच झाली नाही. हे अत्यंत गंभीर असून, याबाबत कुठलीही हलगर्जी खपवून घेणार नाही. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामांचे कार्यारंभ आदेश आजच काढावे व उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी. आपण स्वतः दोन दिवसांनी पुन्हा आढावा घेऊ, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

 

जिल्हा परिषदेतील जिल्हा नियोजन समितीविषयक कामकाजासंबंधी बैठक पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.आमदार बळवंतराव वानखडे, जि. प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर,पूजा आमले, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी सभापती जयंतराव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा आदी उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्हा नियोजन समितीकडून ग्रामीण भागातील विविध कामासाठी जि. प. ला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. तथापि, प्रशासनाकडून अनेक कामांना सुरुवात झाल्याचे दिसत नाही. असा हलगर्जीपणा खपवुन घेणार नाही. निविदा प्रक्रिया झालेल्या कामांचे आदेश आजच काढा. उर्वरित निविदा प्रक्रिया पूर्ण करा.

या कामांचा पुन्हा दोन दिवसांनी आढावा घेण्यात येईल. सर्व कामांच्या प्रगतीबाबत बुकलेट सादर करावे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

तीर्थक्षेत्र विकास योजनेत अनेक कामे प्रलंबित आहेत. अनेक कामाच्या दीड वर्षांपासून प्रशासकीय मान्यता मिळूनही कामे सुरू झाली नाहीत. तीर्थक्षेत्र, जनसुविधा, १५ वा वित्त आयोग, अंगणवाडी, वर्गखोली, दवाखाना बांधकाम आदी अनेक नियोजित कामांना चालना द्यावी. कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असावीत. जि. प. प्रशासनाने कामांचा नियमित आढावा घ्यावा.

प्रत्येक अंगणवाडीत बोलकी अंगणवाडी उपक्रम राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

00000

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...