Thursday, June 27, 2024

शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत आंतरराष्ट्रीय परिषदचे आयोजन

 


शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत आंतरराष्ट्रीय परिषदचे आयोजन

 

           अमरावती, दि. 27 (जिमाका): शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेमध्ये पहिल्यांदाच दि. 1 व 2 जुलै 2024 रोजी भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे मटेरियल फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट" या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

             मटेरियल सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोन्ही विषयाचे संशोधनात्मक महत्त्व आणि समाजोपयोगी लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती आणि उत्पादन लक्षात घेता विभागाने सदर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. आपल्या देशाचे इलेक्ट्रॉनिक्स विषयाबाबतचे धोरण आणि इतर आधुनिक व प्रगतिशील देशासोबत इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर आणि माहिती तंत्रज्ञान संबंधी शाश्वत विकासाबाबत केलेले सामंजस्य करार आपल्या देशाला एका वेगळ्या उंच पातळीवर घेऊन जाणारे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाने सौर ऊर्जा क्रांती घडून आणण्याकरिता वर्ड सोलार बँक आणि वन सन, वन वर्ड, वन ग्रिड इनिशिएटिव्ह या दोन नवीन उपक्रमांची सुरुवात केली आहे. आपल्या देशाला केवळ इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲडव्हान्स पदार्थ विज्ञानाबाबतीत विकास साध्य करायचा आहे असे नसून विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशाचा शाश्वत विकास घडवून आणायचा आहे. आजच्या पिढीसोबतच भावी पिढीच्या सर्व गरजा व त्यातील समतोल साधायचा आहे.

 

            नैसर्गिक संपत्ती व संसाधने याचे जतन, निगा आणि संवर्धन केल्यास हा मार्ग आपणास आर्थिक समृद्धीकडे व संपन्नतेकडे घेऊन जाईल. संयुक्त राष्ट्र संघाने 2015 साली शाश्वत विकासाची एकूण 17 जागतिक ध्येय ठरविले आहेत. त्यातील एक ध्येय म्हणजे सर्वांना परवडणारी आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे आणि या ध्येयांचे उद्दिष्ट 2030 पर्यंत साध्य करायचे ठरविले आहे. शाश्वत विकासाची ध्येय व शासकीय धोरणे राबविण्याकरीता प्रशासनाचा फार मोठा सहभाग असतो. हा सहभाग शासकीय पातळीवर अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था अमरावती यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यादृष्टीने या संस्थेतील भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स विभागाने व आयक्यूईसी विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. परिषदेच्या आयोजनाकरिता सायन्स अँड इंजीनियरिंग रिसर्च बोर्ड विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार यांचे सहकार्य लाभले आहे.

 

            परिषदेमध्ये देशातील तसेच इतर देशातील मान्यवर व शास्त्रज्ञ यांचे व्याख्याने आयोजित केले आहेत. परिषदे करिता एकंदरीत 300 डेलिगेट्स व पार्टिसिपंड्स येणार आहेत. मटेरियल सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स पासून तयार केलेली उत्पादने मानवासाठी शाश्वत विकास कशा पद्धतीने घडून आणू शकतात. अर्थातच नैसर्गिक संसाधने व स्त्रोत यांचा उपयोग करून आणि निसर्गाचा समतोल कायम राखून शाश्वत विकासावर चर्चा घडवून येणार आहे. त्यामध्ये डिजिटल तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाऊड कॉम्पिटिंग इत्यादी सारख्या तंत्रज्ञानाचा इंटरनेट ऑफ थिंग्सद्वारे तंत्रज्ञान उपायांचा लाभ कशाप्रकारे करता येईल यावर पेपर वाचन, व्याख्यान आणि चर्चा होणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजक भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभाग प्रमुख डॉ.श्रीकृष्ण यावले, ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय सहआयोजक प्राचार्य डॉ. दीपक धोटे,  परिषदेचे सचिव डॉ. एम. पी. लोखंडे व डॉ. आर. व्ही. बरडे हे आहेत. तसेच डॉ. डी. आर. बिजवे, गो. सी. टोम्पे महाविद्यालय, चांदूरबाजार आणि डॉ. जी.टी. लामधाडे, विद्याभारती महाविद्यालय अमरावती हे सहसमन्वयक आहेत.

 

           आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजनाकरीता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आयक्यूएसी विभाग प्रमुख डॉ. एस. ए. वाघुळे आणि भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था अमरावतीच्या संचालक डॉ. संगीता यावले यांचे संयुक्त विद्यमाने ही परिषद संपन्न होत आहे. परिषदेच्या आयोजनाकरिता शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचे संचालक तथा सहसंचालक डॉ. सुबोध भांडारकर यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे मागील दोन महिन्यापूर्वी संचालक उच्च शिक्षण डॉ. शैलेंद्र देवळणकर यांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती समिती, बंगलोर  करीता संस्थेमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्याबाबत सुचविले होते. त्याचाच एक भाग म्हणून  1 व 2 जुलै 2024 रोजी ही आंतरराष्ट्रीय परिषद संचालक उच्च शिक्षण डॉ. देवळणकर यांचे सहकार्याने संपन्न होत आहे. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेला विविध महाविद्यालये तसेच संस्थेमधून संशोधक विद्यार्थी, शिक्षक, संशोधकव पदव्युत्तर विद्यार्थी यांनी जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन परिषदेचे आयोजक प्राध्यापक डॉ. श्रीकृष्ण यावले यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...