अभियानाचा उपयोग गावाच्या विकासासाठी करावा
- विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल
अमरावती, दि. 17 : राज्य शासनातर्फे गावाच्या विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. या प्रामुख्याने ग्रामस्तरावरील आत्मनिर्भरता निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. यात नागरिकांचा सक्रीय सहभाग राहणार असल्याने या अभियानाचा उपयोग गावाच्या विकासासाठी करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा विभागीयस्तराचा शुभारंत उत्तमसरा, ता. भातकुली येथे आज पार पडला. तसेच स्वच्छताही सेवा उपक्रम, राष्ट्रीय पोषण माह, सेवा पंधरवडा या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, परिविक्षाधिन अधिकारी कौशल्या एम., उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे, उपायुक्त राजीव फडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बयास, गटविकास अधिकारी तुषार दांडगे, सुनिल राणा, सरपंच धमेंद्र मेहरे आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. सिंघल म्हणाल्या, गावांना समृद्ध पंचायत राज अभियानात चांगले काम करून बक्षीस जिंकण्याची संधी आहे. या अभियानात गावाला सुंदर करावे. सेवा पंधरवड्यात प्रामुख्याने शेतरस्ते मोकळे करण्यात येणार आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. तसेच घरकुलासाठी अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात एकही जण बेघर राहणार नाही. यासाठी होणाऱ्या सर्व्हेक्षणामध्ये नाव नोंदणी करावी. जिल्ह्यात गाव तेथे स्मशानभूमी व्हावी, यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. यात गावांना प्राधान्याने जागा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तसेच सशक्त नारी अभियानातून महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी अभियानात निश्चित केलेल्या मानकानुसार कार्य केल्यास अभियानात बक्षीस जिंकण्याची संधी आहे. राजस्व अभियानात शेतरस्ते, घरकुल, सातबारा आदी क्षेत्रात कार्य करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सामान्य महसुली बाबी आणि भटक्या विमुक्तांसाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानात राज्यभरातील चांगल्या ग्रामपंचायतींशी स्पर्धा होणार आहे. त्यामुळे गावाने एकत्रित प्रयत्नांनी उत्साहात या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती महापात्र यांनी, अभियान राबविण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. प्रत्येकाने अभियानात योगदान दिल्यास राज्यस्तरावर यश मिळणे शक्य होईल. महिलांसाठी पोषण अभियान राबविण्यात येत असले तरी यात पुरूषांनी सहभागी व्हावे. तसेच स्वच्छताही सेवा आणि स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानात महिलांनी आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन केले.
यावेळी फुलंब्री, जि. छत्रपती संभाजी नगर येथील राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. तसेच उमेदच्या 27 बचतगटांना दिड कोटी रूपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला. तसेच सातबारा, शिधापत्रिका, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सरपंच धमेंद्र मेहरे यांनी प्रास्ताविक केले.
000000
रोजगार मेळाव्यात १२८ तरुणांचा सहभाग;
३८ जणांची प्राथमिक निवड
अमरावती, दि. १७ (जिमाका) : जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या 'प्लेसमेंट ड्राईव्ह' ला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अमरावती शहर आणि परिसरातील विविध तालुक्यांमधून तब्बल १२८ उमेदवारांनी मेळाव्यात सहभाग घेतला.
या मेळाव्यात दहावी, बारावी, पदविकाधारक, पदवीधर तसेच तांत्रिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संधी मिळावी यासाठी पाच नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यामध्ये कोल्ब्रो ग्रुप, सहयोग मल्टी बँक, कोअर प्रोजेक्ट, स्विगी आणि जाधव गियर्स या कंपन्यांचा समावेश होता. या कंपन्यांनी ८२ विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या.
उपस्थित १२५ उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन जागेवरच निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यातून ३८ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून, ४ उमेदवारांची अंतिम निवड लगेचच जाहीर करण्यात आली. त्यामुळे तरुणांना कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.
या मेळाव्याच्या यशामुळे जिल्ह्यातील तरुणांना आत्मनिर्भर होण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे, असे मत कौशल्य विकास केंद्राचे अधिकारी अभिषेक ठाकरे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन श्रीमती वैष्णवी कुयरे यांनी तर क्रपा अरगुर्लेवार यांनी आभार मानले.
**
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी मोफत प्रशिक्षण:
अमृत आणि एमसीईडीचा संयुक्त उपक्रम
अमरावती, दि. १७ (जिमाका): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी दोन महत्त्वपूर्ण मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नवउद्योजक, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती आणि महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करणे आहे.
पहिला कार्यक्रम १८ दिवसांचा अन्न व फळ प्रक्रिया निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण असून, दुसरा ३० दिवसांचा AI तंत्रज्ञानावर आधारित तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. या दोन्ही प्रशिक्षणांमध्ये मोफत शिक्षण, अनुदान, आर्थिक सहाय्य आणि उद्योजकता विकासासाठी मार्गदर्शन पुरवले जाईल. याव्यतिरिक्त, 'अमृत' व्याज परतावा योजनेबाबतही सखोल माहिती दिली जाणार आहे.
