Wednesday, August 28, 2024

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

 

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

 

           अमरावती, दि. 28 (जिमाका): प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र आणि राज्य निधी हा 60:40 या प्रमाणात आहे. अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी करण्यास इच्छुक लाभार्थ्यांसाठी रोजगारांची संधी उपलब्ध होणार असून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

 

           प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन 2020-21 ते 2024-25 पर्यंत कालावधीसाठी असणार आहे. या योजनेमध्ये नाशिवंत कृषी उत्पादने, तृणधान्य/कडधान्य आधारित उत्पादन, तेलबिया आधारित उद्योग, मसाला उद्योग, दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन, मत्स्य खाद्य, कुकूट खाद्य, इत्यादी उद्योगाचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत नवीन उद्योग व अस्तित्वातील सुक्ष्म प्रक्रिया उद्योगांचे आधुनिकीकरण करण्यासाठी अनुदान दिले जाते. सामाजिक पायाभूत सुविधा व विपणन ब्रँडिंग उत्पादनाकरिता अनुदान देय असेल. या योजनेअंतर्गत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक, स्वयंसहाय्यता गटातील वैयक्तिक उद्योजक, स्वयंसहाय्यता गट तसेच शेतकरी उत्पादक गट किंवा सहकारी संस्था यांनाही अनुदान देय असणार आहे. वैयक्तिक लाभार्थी, स्वयंसहाय्यता गटातील वैयक्तिक लाभार्थी व स्वयंसहाय्यता गटास सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासाठी प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 लाख रुपये इतके अनुदान हे दिले जाईल. प्रकल्प उभारणीसाठी बँकेकडून कर्ज घेणे आवश्यक आहे. कर्ज घेतल्यावर कर्जाशिवाय प्रकल्पांमध्ये लाभार्थ्यांचा स्वतःचा हिस्सा किमान 10 टक्के रकमेचा आवश्यक आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यात आजमितीस 670 प्रकल्प प्रस्तावास कर्ज मंजुरी मिळालेली असून 450 हून अधिक प्रकल्पास कर्ज वितरण झालेले आहे.

 

       प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत अमरावती जिल्ह्यात जिल्हा संसाधन व्यक्ती कार्यरत असून उद्योग संबंधी अधिक माहिती देणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, बँकेत सादर केलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणे यासाठी निशुल्क सेवा पुरविण्यात येतात. योजनेच्या लाभाकरिता तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, योजनेचे संसाधन व्यक्ती, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, तसेच ग्रामस्तरावर गावातील संबंधीत गावाचे कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक यांचेशी संपर्क करावा.

0000

अटल भूजल योजना; जिल्हास्तरीय भूजल मित्र कार्यशाळा मोर्शी येथे संपन्न

 



अटल भूजल योजना; जिल्हास्तरीय भूजल मित्र कार्यशाळा मोर्शी येथे संपन्न

 

          अमरावती, दि. 28 (जिमाका): अटल भूजल योजनेतंर्गत ग्रामपंचायत स्तरावरील भूजल मित्रासाठी एकदिवसीय कार्यशाळा दि. 23 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय सभागृह मोर्शी येथे आयोजित करण्यात आला होतो. यावेळी विषय तज्ज्ञाव्दारे मार्गदर्शन करण्यात आले.

 

         वरिष्ठ भूवैज्ञानिक भूसवियं राजेश सावळे यांचे मार्गदर्शनाखाली भुजल मित्र कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसिलदार राहुल पाटील, नायब तहसीलदार कृष्णकुमार ठाकरे, हरीश ठाकरे, कनिष्ठ भूवैज्ञानिक हरीश कठारे उपस्थित होते. 

 

