उद्योगांना पोषक वातावरण निर्मितीवर भर द्यावा
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 22 : औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना रस्ते, वीज, पाणी प्राधान्याने देण्यात यावी. तसेच उद्योजकांना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडविण्यात याव्यात. तसेच उद्योजकांना पोषक वातावरण निर्मिती भर द्यावा, यामुळे त्यांचे उद्योग सुकर चालण्यास मदत होईल, असे मत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योजकांच्या समस्यांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी उद्योग सहसंचालक निलेश निकम, प्रादेशिक अधिकारी राम लंके, एमआयडीसी असोसिएशनचे किरण पातुरकर यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, उद्योजकांनी मांडलेल्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यात येतील. कचरा कुंडींची संख्या वाढविण्यासोबतच औद्योगिक क्षेत्रातील कचरा दररोज उचलण्याच्या सूचना देण्यात येतील. अतिक्रमणाचीही तक्रार उद्योजकांकडून येत असल्याने शहरी भागातील अतिक्रमण पोलिस आणि महापालिकेकडून कारवाईकरून काढण्यात येईल. उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे उद्योग बंद ठेवण्याची वेळ येऊ नये, यासाठी आतापासूनच नियोजन करावे. उद्योगांना मुबलक पाणीपुरवठा होईल, याची दक्षता येण्यात यावी.
अग्निशमन यंत्रणा ही सातत्याने समोर येणारी बाब आहे. त्यामुळे दोन्ही एमआयडीसीमधील अग्निशमन केंद्र हे एमआयडीसीला देण्यात येतील. त्यांच्याकडूनच दोन्ही केंद्र कार्यान्वित होतील. तसेच कामगारांसाठी असलेल्या ईएसआयसी रूग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रूग्णालयांचे बांधकाम तातडीने होण्यासाठी कार्यवाही करण्याची सूचना करण्यात आली. यासोबतच खासगी रूग्णालयांचे देयक ईएसआयसीने तातडीने आदा करावेत. शहरातील एमआयडीसीला जोडण्यासाठी रस्त्यांची उपलब्धता करण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
00000
शारदीय नवरात्रौत्सवात जागर महिला आरोग्याचा विशेष अभियान
अमरावती, दि. 22 (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती आणि शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे 'शारदीय नवरात्रौत्सव - जागर महिला आरोग्याचा' हे विशेष अभियान राबवले जाणार आहे. अभियान 23 ते 30 सप्टेंबर दरम्यान चालणार आहे.
अभियानात महिलांच्या आरोग्याशी संबंधित तपासण्या, मार्गदर्शन आणि सल्ला दिला जाणार आहे. तसेच, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ताणतणाव आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांवर तज्ज्ञांकडून व्याख्यान आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. यात दि. 23 सप्टेंबर रोजी महिला कर्करोग तज्ज्ञ डॉ. भावना सोनटक्के, महिलांचे कर्करोग आणि ब्रेस्ट कॅन्सरवर मार्गदर्शन करतील. या दिवशी महिलांसाठी आरोग्य तपासणी, पॅप्समिअर आणि मॅमोग्राफीची मोफत तपासणी उपलब्ध असेल.
दि. 24 सप्टेंबर रोजी कायदे तज्ज्ञ वर्षा देशमुख महिला आणि कायद्याविषयी मार्गदर्शन करतील. तसेच अनिरुद्ध पाटील महिला सबलीकरणावर मार्गदर्शन करतील.
दि. 25 सप्टेंबर रोजी मेंदू रोग तज्ज्ञ डॉ. अडवाणी मेंदू रोगाविषयी, तर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पवन अग्रवाल जीवनशैली आणि हृदयरोगाविषयी मार्गदर्शन करतील.
दि. 26 सप्टेंबर रोजी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. नेहा देशमुख महिलांसाठी स्त्री रोगांबाबत मार्गदर्शन करतील. तर बाल किडनी तज्ज्ञ डॉ. नयन चौधरी किडनीविषयक मार्गदर्शन करतील. प्रिती ठाकरे ह्यूमन मिल्क बँकेविषयी माहिती देतील.
