Tuesday, August 20, 2024

जर्मनीत नोकरीच्या विविध संधी; इच्छूकांनी जर्मन भाषेच्या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 




जर्मनीत नोकरीच्या विविध संधी; इच्छूकांनी जर्मन भाषेच्या प्रशिक्षणासाठी

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

           अमरावती, दि. 20 (जिमाका): जर्मनीमधील बाडेन वुटेमबर्गम येथे कुशल मनुष्यबळाची मागणी असून, ती पुरविण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने या राज्याशी सामंजस्य करार केला आहे. त्यासाठी इच्छूकांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून पाच केंद्रांवर दोन सत्रामध्ये वर्ग चालविण्यात येणार आहेत. तरी जर्मनी देशात नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यां पात्र व कुशल युवकांनी आपले नाव ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा  शिक्षण व प्रशिक्षण  संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे यांनी केले आहे.

 

           महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत यूरोपियन देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची असणारी कमतरता पाशर्वभूमीवर राज्यातील युवकांना युरोपीय देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील बाडेन वुर्टेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देणे याबाबत सामंजस्य करार केला आहे.  त्यानुसार जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्यात सुमारे 10 हजार पदांची मागणी आहे. त्यात पारिचारिका, सुरक्षारक्षक, वाहनचालक, वीज कामगार, दंतचिकित्सा सहायक, हॉटेल व्यवस्थापक, स्वयंपाकी, रंगारी, केअरटेकर आदी विविध 30 क्षेत्रांतील पदे भरण्यात येणार आहेत. त्यात कौशल्य असलेल्या व जर्मनीत काम करण्यास इच्छूक असलेल्या युवकांनी ऑनलाईन नोंदणी करावी.

 

           पुणे येथील ग्योथो इन्स्टिट्यूट मॅक्सम्युलर भवन, तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. प्रशिक्षणानंतर आवश्यक कौशल्याबाबतही स्वतंत्र प्रशिक्षण दिले जाईल.  अमरावती जिल्ह्यात जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी पाच केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर सकाळी व रात्री वर्ग चालतील. प्रशिक्षण विनामूल्य असेल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळेल. प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी शासकीय व अनुदानित शाळांतील शिक्षकांनी नावनोंदणी करण्यासाठी https://maa.ac.in/GermanyEmployment/teacher-germany- employement.php   ही गुगल लिंक तयार करण्यात आली असून इच्छुक शिक्षकांनी लिंकवर नाव नोंदणी करावी. तसेच जर्मनी देशात नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यां पात्र व कुशल युवकांनी https://maa.ac.in/GermanyEmployment/student-germany-employement.php या वेबसाईटवर आपली नाव नोंदणी करावी, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...