        जल पूजन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यशाळेची प्रस्तावना कनिष्ठ भूवैज्ञानिक हरीश कठारे यांनी केले. यावेळी अटल भूजल योजनेअंतर्गत मोर्शी वरुड व चांदूर बाजार तालुक्यातील 93 ग्रामपंचायतीतील 214 गावामधील 29 हजार 973 विहिरीचे सर्वेक्षण केल्याची माहिती दिली. पाण्याच्या मोकाट वापरावर नियंत्रण असणे गरजेचे असून शेतासाठी वापर करीत असलेल्या पाण्याची माहिती शेतकऱ्यांना  होण्यासाठी 100 शेतकऱ्यांच्या विहिरीवर वॉटर फ्लो मिटर बसविण्यात आले. यामुळे किती हजार लिटर पाणी पिकाला लागत असल्याची माहिती शेतकऱ्याला होते. तसेच ग्रामपंचायतमध्ये पाणी पातळी घेण्यासाठी पिझोमीटर करण्यात आले असून त्यावर डिजीटल वॉटर लेवल इंडिकेटर बसविण्यात आले आहे. डीएलआय-2 अंतर्गत लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडा तयार करण्यात आले असून अटल भूजल योजने अंतर्गत प्रोत्साहन निधीमधून संलग्न विभागामार्फत नविन सिमेंट बंधारा, बांधकाम व दुरुस्ती, नाला खोलीकरण कोल्हापुरी टाईप बंधारा दुरुस्ती आणि भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांचेमार्फत रिचार्ज शाफ्ट केले असून भूजल पातळी वाढण्यासाठी या योजनांचा फायदा होत असल्याचे मत व्यक्त केले.

 

        भूजल विषयक माहिती संकलन व खुली करण्याच्या विविध पद्धती या विषयावर रितेश माटे यांनी माहिती दिली. भूजल मित्र व समूह संघटक यांचेमार्फत दरदिवशी पर्जन्यामानाच्या नोंदी ग्रामपंचायत स्तरावर घेतली जात असून भूजल पातळी दरमहा दहा निरीक्षण विहिरीची व पिझोमिटरची घेतली जात आहे. मान्सून पूर्व व मान्सूनपश्चात पाणी नमुना तपासणी केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

        सन 2023-24 मध्ये अटल भूजल योजने अंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत 67 ग्रामपंचायतने सहभाग घेतला होता.  शेतकऱ्यांना लघुसिंचनासाठी कृषी विभागाच्या विविध योजना तसेच शेतकरी प्रोडूसर कंपनी स्थापन करण्यासाठी शासनाच्या विविध योजनेबाबत भूपेश बावनकुडे यांनी माहिती दिली. तहसिलदार राहुल पाटील यांनी अटल भूजल योजनेंतर्गत झालेल्या जलसंधारनाच्या कामामुळे भुजलात वाढ होत असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. तर विविध प्रशिक्षणामुळे पाणी बचतीबाबत जनजागृती होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ग्रामपंचायत स्तरावरील प्रशिक्षणलासुध्दा चांगला प्रतिसाद मिळत असून यांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

 

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती शिक्षण आणि संवाद तज्ज्ञ प्रमोद झगेकर यांनी तर आभार प्रदर्शन कृषी तज्ज्ञ दिनेश खडसे यांनी केले. खुली चर्चा सत्राच्या माध्यमातून जलसंधारण तज्ज्ञ सचिन चव्हाण यांनी संवाद साधला. यावेळी सारडा संस्थेचे समन्वयक, विषय तज्ज्ञ,  समूह संघटक व सर्व गावातील भूजल मित्र उपस्थित होते.

0000

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ.एस.आर.रंगनाथन

उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

 

          अमरावती, दि. 28 (जिमाका):  डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कारआणि डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार सन 2023-24 च्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी विहीत नमुन्यातील अर्ज दि.25 सप्टेंबरपर्यंत तीन प्रतीत जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सु.गु. मडावी यांनी केले आहे.

 

          महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करून द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दीगंत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार तसेच, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येतो.  राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 1 लक्ष, 75 हजार, 50 हजार व 25 हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते.

000000

 

 

स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त, महिलांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त, महिलांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

         अमरावती, दि. 28 (जिमाका):  जिल्ह्यातील वरुड व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 500 हेक्टर खालील पाटबंधारे, जलसंधारण विभागाचे ‘पवनी सा. तलाव’ (36 हेक्टर) व अजनी फुलआमला तलाव (27 हेक्टर) हे दोन तलाव मत्स्यव्यसाय विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. यासाठी तलाव परिसरातील स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त व महिला यांना संस्था नोंदणी करण्यास प्राधान्य देण्यात येईल.  तरी सदर दोन तलावावर संस्था नोंदणी करण्यास इच्छुक असलेल्या स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त व मच्छिमार महिलांनी सहायक निबंधक (सहकारी संस्था), अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधून बातमी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या कालावधीत संस्था नोंदणीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यसाय एम.एम. मेश्राम यांनी केले आहे.

000000

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा अमरावती दौरा

 

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा अमरावती दौरा

            अमरावती, दि 28 (जिमाका) : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे शुक्रवार, दि. 30 ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-

            शुक्रवार, दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता नागपूर येथून वाहनाने अमरावती येथे आगमन. सकाळी 11.40 वाजता संत अच्च्युत महाराज हार्ट हॉस्पीटल मार्डी रोड, येथे प्रादेशिक ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन. त्यानंतर नेमाणी गोडाऊन समोरील सिपना कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजीच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यास उपस्थित. दुपारी 2.15 ते 4.30 पर्यत राखीव. दुपारी 5 वाजता हनुमान व्यायाम प्रसारकमंडळाचे सभागृह येथे दैनिक हिन्दुस्थानच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमास उपस्थित. सायंकाळी 6.30 वाजता अमरावती येथून वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.

00000

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर मेळावा; लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर मेळावा; लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

           अमरावती, दि. 28 (जिमाका):  इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत मागास बहुजनासाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून योजनेची सविस्तर माहिती मेळाव्याच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली.

 

            इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांची माहिती सर्व विद्यार्थी, लाभार्थी, पालकांपर्यंत तसेच सर्व शाळा प्रमुखांपर्यत पोहोचविण्यासाठी अचलपूर, दर्यापूर, चांदुर रेल्वे, धामणगांव व चिखलदरा या तालुक्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योजनेची माहिती तसेच योजनेचा लाभ घेण्याकरीता आवश्यक पात्रता, अर्ज कुठे व कसे करायचा याची सविस्तर माहिती मेळाव्यामध्ये देण्यात आली. तसेच योजनेच्या अनुषंगाने मान्यवरांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले.

000000

 

 

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत परिवहन महामंडळात प्रशिक्षणाची संधी; शनिवारी मेळाव्याचे आयोजन

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत परिवहन महामंडळात प्रशिक्षणाची संधी;

शनिवारी मेळाव्याचे आयोजन

 

          अमरावती, दि. 28 (जिमाका): युवकांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अमरावती विभागात विविध पदावर प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यासाठी शनिवार दि. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कार्यालय, शिवाजी नगर अमरावती येथे उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यानी केले आहे.

           

            मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत  युवक, युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढविण्यासाठी या कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक अहर्तप्रमाणे 12 वी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार, आयटीआय/पदवीका यांना 8 हजार व पदवीधर/पदव्युत्तर यांना 10 हजार रुपये शासनाकडून विद्यावेतन दिले जाणार आहे. या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असून प्रशिक्षणार्थ्यांचे वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील असावा.

 

            परिवहन महामंडळामध्ये प्रशिक्षणार्थी लिपीक-टंकलेखक पदाचे 67 व प्रशिक्षणार्थी लिपीक पदाचे 10 जागा, प्रशिक्षणार्थी सहायक पदाचे 60 जागा, प्रशिक्षणार्थी सहायक कारागीरचे 10 व प्रशिक्षणार्थी कारागीरचे 10 असे 157 जागेसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रशिक्षणार्थी लिपीक-टंकलेखक व लिपीक पदासाठी पदवीधर, टायपिंग इंग्रजी 40 श.प्र.मि., मराठी 30 श.प्र.मि., एमएस-सीआयटी पात्रता असणे आवश्यक. तर  प्रशिक्षणार्थी सहायक, सहायक कारागीर व कारागिरसाठी शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथून 1 किंवा 2 वर्ष कालावधी असलेला आयटीआय ट्रेड उर्त्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

          अर्ज करण्याची पद्धत : उमेदवाराने त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून रिक्त पदासाठी ऑनलाईन नोंदणी करावी. किंवा प्रत्यक्ष मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहुन वरील प्रक्रीया करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रोजगार नोंदणी कार्ड असणे आवश्यक आहे.

 

         मेळाव्याच्या ठिकाणी उमेदवारांची राहण्याची, येणे-जाणेसाठी मोफत प्रवास पास दिल्या जाणार नाही. मेळाव्याकरिता उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहावे. यांत्रिक प्रवर्गातील उमेदवारांना दोन शिफ्टमध्ये कामगिरी करावी लागेल. उमेदवारांना नेमणूक दिलेल्या ठिकाणी कामगिरी करावी लागेल. उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही. या योजनेंतर्गत शिकाऊ उमेदवारी एनअेपीएस/एमअेपीएस पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाही, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.

                                                                00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...