या प्रशिक्षणासाठी १८ ते ६० वयोगटातील उमेदवार पात्र आहेत. विशेषतः ब्राह्मण, कायस्थ, ठाकूर, मारवाडी, गुजराती, जाट, राजपूत यांसारख्या अमृत लक्षित गटातील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.
या संदर्भात एक दिवसीय परिचय मेळावा आणि मुलाखत २६ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी १२ ते ३ या वेळेत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पहिला माळा, टांक चेंबर्स बिल्डिंग, गाडगेनगर, अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह (टी.सी., मार्कशीट, पॅन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाइल, फोटो इत्यादी) मुलाखतीस उपस्थित राहावे.
नोंदणी करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर, २०२५ आहे. अधिक माहितीसाठी स्वप्नील इसळ (८७८८६०४२२६), राजेश सुने (९१६८६६७१५४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना अमरावती जिल्ह्यातील रोजगार व स्वयंरोजगारासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.
***
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे जयंती साजरी
अमरावती, दि. 17: महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानात मोलाचे योगदान देणारे विचारवंत, झुंझार पत्रकार आणि साहित्यिक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली.
निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिक्षक निलेश खटके, तहसिलदार विजय लोखंडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
0000
उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची परीक्षा येत्या रविवारी
जिल्ह्यातील निरक्षरांना साक्षर होण्याची संधी
अमरावती, दि. 17 ( जिमाका): 'उल्लास - नवभारत साक्षरता कार्यक्रम' अंतर्गत अमरावती जिल्ह्यात रविवार, दि. 21 सप्टेंबर रोजी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLANT) परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या निरक्षर व्यक्तींनी आपापल्या परीक्षा केंद्रांवर वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
या परीक्षेचा मुख्य उद्देश १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या निरक्षर व्यक्तींना मूलभूत साक्षरता कौशल्ये प्रदान करणे हा आहे. यात वाचन, लेखन आणि गणितीय कौशल्ये तपासली जातील. केंद्र शासनाच्या 'उल्लास' या कार्यक्रमाअंतर्गत ही परीक्षा घेण्यात येत आहे, ज्यामध्ये निरक्षर व्यक्तींना केवळ साक्षर बनवणेच नाही तर त्यांना जीवनोपयोगी कौशल्ये, जसे की आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता आणि आरोग्यविषयक माहिती देणे हे देखील समाविष्ट आहे.
परीक्षेसाठी, उमेदवारांनी आपला नोंदणी क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच, ओळखपत्र म्हणून मूळ आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक पासबुक यापैकी कोणतेही एक कागदपत्र सोबत बाळगणे अनिवार्य आहे. परीक्षा केंद्र हे त्याच शाळेत असेल जिथे उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत होणार असून, दिव्यांगांसाठी 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. ही परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगू, तामिळ, बंगाली आणि उर्दू या माध्यमांमध्ये देता येईल. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना केंद्र सरकारकडून प्रमाणपत्र दिले जाईल.
*****
रेवसा आश्रमशाळेत गोवर-रुबेला लसीकरण मोहिम
अमरावती, दि. 17 (जिमाका): आयुष्मान भारतअंतर्गत, आयुष्मान आरोग्य मंदिर, रेवसा येथे जिल्हास्तरीय गोवर-रुबेला विशेषलसीकरण अभियान मोहिमेचे उद्घाटन नुकतेच पार पडले. हा कार्यक्रम श्री. चतुरजीउके अनुदानित आश्रमशाळा, रेवसा येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशअसोले यांच्या हस्ते झाले.
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, जिल्हा प्रजनन व बालआरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे आदी उपस्थित होते.यावेळी गोवर-रुबेला या आजारांविषयी सविस्तर माहिती देत,लसीकरणाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.गोवर आणि रुबेला निर्मूलनासाठी प्रत्येक मुलापर्यंतलसीकरण पोहोचणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.डॉ.सुरेश असोले यांनी गोवर व रुबेला हे संसर्गजन्य आजारमुलांसाठी अत्यंत घातक असल्याचे सांगितले.५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी 'एम.आर. विशेष अभियान' महत्त्वाचे आहे, आणि आदिवासी आश्रमशाळांमधीलमुलांपर्यंत लसीकरण पोहोचणे ही खरी गरज आहे, असे ते म्हणाले.डॉ.प्रवीण पारिसे यांनी गोवर-रुबेला लसीकरण पूर्णपणे होणेहीच प्राथमिकता असल्याचे नमूद केले.प्रत्येक मुलाला लस मिळालीच पाहिजे, असा आरोग्य विभागाचादृढनिश्चय असल्याचेही त्यांनी सांगितले.डॉ. संदीप हेडाऊ यांनी आदिवासी आश्रमशाळांमधील मुलांचेआरोग्य ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे म्हटले.लसीकरणामुळे विद्यार्थ्यांना रोगांपासून संरक्षण मिळतेआणि त्यांच्या शिक्षणात अडथळे येत नाहीत, असेही ते म्हणाले.
****
No comments:
Post a Comment