ग्रामीण व शहरी दस्त नोंदणी कार्यालये झाले समकक्ष; नागरिकांनी लाभ
घ्यावा
अमरावती, दि. 19 (जिमाका): अमरावती
शहराकरीता मिळकती दस्त नोंदणी करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रासाठी तीन व ग्रामीण
भागासाठी एक असे चार दस्त नोंदणी कार्यालय होते. तथापि दि. 7 जून 2024 रोजीच्या अधिसूचनेनुसार
शहरी व ग्रामीण कार्यालये हे समकक्ष झाले असून मिळकत दस्तांची नोंदणी करण्यासाठी जनतेला
आता चार कार्यालये उपलब्ध झाली आहेत. नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा सर्वांनी
लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल औतकर
यांनी केले आहे.
अमरावती
तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सह दुय्यम निबंधक
वर्ग 2 चे अमरावती शहर क्रमांक-1, 2 आणि 3 असे 3 नोंदणी कार्यालय होती. या तीन कार्यालयात
अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील मिळकत व्यवहारांची नोंदणी केल्या जात होती. तसेच
महानगरपालिका क्षेत्र वगळता उर्वरित अमरावती तालुक्यातील सर्व गावातील मिळकतीची नोंदणी
करण्यासाठी जुन्या तहसील कार्यालय परिसरात सह दुय्यम निबंधक वर्ग 2 अमरावती ग्रामीण
हे एक कार्यालय होते.
अमरावती
महानगरपालिका क्षेत्रालगतचा ग्रामीण भाग हा झपाट्याने विकसित होत असून त्या भागात नव्याने
अनेक नवीन ले-आउट निर्माणाधीन होत आहे. त्यामुळे अमरावती ग्रामीण कार्यालयातील दस्तांच्या
संख्येत वाढ होऊन गर्दी होत असल्यामुळे लोकांची कामे खोळंबत होती. यावर तोडगा काढण्याबाबत
जनतेकडून वारंवार मागणी करण्यात येत होती.
तसेच एकता प्रॉपर्टी असोसिएशन व क्रेडाई अमरावती यांनी सुद्धा निवेदन सादर केले होते.
जनतेची सातत्याची मागणी व लोकप्रतिनिधी यांचा पाठपुरावा लक्षात घेऊन नोंदणी
विभागाचे प्रमुख हिरालाल सोनवणे यांनी याबाबत सकारात्मक प्रस्ताव शासनाकडे सादर केला
होता. यासाठी नोंदणी महानिरीक्षक कार्यालयातील
मुख्यालय पुणे नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण, सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक नितीन
पिंपळे व सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक किशोरकुमार मगर यांच्या प्रयत्नाने हा प्रस्ताव
शासनाने मान्य केला आहे.
आता अमरावती तालुक्यातील सर्व गावे मनपा क्षेत्रासह मिळकतीचे दस्तांची नोंदणी
करण्यासाठी अमरावतीकरांना चार नोंदणी कार्यालय उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे जनतेची कामे
लवकर होण्यास मदत होणार आहे. तसेच एका कार्यालयात गर्दी असेल तर दुसऱ्या कार्यालयात
दस्ताची नोंदणी करण्याचा पर्याय जनतेस उपलब्ध झाला आहे. दस्त नोंदणीसाठी बहुपर्याय
उपलब्ध झाल्याने जनतेची कामे वेगाने पार पडणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातील
जनतेकडून, क्रेडाई असोसिएशन व एकता प्रॉपर्टी ब्रोकर असोसिएशनद्वारे स्वागत करण्यात
येत आहे.
No comments:
Post a Comment