मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
अमरावतीच्या बहिणीने साधला
मुख्यमंत्र्यांशी संवाद!
अमरावती, दि. 16 (जिमाका) : ‘मुख्यमंत्री
माझी लाडकी बहीण योजना’ या अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील जवळपास 3 लक्ष 95 हजार बहिणींची
ऑनलाईन नोंदणी झाली असून ह्या सर्व बहिणी प्रतिमहा पंधराशे रुपये लाभासाठी पात्र आहेत.
यासाठी काल दि. 15 ऑगस्ट या स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीशी सुसंवाद साधला. त्यामध्ये अमरावती
जिल्ह्यातील रंजना हिरुळकर या बहिणीने मुख्यमंत्री महोदय यांच्याशी प्रत्यक्ष संवाद
साधून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत तीन हजार रुपये मिळाल्यामुळे बोलीभाषेमध्ये
मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून याबाबत आभार व्यक्त केले.
मुख्यमंत्री
माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण चार लक्ष लाभार्थ्यांनी नोंदणी
केली होती. त्यापैकी 3 लक्ष 95 हजार लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले असून या लाभार्थ्यांच्या
खात्यामध्ये प्रतिमहा 1 हजार 500 रुपये याप्रमाणे 3 हजार रुपयांचा पहिला हप्ता एकत्रितरित्या
जमा झाला. यामुळे जिल्ह्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीशी संवाद साधता यावा
म्हणून मुंबई येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आभासी पद्धतीने सर्व बहिणीशी
संवाद साधला. यामध्ये अमरावतीतून रंजना हिरुळकर या लाभार्थी महिलेने मुख्यमंत्री महोदयांशी थेट संवाद साधत आपल्याला
या योजनेतून जो निधी मिळाला आहे त्याचा कसा उपयोग करण्यात येणार आहे, आणि हा निधी आपल्यासाठी
किती उपयुक्त आहे, या योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यास कसे सहाय्य
होईल याबाबत मनमोकळेपणे बोलून आपले मनोगत व्यक्त केले. या योजनेमुळे महिलांना कुटुंबासाठी
निर्णायक भुमिका घेताना आर्थिक सहाय्य होईल याबाबत सविस्तर संवाद साधला.
मुख्यमंत्री यांनीही यावेळी या लाडक्या बहिणीचे
कौतुक करत भाऊ म्हणून सदैव बहिणींच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, बाल विकास प्रकल्प अधिकारी नवनाथ घनतोडे,
नांदगाव पेठच्या सरपंच श्रीमती कविता डांगे,
श्रीमती दीपा शास्त्रकार, श्रीमती प्रिया खवले अंगणवाडी सेविका माया पिसाळकर, श्रीमती
अर्चना मोरे, श्रीमती सीमा गडले, श्रीमती किरण उगले यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
0000
No comments:
Post a Comment