ज्येष्ठांनी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी
सौरभ कटियार यांचे आवाहन
अमरावती, दि. 23 (जिमाका) : आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटकांतील ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’द्वारे सहाय साधने किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी, तसेच प्रबोधन- प्रशिक्षणासाठी
एकवेळ एकरकमी तीन हजार रुपये डीबीटी प्रणालीव्दारे दिले जाते. या योजनेचा पात्र जेष्ठ
व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी
केले आहे.
राज्यातील 65 वर्ष व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन
जीवनातील सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा
यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच
मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र याद्वारे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी ही
योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक
अक्षमतेनुसार आवश्यक साधने, उपकरणे पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत
खात्यात थेट लाभ वितरित करण्यात येतात. लाभ वितरण झाल्यावर योजनेअंतर्गत उपकरणे खरेदी
केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थींची देयक प्रमाणपत्र
30 दिवसांच्या आत सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावे.
पात्रता : या योजनेसाठी अर्जदार
हा महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा. ज्येष्ठ नागरिकांचे वय हे किमान 65 वर्ष
असावे. तसेच या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत
असणे आवश्यक आहे.
लाभाचे स्वरूप : योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये थेट बँक खात्यात
मिळतात. यामधून वृद्ध लोकांसाठी उपयुक्त अशी श्रवण यंत्रे, फोल्डिंग वॉकर, बॅक सपोर्ट
बेल्ट, सर्वाइकल कॉलर, चष्मा, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, कमोड चेअर आदी उपकरणे खरेदी करता येईल.
कागदपत्रे
: आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत तथा कुठल्याही कोअर बँकेच्या पासबुकची झेरॉक्स,
स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे, आरोग्य
प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, समकक्ष योजनेचा लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र,
बीपीएल कार्ड झेरॉक्स आदी कागदपत्रे आवश्यक आहे.
अर्ज कुठे करावा : योजनेचे फॉर्म हे नागरिकांच्या सोयी नुसार आपापल्या
तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, मुख्याधिकारी, नगरपरिषद
कार्यालय तसेच सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, अमरावती येथे जमा करु शकतात. परिपूर्ण
कागदपत्र जोडलेले अर्ज सादर करून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण
कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
000000
No comments:
Post a Comment