Tuesday, June 11, 2024

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्राणी क्लेष समितीचा आढावा; जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी 'इअर टॅगिंग' बंधनकारक- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 







बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्राणी क्लेष समितीचा आढावा;

जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी 'इअर टॅगिंग' बंधनकारक- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

          अमरावती, दि. 11 (जिमाका): बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची अवैध वाहतूकीवर कारवाई करुन गोवंशाच्या रक्षणासाठी पोलीस प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने समन्वयाने काम करावे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्व जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी इअर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व गोवंश जनावरांच्या सुरक्षितेसाठी इयर टॅगिंग करुन घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधिताना आज दिल्या.

 

          जिल्हास्तरीय प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसुल भवनात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, पोलीस उपायुक्त सागर पाटील, जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त डॉ. संजय कावरे, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. शिवेंद्र महल्ले, प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक मेहेरकर, जिल्हा परिषदेचे डॉ. पुरुषोत्तम सोळंके तसेच अशासकीय सदस्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

            जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, येत्या सोमवारी बकरी ईद साजरी होणार असून जिल्हा पशु संवर्धन विभागाने मनुष्यबळाचे नियोजन करुन जिल्ह्यातील अधिकृत पशुवधगृहामध्ये जनावरांची तपासणी करावी. जनावरे अवैध विक्रीबाबतची माहिती पोलीस प्रशासनाने घेऊन त्यावर तात्काळ कार्यवाही करावी. प्राणीक्लेष प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात याव्यात. तसेच सर्व लहान-मोठ्या पशुधनाला 1 जून पासून ईअर टॅगिंग बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे कानातील बिल्याशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री व वाहतूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पशुधनाची इअर टॅगिंग करण्याबाबत शहरी तसेच ग्रामीण भागात विविध माध्यमातून जनजागृती करावी.

 

             महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियमानुसार कोणत्याही प्रकारचा गोवंश जसे गाय, वळू, बैल या प्राण्यांची कत्तल करण्यास संपूर्ण मनाई करण्यात आली आहे. या कायद्याचे पालन करण्यासाठी सदर समितीच्या सदस्यांमध्ये चर्चा करण्यात आली. सभेमध्ये अशासकीय सदस्यांनी जनावरांना शासन निर्णयानुसार टॅगिंग करण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यावर उपायुक्त पशु संवर्धन डॉ. संजय कावरे यांनी महानगरपालिका क्षेत्रामध्ये जिल्हा पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय येथे पशुंना टॅगिंग करण्यात येत असल्याचे सांगितले. बकरी ईदच्या अनुषंगाने शहरात जनावरांच्या तपासणीसाठी बॉर्डर सिलींग ठिकाणी व कत्तलखान्यावर तपासणीकरिता पोलीस व पशुसंवर्धन विभागाने समन्वयाने कारवाई करावी, असे निर्देश श्री. कटियार यांनी यावेळी दिले.

 

जनावरांच्या अवैध वाहतुकीवर कडक कारवाई करा

 

          बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात जनावरांच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी शहर व ग्रामीण पोलीस यांनी योग्य समन्वय ठेवून अवैध वाहतूकीवर कडक कारवाई करावी. यासाठी शहरी व ग्रामीण भागातील पोलीस चौकीवर कडेकोट बंदोबस्त ठेवावा. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे प्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिल्या.

 

          प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचे शासकीय व अशासकीय सदस्यांची बैठक पोलीस आयुक्त कार्यालय येथे आज सकाळी आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपायुक्त सागर पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके, सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) डॉ. शिवेंद्र महल्ले, सर्व पोलीस अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

000000

 

आज जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिन बालकामगारांना कामावर ठेवणाऱ्यावर कडक कार्यवाही

 

आज जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिन

बालकामगारांना कामावर ठेवणाऱ्यावर कडक कार्यवाही

 

       अमरावती, दि. 11 (जिमाका) : भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण आणि आरोग्य हे बालकांचे मुलभूत अधिकार आहेत. बालकांचे हे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी बालमजुरी प्रथा कायमस्वरुपी नष्ट होणे आवश्यक आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये 14 वर्षाखालील मुलांना बालमजुरी करण्यास प्रवृत्त करणाऱ्याविरुध्द जबर शिक्षेची तरतुद केली आहे. यामुळे दरवर्षी 12 जून हा दिवस जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिवस म्हणून देशभर पाळला जातो. अमरावती जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापनाधारक तसेच उद्योजकांनी बाल व किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवू नये, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त रा.रा. काळे यांनी केले आहे.

