Thursday, September 11, 2025

DIO NEWS AMRAVATI 11-09-2025

 











                               योजनेतील कर्जदारांनी जाणीवपूर्वक कर्ज परतफेड करावी

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 11 (जिमाका) : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतून युवकांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्यामुळे कर्ज मंजूर झालेल्या कर्जदारांनी जाणीवपूर्वक कर्ज परतफेड करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी आज बँक ऑफ महाराष्ट्रच्या एमएसएमई शाखेला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते शासनाच्या योजनांतून मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणांचे स्विकृती पत्र वाटप करण्यात आले. विभागीय बँक व्यवस्थापक महेश डांगे, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी शाखेतील कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेची माहिती घेतली. कर्ज मंजुरीची प्रकरणे ऑनलाईन येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. बँकेच्या शाखेकडून आलेल्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. केंद्र आणि राज्य शासनाकडून उद्योगांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी कर्ज योजना राबवून सबसिडी देत आहे. त्यामुळे युवकांनी यासाठी पुढे येऊन रोजगार देणारे व्हावे, असे आवाहन केले.

पर्यटन विभागातर्फे आई योजना राबविण्यात येत आहे. यात कर्जावरील व्याज माफीची योजना आहे. याचाही कर्जदारांनी लाभ घ्यावा. तसेच चांगल्या पद्धतीने व्यवसाय करून कर्जाची जबाबदारीने परतफेड करावी. बँकेने कर्ज दिलेल्या उद्योगांना बँकांच्या अधिकाऱ्यांनी भेट द्यावी. तसेच कर्ज प्रकरणे मंजूर करण्यास गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.

बँकेतर्फे शिवणकाम, तेल घाणी, बांधकाम व्यवसाय, बांधकाम साहित्य, शेळी पालन, ब्युटी पार्लर, रेडीमेड गारमेंट, फोटो स्टुडिओ, आटा चक्की, डेअरी, कँटीन आदी योजनांसाठी कर्ज स्विकृतीचे पत्र देण्यात आले.

000000

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा

अमरावती, दि. 11 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे शनिवार, दि. 13 सप्टेंबर व रविवार, दि. 14 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, शनिवार, दि. 13 सप्टेंबर रोजी 3 वाजता चिखलदरा येथील पंचायत समिती सभागृहात उमेद, महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मोथा येथे खवा निर्मिती करणाऱ्या बचतगटाची सभेला उपस्थित राहतील. रविवार दि. 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता चिखलदरा येथील पंचायत समिती सभागृहात दुध उत्पादक व स्ट्राबेरी उत्पादकांच्या सभेला उपस्थित राहतील. दुपारी 2 वाजता सोईने काटोलकडे प्रयाण करतील.

0000

वसतिगृहात प्रवेशासाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींसाठी सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर व्यावसायिक अभ्यासक्रमाचा प्रोफेशनल कोर्स वरून प्रवेश अर्ज करावा. त्यानंतर आवश्यक सर्व कागदपत्रासह नजीकच्या वसतिगृह कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. विभागीय स्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह संकुल, निंभोरा येथे इच्छुकांनी फॉर्म वेळेत जमा करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालय किंवा वसतिगृह कार्यालय, निंभोरा येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

सेवा पंधरवड्यात अमरावती तालुक्यात विविध उपक्रम

अमरावती, दि. 11 (जिमाका) : 'सेवा पंधरवडा' मोहिमेअंतर्गत अमरावती तालुक्यात १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत. प्रशासकीय सेवा नागरिकांना जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच तीन टप्प्यात ही मोहिम राबविण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात दि. १७ ते २२ सप्टेंबर दरम्यान पाणंद रस्ते आणि शेतीला जोडणारे मार्ग, या टप्प्यात पाणंद, शिवरस्त्यांना क्रमांक देण्याच्या महसूल विभागाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करून ते गाव नकाशावर चिन्हांकित केले जातील. निस्तार पत्रकामध्ये नोंद नसलेल्या पाणंद रस्त्यांची नोंद घेण्याची कार्यवाही केली जाईल. शेतकऱ्यांसाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्र घेतले जातील. रस्ता अदालत आयोजित करून शेतरस्त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जातील. शेतरस्त्यांची मोजणी आणि सीमांकन केले जाईल.

