Friday, August 16, 2024

पालकमंत्र्यांनी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाला दिली भेट; साथरोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे दिले निर्देश -पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

 



पालकमंत्र्यांनी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाला दिली भेट;

साथरोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे दिले निर्देश

-पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

 

            अमरावती, दि. 16 (जिमाका):  चिखलदरा तालुक्यातील हतरु व चुरणी या गावात साथरोगामुळे अचानक 24 रुग्णांना स्थानिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते. रुग्णांवर तातडीने औषधोपचार करण्यासाठी जिल्हास्तरावरील वैद्यकीय पथकही त्याठिकाणी पाठविण्यात आले होते. पथक व स्थानिक रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित रुग्णांवर प्रथमोपचार केलेत. या घटनेची पालकमंत्र्यांनी दखल घेऊन चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाला गुरुवारी (ता. 15 ऑगस्ट) भेट दिली. याप्रसंगी वैद्यकीय सोयी-सुविधांचा व रुग्णांच्या प्रकृतीच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा घेऊन साथरोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिले.

 

           पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या चिखलदारा दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, तहसिलदार प्रदीप शेवाळे, नायब तहसिलदार सुधीर धावडे तसेच वन विभागाचे अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

          हतरु येथील 17 रुग्ण व चुरणी येथील 7 असे 24 रुग्णांना साथरोगामुळे स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आले होते. भरती झालेल्या रुग्णांपैकी दहा रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांनी यावेळी दिली. तसेच साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी रात्र व दिवस पाळीसाठी 4 वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करुन पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. हतरु येथे संपूर्ण गावाचे सर्वेक्षण करण्यात येत असून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. पिंपरकर यांनी दिली.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...