अटल भूजल योजना; जिल्हास्तरीय भूजल मित्र कार्यशाळा मोर्शी येथे संपन्न
अमरावती, दि. 28 (जिमाका): अटल भूजल योजनेतंर्गत
ग्रामपंचायत स्तरावरील भूजल मित्रासाठी एकदिवसीय कार्यशाळा दि. 23 ऑगस्ट रोजी तहसील
कार्यालय सभागृह मोर्शी येथे आयोजित करण्यात आला होतो. यावेळी विषय तज्ज्ञाव्दारे मार्गदर्शन
करण्यात आले.
वरिष्ठ भूवैज्ञानिक भूसवियं राजेश सावळे
यांचे मार्गदर्शनाखाली भुजल मित्र कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून
तहसिलदार राहुल पाटील, नायब तहसीलदार कृष्णकुमार ठाकरे, हरीश ठाकरे, कनिष्ठ भूवैज्ञानिक
हरीश कठारे उपस्थित होते.
जल पूजन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात
आले. कार्यशाळेची प्रस्तावना कनिष्ठ भूवैज्ञानिक हरीश कठारे यांनी केले. यावेळी अटल
भूजल योजनेअंतर्गत मोर्शी वरुड व चांदूर बाजार तालुक्यातील 93 ग्रामपंचायतीतील 214
गावामधील 29 हजार 973 विहिरीचे सर्वेक्षण केल्याची माहिती दिली. पाण्याच्या मोकाट वापरावर
नियंत्रण असणे गरजेचे असून शेतासाठी वापर करीत असलेल्या पाण्याची माहिती शेतकऱ्यांना होण्यासाठी 100 शेतकऱ्यांच्या विहिरीवर वॉटर फ्लो
मिटर बसविण्यात आले. यामुळे किती हजार लिटर पाणी पिकाला लागत असल्याची माहिती शेतकऱ्याला
होते. तसेच ग्रामपंचायतमध्ये पाणी पातळी घेण्यासाठी पिझोमीटर करण्यात आले असून त्यावर
डिजीटल वॉटर लेवल इंडिकेटर बसविण्यात आले आहे. डीएलआय-2 अंतर्गत लोकसहभागातून जलसुरक्षा
आराखडा तयार करण्यात आले असून अटल भूजल योजने अंतर्गत प्रोत्साहन निधीमधून संलग्न विभागामार्फत
नविन सिमेंट बंधारा, बांधकाम व दुरुस्ती, नाला खोलीकरण कोल्हापुरी टाईप बंधारा दुरुस्ती
आणि भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांचेमार्फत रिचार्ज शाफ्ट केले असून भूजल पातळी
वाढण्यासाठी या योजनांचा फायदा होत असल्याचे मत व्यक्त केले.
भूजल विषयक माहिती संकलन व खुली करण्याच्या
विविध पद्धती या विषयावर रितेश माटे यांनी माहिती दिली. भूजल मित्र व समूह संघटक यांचेमार्फत
दरदिवशी पर्जन्यामानाच्या नोंदी ग्रामपंचायत स्तरावर घेतली जात असून भूजल पातळी दरमहा
दहा निरीक्षण विहिरीची व पिझोमिटरची घेतली जात आहे. मान्सून पूर्व व मान्सूनपश्चात
पाणी नमुना तपासणी केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
सन 2023-24 मध्ये अटल भूजल योजने अंतर्गत
भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत 67 ग्रामपंचायतने सहभाग घेतला होता. शेतकऱ्यांना लघुसिंचनासाठी कृषी विभागाच्या विविध
योजना तसेच शेतकरी प्रोडूसर कंपनी स्थापन करण्यासाठी शासनाच्या विविध योजनेबाबत भूपेश
बावनकुडे यांनी माहिती दिली. तहसिलदार राहुल पाटील यांनी अटल भूजल योजनेंतर्गत झालेल्या
जलसंधारनाच्या कामामुळे भुजलात वाढ होत असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. तर
विविध प्रशिक्षणामुळे पाणी बचतीबाबत जनजागृती होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायत स्तरावरील प्रशिक्षणलासुध्दा चांगला प्रतिसाद मिळत असून यांचा शेतकऱ्यांनी
लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती शिक्षण
आणि संवाद तज्ज्ञ प्रमोद झगेकर यांनी तर आभार प्रदर्शन कृषी तज्ज्ञ दिनेश खडसे यांनी
केले. खुली चर्चा सत्राच्या माध्यमातून जलसंधारण तज्ज्ञ सचिन चव्हाण यांनी संवाद साधला.
यावेळी सारडा संस्थेचे समन्वयक, विषय तज्ज्ञ,
समूह संघटक व सर्व गावातील भूजल मित्र उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment