Friday, August 9, 2024

चारचाकी वाहन संवर्गासाठी नवीन मालिका सुरु; आकर्षक क्रमांक राखीव करण्याचे आवाहन

 

चारचाकी वाहन संवर्गासाठी नवीन मालिका सुरु;

 आकर्षक क्रमांक राखीव करण्याचे आवाहन

        अमरावती, दि. 09 (जिमाका): चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता इच्छुक अर्जदारांनी दि. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.

 

           परिवहनेत्तर ( चारचाकी) संवर्गातील नवीन वाहनांकरीता नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी दि. 14 ऑगस्ट 2024  रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहीत शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज परिवहन कार्यालय, कॅम्प, अमरावती खिडकी क्रमांक 25 येथे जमा करावेत. वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांचा पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड जोडावे. तसेच अर्जामध्ये वाहन ज्या व्यक्तीच्या नावे आहे, त्या व्यक्तीचा आधार कार्डला सलंग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक डिमांड ड्राफ्ट अमरावती कॅम्प बॅच, ट्रेझरी ब्रँच कोड नं 003866 करीता देय असावा.

 

           एका पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज आला असेल, त्यांची व एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले असतील त्यांच्या पसंती क्रमांकाची यादी दि. 14 ऑगस्ट 2024 रोजी  4  वाजता कार्यालयातील नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आलेल्या यादीमधील पसंती क्रमांसाठी ज्यांनी अर्ज केला आहे अशाच अर्जदारांनी दि. 16 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठी पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सिलबंद करून खिडकी क्रमांक 25 वर जमा करावे. एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनापेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन सिलबंद लिफाफ्यात सादर केलेल्या जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट धारकांनी दि. 16 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे दालनात उपस्थित रहावे. लिलावासाठी उपस्थित राहणाऱ्या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकार पत्रासह हजर रहावे. कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदारांना परत देण्यात येईल. तसेच, विहीत वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठलाही प्रकारचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...