योजनेतील कर्जदारांनी जाणीवपूर्वक कर्ज परतफेड करावी
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 11 (जिमाका) : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतून युवकांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्यामुळे कर्ज मंजूर झालेल्या कर्जदारांनी जाणीवपूर्वक कर्ज परतफेड करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी आज बँक ऑफ महाराष्ट्रच्या एमएसएमई शाखेला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते शासनाच्या योजनांतून मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणांचे स्विकृती पत्र वाटप करण्यात आले. विभागीय बँक व्यवस्थापक महेश डांगे, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी शाखेतील कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेची माहिती घेतली. कर्ज मंजुरीची प्रकरणे ऑनलाईन येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. बँकेच्या शाखेकडून आलेल्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. केंद्र आणि राज्य शासनाकडून उद्योगांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी कर्ज योजना राबवून सबसिडी देत आहे. त्यामुळे युवकांनी यासाठी पुढे येऊन रोजगार देणारे व्हावे, असे आवाहन केले.
पर्यटन विभागातर्फे आई योजना राबविण्यात येत आहे. यात कर्जावरील व्याज माफीची योजना आहे. याचाही कर्जदारांनी लाभ घ्यावा. तसेच चांगल्या पद्धतीने व्यवसाय करून कर्जाची जबाबदारीने परतफेड करावी. बँकेने कर्ज दिलेल्या उद्योगांना बँकांच्या अधिकाऱ्यांनी भेट द्यावी. तसेच कर्ज प्रकरणे मंजूर करण्यास गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.
बँकेतर्फे शिवणकाम, तेल घाणी, बांधकाम व्यवसाय, बांधकाम साहित्य, शेळी पालन, ब्युटी पार्लर, रेडीमेड गारमेंट, फोटो स्टुडिओ, आटा चक्की, डेअरी, कँटीन आदी योजनांसाठी कर्ज स्विकृतीचे पत्र देण्यात आले.
000000
ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा
अमरावती, दि. 11 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे शनिवार, दि. 13 सप्टेंबर व रविवार, दि. 14 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
दौऱ्यानुसार, शनिवार, दि. 13 सप्टेंबर रोजी 3 वाजता चिखलदरा येथील पंचायत समिती सभागृहात उमेद, महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मोथा येथे खवा निर्मिती करणाऱ्या बचतगटाची सभेला उपस्थित राहतील. रविवार दि. 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता चिखलदरा येथील पंचायत समिती सभागृहात दुध उत्पादक व स्ट्राबेरी उत्पादकांच्या सभेला उपस्थित राहतील. दुपारी 2 वाजता सोईने काटोलकडे प्रयाण करतील.
0000
वसतिगृहात प्रवेशासाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींसाठी सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर व्यावसायिक अभ्यासक्रमाचा प्रोफेशनल कोर्स वरून प्रवेश अर्ज करावा. त्यानंतर आवश्यक सर्व कागदपत्रासह नजीकच्या वसतिगृह कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. विभागीय स्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह संकुल, निंभोरा येथे इच्छुकांनी फॉर्म वेळेत जमा करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालय किंवा वसतिगृह कार्यालय, निंभोरा येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
सेवा पंधरवड्यात अमरावती तालुक्यात विविध उपक्रम
अमरावती, दि. 11 (जिमाका) : 'सेवा पंधरवडा' मोहिमेअंतर्गत अमरावती तालुक्यात
१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात
येणार आहेत. प्रशासकीय सेवा नागरिकांना जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देणे
हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच तीन टप्प्यात ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात दि. १७ ते २२ सप्टेंबर दरम्यान पाणंद रस्ते आणि शेतीला
जोडणारे मार्ग, या टप्प्यात पाणंद, शिवरस्त्यांना क्रमांक देण्याच्या महसूल विभागाच्या
निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करून ते गाव नकाशावर चिन्हांकित
केले जातील. निस्तार पत्रकामध्ये नोंद नसलेल्या पाणंद रस्त्यांची नोंद घेण्याची कार्यवाही
केली जाईल. शेतकऱ्यांसाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्र घेतले जातील. रस्ता
अदालत आयोजित करून शेतरस्त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जातील. शेतरस्त्यांची
मोजणी आणि सीमांकन केले जाईल.
दुसऱ्या टप्प्यात दि. २३ ते २७ सप्टेंबरमध्ये 'सर्वांसाठी घरे' योजनेची
अंमलबजावणी केली जाईल. यात घरे बांधण्यासाठी शासकीय जमिनी कब्जेहक्काने दिल्या जातील.
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुसार नियमित केली जातील. पात्र लाभार्थ्यांना जमिनींचे
पट्टे वाटप केले जातील. यामध्ये शासकीय जमिनी वाटप केलेल्या, अतिक्रमण नियमित केलेल्या
तसेच २०११ पूर्वीच्या गावठाणातील अतिक्रमणे नियमित केलेल्या लाभार्थ्यांचा समावेश असेल.
तिसऱ्या टप्प्यात दि. २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान नावीन्यपूर्ण
उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात जनसंवाद, १५५ अंतर्गत आदेशांची तपासणी, जिवंत सातबारा
मोहीम आणि 'गाव तिथे स्मशानभूमी' या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल.
या मोहिमेत अमरावती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती, उपअधीक्षक
भूमी अभिलेख आणि विविध विभागांचे अधिकारी सक्रिय सहभाग घेणार आहेत. नागरिकांनी या
'सेवा पंधरवडा' उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विजय लोखंडे यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment