केंद्रीय संचार ब्यूरो, अमरावतीकडून एनिमेशनच्या विद्यार्थ्यांसोबत जनजागृती कार्यक्रम
आपल्याला आवडणारे काम करत रहा: जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर
कला जोपासताना सामाजिक विषयांची माहिती ठेवा, कलाकार शिक्षक विजय राऊत
यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
अमरावती, दिनांक 14 ऑगस्ट 2024 समाजातील अनेक व्यक्ती तुमच्या
कलेतील शिक्षणाचा उपयोग काय म्हणून विचारतील, जोपर्यंत तुम्ही कलेतून काही मिळवत नाहीत,
तोपर्यंत त्यांना विश्वास बसणार नाही, परंतु तुम्ही कलेचे साधक म्हणून तुम्हाला जे
आवडते ते निश्चित करत रहा, त्यातून मिळणारे समाधान तुम्हाला खरा आनंद देईल, अशी भावना
जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी आज व्यक्त केली.
भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत काम
करणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो, अमरावती कार्यालयातर्फे स्वातंत्र्य दिन व ‘हर घर
तिरंगा’ अभियानानिमित्ताने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि कॉलेज
ऑफ एनिमेशन, बायो-इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर या महाविद्यालयासोबत हा कार्यक्रम आयोजित
केला होता; याप्रसंगी अपर्णा यावलकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या, त्यावेळी
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
विद्यार्थी म्हणून अभ्यासक्रमातील गोष्टी शिकताना व्यक्तिमत्त्व
विकासाच्या दृष्टीने शिक्षण घेतले पाहिजे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
महाविद्यालयाचे संस्थापक संचालक व प्राचार्य प्रथितयश कलाकार
विजय राऊत यांनी देखील यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रशासनाला कलेतून आपण सहाय्य करायला हवे, असे मत विजय
राऊत यांनी व्यक्त केले. कला जोपासताना सामाजिक विषयांची माहिती ठेवल्याने कलाकृतीला
एक नवा आयाम मिळतो, असेही त्यांनी विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले.
दोन दिवस विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्व व वादविवाद
स्पर्धा देखील घेण्यात आल्या. यावलकर यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना
पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात आली.
परिक्षक म्हणून ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व गोपाल उताणे व सहायक
प्राध्यापक अंकुश कडू यांनी काम पाहिले. यावेळी गोपाल उताणे यांनी विद्यार्थ्यांना
‘वक्तृत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे उप प्राचार्य निखिल राऊत यांच्या सहकार्याने
स्पर्धा नियोजन करण्यात आले.
केंद्रीय संचार ब्युरो, पुणेच्या शिल्पा पोफळे यांनी याप्रसंगी
प्रास्ताविक केले व केंद्रीय संचार ब्युरो, अमरावतीचे शशिकांत पटेल यांनी आभार प्रदर्शन
केले.
0000
No comments:
Post a Comment