सेवा पंधरवड्यात नागरिकांनी सहभागी व्हावे
जिल्ह्यात सेवा पंधरवडा प्रभावीपणे राबविणार
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 15 : राज्य शासनाच्या निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात तीन टप्प्यात हा उपक्रम राबविण्यात येणार असून यात हाती घेण्यात आलेले उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, सेवा पंधरवडा मोहिमेमध्ये पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत. यात नागरिकांना प्रशासकीय सेवा या जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी आलेल्या काही महत्त्वाच्या सूचनाही या अभियानात समाविष्ट करण्यात येणार आहे.
शासनाच्या निर्देशानुसार या पंधरवड्यामध्ये पहिल्या टप्प्यात दि. १७ ते २२ सप्टेंबर दरम्यान पाणंद रस्ते आणि शेतीला जोडणारे मार्ग, तसेच पाणंद, शिवरस्त्यांना क्रमांक देण्याच्या महसूल विभागाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करून ते गाव नकाशावर चिन्हांकित केले जातील. निस्तार पत्रकामध्ये नोंद नसलेल्या पाणंद रस्त्यांची नोंद घेण्याची कार्यवाही केली जाईल. शेतकऱ्यांसाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्र घेतले जातील. रस्ता अदालत आयोजित करून शेतरस्त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जातील. शिवार फेरी घेऊन शेतरस्त्यांची मोजणी आणि सीमांकन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात राबविण्यात आलेला पाणंद रस्त्याचा पॅटर्न राज्य शासनाने स्वीकारला आहे. रस्ते मोकळे करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहे. तसेच हे रस्ते वहिवाटीसाठी मोकळे करून देण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात दि. २३ ते २७ सप्टेंबरमध्ये 'सर्वांसाठी घरे' योजनेची अंमलबजावणी केली जाईल. यात घरे बांधण्यासाठी शासकीय जमिनी कब्जे हक्काने दिल्या जातील. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुसार नियमित केली जातील. पात्र लाभार्थ्यांना जमिनींचे पट्टे वाटप केले जातील. यामध्ये शासकीय जमिनी वाटप केलेल्या, अतिक्रमण नियमित केलेल्या तसेच २०११ पूर्वीच्या गावठाणातील अतिक्रमणे नियमित केलेल्या लाभार्थ्यांचा समावेश असेल. महापालिका, नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीमध्ये सुमारे दिड हजारावर पट्टेवाटप करण्यात येतील. जिल्ह्यातील 96 मंडळात महाराजस्व शिबिर घेण्यात येईल. यात एकाच ठिकाणी दाखले देण्याची सुविधा असेल. तसेच जिल्ह्यात एक वैशिष्ट्य उपक्रम म्हणून 300 गावात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात दि. २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात जनसंवाद, १५५ अंतर्गत आदेशांची तपासणी, जिवंत सातबारा मोहीम आणि 'गाव तिथे स्मशानभूमी' या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल. जिवंत सातबारा मोहिमेत आतापर्यंत सात हजार नोंदणी नव्याने घेण्यात आल्या आहे. तसेच शहरी बेघरांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती, उपअधीक्षक भूमी अभिलेख आणि विविध विभाग सहभागी असणार आहेत. नागरिकांनी या 'सेवा पंधरवडा' मध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि विविध उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.
000000
आणीबाणी मानधन योजनेमध्ये सुधारणा
* अर्ज करण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत
अमरावती, दि. 15 : आणीबाणीच्या काळात कारावास भोगला आहे, त्यांच्यासाठी मानधन योजनेमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. त्यानुसार 24 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन निर्णयानुसार, ज्या आणीबाणी धारकांनी यापूर्वी योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यांना नव्याने अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. अर्जदारांनी १५ सप्टेंबर २०१८ रोजीच्या शासन पूरक पत्रासोबत असलेल्या परिशिष्ट ‘ब’ मधील अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
तसेच आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती २ जानेवारी २०१८ पूर्वी हयात नसेल, तर त्यांच्या पश्चात हयात असलेले पती किंवा पत्नी मानधनासाठी अर्ज दाखल करू शकतात. आणीबाणी मानधन योजनेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २४ नोव्हेंबर २०२५ आहे. पात्र आणीबाणीधारक आणि त्यांचे हयात जोडीदार पती, पत्नी यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.
