Friday, August 30, 2024

अमरावती विधानसभा मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द

 

अमरावती विधानसभा मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द

 

               अमरावती, दि. 30 (जिमाका): आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुक - 2024 च्या अनुषंगाने दि. 1 जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित प्रारुप मतदार यादी आज दि. 30 ऑगस्ट रोजी  038- अमरावती विधानसभा मतदारसंघातील सर्व 322 मतदान केंद्र तसेच अमरावती महानगरपालिका, तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मतदान केंद्रावरील मतदार यादीत आपल्या नावाची नोंद असल्याची खात्री करावी, असे आवाहन अमरावती विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.

 

          अंतिम मतदार यादी शासकीय कामाकाजाचे वेळेत मतदार नोंदणी अधिकारी, 038 –अमरावती विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी अमरावती यांचे कार्यालयात उपलब्ध करण्यात आलेली आहे. सर्व मतदारांनी आपले मतदान केंदावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बिएलओ यांचेकडे किंवा तहसिल कार्यालय, अमरावती येथील निवडणूक विभागात जाऊन मतदान यादीमध्ये आपल्या नावाची नोंद असल्याची खात्री करावी. मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये नसेल तर नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना-6तसेच नाव किंवा इतर तपशिलात दुरूस्ती करावयाची असल्यास नुमुना-8 भरून व नाव वगळायचे असल्यास नमुना-7 भरून मतदार नोंदणी अधिकारी, 038-अमरावती विधानसभा मतदासंघ तथा उपविभागीय अधिकारी, अमरावती यांचे कार्यालयास सादर करावे.

           

            मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी https://votres.eci.gov.in किंवा व्होटर हेल्पलाईन अप्लीकेशनवर भेट देऊन मतदार घरबसल्यासुध्दा आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करू शकतात. तसेच मतदार यादीमध्ये नाव शोधण्याकरीता https://electoralsearch.ecigov.in येथे भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

00000

अमरावतीच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी गजानन कोटुरवार रुजू

 



अमरावतीच्या जिल्हा माहिती अधिकारी

पदी गजानन कोटुरवार रुजू

 

           अमरावती,दि.30 (जिमाका):-  जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती येथील जिल्हा माहिती अधिकारी या पदावर गजानन शेषराव कोटुरवार आज रुजू झाले आहेत. जिल्हा माहिती अधिकारी या पदावर त्यांची प्रशासकीय बदली झाली असून त्यांनी आज दि.  30 ऑगस्ट 2024 रोजी माहिती अधिकारी श्रीमती अपर्णा यावलकर यांच्याकडून जिल्हा माहिती अधिकारी या पदाचा कार्यभार स्वीकारला.

 

              माहिती अधिकारी श्रीमती अपर्णा यावलकर, माहिती सहायक सतिश बगमारे, वरीष्ठ लिपीक प्रतिक फुलाडी, योगेश गावंडे, छायाचित्रकार सागर राणे, कनिष्ठ लिपीक गजानन परटके, कोमल भगत, वाहनचालक हर्षल हाडे, शिपाई राजश्री चौरपगार, प्रतिक वानखडे आदी यावेळी उपस्थित होते.

 

            जिल्हा माहिती अधिकारी श्री. कोटुरवार यांनी यापूर्वी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मुंबई व जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ येथे उपसंपादक पदावर तसेच विभागीय माहिती कार्यालय, अमरावती येथे सहायक संचालक तर जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा येथे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर काम केले आहे. या कालावधीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण शासकीय उपक्रम राबवून त्यांनी योगदान दिले आहे.

