सेवा पंधरवड्यात गाव तंटामुक्त करावे
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
*वडगाव माहोरे पहिले महसुली तंटामुक्त गाव
अमरावती, दि. 23 (जिमाका): गावातील नागरिकांनी एकत्र येत दोन किलोमीटरचा पाणंद रस्ता मोकळा केला आहे. याचप्रकारे नागरिकांनी सेवा पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात सक्रिय सहभा नोंदवावा. या सेवा पंधरवड्यात पांदण रस्ते, घरकुल यांची कामे घेऊन गाव तंटामुक्त करावेत, असे आवाहन जिल्हाधिकार आशिष येरेकर यांनी केले.
वडगाव माहोरे येथे सेवा पंधरवड्यानिमित्त पांदण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचा उपक्रम पार पडला. यावेळी सरपंच मालाताई माहोरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, भूमी अभिलेखचे अधिक्षक महेश शिंदे, तहसिलदार विजय लोखंडे, तालुका कृषी अधिकारी श्री. गुल्हाणे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मदन पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, प्रत्येक गावात पांदण रस्ते हा जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रामुख्याने पेरणीच्या कालावधीत रस्त्यांबाबत समस्या समोर येतात. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून अस्तित्वात असलेले रस्ते मोकळे करणे आणि नकाशावर नसलेले परंतु वहिवाटीत असलेले रस्ते नकाशावर घेण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या रस्त्यांवर परत अतिक्रमण होऊ नये, यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येत आहे.
पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी गावातील नागरिकांनी पुढाकार घ्यावा. अहिल्यादेवी होळकर यांच्या तिनशेव्या जयंतीनिमित्त महसुली तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. तसेच गावातील इतर तंट्यांमुळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहे. त्यामुळे तंटामुक्त गाव मोहिमेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. प्रामुख्याने शेतातील रस्त्यांबाबत समोपचाराने मार्ग काढावा. सेवा पंधरवड्यात घरकुलाची मोहिम हाती घेण्यात येणार आहे. गावठानातील अतिक्रमण असलेल्यांना 500 चौरस फुट जागा देण्यात येईल, तसेच गावालगतच्या इतर जमिनींवर प्रकल्प राबवून 500 चौरस फुटाची जागा वाटप करावी. यामुळे सर्वांसाठी घरे हा उपक्रम यशस्वी होण्यास मदत होईल.
कार्यक्रमात पांदण रस्त्यांसाठी गावातील नागरिकांनी सहमतीपत्र जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांना सुपूर्द केले. यावेळी पांदण रस्त्यांसाठी ग्रामपंचायत सदस्य आणि महसूल अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी श्री. येरेकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भटकर यांनी बैलगाडीत बसून गावातील नागरिकांसह पांदण रस्त्यांची पाहणी केली. त्यानंतर वृक्षारोपण केले. तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मदन पाटील यांनी पांदण रस्त्यासाठी सहा गुंठे जमीन दिली असल्याचे सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी प्रास्ताविक केले. निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांनी सूत्रसंचालन केले. मंडळ अधिकारी गजानन हिवसे यांनी आभार मानले.
00000
महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक
*डॉ. भावना सोनटक्के यांचे कर्करोगावर मार्गदर्शन
*’जागर महिला आरोग्याचा’ उपक्रमाला सुरवात
अमरावती, दि. 23 (जिमाका) : महिलांमध्ये कर्करोगाबद्दल असंख्य गैरसमज पसरले आहेत. मात्र कर्करोगाचे निदान अगदी सुरवातीच्या टप्प्यात झाल्यास हा रोग पूर्णपणे बरा होणारा आहे. त्यामुळे महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करून कर्करोगाला वेळीच आळा घालावा, असे आवाहन कर्करोग तज्ज्ञ डॉ. भावना सोनटक्के यांनी केले.
पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तिनशेव्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशानातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सवात महिलांच्या आरोग्याबाबत दि. 30 सप्टेंबरपर्यंत जिल्हा नियोजन भवन येथे मार्गदर्शन आणि तपासणी शिबिर घेण्यात येत आहे.
कर्करोग तज्ज्ञ डॉ. भावना सोनटक्के यांनी कर्करोगाची तपासणी आणि उपचार यावर मार्गदर्शन केले. डॉ. सोनटक्के म्हणाल्या, स्त्रिया बरेचदा कामाला जास्त प्राधान्य देऊन प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. यामुळे शारीरिक व मानसिक तणाव वाढून दीर्घकालीन उपचार घ्यावे लागतात. यासाठी स्त्रियांनी आरोग्याला प्रथम प्राधान्य द्यावे. नियमित आवश्यक आरोग्य तपासण्या करून घ्याव्यात. भारतामध्ये कर्करोगाच्या रुग्णाचे प्रमाण वाढत आहे. बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि चुकीच्या खाण्याच्या पद्धती बदलवून उत्तम आरोग्यशैली पूर्ण जीवन जगण्यासाठी स्वतःहून लक्ष केंद्रित करावे. घरातील महिलेची प्रकृती उत्तम राहिल्यास ती परिवारातील अन्य सदस्यांची काळजी चांगल्या प्रकारे घेवू शकते. यासाठी महिलांनी स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये.
