Thursday, August 15, 2024

जिल्हास्तरीय रानभाजी व मिलेट्स महोत्सवाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ;

 


















जिल्हास्तरीय रानभाजी व मिलेट्स महोत्सवाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ;

सेंद्रीय शेतीमुळे शेतकरी व ग्राहक दोघांनाही लाभ

-पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील

 

            अमरावती, दि. 15 (जिमाका): भारत हा कृषी प्रधान देश असून येथील आर्थिक विकास हा शेती व शेतीपूरक व्यवसायावर आजही अवलंबून आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीव्यवसायाला बळकट केल्याशिवाय सर्वांगिण आर्थिक विकास होणे शक्य नाही. ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ दिल्या जात आहे. शेतकऱ्यांनी संघटित होऊन शेतामध्ये विविध वाण्याच्या व प्रजातीच्या पिकांचे प्रयोग करावे. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून सकस व पौष्टिक वाण ग्राहकांना पुरविल्यास शेतकरी व ग्राहक या दोघांनाही लाभ होईल. यामाध्यमातून ग्रामीण अर्थकारण बदलण्यास निश्चितच मदत होईल, अशा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.

            कृषी विभागाच्या कृषि, तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट  यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जिल्हास्तरीय रानभाजी व मिलेट्स महोत्सवा’चा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांच्या हस्ते आज वलगाव येथील सिकची सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, आत्मा प्रकल्पाचे अध्यक्ष नरेंद्र शिंगणे, प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के, वलगावचे सरपंच सुधीर उगले, बाळासाहेब यादव आदी यावेळी उपस्थित होते.

           पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, उत्पादन वाढीसोबतच सुदृढ आरोग्यासाठी जैविक पिके व रानभाज्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. अलीकडच्या काळात वाढत चाललेल्या जंक फूडच्या सवयींमुळे प्रतिकारशक्ती कमी होत असून दुर्धर आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे शहरातही कुपोषणाचे प्रमाणात वाढ होत आहे. आहारातील तृणधान्य व रानभाज्यांचे महत्त्व ओळखून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी सामूहिक शेती, आधुनिक पीक पद्धती व सेंद्रीय शेतीकडे वळावे. नव्या पिढीला मिलेट्स व रानभाज्यांची ओळख करून देणारा हा महोत्सव महत्त्वपूर्ण आहे. हा महोत्सव मर्यादित कालावधीसाठी न ठेवता शहरातील नागरिकांना सहज उपलब्ध होईल, अशी बाजारपेठ निर्माण करावी. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन नागरिकांना आरोग्यवर्धक भाज्या व फळे सहज उपलब्ध होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

           

            गोरगरीब व शेतकऱ्यांसाठी शासन अहोरात्र काम करित असून त्यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या  ‘शेतकरी सन्मान योजने’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये सन्मान निधी  दिल्या जात आहे. तसेच शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बी-बियाणे, रासायनिक खते, युरिया शासनाच्या अनुदानातून कमी दरात उपलब्ध होत आहे. तसेच शेतकऱ्यांना जलयुक्त शिवारामुळे बारमाही पिक घेणे सोईचे झाले असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्ती प्रसंगी शासन शेतकऱ्यांच्या नेहमी पाठीशी आहे. पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना  नुकसान भरपाई मिळत आहे. यासह ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’मुळे महिलांचे आर्थिक सशक्तीकरण होण्यास मदत होणार असून येत्या काही दिवसात त्यांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये रक्कम जमा होणार आहे. अशा विविध योजनेच्या माध्यमातून गरजवंताना प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. यामुळे लाभार्थ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल होत असून त्यांच्या राहणीमानात सुधारणा होत आहे. मेळघाटाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून या भागाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यांनी सामुहिक शेतीला प्राध्यान्य देऊन उत्पादित शेती मालाला ‘मेळघाट हाट’च्या माध्यमातून बाजारपेठ निर्माण करण्यात आली आहे. तसेच मेळघाटातील आयुवेदीक औषध निर्माण, सेंद्रीय शेती, बांबू वर्गीय शेती यांना प्रोत्साहन देण्यासाठी  विशेष मोहिम राबवून या भागाचा सर्वागिण विकास करण्याचा मानस पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

           खासदार डॉ. बोंडे म्हणाले की, आधुनिक जीवनशैलीत आहारपद्धतीतून रानभाज्यांचे प्रमाण कमी झाले आहे. सुदृढ शरीरासाठी ऋतुनिहाय भाज्या आहारात असाव्यात. गुळवेल या भाजीमध्ये अँटी ऑक्स्डिेंटस्, ॲटी इन्फ्लेमेट्री गुणधर्म असून रक्तपेशी वाढविण्यास ही वनौषधी मदत करते. तसेच मधुमेह, त्वचेच्या समस्या या रोगांवर अतिशय उपयुक्त आहेत. प्रत्येक रानभाज्यांमध्ये औषधी व विविध घटकांनी परिपूर्ण असून कफ-पित्तदोष, रक्त विकार, खाज, कुष्ठरोग, पोटांचे विकार यासारख्या अनेक रोगांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे असे महोत्सव वेळोवेळी होणे आवश्यक आहे.  विविध संस्थेच्या माध्यमातून रानभाज्या विक्रीसाठी  जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर द्या. अशा महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक थेट विपणन साखळी निर्माण होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

महोत्सवात मिलेट्स, पाककृती व रानभाज्यांचा समावेश

          रानभाजी महोत्सवामध्ये मेळघाटसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील बचत गट, शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉलवर नैसर्गिकरित्या रुजलेल्या मायाळू, मटारू, राजगिरा, पुदिना, केणा, पाथरी, आघाडा, गुळवेल, ओवा, वावडिंग, शेवगा, तरोटा, तांदुळजा, बेलफळ, जिवती, कवठ, करवंद, रानकेळी, बांबू, करटुले, शतावरी, भुई आवळा, सुरण, अरबी, कमळकाकडी, कपाळफोडी, उंबर आदी 65 प्रकारचे रानभाज्यांसोबतच कडधान्याचे 30 पेक्षा जास्त प्रकार होते. तसेच बांबूपासून बनविलेले 16 प्रकारचे विविध साहित्यही या महोत्सवामध्ये ठेवण्यात आले होते. महोत्सवामध्ये आलेल्या खवय्यांसाठीही 25 प्रकारचे विविध पाककृतीचे स्टॉल्स महोत्सवात लावण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री यांनी महोत्सवात लावलेल्या विविध रानभाज्यांच्या व खाद्यपर्दाथांच्या स्टॉल्सला प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून रानभाज्यांची माहिती जाणून घेतली. यावेळी पालकमंत्र्यानी सावा खीर, अळूवळी अशा मिलेट्स व रानभाज्यांच्या खाद्यपदार्थांची चव चाखून खरेदीही केली.

           कार्यक्रमाच्या सुरुवातीला रानभाजी व मिलेट्सची माहिती असलेली ‘ओळख रानभाज्यांची’ या घडीपत्रिका व संत्रा फळपिकांची संपूर्ण माहिती असलेले ‘संत्रा उत्पादनाचे गुरुकिल्ली’ या पुस्तकाचे विमोचन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.  त्यानंतर ‘जिल्हास्तरीय रानभाजी व मिलेट्स’ महोत्सवाच्या आयोजन उद्देशाबाबत आत्माच्या प्रकल्प संचालिका श्रीमती निस्ताने यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार पुरवठा व मुल्य साखळी तज्ज्ञ निलेश राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...