Friday, August 16, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभ वितरणाचा कार्यक्रम

 





मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभ वितरणाचा कार्यक्रम

 

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री येणार

 

पुणे, दि. 16: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही गरजू महिलांच्या घरसंसाराला हातभार लावणारी कल्याणकारी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आकाराला आली आहे. या योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (दि. १७) शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार आहे.

 

राज्य शासनाने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबीकरण, आत्मनिर्भर करण्याबरोच त्यांच्या सशक्तीकरणाला चालना देण्याकरीता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सुरू केली आहे. राज्यातील बहिणींना रक्षाबंधनाची गोड भेट म्हणून रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमात महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील लाभ जमा करण्यात येणार आहे.

 

या कार्यक्रमास सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदींसह खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 

राज्यातील १५ हजाराहून अधिक लाभार्थी प्रातिनिधीक स्वरुपात कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्यावेळी लाभार्थींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, बैठक व्यवस्था, पार्किंग, महिलांना कार्यक्रमस्थळी आणण्याची व्यवस्था, त्यांची आरोग्य तपासणी, भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी व्यवस्था चोख होतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

 

पुणे जिल्ह्यातील ५ लाखावर महिलांच्या खात्यावर रक्कम जमा

या योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येत असून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये लाभार्थी भगिनींच्या खात्यावर जमा होण्यास १४ ऑगस्टपासूनच सुरूवात झाली आहे. आजपर्यंत पुणे जिल्ह्यातील ५ लाखाहून अधिक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर या योजनेची रक्कम जमा झाली आहे.

 

बहिणींसाठी अखंड कार्यरत आहे यंत्रणा

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'अंतर्गत सर्व पात्र महिलांना लाभ मिळेल, कोणीही पात्र भगिनी वंचित राहणार असे निर्देश दिले होते. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा अखंड कार्यरत ठेवल्यामुळे राज्यात सर्वाधिक महिलांची नोंदणी पुणे जिल्ह्यात झाली आहे. राज्यात १ कोटी ५६ लाख ६१ हजार २०९ महिलांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी राज्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील ९ लाख ७४ हजार ६६ महिलांनी नोंदणी केली आहे.

 

प्रशासनाच्या गतीमानतेमुळे ऑनलाईनसह ऑफलाईन अर्ज स्वीकारणे, ऑफलाईन अर्ज ऑनलाईन पोर्टलवर भरणे, अर्जांची छाननी करणे आदींसाठी २४ बाय ७ तत्त्वावर काम केल्यामुळे ९९.५४ टक्के अर्जांवर निर्णय घेण्यात आला.

 

प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज तपासून तिला लाभ देण्याची प्रक्रिया लाभ मिळेपर्यंत सुरू राहणार आहे. योजनेचा लाभ हस्तांतर करण्यासाठी महिलांचे बँकखाते आधार संलग्न करण्याची कार्यवाही प्रशासनाच्यावतीने सुरू असून सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. योजनेकरिता उर्वरित पात्र महिलांना ३१ ऑगस्टअखेर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

मंत्री कु. तटकरे आणि उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी घेतला तयारीचा आढावा

उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महिला व बाल विकास मंत्री कु. तटकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आज शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे भेट देऊन सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. कार्यक्रमात येणाऱ्या महिलांची कोणतीही गैरसोय होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

 

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...