तालुकास्तरीय क्रीडा संकुलात आवश्यक सर्व क्रीडा सुविधा पुरविणार
जिल्हा क्रीडा संकुलाचा
लोकार्पण सोहळा संपन्न
-पालकमंत्री चंद्रकांत
(दादा) पाटील
अमरावती, दि. 16 (जिमाका): अमरावती जिल्ह्याला
क्रीडा संस्कृतीचा जुना वारसा आहे. येथील जगप्रसिध्द हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ मागील
शंभर वर्षापासून क्रीडा क्षेत्रात काम करीत आहे. हजारो क्रीडा शिक्षक व आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय खेळाडू या भूमीत निर्माण झाले आहे. येथील आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी विविध
स्पर्धांमध्ये सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त केले आहे. जिल्हास्तराप्रमाणे ग्रामीण
भागातील मुला-मुलींनाही तालुकास्तरावरच क्रीडा सुविधा मिळाल्यास विद्यार्थी लहान वयापासूनच
या क्षेत्राकडे वळतील. व आपसुकच युवा पिढीचे आरोग्यही सुधारेल. तालुकास्तरीय क्रीडा
संकुलात आवश्यक सर्व क्रीडा सुविधा पुरविणार असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग,
संसदीय कार्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी
आज येथे केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठासमोरील
नवनिर्मित जिल्हा क्रीडा संकुलाचे लोकार्पण व विविध क्रीडा सुविधांचे भुमीपूजन पालकमंत्री
चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार सुलभाताई
खोडके, आमदार रवि राणा, जिल्हाधिकारी तथा उपाध्यक्ष जिल्हा क्रीडा संकुल समिती सौरभ
कटियार, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाचे विजय संतान, राज्य धर्नुविद्या
संघटनेचे अध्यक्ष ॲङ प्रशांत देशपांडे, सचिव अमर राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत
मस्के आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, आज जिल्हा
क्रीडा संकुल लोकार्पण होत असतांना आनंद होतो की, संकुलाच्या 28 हजार चौ. मीटर जागेवर
आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्चरी रेंज, स्क्वॅश कोर्ट, आधुनिक जीम, कब्बड्डी, ज्युदो,
कुस्ती, टेबल टेनिस इत्यादी क्रीडा सुविधा 11 कोटी निधीमधून निर्माण झालेले आहे. त्या
लवकरच खेळाडूंसाठी खुल्या करण्यात येतील. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार
तालुका क्रीडा संकुलाचे अनुदान मर्यादा 1 कोटीवरुन 5 कोटी, जिल्हा क्रीडा संकुलासाठी
8 कोटीवरुन 25 कोटी तर विभागीय क्रीडा संकुलासाठी 24 कोटीवरुन 50 कोटी वाढविण्यात आलेली
आहे. ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे. अमरावती जिल्हा क्रीडा संकुलातील विविध क्रीडा
सुविधांचा लाभ घेवून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू संकुलातून निर्माण होतील,
असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा धोरणानुसार महाराष्ट्रातील
प्रत्येक तालुका, जिल्हा व विभागाच्या ठिकाणी महाराष्ट्र स्पोर्ट्स, महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर
डेव्हलपमेंट प्लॅन अंतर्गत विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने
अमरावती येथे जिल्हा क्रीडा संकुलासाठी 9 एकर शासकीय जागेत 14.32 कोटी रुपये प्राप्त
निधीमधून जिल्हा क्रीडा संकुलामध्ये प्रशासकीय इमारत, इनडोअर हॉल, धनुर्विद्या रेंज,
प्रेक्षक गॅलरी, अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत, विद्युतीकरण व जनरेटर इत्यादी कामे सार्वजनिक
बांधकाम विभागामार्फत पूर्ण करण्यात आलेली आहे. ही सर्व कामे कमी वेळेमध्ये करण्यात
आली असून उच्चदर्जाची व सुबक आखणी करुन या सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा
क्रीडा संकुलामध्ये विविध क्रीडा सुविधांचा विद्युत वापर कमी करण्यासाठी संपूर्ण जिल्हा
क्रीडा संकुलात सोलर सिस्टम बसविणे व हायमास फ्लड लाईट लावणे या कामास 50 लक्ष खर्च
अपेक्षित आहे. ही कामे महाउर्जा विकास अधिकारण या यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे.
