ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा
अमरावती, दि. 10 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे गुरूवार, दि. 11 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
दौऱ्यानुसार, गुरूवार, दि. 11 सप्टेंबर रोजी 3 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील मिशनच्या कार्यालयात शेतकरी आत्महत्या व शासकीय जमिनीवर चारा लागवड यासंबंधी चर्चा करतील. दुपारी 3.30 वाजता धानोरा कोकाटे, ता. अमरावती येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियास भेट देतील. सायंकाळी 4.30 वाजता पोहरा पूर्ण, ता. भातकुली येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियास भेट देतील. त्यानंतर सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.
00000
युवकांनी जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी व्हावे
- जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 10 (जिमाका) : शांघाई येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी जिल्ह्यातील युवकांना मिळणार आहे. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा होणार आहे. यात जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांना ऑलिम्पिकच्या धर्तीवर कौशल्य सादर करण्याची स्पर्धा होणार आहे.
जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कॉन्सील, विविध औद्यागिक आस्थापना यांच्या सहकार्याने स्किल कॉम्पीटीशन आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर निवड केलेल्या उमेदवारांची नावे जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेकरीता जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आला आहे. सदर स्पर्धेमध्ये 50 क्षेत्रासाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2004 किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच, डिजीटल कन्स्ट्रक्शन, क्लाऊड कॉम्प्युटींग, सायबर सिक्युरिटी, आयसीटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, अॅडिटीव्ह मॅनुफॅक्चरिंग, इंडस्ट्रीअल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, मॅकेट्रॉनिक्स, ऑप्टोइलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी, रोबोट सिस्टीम इंटीग्रेशन, वॉटर टेक्नॉलॉजी, डेंटल प्रोस्टेथिक्स, एअरक्राफ्ट मेंटनन्स या क्षेत्राकरीता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2001 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.
शांघाई येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धेत प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेत सर्व कौशल्य प्रशिक्षण संस्थांनी स्पर्धेत सहभागी व्हावे. वर्ष 2026 मधील जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी skillindiadigital.gov.in यावर दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.
000000
कौशल्य विकास केंद्राचा आज रोजगार मेळावा
अमरावती, दि. 10 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे गुरूवार, दि. 11 सप्टेंबर 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे. जगदंब महाविद्यालय, अचलपूर येथे हा मेळावा होणार आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येते. मेळाव्यात कोलब्रो गृप प्रा. लि., भारत फायनान्स प्रा.लि., स्विगी, जिनस पावर, क्वेज कॉर्पोरेशन प्रा. लि. पुणे, दामोधर इंडस्ट्रीज प्रा. लि., टाटा मोटर्स, पुणे, ग्रिनफॅब सोलर खादी, कोअर प्रोजेक्ट, धूत ट्रान्समिशन संभाजीनगर, जाधव गियर्स, स्पंदन मायक्रो फायनान्स ली., मेस्कोर प्रेसीजन प्रा. लि., क्रेडीट ॲक्सीस ग्रा. लि., ब्लिंकीट प्रा. लि., तसेच विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी. यात ऑनलाईन सहभाग नोंदवून आपली रजिट्रेशनची प्रत काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रासह प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.
0000000
दुचाकीसाठी नवीन वाहन मालिका सुरू
अमरावती, दि. 10 (जिमाका) : परिवहनेत्तर दुचाकी संवर्गातील वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी मंगळवार, दि. 16 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज परिवहन कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
पसंती क्रमांकासाठी वाहन नावावर असलेल्या व्यक्तीच्या अर्जासोबत त्यांच्या पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड जोडावे. तसेच अर्जामध्ये वाहन ज्या व्यक्तीच्या नावे आहे, त्या व्यक्तीचा आधारकार्डला संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक डिमांड ड्राफ्ट अमरावती, कॅम्प शाखा, ट्रेझरी ब्रांच कोड नं. 003866 येथे देय असावा.
पसंती क्रमांकाची यादी दि. 16 सप्टेंबर रोजी 4 वाजता कार्यालयातील नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. एकापेक्षा अधिक अर्ज आलेल्या अर्जदारांनी दि. 17 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांक शुल्काचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात जमा करावेत. दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
00000
सोमठाणा खुर्द येथील जमीन मोबदल्यासाठी
कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 10 (जिमाका) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागांतर्गत सोमठाणा खुर्द येथील वाढीव जमीन मोबदल्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.
सोमठाणा खुर्द येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या मूल्यांकनाच्या चार पट मोबदला लवकरच वितरित केला जाणार आहे. यासाठी 100 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर अर्ज, बँक खाते पुस्तकाची छायाप्रत, शेतीचा सातबारा उतारा, लाभार्थी मयत असल्यास वारस प्रमाणपत्र आणि वारसाच्या बँक पासबुकची छायाप्रत ही कागदपत्रे तातडीने सादर करणे आवश्यक आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव संरक्षणासाठी सोमठाणा खुर्द गावातील 42 शेतमूल्यांकनधारक आणि 21 वनहक्कधारक यांच्या जमिनींचे मूल्यांकन करण्यात आले आहे. यापूर्वी, त्यांना जमिनीच्या मूल्यांकनाच्या एक पट रक्कम आणि त्यावर 30 टक्के दिलासा रक्कम देण्यात आली होती. मात्र, 12 ऑक्टोबर 2015 रोजीच्या नवीन शासन निर्णयानुसार, भू-संपादन कायदा 2013 लागू झाला आहे. या कायद्यानुसार, जमिनीचा मोबदला पुनर्वसन पॅकेजव्यतिरिक्त दिला जातो आणि तो जमिनीच्या मूल्यांकनाच्या चार पट असणे अपेक्षित आहे. त्यामुळे, या लाभार्थ्यांना यापूर्वी मिळालेली रक्कम वगळून, उर्वरित मोबदला देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
यात अनेक लाभार्थ्यांनी अद्याप आवश्यक कागदपत्रे सादर केली नसल्याने मोबदला मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांना हक्काचा मोबदला तातडीने मिळणार आहे. या गावातील पात्र लाभार्थ्यांची सविस्तर यादी mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे उपवनसंरक्षक आर. एस. टोलिया यांनी यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment