Saturday, June 22, 2024

पालकमंत्र्यांच्या हस्ते सुपरस्पेशालिटी येथील कॅथलॅबचे लोकार्पण आरोग्य सेवा-सुविधा नियमितपणे सुरु ठेवाव्यात -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील











पालकमंत्र्यांच्या हस्ते सुपरस्पेशालिटी येथील कॅथलॅबचे लोकार्पण

आरोग्य सेवा-सुविधा नियमितपणे सुरु ठेवाव्यात

-पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करुन द्याव्यात


अमरावती, दि. 22 : सुपरस्पेशालिटी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या कॅथलॅबमुळे विभागातील सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना हृदयरोगासंबंधीच्या आजारावर उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. नवीन उपचार सेवा-सुविधा कार्यान्वित होत असताना त्या नियमितपणे सुरु राहाव्यात, याची जाणीवपूर्वक खबरदारी घ्यावी, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज रुग्णालय प्रशासनाला दिल्या. 

येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल) उभारण्यात आलेल्या हृदयरोगसंबंधीच्या कॅथलॅबचे लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे-पाटील, आमदार किरण सरनाईक, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, डॉ. मंगेश मेंढे, डॉ. अविनाश चौधरी, पदाधिकारी तुषार भारतीय, निवेदिता दिघडे यांच्यासह सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलचे वैद्यकीय अधिकारी, अधिपरीचारिका व आरोग्य कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, कोविड महामारीच्या संकटाने आरोग्य सेवा-सुविधांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात कॅथलॅब व इतर वैद्यकीय उपचार सुविधा उभारण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे 4 कोटी 21 लक्ष निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून कॅथलॅब उभारण्यात आली आहे. या लॅबच्या माध्यमातून 80 रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. समाजातील गोरगरीब, सर्वसामान्य रुग्णांसाठी पुरेश्या खाटा व इतर वैद्यकीय सेवा-सुविधा, उपचार यंत्र-साहित्य रुग्णालयास हवे असल्यास त्यांनी मागणीचा प्रस्ताव सादर करावा. त्यास तात्काळ मंजूरी देऊन साहित्य उपलब्ध करुन दिल्या जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

ते पुढे म्हणाले की, गोरगरीब, सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या आजारांवर मोफत उपचार सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार खर्चाची मर्यादा वाढवून पाच लाख पर्यंत करण्यात आली आहे. या योजनेतून पाच लाखापर्यंत खर्च येणाऱ्या मोठ्या आजारांसाठी उपचार सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. या योजनेचा जनतेनी लाभ घ्यावा. रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवाऱ्याची व भोजनाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. तसेच निम्म्या किंमतीत जीवनाश्यक वस्तू उपलब्ध होतील, यादृष्टीने एखादे फिरते वितरण केंद्र सारखा उपक्रम राबविण्यात यावा. यासाठी इच्छुक स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग घ्यावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी रुग्णालय प्रशासनाला केल्या. जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाही भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल. डॉक्टरांनीही आरोग्यसेवा हीच खरी ईश्वरसेवा समजून रुग्णांना मनापासून औषधोपचार सेवा-सुविधा पुरवाव्यात, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

यावेळी पालकमंत्र्यांनी कॅथलॅबची पाहणी करुन शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांशी संवाद साधला.  रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांचे नातेवाईक मंडळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

           0000 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...