कोलकत्ता येथील घटनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी समन्वयाने उपाययोजना राबवा- सौरभ कटियार
अमरावती, दि. 26 (जिमाका): कोलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेची दखल घेऊन जिल्ह्यात अशा घटनाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आरोग्य कर्मचारी व पोलीस यंत्रणेने आपसी समन्वय ठेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी आवश्यक ते उपाययोजना राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे कोलकत्ता येथील घटनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील परिस्थिती व उपाययोजना संदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधिक्षक ग्रामिण विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, पोलीस उपायुक्त सागर पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रिती मोरे तसेच विविध विभागाचे कार्यालय प्रमुख, खाजगी व शासकीय वैद्यकीय आस्थापना व संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, कामाच्या ठिकाणी आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना भेडसावत असलेल्या सुरक्षितता आणि संरक्षणविषयक समस्यांचे संबंधित आस्थापनानी तातडीने दखल घ्यावी. आवश्यकतेनुसार सुरक्षतेच्या दृष्टीने उपाययोजना करावी. सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, त्यांचे नियमित नियंत्रण करणे, सुरक्षा रक्षकाची नियुक्ती, महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह, निवासाची व्यवस्था अशा मुलभूत सुविधा कामाच्या ठिकाणी असल्याची खातरजमा संबंधित आस्थापनानी करावी. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात पोलिस यंत्रणेमार्फत ऑडिट केले जाईल. शासन व प्रशासन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कटीबद्ध असून त्यांच्यासाठी आवश्यक ते उपाययोजना राबविण्यात येईल. महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनासोबतच शाळा, महाविद्यालय, खाजगी व शासकीय आस्थापनाच्या ठिकाणी महिला सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यात यावी, असेही ते यावेळी म्हणाले.
महिलांच्या सुरक्षतेसाठी पोलीस यंत्रणा सदैव तत्पर असून त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 24 तास उपलब्ध आहे. “112” हा आपत्कालीन क्रमांक असून संकटात सापडलेल्या महिला वा व्यक्तींना पोलीस विभागामार्फत तातडीने मदत दिल्या जाते. या सुविधेचा महिलांनी लाभ घ्यावा. खाजगी व शासकीय आरोग्य विभागाने पोलीस विभागासोबत आपसी समन्वय ठेवावा. ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जाताना रात्रीच्या वेळी पोलीस यंत्रणेव्दारे सुरक्षा उपलब्ध करुन दिल्या जाईल. संवेदनशील भागामध्ये रात्रीच्या वेळी पेट्रोलिंगचे प्रमाण जास्त करण्यात येईल. महिलासंदर्भातील प्रकरणे हाताळणीसाठी महिला पथक तयार करण्यात आले असून शाळा व महाविलयास्तरावर समुपदेशन करण्यात येत आहे. कोलकत्ता सारख्या घटना होवू नये यासाठी सर्वांनी जागृत राहून होणाऱ्या अत्याचाराविरोधात पोलीस विभागाकडे तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिस विभागामार्फत करण्यात आले आहे.
000000
No comments:
Post a Comment