किमान कौशल्य विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी
-
जिल्हाधिकारी सौरभ करियार
अमरावती, दि. 14 (जिमाका) : प्रमोद महाजन
कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत 'किमान कौशल्य विकास कार्यक्रम' या जिल्हास्तरीय
योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. दरवर्षी निश्चित करण्यात आलेले प्रशिक्षण विहित
कालावधीत पूर्ण करुन उमेदवारांना रोजगाराच्या नवीन संधीची कवाडे खुली करून देण्यास
सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले
.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे
आज कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची सभा संपन्न झाली.
समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. कटियार यावेळी बोलत होते. सहायक जिल्हाधिकारी
अमर राऊत, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे उपायुक्त डी.
एल. ठाकरे, सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी, उद्योग विभागाचे प्रतिनिधी मयूर झवर, जिल्हा कौशल्य
विकास समन्वयक वैभव टेटू आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील युवक युवतींचे कौशल्य विकासाव्दारे
सक्षमीकरण करुन त्यांना अधिकाधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार
व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास
अभियान राबविण्यात येते. या अभियानांतर्गत नियमितपणे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात
यावा. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये पर्यटन, आदरतिथ्य,जीएसटी असिस्टंट, इन्फॉर्मेशन
टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया आदी प्रशिक्षणाचा अंतर्भाव करावा. सद्यस्थितीत उद्योग विभागाला
आवश्यक असणाऱ्या मागणीप्रमाणे प्रशिक्षण कार्यक्रम राबवावा. विद्यार्थी तसेच पालकांचे
मत जाणून घेऊन त्यांना आवश्यक असलेल्या प्रशिक्षणावर भर द्यावा, अशा सूचना श्री. कटियार
यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील विशिष्ट भौगोलिक तथा सामाजिक
स्थिती, परंपरागत व्यवसाय, नैसर्गिक संसाधने, साधनसामुग्री इत्यादीच्या आधारे जिल्ह्यातील
रोजगार-स्वयंरोजगारासाठी अधिक मागणी असलेली क्षेत्रे निश्चित करून त्या क्षेत्रातील
कौशल्याच्या मागणीनुसार विशिष्ट अभ्यासक्रम राबवावेत. त्याचप्रमाणे अमरावती कारागृहातील
बंदींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आल्यास ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळणार नाहीत. तसेच
या प्रशिक्षणामुळे ते रोजगारक्षम होऊन सन्मानाने जीवन जगू शकतील. यादृष्टीने बंदीना
रोजगारक्षम बनविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे, असे श्री. कटियार यावेळी म्हणाले.
बैठकीच्या सुरुवातीला सहायक आयुक्त श्रीमती
बारस्कर यांनी सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती दिली. जिल्ह्यात सद्यस्थितीत
300 उमेदवारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. बैठकीमध्ये सन 2024-25
च्या जिल्हा कौशल्य विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य
विकास केंद्र, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, कारागृहातील बंदींसाठी कौशल्य विकास
प्रशिक्षण कार्यक्रम, आकांक्षा-कौशल्यातून जीवनोन्नतीकडे कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम
याबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. युवक-युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करून
त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात लवकरच ‘नमो महारोजगार मेळाव्या’चे
आयोजन करण्यात येणार आहे.
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र
मा. पंतप्रधान यांच्या ‘स्कील इंडिया’ या
संकल्पनेस अनुसरून महाराष्ट्र राज्याने ‘कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’
हे सूत्र अवलंबिले असून राज्यातील युवक युवतींचे कौशल्य विकासाव्दारे सक्षमीकरण करून
त्यांना रोजगार, स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरात या योजनेंतर्गत
ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी स्थानिक पातळीवरील
रोजगार व स्वयंरोजगारासाठी ग्रामीण भागात
‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ ही योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार
अमरावती जिल्ह्यातील 15 गावांसाठी 3 संस्थाची निवड करण्यात आलेली आहे.
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र
कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील
युवक-युवतींना व्हावा, या दृष्टिकोनातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य
विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने
प्रयत्न करण्यात येत आहेत.
00000
No comments:
Post a Comment