Friday, September 12, 2025

DIO NEWS AMRAVATI 12-09-2025

 रोजगार मेळाव्यात 350 उमेदवारांनी सहभाग

अमरावती, दि. 12 (जिमाका) : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने अचलपूर येथील जगदंब महाविद्यालयात 11 सप्टेंबर रोजी आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 350 पेक्षा अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला. यातील 112 उमेदवारांनी प्राथमिक निवड फेरी यशस्वी केली आहे, यातून अंतिम 22 जणांची निवड 'ऑन-स्पॉट' करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रमाकांत शेरेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव भिमराव दखणे, रजनी शेरकार, प्राचार्य डॉ. अविनाश कोहळे उपस्थित होते.

डॉ. शेरेकर यांनी युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित केले. तसेच विदर्भातील उद्योजकता आणि रोजगाराच्या संधीवर प्रकार टाकला. तसेच युवकांना उद्योगांची दिशा दाखविण्यासोबतच रोजगारक्षम उमेदवारांना नवी संधी मिळावी, यासाठी प्रेरणा दिली. सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी मेळाव्यातून जिल्ह्यातील तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. यातून युवकांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले.

मेळाव्यात विविध क्षेत्रांतील जवळपास 20 हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला. यात 280 रिक्त पदांसाठी 408 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यातील 112 उमेदवारांची प्राथमिकस्तरावर निवड करण्यात आली. तसेच 22 उमेदवारांना जागेवरच नियुक्ती देण्यात आली.

डॉ. मयुरेश सिंगरूप यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. वैभव पाटील यांनी आभार मानले. मेळाव्यासाठी मार्गदर्शन अधिकारी सुभाष गुल्हाणे, कृपा अरगुलेवार, तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातील अधिकारी, कर्मचारी, जगदंब महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

00000

पोषण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन

अमरावती, दि. 12 (जिमाका) : कुपोषण आणि अशक्तपणासारख्या समस्या दूर करण्यासाठी, तसेच सर्वांगीण आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात पोषण महिन्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ‘राष्ट्रीय पोषण महिना’ अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभाग आणि इतर संबंधित विभागांच्या सहकार्याने हे उपक्रम राबवले जात आहेत.

12 सप्टेंबरपासून महिना 'पोषण महिना' साजरा केला जाणार आहे. या अभियानाचा उद्देश लहान मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांमध्ये योग्य पोषणाबद्दल जागरूकता वाढवणे आहे. 'सही पोषण, देश रोशन' हे घोषवाक्य घेऊन हे अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत अंगणवाड्या, शाळा आणि ग्रामीण भागांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे, पोषण आहाराचे महत्त्व सांगणारे प्रदर्शन, तसेच पौष्टिक पाककृतींचे प्रात्यक्षिक आयोजित केले जाणार आहे.

या अभियानाच्या माध्यमातून केवळ पोषणविषयक समस्यांवरच नव्हे, तर स्वच्छता, लसीकरण आणि आरोग्यदायी सवयींवरही भर दिला जात आहे. तसेच लठ्ठपणा नियंत्रणात साखर आणि तेलाचे सेवन कमी करणे, प्रारंभिक बालसंगोपन व शिक्षण, पोषण भी – पढाई भी, एक पेड माँ के नाम, बाल व लहान मुलांच्या आहार पद्धती, मेन स्ट्रीमींग, व्होकल फॉर लोकल आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून निरोगी जीवनासाठी योग्य आहाराची निवड करण्याचे महत्त्व सांगितले जाणार आहे.

जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन मुलांना आणि महिलांना संतुलित आहाराबद्दल माहिती देतील. या उपक्रमांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, बचत गट आणि महिला मंडळेही सक्रियपणे सहभागी होतील. यासाठी जिल्हा परिषेदेने महिन्याभरात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे, त्यानुसार उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी कळविले आहे.

00000

13 सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत

अमरावती, दि. 12 (जिमाका) : अमरावतीसह राज्यातील सर्व न्यायालयात शनिवार, दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दाखल व दाखलपूर्व प्रकरणे तडजोड व सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

अमरावती येथील लोकअदालतीचे उद्घाटन नागपूर खंडपिठाचे न्यायमुर्ती प्रविण पाटील यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाहीत.

तडजोडपात्र प्रलंबित खटले राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा, तसेच दाखलपूर्व प्रकरणाबाबत नजिकच्या जिल्हा किंवा तालुका न्यायालयाकडे संपर्क साधावा. सप्टेंबरमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपली प्रकरणे सामंजस्य आणि तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सुधाकर यार्लगड्डा, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. एस. वमने यांनी केले आहे.

0000

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा

अमरावती, दि. 12 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे मंगळवार, दि. 16 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, मंगळवार, दि. 16 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील मिशनच्या कार्यालयात उपस्थित राहतील. दुपारी 3.30 वाजता नांदगाव खंडेश्वर येथील विश्रामगृहात तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, तसेच शासकीय जमिनीवर चारा लागवड यासंबंधी चर्चा करतील. दुपारी 4.15 वाजता नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियास भेट देतील. त्यानंतर सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.

0000

सोमवारी जिल्हा महिला लोकशाही दिन

अमरावती, दि. 12 (जिमाका) : जिल्हा महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

00000

शेती स्वालंबन मिशनच्या अध्यक्षांची पोहरापुर्णा येथे सांत्वनपर भेट

अमरावती, दि. 12 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांनी पोहरापुर्णा येथे आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना भेट दिली.

ॲड. हेलोंडे पाटील यांनी गुरूवार, दि. 11 सप्टेंबर रोजी पोहरापुर्णा, ता. भातकुली येथील नितीन बोबडे या आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबास सांत्वनपर भेट दिली. यावेळी स्वीय सहाय्यक मनोज कापडे, भातकुलीचे तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे आदी उपस्थित होते.

अॅड. हेलोंडे पाटील यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची आत्मियतेने चौकशी केली. मृतक नितीन बोबडे यांचा मुलगा सार्थक बोबडे आणि मुलगी धनश्री बोबडे यांच्या शिक्षणाबाबत विचारपूस केली. तसेच मृतकाची पत्नी रुपाली बोबडे यांना घरगुती व्यवसायाचे प्रशिक्षण, तसेच शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत सांगितले.

000000

 शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

अमरावती, दि. 12 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 14 सप्टेंबर ते दि. 28 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...