Wednesday, June 26, 2024

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

          अमरावती, दि.26 (जिमाका) : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसिलदार विजय लोखंडे यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

000000

Tuesday, June 25, 2024

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सुरु; 30 जूनपर्यंत अर्ज करा

 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सुरु; 30 जूनपर्यंत अर्ज करा

 

            अमरावती, दि. 25 (जिमाका): येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांने ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक संजय बोरकर यांनी केले आहे.

 

            शासकीय औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती येथे एक वर्ष व दोन वर्ष कालावधीच्या विविध 28 ट्रेडमध्ये एकूण 1152 जागा प्रवेशाकरिता उपलब्ध आहेत. यामध्ये एक वर्ष कालावधीचे कोपा, सेक्रेटरीअल प्रॅक्टिस, स्युइंग टेक्नॉलॉजी, स्टेनोग्राफर इंग्लिश, फाउंड्रीमन, मेसन (बिल्डिंग कन्स्ट्रक्शन), मेकॅनिक डिझेल मेकॅनिक ट्रॅक्टर, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, प्लंबर, वेल्डर आणि वूड वर्क टेक्निशियन यासह दोन वर्ष कालावधीचे आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक फिटर आय.सी.टी.एस.एम. मशिनिष्ट, मशिनिष्ट ग्राइंडर, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स, मेकॅनिक मोटर व्हेईकल, पेंटर जनरल रेफ्रिजरेशन अॅड एअर कंडिशनर टेक्निशियन, टूल अॅड डाय मेकर टर्नर, वायरमन इत्यादी व्यवसाय अभ्यासक्रम यावर्षी प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

 

           उमेदवारांनी प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्जाची छापील प्रत, सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रतीच्या संच्यासह नजीकच्या आयटीआयमध्ये प्रमाणपत्र पडताळणीसाठी हजर राहून प्रवेश अर्ज निश्चित करून घ्यावा. अर्ज निश्चितीची अंतिम तारीख 1 जुलै असून कन्फर्म केलेल्या अर्जाचाच सर्व प्रवेश फेऱ्यासाठी विचार करण्यात येईल. प्रवेश अर्ज कन्फर्म केल्यावर आपल्या खात्यात प्रवेश करून व्यवसाय निवड करण्यासाठी संस्थानिहाय विकल्प व प्राधान्याने सादर करता येईल.

 

            संस्थेत अतिशय नाममात्र प्रवेश शुल्क असून प्रवेशित सर्व प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये इतके वि‌द्यावेतन सु‌द्धा मिळते. प्रवेश प्रक्रियेचे कामकाज सर्व सु‌ट्टीचे दिवशी सु‌द्धा सुरु असून संस्थेमध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे तथा ऑप्शन फॉर्म भरणे इत्यादी सर्व सुविधा निशुल्क उपलब्ध आहेत.

 

            आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्वच वि‌द्यार्थ्यांना विविध क्षेत्रात रोजगाराची संधी, औ‌द्योगिक क्षेत्रातील कंपन्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध होते. त्याचबरोबर स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरु करता येऊ शकतो. तरी जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा व अधिक माहिती करिता शासकीय औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था, इर्विन चौक, मोर्शी रोड, अमरावती येथे संपर्क साधावा.

00000

सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

        अमरावती, दि.25 (जिमाका): राजर्षि शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दि. 26 जून रोजी सामाजिक न्याय विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

          सामाजिक न्याय दिनानिमित्त यावर्षीही समाजकल्याण कार्यालयामार्फत सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येणार आहे. यात दि. 26 जून रोजी सकाळी 8.30 वाजता समता दिंडीचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, इर्विन चौकपासून होणार आहे. या दिंडीत समाज कल्याण कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी व लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहे. तसेच  मुख्य कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चांदुर रेल्वे रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे.  

