Tuesday, August 27, 2024

‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी जेष्ठ नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन

 

‘मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी जेष्ठ नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन

 

           अमरावती, दि. 27 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरु करण्यात आली आहे. जेष्ठांमध्ये वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा निराकरणासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे, योग उपचार केंद्राव्दारे प्रबोधन, प्रशिक्षणासाठी पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. लाभ वितरण झाल्यावर या योजनेंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य  केंद्राव्दारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्या प्राप्त करुन घ्यावे.

 

            या योजनेसाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमस्वरुपी रहिवासी असावा. जेष्ठ नागरिकांचे वय हे किमान 65 वर्ष असावे. तसेच या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.

 

            या योजनेत जेष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये थेट बँक खात्यात मिळतात. यामधून वृध्द लोकांसाठी उपयुक्त अशी श्रवणयंत्रे, फोल्डिंग वॉकर, बॅक सपोर्ट बेल्ट, सर्वाइकल कॉलर, चष्मा, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, कमोड चेअर आदी उपकरणे खरेदी करता येतात. यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत तथा कुठल्याही कोअर बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे, आरोग्य प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, समकक्ष योजनेचा लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र, बीपीएल कार्ड झेरॉक्स आदी कागदपत्रे आवश्यक आहे.

 

            या योजनेचे अर्ज ज्येष्ठ मंडळी त्यांच्या सोयीनुसार आपआपल्या तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, मुख्याधिकारी, नगरपरिषद कार्यालय तसेच सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, अमरावती येथे जमा करु शकतात. परिपूर्ण कागदपत्र जोडलेले अर्ज सादर करुन ज्येष्ठांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन समाजकल्याणच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

 

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...