पिक कर्जासाठी खात्याचे नूतनीकरण 30 जूनपूर्वी करा; जिल्हाधिकारी यांचे शेतकऱ्यांना आवाहन
अमरावती, दि. 07 (जिमाका): शेतकऱ्यांना विविध बँकामार्फत पिक कर्जाचे वाटप
केल्या जातात. या पिक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणे आवश्यक आहे. परतफेड न झाल्यास
शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होण्यासोबतच कर्जावरील व्याज सवलत योजनेस
मुकावे लागु शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पिक कर्जाची परतफेड करुन आपले
खाते नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.
विविध बँकांच्यावतीने शेतकऱ्यांना दरवर्षी
पिक कर्जाचे वाटप केल्या जाते. या अल्पमुदत पिक कर्जाची परतफेड दरवर्षी विहित मुदतीत
म्हणजे कर्ज घेण्याल्यापासून 365 दिवस किंवा 30 जूनपूर्वी करावी लागते. यामुदतीत कर्जफेड
करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन वर्षासाठी पुन्हा कर्ज दिले जाते. मुदतीत परतफेड न केल्यास
कर्ज खाते थकीत होते. अशा थकीत खातेधारकांना बँक पिककर्ज देत नाही. त्यामुळे मुदतीत
कर्जाची परतफेड करुन खात्याचे नुतनीकरण करणे आवश्यक असते. खाते नुतनीकरण केलेल्या शेतकऱ्याला
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेता येतो. तसेच पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनचा
लाभ उपलब्ध होतो. या योजनेंअंतर्गत 3 लाख पर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदरावर उपलब्ध
होते. नवीन पिककर्जाच्या दरानुसार वाढीव कर्ज घेण्यास शेतकरी पात्र होतात. यासोबतच
शेतकऱ्यांचा सिबिल रिपोर्ट सुद्धा चांगला राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्ज घेण्यासाठी
बँकाकडे पत चांगली राहते.
कर्ज खाते नुतनीकरण केलेल्या शेतकऱ्यांना
बँकाच्या इतर कर्ज योजनांचा लाभ देखली घेता येतो. यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न
प्रक्रिया उद्योग, शेती तारण योजना, फळबाग, फुलबाग, हरितगृह, शेडनेट हाऊस योजना, शेळीपालन,
पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, कृषि यांत्रिकीकरण, इत्यादी बँक कर्जाशी निगडीत
योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येतो. अमरावती जिल्ह्यातील सर्व बँका शेतकऱ्यांचे कर्ज
खाते नुतनीकरण करुन विनाविलंब नवीन कर्जाचा लाभ देण्यास तयार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी
येत्या 30 जूनपूर्वी आपल्या मागील पिक कर्जाची परतफेड करुन खाते नुतनीकरण करुन घ्यावे,
असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले
आहे.
000000
No comments:
Post a Comment