 

           समता दिंडीचा मार्ग याप्रमाणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरतळा इर्विन चौक-दुर्गावती चौक-मालटेकडी चौकमार्ग सामाजिक न्याय भवन येथे सांगता होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मुख्य कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पुरस्कार, वितरण तसेच विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

 

00000

उर्ध्व वर्धा जलाशयानजिकची जमीन भाडेपट्टीवर देणार; इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

 

उर्ध्व वर्धा जलाशयानजिकची जमीन भाडेपट्टीवर देणार;

इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

 

           अमरावती, दि.25 (जिमाका): उर्ध्व वर्धा जलाशयाच्या बुडित क्षेत्राच्या काठाभोवतीची 342.50मी. ते 343.00 मी. तलांकातील अमरावती जिल्ह्यातील 298.22 हे. व वर्धा जिल्ह्यातील 30.60 हे. जमीन उन्हाळी हंगामासाठी उपलब्ध होऊ शकते. ती कसण्यासाठी भाडेपट्ट्यावर देण्यात येणार असून, इच्छूकांनी 31 जुलैपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

 

         प्राधान्यक्रम असा आहे : अग्रकमाने गाळपेर जमीन भाडेपट्टीवर देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या व्यक्तीची जमिन नविन जलाशय, उत्प्लव बांध, धरण बांधण्यासाठी संपादित केलेली आहे किंवा कोणत्याही शासकीय प्रकल्पामुळे अथवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या प्रकल्पामुळे ज्यांना बाधा पोहोचलेली आहे अशा व्यक्ती, स्थानिक भूमिहीन, मागासवर्गीयांच्या सहकारी संस्था, बहुसंख्य मागासवर्गीय सदस्य आहेत अशा मागासवर्गीय आणि मागास वर्गीयेतर स्थानिक भूमिहीन व्यक्तीच्या सहकारी संस्था, स्थानिक भुमिहीन व्यक्तीच्या सहकारी संस्था, स्थानिक भूमिहीन मागासवर्गीय लोक,  इतर वर्गातील स्थानिक भूमिहीन लोक, जेथे गाळपेर जमिनी आहेत त्या गावाच्या बाहेरील भूमिहीन लोक, त्याव्यतिरिक्त इतर स्थानिक भूमिधारक.

 

            अर्ज येथे करावा : उपलब्ध होणा-या गाळपेर जमिनीचा तपशील, मूळ मालकनिहाय यादी व 100 रू.च्या स्टॅम्पपेपरवर करावयाचा करारनामा व अर्जाचे प्रारूप मोर्शी येथील उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्र. 1 येथे उपविभागीय अभियंता कार्यालयात उपलब्ध आहे. हे प्रारूप मिळवून त्यानुसार अर्ज व करारनामा त्याच कार्यालयात दि. 31 जुलैपर्यंत द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

            पात्र अर्जदार असलेल्या प्रत्येक कुटुंबाला जास्तीत जास्त 1.20 हेक्टर जमिन भाडेपट्टीवर देण्यात येईल. तथापि, कुटूंबप्रमुख सहकारी संस्थेचा सदस्य असल्यास त्याला मुंबई कुळवहिवाट अधिनियम 1948 नुसार जास्तीत जास्त 1.6 हे. इतकी जमीन मिळू शकेल. एका वर्षात दोन पिके घेतली गेल्यास प्रति 11 महिन्यासाठी प्रतिहेक्टरी दोन हजार रू. व एका वर्षात एकच पिक घेतले गेल्यास प्रति हेक्टरी एक हजार रूपये भरणे अनिवार्य राहील, असेही नमूद करण्यात आले आहे.

                                                      00000

कृषि निविष्ठा सनियंत्रणासाठी जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथक व नियंत्रण कक्षाची स्थापना; तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

 

कृषि निविष्ठा सनियंत्रणासाठी जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथक व नियंत्रण कक्षाची स्थापना;

तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

            अमरावती, दि. 25 (जिमाका): खरीप हंगामाची सुरुवात झाली आहे. हंगामामध्ये शेतकऱ्यांना गुणवत्ता पुर्ण कृषी निविष्ठा, बियाणे, खते व किटकनाशके योग्य दराने उपलब्ध व्हावी तसेच कृषी निविष्ठेच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी, जादा दराने किंवा मुदत बाह्य कृषी निविष्ठांची विक्री,  साठेबाजी व अनाधिकृत कृषी निविष्ठांची विक्री करणे, अशा प्रकारच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथक व नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी दिली.