      त्या अनुषंगाने केंद्र शासनाने बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 पारित केलेला आहे. अधिनियमानुसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय/प्रक्रियेत कामावर ठेवणे तसेच 14 वर्ष पूर्ण परंतु 18 वर्ष पूर्ण न झालेल्या किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे गुन्हा आहे. जर मालक अथवा नियोक्त्याने बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास त्यास 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास किंवा रुपये 20 हजार ते 50 हजार रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते, अशी तरतूद आहे. बालमजुरी ही एक अनिष्ठ प्रथा असून ती सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक समस्यांशी निगडीत असल्यामुळे या प्रथेविरुध्द विस्तृत प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनीही सजकता बळगून कोठेही बालकामगार काम करीत असल्याचे आढळल्यास जिल्हा प्रशासन तसेच कामगार विभागाला अवगत करावे.

00000

‘प्रति थेंब, अधिक पिक’योजना; अनुसूचित जाती व जमाती शेतकरी लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा- कृषी विभागाचे आवाहन

 

‘प्रति थेंब, अधिक पिकयोजना; अनुसूचित जाती व जमाती शेतकरी लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा- कृषी विभागाचे आवाहन

          अमरावती, दि. 11 (जिमाका):   राष्ट्रीय कृषि विकास योजना ‘प्रति थेंब, अधिक पिक’ या योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार संचाची खरेदी करण्यासाठी अनुदान दिल्या जाते. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

 

            योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना 55 टक्के व इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान दिल्या जाते. याच घटकासाठी मुख्यमंत्री शाश्र्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांना 25 टक्के व इतर लाभार्थ्यांना 30 टक्के पुरक अनुदान दिल्या जाते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना 55 टक्के व इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान दिल्या जाते. याच घटकासाठी जिल्हा परिषद मार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन मिशन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांना 35 टक्के पुरक अनुदान इतर लाभार्थ्यांना 45 टक्के पुरक अनुदान दिल्या जाते. अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना बिरसा मुंडा योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांना 35 टक्के पुरक अनुदान व इतर लाभार्थ्यांना 45 टक्के पुरक अनुदान दिल्या जाते.

 

           योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचाचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकऱ्याकडे मालकी हक्काचा सातबारा, 8 अ व ओलीताची सोय असणे आवश्यक आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक राहिल.

000000

Monday, June 10, 2024

दर्यापूर येथील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू

 

दर्यापूर येथील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू

 

          अमरावती, दि. 10 (जिमाका): दर्यापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह व 125 वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे प्रवेशासाठीचे अर्ज वितरित होत आहेत. इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन गृहपाल वनिता गोळे यांनी केले आहे.

 

              सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातंर्गत मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतिगृह कार्यरत असून शैक्षणिक सत्र 2024-25 करीता शालेय तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन विभागासाठी ऑफलाईन प्रवेशप्रक्रीया सुरू झाली आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृहातुन अर्ज प्राप्त करून  संपूर्ण कागदपत्रासह विहित मुदतीत अर्ज सादर करावे.

00000

बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संचाचे वितरण सुरु; वाटपाच्या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन

 

बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संचाचे वितरण सुरु;

वाटपाच्या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन

 

           अमरावती, दि. 10 (जिमाका): महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबईमार्फत जिल्ह्यातील नोंदणीकृती सक्रिय(जिवीत) बांधकाम कामगारांना कंपनीमार्फत गृहपयोगी वस्तु संच वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संच मिळणार असून त्याचे जिल्हा व तालुकास्तरावर वितरण होणार आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांनी वाटपाच्या ठिकाणी गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हा कार्यकारी अधिकारी तथा सहाय्यक कामगार आयुक्त यांनी केले आहे.

 

             जिल्ह्यातील नोंदणीकृती जिवित पात्र बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संच वाटप जिल्ह्यातील संबंधित कंपनीकडून पुढील आठवड्यात जिल्हा व तालुकास्तरावरील नगरपरिषद, नगरपंचायत येथे नियोजन करण्यात आले आहे. सन 2023-24 मधील नोंदणीकृत जिवित पात्र कामगारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार गृहपयोगी वस्तु संच नोंदीत जिवित पात्र कामगारांच्या कुटुंबातील एकाच व्यक्तीला दिला जाणार आहे. यादीनुसार मे. मफतलाल इंडस्ट्रीज, मुंबई यांच्याकडून दुरध्वनी क्रमांक 7249442793 वरुन नोंदणीकृत लाभार्थ्यांना संपर्क साधून संबंधित लाभार्थ्यांना गृहपयोगी संच जिल्हा व तालुक्यातील नियोजित जागेवर वितरण केल्या जाईल. त्यामुळे दुरध्वनी क्रमांकावरुन संपर्क झालेल्या लाभार्थ्यांनी स्वत: मंडळाचे संबंधित मुळ कागदपत्रासह उपस्थित राहावे. दुरध्वनीवरुन संपर्क झालेल्या कामगारांनाच गृहपयोगी वस्तु संच वाटप होणार असल्याने वाटपाच्या ठिकाणी गर्दी करु नये. मंडळाची योजना ही निशुल्क असून त्रयस्त व्यक्तीव्दारे आपली दिशाभुल, फसवणुक करण्यात येत असेल तर नजिकच्या पोलिस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल करावी, असे आवाहन उपआयुक्त कार्यालयाव्दारे करण्यात आले आहे.

