छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;
कौशल्य, रोजगार संधीचा युवकांनी लाभ घ्यावा- खासदार डॉ. अनिल बोंडे
अमरावती, दि. 21 (जिमाका): राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या माध्यमातून शासन रोजगार व स्वयंरोजगारासाठी इच्छुक तरुणांना प्राधान्याने स्थानिक भागात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाच्या या उपक्रमाचा सर्वांनी सहभाग घ्यावा. या शिबिराच्या निमित्ताने कौशल्य, दर्जेदार शिक्षण-प्रशिक्षण आणि रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीचा तरुणाईने लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे केले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची, अनुसुचित जाती औद्योगिक प्रशिक्षण संस्था रहाटगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज सांस्कृतिक भवन येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन खासदार डॉ. बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार सुलभा खोडके, एमआयडीसीचे अध्यक्ष किरण पातुरकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक एस.के. बोरकर, उपसंचालक संजय बोरकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी डॉ. राजेश शेळके, सहायक संचालक के.के. फुटाणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था भातकुली विवेक पडोळे, रहाटगावचे प्राचार्य श्री. वाळके, प्र. जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार डॉ. बोंडे म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने शासनाने हा एक स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. तरुणाईंना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची प्रत्यक्ष संधी मिळण्यासाठी या शिबिराच्या माध्यमातून योग्य व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. तरुणांनी करीअर निवड करताना स्वत:ची क्षमता ओळखावी. स्वत:मधील असलेले गुण, कौशल्य ओळखून आवडीनुसार करीअरची निवड करावी. तसेच स्वत:मध्ये असलेल्या नकारात्मक बाबीची जाणीव असावी. करीअरची निवड करताना न्युनगंड न बाळगता मिळालेल्या संधीचे सोने करा. संधी वारंवार उपलब्ध होत नसते. करीअरची निवड करताना इतरांनी लादलेली मते न स्विकारता स्वयं निवडीला प्राधान्य द्या. करीअरची निवड करताना निर्माण होणाऱ्या व्दिधा स्थितीवर मात करणासाठी व भविष्यकालीन रोजगाराच्या संधीची माहिती मिळविण्यासाठी हे शिबिर निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यानी यावेळी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांसाठी दहावी, बारावीनंतरचा टप्पा करीअरच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा असतो. शिक्षण, प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना माहिती व्हाव्यात. तसेच स्वयंरोजगाराच्या संधी, त्यासाठी मिळणारे अर्थसहाय्याचे मार्ग माहिती व्हावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बदलत्या काळानुसार उद्योगातील कौशल्याच्या मागणीनुसार प्रशिक्षण, रोजगाराची संधी किंवा स्वतः उद्योजक बनण्यासाठी आवश्यक कौशल्याचा विकास, समुपदेशन अशा विविध बाबीचे मार्गदर्शन या शिबिरात दिले जाणार आहे. करीअर घडविण्यासाठी अनेक अडचणीवर मात करावी लागते. यशाची पायरी चढण्यासाठी मेहनत, जिद्द, सातत्य व प्रयत्नांची जोड असणे आवश्यक आहे. शिबिराच्या माध्यमातून युवक-युवतींना उत्तम व्यासपीठ मिळाले आहे, त्याचा लाभ प्रत्येकांनी घ्यावा,असे आवाहन आमदार सुलभा खोडके यांनी यावेळी केले.
शासनाचे मुख्यपत्र असलेले लोकराज्य मासिक कोरोना काळामध्ये ऑनलाईन स्वरुपात प्रकाशित होत होते. मुख्यमंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार लोकराज्य मासिकाचे पुर्वीप्रमाणे आता दर महिन्याला प्रकाशित होत आहे. यावेळी प्र. जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी मान्यवरांना ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा’ हा लोकराज्य निवडणूक विशेषांक भेट दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बोरोडे तर संचालन पल्लवी वैद्य यांनी केले. शिबिरानिमित्त विविध संस्था व शासनाच्या विभागांनी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तसेच विविध कर्ज योजना आदींची माहिती देणारे स्टॉल्स लावले होते. यामध्ये जिल्हा माहिती कार्यालयामार्फत शासन मुखपत्र असलेल्या लोकराज्य या मासिकाचे नावनोंदणी तसेच विक्री स्टॉल लावण्यात आला होता. याला विद्यार्थी व पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. शिबिराच्या दिवसभराच्या सत्रात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शनही केले. याशिबिराला युवक-युवती मोठया संख्येने उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment