Friday, August 23, 2024

बाल मधुमेही रुग्णांना खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते मोफत इन्सुलिन

 






बाल मधुमेही रुग्णांना खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते मोफत इन्सुलिन औषधीचे वितरण

         अमरावती दि. 23 (जिमाका) : जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे बाल मधुमेही (Type-1) रुग्णांना मोफत इन्सुलिन औषधीचे वितरण खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या कमकुवत सामाजिक घटकांसाठी डॉ. बोंडे यांच्या सातत्यपूर्ण व यशस्वी प्रयत्नाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बाल मधुमेही रुग्णांना मोफत इन्सुलिन औषधी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

           जिल्हा सामान्य रुग्णालय, आयएमए व मधुमेह संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बाल मधुमेह रुग्णांना मोफत इंजक्शन इन्सुलीन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. संतोष राऊत, मधुमेह संघाचे अध्यक्ष डॉ. अजय डफडे, उपाध्यक्ष डॉ. शर्मिला बेले, विभाग प्रमुख डॉ तृप्ती जवादे, आईएमएचे अध्यक्ष डॉ. अनुपम देशमुख, सचिव डॉ. शर्मिष्टा बेले आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते.

           जिल्ह्यामध्ये बाल मधुमेह प्रकार(Type 1) 18वर्ष खालील आजारांनी ग्रस्त रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असुन दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आढळून येते. या रुग्णांमध्ये मधुमेह प्रकार बालपणामध्येच योग्य उपचार व इन्सुलीन मिळणे अत्यावश्यक असते. ज्यामुळे बालपणामध्येच निदान होऊन पुढील भविष्य सुखकर व आरोग्यपूर्ण होते.  शासकीय रुग्णालयांमध्ये या आजाराचे बरीच रुग्ण उपचार घेत आहेत. ज्यामध्ये मुख्यत्वे करुन आर्थिकदृष्ट्या कमकुवत सामाजीक घटक असतो. अश्या रुग्णांना केवळ रुग्णालयामध्ये भरती असतांना इन्सुलीन इंजक्शन दिल्या जातात. परंतु रुग्णास सु‌ट्टी झाल्यानंतर महागडे इंजक्शन स्वखर्चाने विकत घेवुन घरी उपचार सुरु ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे अश्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत 18 वर्ष खालील मधुमेही बालकांना घरी सुद्धा इन्सुलीन इंजक्शन मोफत मिळण्याकरीता डायबेटीक असोसिएशनचे संस्थापक तथा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधुन निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून बाल मधुमेही रुग्नाकरिता इन्सुलीनचे इंजेक्शन मोफत उपलब्ध करुन देण्यात आले.

           यावेळी उपस्थित रुग्णांना इन्सुलीन इंजक्शन कशा प्रकारे व किती प्रमाणात इंजक्शन घ्यावे, याबाबत वैद्यकीय अधिकारी व विषय तज्ज्ञांनी माहिती देऊन बाल मधुमेह आजाराबाबत मार्गदर्शन केले.  तसेच इन्सुलीन इंजक्शनची घरी कशाप्रकारे साठवणुक करावी याविषयी सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी डॉ. अजय साखरे यांनी केले.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...