जीवनशैलीतील बदलामुळे शहरी आणि ग्रामीण भागात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. वेळीच निदान आणि उपचारामुळे हा आजार बरा होणे शक्य आहे. स्तनाचे कर्करोगाची तपासणी स्त्रियांनी दर महिन्याला घरीच करावी. काही लक्षणे आढळल्यास तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. श्वेत प्रदर रोगावरील उपचार व काळजी, मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी, सकस आहाराचे महत्त्व, व्यायाम याबाबात डॉ. भावना सोनटक्के यांनी सखोल माहिती दिली. तसेच उपस्थित महिलांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
00000
शेती स्वावलंबन मिशनची आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट
अमरावती, दि. 23 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी सोमवार, दि. 22 सप्टेंबर रोजी धानोरा म्हाली, ता. चांदूर रेल्वे येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सुमन मारबदे यांच्या घरी भेट दिली.
अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांनी चांदूर रेल्वे येथे शेतकरी आत्महत्याबाबत तहसिल कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी तहसिलदार पुजा माटोडे, गटविकास अधिकारी संजय खारकर, तालुका कृषी अधिकारी संचित ढाकरे आदी उपस्थित होते.
बैठकीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना संगायो योजना, पुरवठामधील योजनेसह चांदूर रेल्वे तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेले शेतीचे नुकसान आणि इतर नुकसानीचा आढावा घेतला. तसेच पंचायत समितीच्या विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला. कृषी विभागामार्फत कुरण विकास अंतर्गत कुरण लागवडीबाबत आढावा घेवून कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आली. त्याचप्रमाणे पशूसंवर्धन विभागाच्या पशुधन विकास योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. बालविकास अधिकारी यांच्याकडून बालसंगोपन व इतर योजनांची विस्तृत माहिती घेतली. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सुमन मारबदे यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले.
00000
सण उत्सव कालावधीत जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू
अमरावती, दि. 23 (जिमाका): जिल्ह्यात आगामी काळात सण उत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व व्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिनियमांतर्गत कलम 36नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू झाले आहे.
शहरात नवदुर्गोत्सव, शारदोत्सव तसेच नवरात्री उत्सवास प्रारंभ झाला आहे. यात दुर्गादेवी व शारदादेवींची मोठ्या प्रमाणात स्थापना करण्यात आली आहे. तसेच अंबादेवी, एकविरादेवी मंदिर परिसरात भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज भाविकांची विशेषत: महिला वर्गाची प्रचंड गर्दी राहते. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 नुसार सर्व पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील सर्व पोलिस ठाणेदार, अंमलदार व त्यांच्यावरील अधिकाऱ्यांना दि. 22 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 2025च्या मध्यरात्रीपर्यंत अधिकार प्रदान करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिले आहे.
रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे, उपासनास्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळ्याचा संभव असेल तर अडथळा होऊ न देणे, सर्व मिरवणूकाच्या व जमावाच्या प्रसंगी व पूजा-अर्चा या ठिकाणी कोणताही रस्ता किंवा अडथळा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा न होवू देण्यासाठी याठिकाणी बंदोबस्त ठेवणे, सर्व रस्त्यांवर किंवा रस्त्यात, सर्व धाब्यावर आणि सार्वजनिक ठिकाणच्या कपडे धुण्याचा व उतरविण्याचा जागेच्या ठिकाणी व इतर सर्व सार्वजनिक किंवा लोकांच्या येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त राहण्यासाठी, वाद्यांबाबत नियम व नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यासाठी हे आदेश देण्यात आले आहे.
0000
सण उत्सव कालावधीत शहरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू
अमरावती, दि. 23 (जिमाका): जिल्ह्यात आगामी काळात सण उत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस अधिनियमांतर्गत कलम 36नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू झाले आहे.
या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 नुसार सर्व पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील सर्व पोलिस ठाणेदार, अंमलदार व त्यांच्यावरील अधिकाऱ्यांना दि. 5 ऑक्टोबर 2025च्या मध्यरात्रीपर्यंत अधिकार प्रदान करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिले आहे.
0000
No comments:
Post a Comment