दुसऱ्या टप्प्यात दि. २३ ते २७ सप्टेंबरमध्ये 'सर्वांसाठी घरे' योजनेची अंमलबजावणी केली जाईल. यात घरे बांधण्यासाठी शासकीय जमिनी कब्जेहक्काने दिल्या जातील. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुसार नियमित केली जातील. पात्र लाभार्थ्यांना जमिनींचे पट्टे वाटप केले जातील. यामध्ये शासकीय जमिनी वाटप केलेल्या, अतिक्रमण नियमित केलेल्या तसेच २०११ पूर्वीच्या गावठाणातील अतिक्रमणे नियमित केलेल्या लाभार्थ्यांचा समावेश असेल.

तिसऱ्या टप्प्यात दि. २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात जनसंवाद, १५५ अंतर्गत आदेशांची तपासणी, जिवंत सातबारा मोहीम आणि 'गाव तिथे स्मशानभूमी' या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल.

या मोहिमेत अमरावती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती, उपअधीक्षक भूमी अभिलेख आणि विविध विभागांचे अधिकारी सक्रिय सहभाग घेणार आहेत. नागरिकांनी या 'सेवा पंधरवडा' उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विजय लोखंडे यांनी केले आहे.

000000
























Wednesday, September 10, 2025

DIO NEWS AMRAVATI 10-09-2025

                                                       ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा

अमरावती, दि. 10 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे गुरूवार, दि. 11 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, गुरूवार, दि. 11 सप्टेंबर रोजी 3 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील मिशनच्या कार्यालयात शेतकरी आत्महत्या व शासकीय जमिनीवर चारा लागवड यासंबंधी चर्चा करतील. दुपारी 3.30 वाजता धानोरा कोकाटे, ता. अमरावती येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियास भेट देतील. सायंकाळी 4.30 वाजता पोहरा पूर्ण, ता. भातकुली येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियास भेट देतील. त्यानंतर सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.

00000

युवकांनी जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी व्हावे

- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 10 (जिमाका) : शांघाई येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी जिल्ह्यातील युवकांना मिळणार आहे. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा होणार आहे. यात जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांना ऑलिम्पिकच्या धर्तीवर कौशल्य सादर करण्याची स्पर्धा होणार आहे.

जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कॉन्सील, विविध औद्यागिक आस्थापना यांच्या सहकार्याने स्किल कॉम्पीटीशन आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर निवड केलेल्या उमेदवारांची नावे जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेकरीता जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आला आहे. सदर स्पर्धेमध्ये 50 क्षेत्रासाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2004 किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच, डिजीटल कन्स्ट्रक्शन, क्लाऊड कॉम्प्युटींग, सायबर सिक्युरिटी, आयसीटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, अॅडिटीव्ह मॅनुफॅक्चरिंग, इंडस्ट्रीअल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, मॅकेट्रॉनिक्स, ऑप्‍टोइलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी, रोबोट सिस्टीम इंटीग्रेशन, वॉटर टेक्नॉलॉजी, डेंटल प्रोस्टेथिक्स, एअरक्राफ्ट मेंटनन्स या क्षेत्राकरीता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2001 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.

शांघाई येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धेत प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेत सर्व कौशल्य प्रशिक्षण संस्थांनी स्पर्धेत सहभागी व्हावे. वर्ष 2026 मधील जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी skillindiadigital.gov.in यावर दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.