 

           जिल्हास्तरावर जिल्हा कृषि कार्यालय, अमरावती येथे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सागर डोंगरे (7588501893) व प्रविण खर्चे (9423185282) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

 

            तालुकास्तरावर अमरावती तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी रोहिणी उगले (8308047778), कृषी अधिकारी उध्दव भायेकर(8275283001), भातकुलीसाठी तालुका कृषी अधिकारी प्रमोद खर्चान (9404689720), कृषी अधिकारी अश्विनी चव्हाण(7774884148), नांदगाव खंडेश्वरसाठी तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे(7875421450), कृषी अधिकारी लक्ष्मण खांडरे (8275229532), चांदुर रेल्वेसाठी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र बाबल (8975961695), कृषी अधिकारी श्री. राणे (9421366613), धामणगाव रेल्वे तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाणे(8275293459), कृषी अधिकारी राजु सावळे (8379909305), अचलपूर तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी किरण मुळे (9545186677), कृषी अधिकारी रवि उइके (9404075276), अंजनगाव सुर्जी तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी राजाभाऊ तराळ(9404689715), कृषी अधिकारी अश्विन राठोड (9422016056), दर्यापूर तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकर(9850175401), कृषी अधिकारी सुरेश रामागडे (9096238655), चिखलदरा तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी लहुजी आडे(8275068639), कृषी अधिकारी शालीनीताई वानखडे (9049555011), धारणी तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी सुधीर ईशी (9422260200), कृषी अधिकारी धैर्यशिल पाटील (8275935084), मोर्शी तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी माधुरी निंबाळकर (8668718238), कृषी अधिकारी राहुल चौधरी (9421827693), वरूड तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी अतुल आगरकर(9766547133), कृषी अधिकारी पवन ढोमणे (9595903320), तिवसा तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी निलेश राठोड (9421160188), कृषी अधिकारी पी एन खोबरखेडे (9763737259), चांदुर बाजार तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी फाल्गुनी ननीर(7558508883), कृषी अधिकारी गजानन राऊत (8055834230) यांची निरिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

 

         जिल्हास्तरावर तक्रार नियंत्रण कक्षाकरीता व्हॉट्सॲप क्रमांक 9834579012 असुन कृषि विभाग टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 आहे.  निविष्ठाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएमएस, व्हॉट्सॲपचे माध्यमातुन नोंदविण्यात यावे, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.

                                                          00000

अनोळखी मृत महिलाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 

अनोळखी मृत महिलाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

             अमरावती, दि. 25 (जिमाका): पोलिस ठाणे सिटी कोतवाली अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी महिलाचा मृतदेह इर्विन दवाखान्याच्या परिसरात सापडला आहे. मृतकाचे अंदाजे वय 50 वर्षे असून मृतकाचा रंग सावळा, उंची 5 फुट 4 इंच, केस काळे पांढरे लांब, डोळे बंद तोंड उघडे दात दिसत आहेत. तसेच अंगात हिरव्या, लाल, पांढऱ्या  साडी, ओळणी घातलेली होती.

 

           मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी महिलाची  ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक- 0721-2672001 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती यांनी केले आहे.

00000

Sunday, June 23, 2024

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सपत्नीक घेतले श्री अंबा व श्री एकविरा देवीचे दर्शन

 





केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सपत्नीक घेतले श्री अंबा व श्री एकविरा देवीचे दर्शन

 

     अमरावती, दि. 23 (जिमाका) :  केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आज अमरावती दौऱ्यावर आले होते. आज त्यांनी सपत्नीक विदर्भाची कुलदेवता असलेल्या श्री अंबादेवी व श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले. श्री अंबादेवी व श्री एकविरा  संस्थाच्यावतीने केंद्रीय मंत्री श्री. गडकरी तसेच त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांचा शाल, श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रविण पोटे-पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

     श्री अंबादेवी संस्थानाचे अध्यक्ष विद्या देशपांडे, सचिव रवींद्र कर्वे, विश्वस्त विलास मराठे, किशोर बेंद्रे, सुरेंद्र भुरंगे, अशोक खंडेलवाल, डॉ. यशवंत मशानकर, जयंत पांढरीकर यांनी तर श्री एकविरा देवी संस्थानाचे अध्यक्ष डॉ. अनिल खरया, सचिव चंद्रशेखर कुळकर्णी, विश्वस्त राजेंद्र टेंबे यांनी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांचा  सपत्नीक सत्कार केला. श्री अंबादेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य सुरू आहे. याबाबत श्री. गडकरी यांनी यावेळी माहिती जाणून घेतली.

मंदिराच्या विकास कामाबाबत सदस्य विलास मराठे यांनी प्रास्ताविकेतून  माहिती दिली. मंदिराच्या विकास कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन श्री. गडकरी यांनी यावेळी दिले.

 

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...