                                                                     00000

 

Friday, June 7, 2024

पिक कर्जासाठी खात्याचे नूतनीकरण 30 जूनपूर्वी करा; जिल्हाधिकारी यांचे शेतकऱ्यांना आवाहन

 

पिक कर्जासाठी खात्याचे नूतनीकरण 30 जूनपूर्वी करा;  जिल्हाधिकारी यांचे शेतकऱ्यांना आवाहन

             अमरावती, दि. 07 (जिमाका):  शेतकऱ्यांना विविध बँकामार्फत पिक कर्जाचे वाटप केल्या जातात. या पिक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणे आवश्यक आहे. परतफेड न झाल्यास शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होण्यासोबतच कर्जावरील व्याज सवलत योजनेस मुकावे लागु शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पिक कर्जाची परतफेड करुन आपले खाते नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

            विविध बँकांच्यावतीने शेतकऱ्यांना दरवर्षी पिक कर्जाचे वाटप केल्या जाते. या अल्पमुदत पिक कर्जाची परतफेड दरवर्षी विहित मुदतीत म्हणजे कर्ज घेण्याल्यापासून 365 दिवस किंवा 30 जूनपूर्वी करावी लागते. यामुदतीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन वर्षासाठी पुन्हा कर्ज दिले जाते. मुदतीत परतफेड न केल्यास कर्ज खाते थकीत होते. अशा थकीत खातेधारकांना बँक पिककर्ज देत नाही. त्यामुळे मुदतीत कर्जाची परतफेड करुन खात्याचे नुतनीकरण करणे आवश्यक असते. खाते नुतनीकरण केलेल्या शेतकऱ्याला प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेता येतो. तसेच पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनचा लाभ उपलब्ध होतो. या योजनेंअंतर्गत 3 लाख पर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदरावर उपलब्ध होते. नवीन पिककर्जाच्या दरानुसार वाढीव कर्ज घेण्यास शेतकरी पात्र होतात. यासोबतच शेतकऱ्यांचा सिबिल रिपोर्ट सुद्धा चांगला राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्ज घेण्यासाठी बँकाकडे पत चांगली राहते.

            कर्ज खाते नुतनीकरण केलेल्या शेतकऱ्यांना बँकाच्या इतर कर्ज योजनांचा लाभ देखली घेता येतो. यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, शेती तारण योजना, फळबाग, फुलबाग, हरितगृह, शेडनेट हाऊस योजना, शेळीपालन, पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, कृषि यांत्रिकीकरण, इत्यादी बँक कर्जाशी निगडीत योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येतो. अमरावती जिल्ह्यातील सर्व बँका शेतकऱ्यांचे कर्ज खाते नुतनीकरण करुन विनाविलंब नवीन कर्जाचा लाभ देण्यास तयार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी येत्या 30 जूनपूर्वी आपल्या मागील पिक कर्जाची परतफेड करुन खाते नुतनीकरण करुन घ्यावे, असे  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                    000000


पंडित दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळावा; हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीमध्ये 66 महिलांची प्राथमिक निवड

 

पंडित दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळावा; हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीमध्ये 66 महिलांची प्राथमिक निवड

             अमरावती, दि. 07 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर अमरावती तथा शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 6 जुन रोजी शासकिय औद्यौगिक प्रशिक्षण संस्था येथे पंडित दीनद्याल उपाध्याय  महिला रोजगार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड या नांमाकित कंपनीमध्ये 66 महिलांची प्राथमिक निवड करण्यात आली.

          महिला रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन,ऑफलाईन असे एकुण 216 महिला उमेदवारांनी सहभाग नोंदवून त्यापैकी 87 महिला उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. मुलाखती दिलेल्या महिला उमेदवारांपैकी 66 महिला उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. मेळाव्याकरिता जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातील महिला उमेदवार उपस्थित राहून मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

           यावेळी कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाचे उपआयुक्त द.ल. ठाकरे, शासकिय औदयौगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य संजय बोरकर, बी.टी.आर.आय.चे प्राचार्य श्री. आगरकर, शासकिय औदयौगिक प्रशिक्षण संस्थाचे उपप्राचार्य श्री.चुलेट, कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली यो.बारस्कर आदी उपस्थित होते.

           महिला उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध असून त्यांनी विभागाव्दारे आयोजित रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. तसेच कौशल्य विकास कार्यालयाव्दारे बेरोजगार उमेदवारांकरिता विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा महिला उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाचे उपआयुक्त द.ल.ठाकरे यांनी केले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त प्रांजली यो.बारस्कर यांनी तर संचलन सोनाली भोगे व आभार प्रदर्शन अभिषेक ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र व शासकिय औद्यौगिक प्रशिक्षण संस्थाचे अधिकारी व कर्मचारी  यांनी अथक परिश्रम घेतले.

00000




 

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६

  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #...