पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
अमरावती, दि. 25 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अधीक्षक निलेश खटके यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यांनीही दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
00000
सांगलीचे तिरंगा गणेशोत्सव मंडळ राज्यात पहिले महाराष्ट्र
राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर
अमरावती, 25: महागणेशोत्सवः महाराष्ट्राचा राज्य उत्सव अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या, 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025' चा निकाल जाहीर झाला असून सांगलीच्या विटा तालुक्यातील तिरंगा गणेशोत्सव मंडळाने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. लातूरचे वसुंधरा वृक्षारोपी गणेशोत्सव राज्यात दुसरे व सुवर्णयोग तरुण मंडळ अ.नगर यांनी राज्यात तृतीय क्रमांक मिळविला.
यासोबतच जिल्हास्तरीय प्रथम द्वित्तीय व तृतीय विजेत्यांची घोषणा करण्यात आली असून तालुकास्तरापर्यंत विस्तारित केलेल्या या स्पर्धेअंतर्गत विजेत्या झालेल्या तालुकास्तरीय मंडळांची घोषणा शासनाद्वारे करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार, दि. 25 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून या समारंभात सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या शुभहस्ते विजेत्या मंडळांचा पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. सर्व विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे.
00000
‘स्वच्छता ही सेवा 2025': अमरावती डाक विभागाचा अभिनव उपक्रम
अमरावती, दि. 25 (जिमाका): भारतीय डाक विभागाने आरोग्य आणि पर्यावरणातील शुद्धता टिकवण्यासाठी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 'स्वच्छता ही सेवा 2025' हे विशेष अभियान अमरावतीमध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध मोहिमांचे आयोजन करण्यात आले.
स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी स्वच्छता रॅली आणि मोहिम आयोजित करण्यात आली. या मोहिमेमध्ये नागरिकांना सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आणि परिसर स्वच्छ राखण्याचे आवाहन करण्यात आले.
या अभियानाचा एक भाग म्हणून, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी 'एक पेड माँ के नाम' या विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. 'झाडे लावा-झाडे जगवा' या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
प्रवर डाक अधीक्षक अनन्या प्रिया आणि प्रवर डाकपाल सुजितकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम विविध उपक्रम सुरु आहेत. अमरावती प्रधान डाकघरातील सर्व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेऊन समाजात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
00000
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील महिलांसाठी सूचना
आधार इ-केवायसी दोन महिन्यांत पूर्ण करा
अमरावती, दि. 25 (जिमाका): 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या महत्त्वाकांक्षी योजनेतील पात्र लाभार्थी महिलांच्या पडताळणी आणि प्रमाणीकरणासाठी इ-केवायसी (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) माध्यमाद्वारे आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या संदर्भातील इ-केवायसीची सुविधा योजनेच्या अधिकृत वेब पोर्टलवर https://ladakibahin.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालु आर्थिक वश् या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. निश्चित केलेल्या कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण केले नाही, ते पुढील कार्यवाहीसाठी अपात्र ठरतील, याची नोंद घ्यावी. याव्यतिरिक्त, या योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत इ-केवायसी करणे बंधनकारक राहील. लाभार्थ्यांना प्रत्यक्षात इ-केवायसी बाबत कोणती कार्यवाही करावी लागेल, याची माहिती 'परिशिष्ट-अ' (Flowchart) मध्ये देण्यात आली आहे. प्रशासनाने सर्व पात्र महिलांना त्वरित योजनेच्या वेब पोर्टलला भेट देऊन आपले इ-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
00000
‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’अभियानाला सुरवात
अमरावती, दि. 25 (जिमाका): महिला व बालकांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पौष्टिक आहाराच्या सेवांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने पुरस्कृत केलेले 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' अभियान अमरावती येथे सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेले हे अभियान राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीतील सर्व सेवा दवाखान्यांमध्ये 17 सप्टेंबर, 2025 पासून राबवले जात आहे.
या अभियानामध्ये महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, सिकल सेल आणि क्षयरोग यांसारख्या आजारांची तपासणी केली जात आहे. याशिवाय, स्तन कर्करोग, गरोदर मातांची तपासणी, महिला व बालकांसाठी संतुलित आहार, मासिक पाळीतील स्वच्छता, डोळे आणि दातांची काळजी यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे.
या अभियानाचा लाभ सर्व विमाधारकांनी घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. उज्ज्वला माळवे आणि प्रशासन अधिकारी डॉ. राजनारायण गोमासे यांनी केले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिनीत कावरे, परिचारिका स्नेहा बारसाराडे, पियुष कनेरी आणि दवाखान्यांमधील अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या उपक्रमामुळे महिला व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
000000
उत्तम जीवनशैली हा निरोगी आयुष्याचा पाया
*’जागर महिला आरोग्याचा’ मध्ये मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. सिकंदर अडवाणी व हृदय रोग तज्ज्ञ
डॉ. पवन अग्रवाल यांचे मार्गदर्शन*
अमरावती, दि. 25 (जिमाका): अहिल्यादेवी होळकर यांच्या तिनशेव्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशानातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सवात महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन आणि तपासणी शिबिर घेण्यात येत आहे. आज या शिबिरामध्ये हृदय व मेंदू रोगाविषयी माहिती देण्यात आली. 'मेंदू रोगाविषयी मार्गदर्शन ' या विषयावर मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. सिकंदर अडवाणी यांनी तर 'जीवनशैली व हृदयरोगाविषयी मार्गदर्शन' या विषयावर डॉ.पवन अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रद्धा उदावंत, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा खणिकर्म अधिकारी प्रणिता चाफले, नायब तहसीलदार श्रीमती मिसाळ आदी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन सभागृहात जागर महिला आरोग्याचा उपक्रमामध्ये राबविण्यात येत आहे. यात मेंदू रोगाविषयी मार्गदर्शन करतांना डॉ. सिकंदर अडवाणी म्हणाले, बदलती जीवनशैली आणि वाढत्या ताणतणावांचे वेळीच योग्य व्यवस्थापन न झाल्यामुळे आजकाल विविध शारीरिक तसेच मानसिक व्याधींचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी सहसा 50 वर्षावरील व्यक्तींना होणारे आजार आज 18 वर्षाखालील मुला-मुलींनाही होत आहे. पूर्वीपेक्षा जीवन गतिमान झाले आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी प्रत्येक जण धावत आहे. परंतु यामुळे बऱ्याच जणांना आरोग्य साधनेला पुरेसा वेळ देता येत नाही. यातून अनेक आजार नकळत डोके वर काढतात. यासाठी कितीही व्यस्त असाल तरीही स्वतःसाठी पुरेसा वेळ द्या. उपचारासाठी वेळ दिल्यापेक्षा काळजी घेणे केव्हाही हितावह आहे. श्वसन प्रक्रिया ही एक सामान्य प्रक्रिया असली तरीही पूर्ण शरीराचे संतुलन त्यावर राहते. यामुळे नियमित योग, प्राणायाम अथवा झेपेल असे शारीरिक श्रम करा. सकस आहारावर भर द्या. शरीराप्रमाणे मेंदूही थकतो, त्यालाही विश्रांती हवी असते. यासाठी कामाबरोबरच छंदही जोपासा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ. पवन अग्रवाल म्हणाले, भारतामध्ये तंबाखूच्या सेवनाचे प्रमाण जास्त आहे. प्रकृती चांगली ठेवण्यासाठी सर्वप्रथम सर्व व्यसनांपासून दूर राहा. कोणतीही शारीरिक व्याधी जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. स्वतःच्या दुखण्याचे स्वतः अनुमान लावू नये. लवकर निदान झाल्यास लवकर उपचार सुरू होतात. आपल्याजवळ असलेल्या सुख समृद्धीचा लाभ घेण्यासाठी उत्तम आरोग्य असणे गरजेचे आहे. झोपण्यापूर्वी मोबाईल बघू नये. कितीही व्यस्त असाल, तरीही प्रत्येकाने दिवसातील किमान एक तास स्वतःच्या आरोग्याला द्यावा. यामुळे कौटुंबिक तसेच कार्यालयीन कामकाजावर निश्चितच सकारात्मक प्रभाव पडेल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन चैताली यादव यांनी तर आभार रूपाली आंबेकर यांनी मानले.
0000
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा
अमरावती, दि. 25 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शुक्रवार, दि. 26 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा आहे.
दौऱ्यानुसार, सकाळी 11.30 वाजता पी. आर. पोटे पाटील शैक्षणिक संकुलात अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात आढावा बैठकीला उपस्थित राहतील. रूख्मिनीनगर येथे दुपारी 2.30 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत चित्र प्रदर्शनी कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता महापालिका सभागृहात अमरावती महापालिकेच्या बैठकीस उपस्थित राहतील. तसेच दुपारी 4.30 वाजता अमरावती जिल्हा परिषद सभागृहातील बैठकीस उपस्थित राहतील.
बैठकीनंतर गांधी चौकातील तुळजाभवानी दुर्गा उत्सव मंडळास सायंकाळी 6.30 वाजता, तर हमालपुरा येथील तानाजी नवदुर्गा उत्सव मंडळास सायंकाळी 7 वाजता भेट देतील. त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.
00000
कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांचा दौरा
अमरावती, दि. 25 (जिमाका) : कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांचा शुक्रवार, दि. 26 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा आहे.
दौऱ्यानुसार, सकाळी 10 वाजता पी. आर. पोटे पाटील शैक्षणिक संकुलातील बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीने खामगावकडे प्रयाण करतील.
000000
No comments:
Post a Comment