दि. 29 सप्टेंबर रोजी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अक्षय चांदूरकर 'स्ट्रेस मॅनेजमेंट' तर वन अभ्यासक यादव तरटे 'वनातील वनश्री' आणि 'वनातील स्त्रीशक्ती' यावर माहिती देतील.
दि. 30 सप्टेंबर रोजी त्वचारोग तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना देशमुख 'स्किन केअर' आणि 'स्किन इन्फेक्शन्स' विषयी जागरूकता निर्माण करतील. आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता कडू ह्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी विविध उपचार पद्धतींवर मार्गदर्शन करतील.
हे अभियान महिलांसह शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीयदेखील यात सहभागी होऊ शकतील. दि. 23 ते 26 सप्टेंबर फक्त महिला कर्मचाऱ्यांसाठी राखीव राहणार आहे.
00000
शासकीय तंत्रनिकेतन येथे अभियंता दिन साजरा
अमरावती, दि. 22 (जिमाका) : शासकीय तंत्रनिकेतन, अमरवती येथे नुकताच अभियंता दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे प्राचार्य, डॉ.अ.भा. बोराडे, सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता तुषार काळे, महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेतील विद्यार्थी दक्ष वाघमारे, आनंदी शेळके यांनी केले. संस्थेचे प्राचार्य तसेच मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अभियंता दिनानिमित्त मार्गदर्शन केले. विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार श्रावणी निघोंट यांनी मानले.
0000
वसतिगृह प्रवेशासाठी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 29 सप्टेंबरपर्यंत मुदत
अमरावती दि. 22 (जिमाका): शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या वसतिगृह योजनेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना' आणि 'पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना' यांचा लाभ घेण्यासाठी 29 सप्टेंबरपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बारावीनंतरच्या बिगर व्यावसायिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. अर्ज hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, अग्रवाल टॉवर, जाफरीन प्लॉट, आदर्श हॉटेल जवळ, कॉटन मार्केट रोड, अमरावती येथे मुलांनी अर्ज सादर करावे. तर मुलींनी इतर मागास बहुजन कल्याण मुलींचे शासकीय वसतिगृह, ब्लॉक A, राम लक्ष्मण संकुल, तिसरा मजला, रामपूरी कॅम्प जवळ, विलास नगर चौक, अमरावती येथे अर्ज सादर करावे.
यासाठी अर्ज करण्याची मुदत: 19 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर,अर्जांची छाननी: 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर, पहिली निवड यादी: 6 ऑक्टोबर, पहिल्या यादीतील प्रवेशाची अंतिम मुदत: 16 ऑक्टोबर, दुसरी प्रतीक्षा यादी: 17 ऑक्टोबर, : 31 ऑक्टोबर राहील, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी इतर मागास बहुजन कल्याण, सहायक संचालक गजेंद्र मालठाणे यांच्याशी संपर्क साधावा. कार्यालयाचा पत्ता सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाच्या मागे, चांदूर रेल्वे रोड, अमरावती असा आहे. ई-मेल आयडी dobbwoamravati@gmail.com आहे.
0000000
महाडीबीटी शिष्यवृत्ती अर्ज 2025-26 साठी पोर्टल सुरू
अमरावती,दि. 22 (जिमाका): शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी शिष्यवृत्ती मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल कार्यान्वित झाले आहे. सामाजिक न्याय आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागांमार्फत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
महाडीबीटी पोर्टलवर नवीन तसेच नूतनीकरणाचे अर्ज स्वीकारले जात आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरणे आवश्यक आहे.
या शिष्यवृत्ती योजनांमध्ये भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी आणि परीक्षा फी योजना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमांशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना या योजनांचा समावेश आहे.