 

00000

प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण; अपघात नियंत्रणासाठी प्रशिक्षित वाहनचालक आवश्यक - नितीन गडकरी

 












प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण;

अपघात नियंत्रणासाठी प्रशिक्षित वाहनचालक आवश्यक - नितीन गडकरी

            अमरावती, दि. 28 (जिमाका): देशामध्ये राष्ट्रीय महामार्ग व रस्ते बांधणीचे कामे वेगाने सुरु असून वाहतुकीचा वेग वाढला आहे. वाढत्या वेगासोबतच रस्ते अपघातामध्येही लक्षणीय वाढ चिंताजनक आहे. अपघात होण्याचे मुख्य कारण परिपूर्ण प्रशिक्षित नसल्याचे  निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहनचालकांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अशा प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून उत्तम प्रशिक्षित वाहनचालक निर्माण होऊन अपघात कमी होण्यास निश्चित मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

 

             मार्डी रोडवरील प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केंद्रीयमंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, विभागीय परिवहन अधिकारी उर्मिला पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सिपना शिक्षण प्रसारक मंडळ व प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष जगदिश गुप्ता आदी उपस्थित होते.

 

            देशात राष्ट्रीय महामार्ग जलद गतीने तयार होत असून यामुळे पैसा, पर्यावरण व वेळेत बचत होत आहे. वाहतुकीचा वेग वाढल्यामुळे रस्ते अपघातामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यात येत आहे. यातून प्रशिक्षित वाहनचालक निर्माण करण्याचे धोरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. हे राज्यातील पहिले केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रामुळे प्रशिक्षित वाहनचालक तयार होतील, असा विश्वास केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केला.

 

             रस्ता सुरक्षा व अपघात कमी करण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करीत आहे. त्यामध्ये अपघात प्रवण स्थळाचा शोध घेऊन दुरुस्ती करणे, वाहननिर्मिती करणाऱ्या उद्योगांना वाहनामध्ये एअर बॅग, ऑटोमॅटिक ब्रेकींग सिस्टीम, आधुनिक तंत्राचा वापर करुन अपघात नियंत्रण सुविधा निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पेट्रोल, डिझेलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहन, सीएनजी, इॅथेनॉल इंधनावर चालणाऱ्या वाहनाचा एक सशक्त व परवडणाऱ्या पर्यायाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. वाहतूक क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल होत आहे.  प्रशिक्षित वाहनचालकांना देश-विदेशात 22 लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असून देशाच्या विकासाला चालना मिळणार आहे. कौशल्य विकास क्षेत्रात मोठी मागणी असून प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून या संधीचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. गडकरी यांनी केले.

 

            प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्रामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. या केंद्रामध्ये चांगले प्रशिक्षित वाहनचालक तयार होवून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे. केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात रस्ताचा विकास झपाट्याने होत असून पर्यावरणपूरक इंधनाला ते प्रोत्साहन देत आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमामुळे देशाच्या विकासात हातभार लागत असल्याचे डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.

 

            कार्यक्रमाच्या सुरुवातील केंद्रीयमंत्री श्री. गडकरी यांनी प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली. सिपना शिक्षण प्रसारक मंडळ व प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष जगदिश गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. इशांत राजगुरु यांनी केले. तर राखी गुप्ता यांनी आभार मानले.

00000

मुल्याधिष्ठित ज्ञान मिळविताना माणूसपणही जपा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 








मुल्याधिष्ठित ज्ञान मिळविताना माणूसपणही जपा

 

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 

अमरावती, दि. 30 (जिमाका) : अन्य देशांच्या तुलनेत आपल्या देशात पारिवारिक जीवन जपल्यामुळे संस्कारशील समाजरचना आजही कायम आहे. नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपापल्या क्षेत्रात मुल्याधिष्ठित ज्ञान मिळवितानाच माणूसपणही जपा. अर्थार्जन करताना उत्तम नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पाळा, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

 

नेमाणी गोडाऊन समोरील सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरींग टेक्नॉलॉजीच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचा समारोपीय सोहळा विद्यालयाच्या स्व. अरविंदजी उर्फ भाऊ लिमये सभागृहात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. सिपना प्रसारक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जगदीश गुप्ता, प्राचार्य संजय खेरडे यावेळी उपस्थित होते.