000000
स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान राबविण्यात येणार
अमरावती, दि. 15 : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' हे राष्ट्रीय अभियान देशभरात राबवले जाणार आहे. त्याच दिवशी जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर महिला व बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
या अभियानात ग्रामीण आणि शहरी भागातील महिला व मुलांची तपासणी आणि विशेषज्ञ आरोग्य शिबिरे आयोजित करणे आहे. यामध्ये महिलांच्या आरोग्य तपासणीत उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी. तसेच, जोखमीच्या महिलांसाठी क्षयरोग तपासणी करण्यात येणार आहे. तसेच गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व काळजी तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी आणि लसीकरण करण्यात येणार आहे.
किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीची स्वच्छता आणि पोषणाविषयी जागृती सत्रे. तसेच, खाद्यतेल आणि साखरेचा वापर कमी करण्यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. १ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वेच्छिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबिरे आयोजित केली जातील. या उपक्रमात आयुष्मान भारत डिजिटल मिशन कार्ड आणि पंतप्रधान जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणी आणि कार्ड वाटप केले जाईल. या अभियानात विविध तपासणी शिबिरे आयोजित करून रुग्णांना आवश्यक तेथे तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठवले जाईल आणि त्यांच्या सर्व तपासण्या व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. राज्यात १७ सप्टेंबर २०२५ रोजी ७५ उपक्रम आयोजित केले आहेत, ज्यात आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी, दंत तपासणी, मानसिक आरोग्य समुपदेशन आणि व्यसनमुक्ती सत्रे यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ३३५ उपकेंद्रे, ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १६ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि इतर रुग्णालये या अभियानात सक्रियपणे सहभागी होणार आहेत.
00000
'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियानात
मोफत आरोग्य तपासणी शिबिर
अमरावती, दि. 15 : जिल्हा स्त्री रुग्णालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या वतीने 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियानांतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर बुधवार, दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत श्रीकृष्णपेठ येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात होणार आहे.
हे शिबिर विशेषतः ३० वर्षांवरील महिलांसाठी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात येणार आहेत. तसेच गरजू व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ देखील दिला जाणार आहे.
या उपक्रमाचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.
00000
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांसाठी
सीएससी केंद्राचे सहकार्य मिळणार
अमरावती, दि. 15 : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि कॉमन सर्विस सेंटर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ गरजू तरुण आणि उद्योजकांना त्यांच्या घराच्या जवळच उपलब्ध होणार आहे.
महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना महामंडळाच्या कार्यालयात जावे लागत होते. मात्र, या नवीन करारामुळे प्रत्येक सीएससी केंद्रावरच अर्ज स्वीकारले जातील. त्यामुळे अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील तरुणांना विशेष फायदा होणार आहे. अर्जदारांना अर्ज करतेवेळी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.
या करारामुळे महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिक वेगाने आणि सहजपणे नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे, असे महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक आकाश मोरे यांनी कळविले आहे.
00000
कौशल्य विकास केंद्राचा आज रोजगार मेळावा
अमरावती, दि. 15 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे मंगळवार, दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे. शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो रोड, जि. अमरावती येथे हा मेळावा होणार आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटर अमरावती तसेच कोलब्रो गृप प्रा. लि. अमरावती, स्विगी अमरावती, कोअर प्रोजेक्ट अमरावती, जाधव गिअर्स अमरावती, सह्योग मल्टी स्टेट क्रेडीट सोसायटी प्रा. लि. अमरावती यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येतो. या मेळाव्यात आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या
No comments:
Post a Comment