सहायक संचालक गजेंद्र मालठाणे यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाहीत याची खात्री करण्याचे आवाहन महाविद्यालयांच्या प्राचार्यांना केले आहे.
00000
जातीचा दाखला मिळवण्यासाठी विशेष मोहीम
अमरावती, दि. 22 (जिमाका): 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवापंधरवाडा' निमित्त अमरावती जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत इयत्ता 11 वी आणि 12 वी विज्ञान शाखेतील, सीईटी देणारे तसेच डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त श्रीमती जया राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेअंतर्गत अर्जदारांच्या त्रुटी दूर करण्यासाठी विशेष शिबिरे आणि वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतचे शिबिर 26 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. तसेच, वेबिनारचे आयोजन 23 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. श्रीमती राऊत यांनी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या शिबिरांचा लाभ घेऊन आपले अर्ज त्वरित सादर करावेत, असे आवाहन केले आहे.
0000
श्रावणबाळ आणि निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिर
अमरावती, दि. 22 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाचा भाग म्हणून आणि ‘राष्ट्रपिता ते राष्ट्रनेता सेवा पंधरवाडा’ अंतर्गत, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत महसूल विभागामार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून, संजय गांधी योजना ,शहर अमरावती कार्यालयाने श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे.
शिबिरांमध्ये पेमेंट फेल झालेल्या लाभार्थ्यांना मदत करण्यात येईल. ज्यांचे पेमेंट फेल झाले आहे, त्यांना नवीन पोस्ट खाते उघडून दिले जाईल जेणेकरून त्यांना अनुदान मिळेल. डीएलसी (डिजिटल लाइफ सर्टिफिकेट), ज्या लाभार्थ्यांचे अनुदान डिजिटल लाइफ सर्टिफिकेट नसल्याने थांबले आहे, त्यांचे डीएलसी करून दिले जाईल. तसेच डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) ज्यांनी अद्याप केलेली नाही, त्यांची डीबीटी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
लाभार्थ्यांच्या सोयीसाठी, महानगरपालिका प्रभागनिहाय शिबिरे आयोजित केली आहेत: प्रभाग क्र. 2: 23 सप्टेंबर - महानगरपालिका कार्यालय, राजापेठ, प्रभाग क्र. 3: 24 सप्टेंबर- महानगरपालिका कार्यालय, दस्तुर नगर, प्रभाग क्र. 4: 25 सप्टेंबर - महानगरपालिका कार्यालय, बडनेरा, प्रभाग क्र. 5: 26 सप्टेंबर - महानगरपालिका कार्यालय, भाजीबाजार.
संजय गांधी योजना तहसीलदार डॉ. प्रियंका मिसाळ यांनी नागरिकांना या शिबिरांचा लाभ घेण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. हा उपक्रम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी समर्पित असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
0000000
शासकीय तंत्रनिकेतन संस्थेमध्ये सीपीआर कार्यशाळा संपन्न
अमरावती, दि. 22 (जिमाका) : शासकीय तंत्रनिकेतन,अमरावती येथे संस्थेतील प्रथमोपचार समिती, औषधनिर्माणशास्त्र विभाग, रेड रिबन क्लब व महिला विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच सीपीआर (Cardiopulmonary Resuscitation) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
संस्थेचे प्राचार्य डॉ. अतुल बी. बोराडे, डॉ. महेंद्र गुढे, औषधनिर्माण शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सी. आर. टेनपे आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. महेंद्र गुढे यांनी विद्यार्थ्यांना सीपीआर प्रक्रिया व त्याचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सीपीआर प्रात्यक्षिक करवून दाखविले तसेच विद्यार्थ्यांकडूनही करवून घेतले. कार्यक्रमासाठी संस्थेचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्योत्सना सावनेरे यांनी तर आभार औषधनिर्माण शास्त्र विभागाचा विद्यार्थी प्रणव बारब्दे यांनी केले.
000000
No comments:
Post a Comment