 

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सिपना प्रसारक शिक्षण मंडळ रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. आजवर येथे कितीतरी विद्यार्थी घडले. ज्ञानामुळेच माणसाची किंमत वाढते. शोध, कौशल्य, ज्ञान यांचे रुपांतरण तुमच्या कार्यात केल्यास निश्चितच प्रगती होते. प्रत्येक व्यक्तीकडून शिकण्यासारखी बाब असते, ती तेवढी शिकून घ्या. आयुष्यात अर्थार्जन करीत असताना ज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान यांचे नवनवे प्रयोग करीत रहा. सुरक्षिततेपेक्षा धोके पत्करायला शिका. कोणतेही नवीन कार्य करताना तुमची इच्छाशक्ती खूप महत्त्वपूर्ण आहे. स्वत:ची प्रगती करण्यासाठी वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वपण सिध्द करा. 

 

श्री. गडकरी पुढे म्हणाले की, देशातील शेतकरी अन्नदाता नसून उर्जादाता आहे. यामुळेच शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे. देशाच्या विकासासाठी ‘स्मार्ट व्हिलेज’ या संकल्पनेवर काम करणे सुरु आहे. जीवनमान सुकर करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करा. इथेनॉल, बायोडिझेल, इलेक्ट्रिक चारचाकी, दुचाकी वाहने यामुळे सामान्यांच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणावर अर्थबचत होत आहे. सध्या भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची  अर्थव्यवस्था आहे. देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आर्थिक समता आणि सामाजिक समता महत्त्वपूर्ण आहे. ‘नीडबेस रिसर्च’ वर विद्यार्थांनी काम करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील गरजा गावातच पूर्ण होण्यावर भर द्या. मदर डेअरी, शेणापासून पेंट, इथेनॉलपासून इंधन अशासारख्या छोट्या बदलातून मोठे बदल लवकर होतात. ई-रिक्षा, ई-कार्टमुळे आज मानवी रिक्षा बंद झाली आहे. यासाठी नवतंत्रज्ञान आत्मसात करुन नोकरी मागणारे न बनता नोकरी निर्माण करणारे बना, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

 

सिपना प्रसारक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. गुप्ता यांनी संस्थेचा आजवरचा प्रवास आणि प्रगती या विषयी माहिती दिली. संस्थेची वाटचाल अधिक प्रगतीशील करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन विविध उपक्रम राबवावे. पुस्तकी ज्ञानासोबत सामाजिक भान जपा. आयुष्यात सत्कर्म करण्यासाठी संगत महत्त्वपूर्ण आहे. यामुळे आपली संगत योग्य राहील यासाठी विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सिपना प्रसारक शिक्षण मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या विकासाबाबतची चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजय खेरडे यांनी केले. आभार डॉ. विशाल राठी आणि नेहा राठी यांनी मानले. 

 

 

00000

Thursday, August 29, 2024

अमरावती महापालिका हद्दीतील मंडप, पेंडॉल तपासणीसाठी पथक

 

अमरावती महापालिका हद्दीतील मंडप, पेंडॉल तपासणीसाठी पथक

 

        अमरावती, दि.29 (जिमाका) :  जिल्ह्यातील अमरावती महानगरपालिका हद्दीमधील सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ या प्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या तपासणीकरीता तपासणी पथक गठीत करण्यात आले आहे. तरी नागरीकांनी सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ या प्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास तपासणी पथकातील सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

 

       पथक याप्रमाणे : उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अनिलकुमार भटकर, दुरध्वनी क्रमांक 0721-2565023, मोबाईल क्रमांक 9881008494, ईमेल- sdo.amravati@gmail.com, महानगरपालिका अमरावती झोन क्रं. 01 सहायक आयुक्त नंदकिशोर तिखीले दुरध्वनी क्रमांक 0721-2676626, मोबाईल क्रं. 7030922889, ईमेल- tikhilenandkishor7@gmail.com , राजापेठ विभाग सहायक पोलीस आयुक्त जयदत्त भवर, दुरध्वनी क्रमांक 0721-2678300, मोबाईल  क्रमांक 9930606689, ईमेल-acprajapeth.cpamt@mahapolic.gov.in  यावर संपर्क साधावा.