000000

कौशल्य विकास केंद्राचा आज रोजगार मेळावा

अमरावती, दि. 10 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमेचे गुरूवार, दि. 11 सप्टेंबर 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे. जगदंब महाविद्यालय, अचलपूर येथे हा मेळावा होणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येते. मेळाव्यात कोलब्रो गृप प्रा. लि., भारत फायनान्स प्रा.लि., स्विगी, जिनस पावर, क्वेज कॉर्पोरेशन प्रा. लि. पुणे, दामोधर इंडस्ट्रीज प्रा. लि., टाटा मोटर्स, पुणे, ग्रिनफॅब सोलर खादी, कोअर प्रोजेक्ट, धूत ट्रान्समिशन संभाजीनगर, जाधव गियर्स, स्पंदन मायक्रो फायनान्स ली., मेस्कोर प्रेसीजन प्रा. लि., क्रेडीट ॲक्सीस ग्रा. लि., ब्लिंकीट प्रा. लि., तसेच विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी. यात ऑनलाईन सहभाग नोंदवून आपली रजिट्रेशनची प्रत काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रासह प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000000

दुचाकीसाठी नवीन वाहन मालिका सुरू

अमरावती, दि. 10 (जिमाका) : परिवहनेत्तर दुचाकी संवर्गातील वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी मंगळवार, दि. 16 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज परिवहन कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पसंती क्रमांकासाठी वाहन नावावर असलेल्या व्यक्तीच्या अर्जासोबत त्यांच्या पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड जोडावे. तसेच अर्जामध्ये वाहन ज्या व्यक्तीच्या नावे आहे, त्या व्यक्तीचा आधारकार्डला संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक डिमांड ड्राफ्ट अमरावती, कॅम्‍प शाखा, ट्रेझरी ब्रांच कोड नं. 003866 येथे देय असावा.

पसंती क्रमांकाची यादी दि. 16 सप्टेंबर रोजी 4 वाजता कार्यालयातील नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. एकापेक्षा अधिक अर्ज आलेल्या अर्जदारांनी दि. 17 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांक शुल्काचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात जमा करावेत. दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

सोमठाणा खुर्द येथील जमीन मोबदल्यासाठी

कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 10 (जिमाका) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागांतर्गत सोमठाणा खुर्द येथील वाढीव जमीन मोबदल्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

सोमठाणा खुर्द येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या मूल्यांकनाच्या चार पट मोबदला लवकरच वितरित केला जाणार आहे. यासाठी 100 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर अर्ज, बँक खाते पुस्तकाची छायाप्रत, शेतीचा सातबारा उतारा, लाभार्थी मयत असल्यास वारस प्रमाणपत्र आणि वारसाच्या बँक पासबुकची छायाप्रत ही कागदपत्रे तातडीने सादर करणे आवश्यक आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव संरक्षणासाठी सोमठाणा खुर्द गावातील 42 शेतमूल्यांकनधारक आणि 21 वनहक्कधारक यांच्या जमिनींचे मूल्यांकन करण्यात आले आहे. यापूर्वी, त्यांना जमिनीच्या मूल्यांकनाच्या एक पट रक्कम आणि त्यावर 30 टक्के दिलासा रक्कम देण्यात आली होती. मात्र, 12 ऑक्टोबर 2015 रोजीच्या नवीन शासन निर्णयानुसार, भू-संपादन कायदा 2013 लागू झाला आहे. या कायद्यानुसार, जमिनीचा मोबदला पुनर्वसन पॅकेजव्यतिरिक्त दिला जातो आणि तो जमिनीच्या मूल्यांकनाच्या चार पट असणे अपेक्षित आहे. त्यामुळे, या लाभार्थ्यांना यापूर्वी मिळालेली रक्कम वगळून, उर्वरित मोबदला देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

यात अनेक लाभार्थ्यांनी अद्याप आवश्यक कागदपत्रे सादर केली नसल्याने मोबदला मिळण्यास अडचणी येत आहेत. त्‍यामुळे राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांना हक्काचा मोबदला तातडीने मिळणार आहे. या गावातील पात्र लाभार्थ्यांची सविस्तर यादी mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे उपवनसंरक्षक आर. एस. टोलिया यांनी यांनी कळविले आहे.

00000

Tuesday, September 9, 2025

DIO NEWS AMRAVATI 09-09-2025

 निम्नपेढी प्रकल्पातील नागरिकांच्या स्थलांतराला प्राधान्य द्यावे

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 9 (जिमाका) : भातकुली तालुक्यातील निम्नपेढी प्रकल्प गतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी भूसंपादन झाल्याने स्थलांतरणासाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्यात आलेली आहे. बाधित गावांमधील कुटुंबांना भेट देऊन नागरिकांनी पुनर्वसित गावात स्थलांतर करावे, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.