जिल्ह्याच्या धर्तीवर तालुका पातळीवर सर्व क्रीडा सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करुन
देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
क्रीडा प्रोत्साहपर निधीचे वितरण
राज्य शासनाच्या क्रीडा धोरणानुसार क्रीडा
व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, अमरावती व जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय, अमरावतीमार्फत तालुका, जिल्हा , विभाग, राज्य, राष्ट्रीयस्तर या
क्रमाने विविध 93 खेळांच्या 14, 17, 19 या वयोगटातील मुले, मुली यांच्या क्रीडा स्पर्धेचे
आयोजन करण्यात येते. यादृष्टीने प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना कार्यान्वित आहे.
या योजनेंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा
स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रोत्साहनात्मक
अनुदान देण्यात येते. अनुदानाचे स्वरूप म्हणून प्रमाणपत्र व तीनही वयोगटात प्रथम, व्दितीय,
तृतीय प्राविण्यानुसार अनुक्रमे एकूण 9 शाळांना,
संस्थांना रू. 1 लाख, 75 हजार, 50 हजार रूपये देण्यात येते.
यानुसार 14 वर्षीय मुले व मुली या वयोगटांतर्गत
ज्ञानमाता हायस्कुलने प्रथम क्रमांक पटकावला असून 1 लक्ष रुपयांचे बक्षिस मान्यवरांच्या
हस्ते प्रदान करण्यात आले. तोमई प्रायमरी इंग्लिश स्कुलचा व्दितीय क्रमांक असून त्यांना
75 हजार रुपयांचे पारितोषिक तर स्कुल ऑॅफ स्कॉलर्स शाळेला तृतीय क्रमांक मिळाला असून
त्यांना 50 हजार रुपये निधीचे अनुदान स्वरुप रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच 17 वर्षीय मुले व मुली या वयोगटांतर्गत ज्ञानमाता
हायस्कुलने प्रथम क्रमांक पटकावला असून 1 लक्ष रुपयांचे बक्षिस मान्यवरांच्या हस्ते
प्रदान करण्यात आले. गणेशदास राठी विद्यालयाचा व्दितीय क्रमांक असून त्यांना 75 हजार
रुपयांचे पारितोषिक तर स्कुल ऑॅफ स्कॉलर्स शाळेला तृतीय क्रमांक मिळाला असून त्यांना
50 हजार रुपये निधीचे अनुदान स्वरुप रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
त्याचप्रमाणे 19 वर्षीय मुले व मुली या वयोगटांतर्गत विद्याभारती
कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला असून 1 लक्ष रुपयांचे बक्षिस मान्यवरांच्या
हस्ते प्रदान करण्यात आले. गणेशदास राठी विद्यालयाला व्दितीय क्रमांक असून त्यांना
75 हजार रुपयांचे पारितोषिक तर रामकृष्ण क्रीडा विद्यालयाला तृतीय क्रमांक मिळाला
असून त्यांना 50 हजार रुपये निधीचे अनुदान स्वरुप रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात
आले.
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले
आर्चेरी आंतरराष्ट्रीय खेळाडू सुमेध मोहोड (क्रीडा प्रबोधिनी खेळाडू) ज्युनि.वर्ल्ड
चॉम्पियनशिप व एशियन कप यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सन 2024-25 मध्ये नाविण्यपूर्ण योजनेतून इनडोअर हॉलला ॲक्वास्टिक
ट्रिटमेंट करणे सिंथेटिक्स फ्लोअर असलेली स्केटिंग रिंग, बास्केटबॉल कोर्ट, बॉक्स क्रीकेट
या क्रीडा सुविधा विकसित करुन खेळाडूंना उपलब्ध होण्यासाठी 1 लक्ष रुपयाचे नियोजन प्रस्तावित
असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी प्रास्ताविकेमध्ये दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा
अधिकारी गणेश जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्षिप्रा मानकर आणि डॉ. नितीन
चवाळ यांनी केले.
0000
No comments:
Post a Comment