Tuesday, June 11, 2024

आज जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिन बालकामगारांना कामावर ठेवणाऱ्यावर कडक कार्यवाही

 

आज जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिन

बालकामगारांना कामावर ठेवणाऱ्यावर कडक कार्यवाही

 

       अमरावती, दि. 11 (जिमाका) : भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण आणि आरोग्य हे बालकांचे मुलभूत अधिकार आहेत. बालकांचे हे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी बालमजुरी प्रथा कायमस्वरुपी नष्ट होणे आवश्यक आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये 14 वर्षाखालील मुलांना बालमजुरी करण्यास प्रवृत्त करणाऱ्याविरुध्द जबर शिक्षेची तरतुद केली आहे. यामुळे दरवर्षी 12 जून हा दिवस जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिवस म्हणून देशभर पाळला जातो. अमरावती जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापनाधारक तसेच उद्योजकांनी बाल व किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवू नये, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त रा.रा. काळे यांनी केले आहे.

      त्या अनुषंगाने केंद्र शासनाने बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 पारित केलेला आहे. अधिनियमानुसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय/प्रक्रियेत कामावर ठेवणे तसेच 14 वर्ष पूर्ण परंतु 18 वर्ष पूर्ण न झालेल्या किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे गुन्हा आहे. जर मालक अथवा नियोक्त्याने बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास त्यास 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास किंवा रुपये 20 हजार ते 50 हजार रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते, अशी तरतूद आहे. बालमजुरी ही एक अनिष्ठ प्रथा असून ती सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक समस्यांशी निगडीत असल्यामुळे या प्रथेविरुध्द विस्तृत प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनीही सजकता बळगून कोठेही बालकामगार काम करीत असल्याचे आढळल्यास जिल्हा प्रशासन तसेच कामगार विभागाला अवगत करावे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...