निम्नपेढी प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या पाचही गावांचा जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी आज आढावा घेतला. नागरिकांनी पुनर्वसित गावात स्थलांतर करावे, यासाठी त्यांना स्थलांतरणासाठी देण्यात येणारे एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे. तसेच पुनर्वसित गावात पाणीपुरवठ्याची व्यवस्था प्राधान्याने करण्यात यावी. यामुळे नागरिकांचा कल पुनर्वसित गावात जाण्याकडे राहील.

सिंचन प्रकल्पासाठी भूसंपादन झाल्यानंतर या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक सुविधा पुनर्वसित गावात स्थलांतरित करण्यात यावे. प्रामुख्याने रेशन दुकान, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय स्थानांतरित केल्यास नागरिकांचे स्थलांतरण गतीने होण्यास मदत मिळेल. सध्यास्थितीत गावामध्ये राहत असलेल्या नागरिकांनी चर्चा करून त्यांना पुनर्वसित गावात घरकुल उपलब्ध करून देण्याविषयी सकारात्मक पावले उचलण्यात यावीत, असा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिल्या.

00000

डाक विभागाची बचत उत्सव मोहिम

सुकन्या समृध्दी खाते उघडण्याचे आवाहन

अमरावती, दि. 9 (जिमाका) : अमरावती डाक विभागातर्फे बचत उत्सव विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यात मुलींच्या नावे सुकन्या समृद्धी खाते उघडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डाक विभागात सुकन्या समृध्दी योजना सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत पालक आपल्या 10 वर्ष वयापर्यंतच्या मुलींचे खाते डाकघरात किमान 250 रूपये भरून उघडू शकतात. योजनेचा सध्याचा व्याजदर 8.2 टक्के असून सदर खाते काढण्याकरीता मुलीचा जन्माचा दाखल, आधार कार्ड, तसेच पालकाचे आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

जिल्ह्यातील डाक अधिकारी, कर्मचारी, शाळा, अंगणवाडी तसेच घरोघरी जाऊन मुलीच्या उज्वल भविष्यासाठी जनजागृती करत आहेत. पालकांनी आपल्या मुलीचे सुकन्या समृद्धी खाते उघडावे, तसेच डाक विभागाच्या इतर बचत योजनांचाही लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.

0000

 

उर्ध्व वर्धा जलाशयजवळील जमीन भाडेपट्टीसाठी अर्ज आमंत्रित

अमरावती, दि. 9 (जिमाका) : उर्ध्व वर्धा जलाशयाच्या सभोवतालची जमीन भाडेपट्टीवर देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

उर्ध्व वर्धा जलाशयाच्या बुडीत क्षेत्राच्या काठाभोवतालची 342.50 मीटर ते 343 मीटर तलांकातील अमरावती जिल्ह्यातील 298.22 हेक्टर आणि वर्धा जिल्ह्यातील 30.60 हेक्टर गाळपेर जमीन रब्बी हंगाम आणि तलांक 340 मीटर ते 342.50 मीटरमधील अमरावती जिल्ह्यातील 806 हेक्टर आणि वर्धा जिल्ह्यातील 53 हेक्टर जमीन दरवर्षी उन्हाळी हंगामाकरीता उपलब्ध होऊ शकते.

