क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सूचना धोरणात परावर्तित होतील
- क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
अमरावती, दि. 21 : राज्याच्या क्रीडा धोरणात अमुलाग्र बदल करणे गरजेचे आहे. यासाठी क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी राज्यभरात संवाद साधण्यात येत आहे. या संवाद कार्यक्रमातून क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आलेल्या सूचनांचे एकत्रीकरण करण्यात येतील. या मौल्यवान सूचना नव्याने तयार होणाऱ्या क्रीडा धोरणात परावर्तित झालेल्या असतील, असे प्रतिपादन क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आज विकसित भारत 2047 च्या अनुषंगाने क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्यात आला. यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, क्रीडा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे, कल्याण पाटील, जितू ठाकूर, ॲड. प्रशांत देशपांडे, संजय सबनीस आदी उपस्थित होते.
ॲड. कोकाटे म्हणाले, पूर्वींच्या क्रीडा धोरणातही चांगल्या बाबींचा समावेश आहे. मात्र कालानुसार यात काही बदल घडत असल्याने नव्याने क्रीडा धोरण करणे गरजेचे आहे. पूर्वीच्या धोरणात विविध पुरस्कार आणि अनुदानाची सोय होती. क्रीडा विभागात अधिकाऱ्यांच्या उपलब्धतेसाठी उपाय म्हणून कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. येत्या काळात क्रीडा क्षेत्राशी संबंधित असलेलेच कर्मचारी या भागात नियुक्त व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यामागे केवळ त्यांचा अनुभव कामी यावा अशी अपेक्षा आहे.
नवीन क्रीडा धोरणाबद्दल सूचना मागविताना प्रामुख्याने खेळाडूंची शासकीय सेवेत थेट नियुक्तीची बाब समोर आली आहे. त्यामुळे यामध्ये सर्व बाबी तपासून निर्णय घेण्यात येईल. क्रीडा प्रशिक्षकांना अत्यंत अल्प मानधन देण्यात येत आहे. उत्कृष्ट क्रीडापटू घडविण्यात प्रशिक्षकांची मोलाची भूमिका असल्याने मानधन वाढीबाबत ठोस निर्णय घेण्यात येईल.
नव्या पिढीनेही क्रीडा क्षेत्रात यावे, यासाठी सुविधा द्याव्या लागतील. त्यामुळे सर्वांच्या सहभागाने क्रीडा धोरण येणे आवश्यक आहे. प्रामुख्याने ऑलिंपिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांवर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासोबतच आदिवासी भागात क्रीडा क्षेत्राचा विकास करून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तालुकास्तरावर क्रीडा संकुल निर्माण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये आता बदल करण्यात आले आहेत.
त्यानुसार आता उपविभागीय अधिकारी हे समितीचे अध्यक्ष राहतील. सार्वजनिक-खासगी सहभागातून क्रीडा क्षेत्राचा विकास करावयाचा आहे. क्रीडा विकासासाठी इस्त्राइलमधील कंपनी 800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास तयार आहे. त्यांना अमरावती हा चांगला पर्याय असल्याची सुचवण्यात येईल. शासनाच्या सर्व परवानग्या घेऊन या ठिकाणी चांगली सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यासोबतच जिल्हास्तरावर सिंथेटिक ट्रॅक तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, मार्गदर्शक, पुरस्कार विजेते, पत्रकार, नागरिक, खेळाडू यांच्याशी संवाद साधण्यात आला. उपस्थितांनी क्रीडा क्षेत्रात नव्याने समावेश करावयाच्या बाबी क्रीडामंत्री यांच्यासमोर मांडल्या.
00000
No comments:
Post a Comment