सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रम;
समता दिंडीला प्रादेशिक उपायुक्त यांनी
दाखवली हिरवी झेंडी
अमरावती, दि.26 (जिमाका): राजर्षि शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त समाजकल्याण
कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.
आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून काढण्यात आलेल्या समता दिंडीला प्रादेशिक
उपायुक्त सुनील वारे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन समता दिंडी इर्विन चौकपासून रवाना केली.
या दिंडीत प्रादेशिक विभाग व समाजकल्याण कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन
विद्यार्थी व स्वयंसेवी संस्था सहभागी झाले होते. समता दिंडी इर्विन चौक-दुर्गावती
चौक-मालटेकडी मार्गे सामाजिक न्याय भवन येथे दिंडीचा समारोप करण्यात आला. समता दिंडीमध्ये
सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचे फलक दर्शविणारा
रथ नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच 26
जुन हा आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन असल्याने समाजकल्याण कार्यालय
व जिल्हा परिषद मार्फत व्यसनमुक्ती व अंमली पदार्थ सेवन विरोधी जनजागृती करण्यात आली.
गुणवंत
विद्यार्थ्यांचा सत्कार व लाभार्थ्यांना अनुदान वाटप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय
भवन येथे मुख्य कार्यक्रमात राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार शाळेतून
प्रथम आलेल्या विद्यार्थांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध
विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.दिलीप काळे
यांनी संबोधित करतांना राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांनी समाजाच्या दुर्बल घटकास मुख्य
प्रवाहात आणण्याकरीता स्वत: कृतीतुन वेगवेगळया पद्धतीने कार्य करुन त्याची प्रभावीपणे
अंमलबजावणी केली. त्याकाळी मुलींच्या शिक्षणावर भर देण्याकरीता वसतिगृहांची निर्मीती
करून शिक्षणाचे महत्व पटवुन दिले व शिक्षणाकरीता सक्ती म्हणुन मुलांना शाळेत न पाठविणाऱ्या
पालकांना दंड आकारला. यावरुन छत्रपती शाहु महाराज शिक्षणा प्रती किती सजग होते याची
कल्पना येते. तसेच कार्यकर्ते समाज सुधारक असल्याचे स्पष्ट होते, असे त्यांनी नमुद
केले.
सहायक आयुक्त माया केदार यांनी सामाजिक
न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच उपस्थित
मान्यवरांनी समायोचित मार्गदर्शन केले. यावेळी समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त
सुनील वारे, सहायक आयुक्त माया केदार, समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, समाज भूषण
पुरस्कार पंकज मेश्राम, सहाय्यक संचालक लेखा दिनेश मेटकर, समाजकार्य महाविद्यालयाचे
प्राध्यापक डॉ.शिवाजी तुपेकर, समाज कल्याण अधिकारी सरिता बोबडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहु
महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले या महामानवांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलित करुन झाली. कार्यक्रमास मोठ्या संख्येन
सामाजिक न्याय भवनातील अधिकारी, कर्मचारी, सर्व महामंडळातील कर्मचारी तसेच बाहयस्त्रोत
यंत्रणेतील कर्मचारी व विविध योजनांचे लाभार्थी व अभ्यासिकेतील विद्यार्थी उपस्थित
होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय वानखडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण
पखाले तर आभार प्रदर्शन सरिता बोबडे यांनी केले.
00000
No comments:
Post a Comment