गाळपेर जमीन भाडेपट्टीवर देण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या व्यक्तींच्या जमिनीच  नवीन जलाशय, उत्प्लव बांध, धरण इत्यादी बांधण्यासाठी संपादीत केलेली आहे. किंवा कोणत्याही शासकीय प्रकल्पामुळे अथवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाचा प्रकल्पामुळे ज्यांना बाधा पोहचली आहे अशा व्यक्ती, स्थानिक भूमीहिन, मागासवर्गीयांच्या सहकारी संस्था, ज्यामध्ये बहुसंख्य मागासवर्गीय सदस्य आहेत, अशा मागासवर्गीय आणि मागासवर्गीयेतर स्थानिक भूमिहीन व्यक्तीच्या सहकार संस्था, स्थानिक भूमिहीन व्यक्तीच्या सहकार संस्था, स्थानिक भूमिहीन मागासवर्गीय लोक, इतर वर्गातील स्थानिक भूमिहीन लोक, जेथे गाळपेर जमिनी आहेत, त्या गावच्या बाहेरील भूमीहिन लोक, या व्यतिरिक्त लोकांव्यतिरीक्त इतर स्थानिक भूमिधारक परंतू खंड एक मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तींपैकी उपलब्ध होणारी गाळपेर जमिनीची मौजे व शेतसर्वे व मूळ मालकनिहाय यादी आणि 100 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर करावयाच्या करारनामा आणि अर्जाचे प्रारूप उपविभागीय अभियंता, उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्रं. 1, मोर्शी येथे दि. 15 सप्टेंबर 2025 पर्यत द्यावे लागणार आहे.

पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक कुटूंबांला जास्तीत जास्त 1.20 हेक्टर जमीन भाडेपट्टीवर देण्यात येणार आहे. परंतू कुटूंब प्रमुख हा जर सहकारी संस्थेचा सदस्य असल्यास त्यास मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम 1978 च्या कलम 6 मध्ये ठरवून दिलेल्या निर्वाहक क्षेत्राच्या मर्यादेस अधिन राहून जास्तीत जास्त 1.6 हेक्टर इतकी जमीन देता येईल. भाडेपट्टीचा दर हा जलसंपदा विभागाच्या पत्रानुसार एका वर्षात दोन पिके घेतली गेल्यास प्रति हेक्टरी रूपये 2 हजार रूपये प्रति 11 महिन्यासाठी व एका वर्षात एकच पिक घेतले गेल्यास प्रति हेक्टरी 1 हजार रूपये प्रति 11 महिन्यासाठी भरणे आवश्यक आहे, असे उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

00000






शिक्षकांनी सर्वोत्तम आदर्श आचरण ठेवावे

-विभागीय आयुक्त डॉ. श्‍वेता सिंघल

अमरावती, दि. 9 (जिमाका) : प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षकांमुळे घडतो. शिक्षकांच्या वर्तनाचा विद्यार्थ्यांवर खोलवर परिणाम पडतो. त्यामुळे शिक्षकांनी सर्वोत्तम आदर्श आचरण ठेवावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. श्‍वेता सिंघल यांनी केले.

जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मिलींद कुबडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिश मुगल, डायटचे अधिव्याख्याता प्रविण राठोड आदी उपस्थित होते.

डॉ. सिंघल यांनी शिक्षकांना पिढी घडविण्याची संधी दिली आहे. त्यामुळे शिक्षकांनी त्यांच्या कामावर लक्ष्य केंद्रीत करून शिक्षण देण्याचा आनंद घ्यावा. शाळेचा आत्मा हा शिक्षक आहे. नवीन पिढी घडविण्याचे काम शिक्षकामुळे होत आहे. त्यामुळे शिक्षकांना मिळालेल्या या संधीचे सोने करावे. तसेच विद्यार्थ्यांना अभिमान वाटेल, अशी वागणूक ठेवावी. इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी जिल्हा परिषद शाळांची स्पर्धा असल्याने शाळांनी इंग्रजीवर भर द्यावा. यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावे, तसेच डिजीटल शाळांचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले.

श्रीमती महापात्र यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. शिक्षकांनी येत्या काळात चांगले कार्य करून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन केले. यावेळी डॉ. कुबडे यांनी मार्गदर्शन केले. श्री. मुगल यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कार प्राप्त शिक्षक गजानन काकडे, वनिता बोरोडे, श्री. विरेंद्र यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2, जिल्हास्तरीय पुरस्कार, शिष्यवृत्ती परिक्षा, निपून महाराष्ट्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अंकुश गावंडे आणि विद्यार्थ्यांनी अलेक्साचे प्रात्यक्षिक सादर केले.

00000

Monday, September 8, 2025

DIO NEWS AMRAVATI 08-09-2025

                                     










  

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शन शिबिर


       अमरावती, दि. 8 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी आज मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. आयएएस अधिकारी कौशल्या एम. आणि उपजिल्हाधिकारी सोनल सूर्यवंशी यांनी स्पर्धा परीक्षांची माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात हा कार्यक्रम पार पडला. 

       यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खंडारे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी आदी उपस्थित होते.

      श्रीमती कौशल्या यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केल्याने व्यक्तिमत्त्वामध्ये अमुलाग्र बदल होतो. संपूर्ण देशभरातून लाखो विद्यार्थी परीक्षा देत असताना केवळ एक हजार विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी होत असते. त्यामुळे स्पर्धाही आपल्याला आपल्याशी करावी लागते. केंद्रीय लोकसेवा आयोग दरवेळी परीक्षेची पद्धत बदलत असल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा कस लागत असतो. त्यामुळे कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही.

     स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्रामुख्याने इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. तसेच निबंध किंवा इतर विस्तृत प्रश्नांची उत्तरे देताना भाषेची उत्तम जाण असणे आवश्यक आहे. यासोबतच मुख्य परीक्षा लक्षात घेता विषयांची निवडही महत्त्वाची ठरते. यामध्ये विद्यार्थ्यांना ज्या विषयाचे ज्ञान आकलन करणे सोपे आहे, अशा विषयांची निवड करणे फायद्याचे ठरते. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवणे ही एक लांब प्रक्रिया असून यामध्ये विद्यार्थ्यांचा संयम महत्त्वाचा ठरतो. चाळणी आणि मुख्य परीक्षा, तसेच मुलाखत यातून यशस्वी झालेल्यांनाच शासकीय सेवेची संधी मिळते. यातील एकाही पायरीवर अपयश आल्यास पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांनी सूक्ष्म अभ्यासाचे नियोजन करून ही परीक्षा द्यावी, असे आवाहन केले.

      श्रीमती सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाबत माहिती दिली. यश मिळवण्यासाठी सातत्य आवश्यक असून मेहनत घेण्याची मनाची तयारी असावी लागते. विविध विषयाचा अभ्यास करताना स्वतःचे नोट्स स्वतः काढणे, तसेच व्हिज्युअल तयार करणेही आवश्यक असल्याचे सांगितले. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र या विषयांसोबतच चालू घडामोडी या गोष्टीही महत्त्वाच्या असल्याने यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप समजावून घेण्यासाठी गत वर्षातील परीक्षांची प्रश्नपत्रिका समजावून घेणे आवश्यक आहे. प्राथमिक स्तरावर तयारी करण्यासाठी आठवी ते बारावीपर्यंतची पुस्तके बारकाईने वाचून त्यातील नोट्स काढणे महत्त्वाचे आहे. अभ्यासाला पूरक ठरेल यासाठीच समाज माध्यमांचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.

      जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कल स्पर्धा परीक्षांकडे वाढावा, यासाठी अशा प्रकारचे शिबिरे आयोजित करण्यात येत आहे. याचा युवकांनी लाभ घ्यावा. स्पर्धा परीक्षांमधील प्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी अशा प्रकारचे शिबिरे युवकांना मार्गदर्शन ठरतील. स्पर्धा परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यात यावी. यातून युवकांना फायदाच होणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये विषयांची निवड ही संबंधित विषयाची पुस्तके वाचून त्यातून होणाऱ्या ज्ञानाची आकलन करून निवडावी. विस्तृत उत्तरे लिहिण्याच्या प्रश्नांमध्ये चालू घडामोडींचा उपयोग होत असल्याने तयारी करण्याच्या सुरुवातीच्या काळात वृत्तपत्रे वाचण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
००००

--     

                           रेशिम विभाग आपल्या दारी’ मोहिम

अमरावती, दि. 08 (जिमाका) : रेशिम संचालनालय 1 सप्टेंबर 1997 रोजी स्थापना करण्यात आली. त्यामुळे 1 सप्टेंबर रेशिम दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने रेशीम संचालनालय संचालक विनय मून यांच्या संकल्पनेतून यावर्षी ‘रेशिम विभाग आपल्या दारी’ योजना राबविण्यात येणार आहे.

 शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षापूर्वी रेशिम योजना राबविण्यासाठी कार्यालयाकडे 500 रूपये प्रती एकर प्रमाणे नोंदणी  केली होती. परंतू काही कारणाने तूती लागवड केली नाही. त्यांना त्यांचे घरी जाऊन रेशीम योजनेचे माहितीपत्रक आणि पुन्हा रेशीम उद्योग सुरू करण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी तुती लागवड त्यावेळी केली नसल्याबाबत अभिप्राय घेण्यात येऊन अडचण दूर करण्याचा प्रयत्न रेशीम संचालनामार्फत करण्यात येणार आहे. दि. 1 ते 15 सप्टेंबरपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे.

 जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत रेशीम विकास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राबविण्यात येत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी केले जाणार आहे. एका गावातून कमीत कमी 5 शेतकऱ्यांनी ग्रामसभेच्या संमतीने जिल्हा रेशीम कार्यालयाकडे ग्राम रोजगार सेवकामार्फत अर्ज करावे लागणार आहे. त्यासाठी प्रति एकर 500 रूपये नोंदणी शुल्क रेशीम कार्यालयात जमा कराव लागणार आहे. मनरेगांतर्गत एक एकर वृक्ष जोपासना करण्यासाठी 2 लाख  रूपयांची मंजुरी तीन वर्षात दिली जाणार आहे. रेशीम किटक संगोपनगृह बांधकामासाठी 66 हजार 456 रूपये मजुरी, साहित्यासाठी 1 लाख 53 हजार रूपये जातील, यात 4 लाख 32 हजार रूपये तीन वर्षात दिले जाणार आहे.

 बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र - 2 योजनेत सहभाग घेता येईल. तुती वृक्ष लागवडीसाठी 1 एकरकरीता 45 हजार रूपये, सिंचन व्यवस्थेकरिता 45 हजार रूपये, संगोपनगृह बांधकामकरीता 2 लाख 43 हजार 750 रूपये, संगोपन साहित्याकरीता 37 हजार 500 रूपये आणि निर्जतुकिकरण औषधीसाठी 3 हजार 750 रूपये काम पूर्ण झाल्यावर दिले जातात. या योजनेतून होणारी तूती लागवड मुख्यमंत्री यांनी या पावसाळ्यात 10 कोटी वृक्ष लागवड पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उदिष्ठ दिले आहे. त्यामध्ये तुती वृक्ष लागवडीची गणना होणार आहे. रेशिम संचालनालयास 4 कोटींचे लक्षांक देण्यात आले आहे. त्यापैकी 24 लाख 400 एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट जिल्ह्यास देण्यात आले आहे.

 शेतकऱ्यांनी पर्यावरण पूरक व शेतीशी निगडीत रेशीम उद्योग करून रेशीम कोशनिर्मितीपासून उत्‌पन्न वाढवावे, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी यांनी केले आहे.

00000

सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी

 

अमरावती, दि. 08 (जिमाका) : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पूर्व प्रशिक्षणाची संधी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 पात्र उमेदवारांना सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे राज्यातील युवक व युवतींसाठी दि. 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र.62 आयोजित करण्यात आले आहे. कोर्स कालाबधीत प्रशिक्षणार्थीना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाणार आहे.

 जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी मुलाखतीस हजर राहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभागाच्या वेबसाईटवर सर्च करून त्यामधील एसएसबी 62 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन आणि ते पुर्ण भरून सोबत घेऊन यावे.

 सदर एसएसबी वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. त्यासंबंधीची पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेऊन यावे. कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन पास झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसीचे सी सर्टिफीकेट ए किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावेत. एनसीसी ग्रुप हेडक्वॉर्टर्सने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्यूएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेशप्रणालीसाठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

 याबाबत अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या ई-मेल आयडी training.petenasik@gmail.com व दुरध्वनी क्र 0253 -2451032 किंवा व्हॉटस्अप क्रमांक 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

00000


Sunday, September 7, 2025

राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन 

         अमरावती, दि 7 (जिमाका) : राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

        निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनीही राजे उमाजी नाईक यांना पुष्प वाहून आदरांजली वाहिली.

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...