000000

कावड यात्रा उत्सवाच्या दिवशी दर्यापूर ते मुर्तिजापूर वाहतूक मार्गात बदल

 

कावड यात्रा उत्सवाच्या दिवशी दर्यापूर ते मुर्तिजापूर वाहतूक मार्गात बदल

 

            अमरावती, दि.29 (जिमाका) : श्रावणातील शेवटच्या सोमवारी अमरावती जिल्हयातील दर्यापूर शहरात मोठ्या प्रमाणावर कावड यात्रा उत्सव साजरा होतो. कायदा व सुव्यवस्थाच्या अनुषंगाने दर्यापूर ते मुर्तिजापूर मार्गावर वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी सौरभ कटियार यांनी जारी केला आहे.

 

               दर्यापूर ते मुर्तिजापूर या रोडवर कावड यात्रा मंडळ व शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. सदर रोडचे रुंदीकरण झाल्याने रोडवर वाहतुक वेगाने सुरू राहते. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेकरिता तसेच कावड यात्रा मिरवणूक शांततेत पार पडावी या करीता दर्यापूर ते मुर्तिजापूर मुख्य मार्ग रविवार दि. 1 सप्टेंबर 2024 चे रात्री 10 वाजेपासून ते 2 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत दर्यापूर-आमला-आसरा फाटा-बोटा-हिरापूर ते मुर्तिजापूर मार्गे (फक्त एस.टी. बस वाहतुक वगळून) वळविण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल.

0000

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत पोलीस अधीक्षक ग्रामीण कार्यालय येथे प्रशिक्षणाची संधी; 3 सप्टेंबरला मेळाव्याचे आयोजन

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत पोलीस अधीक्षक ग्रामीण कार्यालय येथे प्रशिक्षणाची संधी;

3 सप्टेंबरला मेळाव्याचे आयोजन

 

           अमरावती, दि. 29 (जिमाका): युवक, युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण कार्यालयातंर्गत विविध पदावर प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यासाठी मंगळवार दि. 3 सप्टेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालय, अमरावती ग्रामीण येथे उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामीण पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांनी केले आहे.

           

           प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक अहर्तप्रमाणे 12 वी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार, आयटीआय/पदवीका यांना 8 हजार व पदवीधर/पदव्युत्तर यांना 10 हजार रुपये शासनाकडून विद्यावेतन दिले जाणार आहे. या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असून प्रशिक्षणार्थ्यांचे वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील असावा. या योजनेकरीता इच्छुक उमेवारांनी

            https://drive.google.com/file/d/lvhLLv6YEvk06pcbKuorwi-pUlqpnpf8t/view?usp=sharing या लिंकवरून अर्जाची प्रिंट काढुन सदर अर्ज भरून शैक्षणिक कागदपत्रासह पोलीस अधीक्षक कार्यालय, अमरावती ग्रामीण येथे उपस्थित राहावे.

 

            अमरावती ग्रामीण कार्यालय, अमरावती येथे 39 पदे, उपविभागीय अचलपूर येथे 19, उपविभागीय अंजनगांव येथे 10, उपविभागीय दर्यापर येथे 10, उपविभागीय अमरावती ग्रामीण येथे 19, उपविभागीय मोर्शी येथे 16, उपविभागीय चांदुर रेल्वे येथे 19, उपविभागीय धारणी येथे 7 असे एकुण पदे 139 पदावर प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात येणार आहेत.           

 

            आवश्यक कागदपत्रे : उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवास असावा, उमेदवारांची आधार नोंदणी असावी, उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे, उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तलाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा, उमेदवारांने अर्ज भरतांना उपरोक्त ठिकाणापैकी एकाच ठिकाणासाठी अर्ज सादर करावा, सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी उमेदवारांना या योजनेंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे, एका उमेदवारस या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल.  उमेदवाराचे ज्या ठिकाणी प्रशिक्षणाकरीता नेमणूक केली जाईल ते मुख्यालय सोडता येणार नाही, यांची नोंद घ्यावी.

00000

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...