Wednesday, September 24, 2025

DIO NEWS AMRAVATI 24-09-2025

                                                  मेळघाटातील आरोग्य सेवेसाठी'स्कॉच अवॉर्ड

अमरावती, दि. 24 (जिमाका) : मेळघाटातील आरोग्य सेवेसाठी अमरावती जिल्हा परिषदेला 'स्कॉच अवॉर्ड 'ने सन्मानित करण्यात आले आहे. मेळघाटातील कुपोषण, माता आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने 'मिशन 28' हा उपक्रम यशस्वीरित्या राबविला आहे.

जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पांडा यांनी 2021 मध्ये 'मिशन 28' ची संकल्पना मांडली होती. सध्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे आणि डॉ. श्रीमती वानखेडे यांच्यासह मेळघाटातील संपूर्ण टीमने या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

या पुरस्कार सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे अधिकारी, जिल्हा लेखा व्यवस्थापक अशोक कोठारी, आरोग्य सेविका विद्या गावंडे आणि आशा कार्यकर्ता अनिता धुर्वे यांच्यासह मेळघाटातील अंगणवाडी कार्यकर्ते टीम उपस्थित होती. डॉ. सुरेश असोले यांनी या यशाचे श्रेय मेळघाटातील आरोग्य टीम, आशा वर्कर, डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ यांना दिले आहे.

00000

रेल्वे पुलाबाबत आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे निर्देश

*संयुक्त पथकाचा पाहणी अहवाल गुरूवारपर्यंत मागविला

अमरावती, दि. 24 (जिमाका) : शहरातील राजकमल रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी असुरक्षित घोषित करण्यात आल्यानंतरही, त्याखालून रेल्वे वाहतूक सुरू असल्याने संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हादंडाधिकारी आणि जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आशिष येरेकर यांनी हे आदेश जारी केले आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशामध्ये रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त पाहणी पथकाद्वारे पुलाची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासाठी रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक संयुक्त पाहणी पथक तात्काळ स्थापन करावे. या पथकात पुलाला असुरक्षित घोषित करणाऱ्या स्ट्रक्चरल कन्सल्टंटचाही समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. हे पथक रेल्वे वाहतुकीला असलेल्या धोक्याचे मूल्यांकन करून पुलाच्या संरचनेची सद्यस्थिती तपासणार आहे. पुलावरून वाहतूक बंद असली तरी पुलाखालून रेल्वे वाहतूक सुरू असल्याने पुलाला सुरक्षित करेपर्यंत किंवा तो पाडण्यात येईपर्यंत रेल्वे वाहतूक थांबवणे, वळवणे किंवा नियंत्रित करण्याची तातडीची गरज असल्याबाबत पथकाने अहवाल देणे आवश्यक आहे. हा संयुक्त पाहणीचा अहवाल आणि शिफारशी दि. 25 सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे.

सदर आदेशानुसार रेल्वेसाठी निर्देश देण्यात आले आहे. यात संयुक्त पाहणीमधील शिफारशीनुसार रेल्वे वाहतूक थांबवणे, वळवणे किंवा नियंत्रित करणे, पुलाचे गर्डर्स आणि सुपरस्ट्रक्चर नियंत्रित आणि सुरक्षित पद्धतीने पाडण्यासाठी कृती आराखडा तयार करून तो 25 सप्टेंबर 2025 पर्यंत सादर करणे, पुलाचे काम होईपर्यंत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व गाड्यांना वेगमर्यादा लागू करणे, संरचनेतील कोणत्याही बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी पूर्ण वेळ देखरेख कर्मचाऱ्याची नेमणूक करणे, वास्तविक-वेळ निरीक्षण प्रणालीमध्ये टिल्ट मीटर्स आणि क्रॅक प्रोपगेशन गेज स्थापित करणे, तसेच आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास आवश्यक उपकरणे आणि पथके तयार ठेवण्याचे निर्देश विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागपूर आणि भुसावळ रेल्वे विभागाला देण्यात आले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाला रेल्वे रुळाखालील बेलपुराकडे जाणारा समांतर रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याबाबत खातरजमा करावी आणि त्याची तपासणी करून प्रमाणपत्र देणे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सूचना फलक आणि इतर उपाययोजना करावी, तसेच आदेशाचे तात्काळ पालन झाले नसल्यास राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

0000000

जिल्ह्यात ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत परीक्षा संपन्न

जिल्ह्यातील 7 हजाराच्यावर नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींचा सहभाग

            अमरावती, दि. 24 ( जिमाका): केंद्र पुरस्कृत ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) नुकतीच जिल्ह्यामध्ये उत्साहात पार पडली. या परीक्षेत जिल्ह्यातील 7,784 नोंदणीकृत असाक्षरांपैकी 7,338 व्यक्तींनी सहभाग घेतला.

            केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, 2022-23 ते 2026-27  या कालावधीत असाक्षरांना साक्षर करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जात आहे. ही चाचणी मराठी, उर्दू, आणि हिंदी माध्यमांतून युडायस प्राप्त शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून प्रमाणपत्र व गुणपत्रक एकत्रित देण्यात येईल. ही चाचणी केवळ साक्षरता तपासणारी नसून, त्यातून व्यक्तींच्या जीवनात आर्थिक, कायदेविषयक, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य आणि कुटुंब कल्याण यांसारख्या जीवनकौशल्यांचा विकास होण्यास मदत होणार आहे.

परीक्षेचे कामकाज यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक), प्राचार्य (डायट), गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.  तसेच, सर्व शिक्षक संघटना, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी परीक्षा नियोजन केले. शिक्षणाधिकारी (योजना) तथा नवभारत साक्षरता कार्यक्रम सदस्य सचिव निखिल मानकर यांनी सर्व परीक्षार्थींचे अभिनंदन केले.

00000

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

अमरावती, दि. 24 (जिमाका): आगामी अमरावती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा सविस्तर कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. भारत निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 रोजी जाहीर केलेल्या विधानसभा मतदार यादीच्या आधारे ही कार्यवाही करण्यात येणार आहे.

 जिल्ह्यातील 59 निवडणूक विभाग आणि 118 निर्वाचक गणांसाठी मतदार यादीचे विभाजन करून पुढीलप्रमाणे कार्यक्रम राबविण्यात येईल.

 निवडणूक विभागनिहाय आणि निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी दि. 8 ऑक्टोबर 2025 प्रसिद्ध केली जाईल.

 मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दि. 8 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार असून दि. 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत राहणार आहे.

 सर्व हरकती व सूचनांचा विचार करून, दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम व अधिप्रमाणित मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

             मतदान केंद्रांची आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी  प्रसिद्ध केली जाईल.

या कार्यक्रमानुसार, सर्व प्रशासकीय यंत्रणांनी वेळेत कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगामार्फत देण्यात  आल्या आहेत.

000000

कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग असणे गरजेचे

*’जागर महिला आरोग्याचा’ मध्ये कायदेतज्ज्ञ डॉ. वर्षा देशमुख व डॉ. अनिरुद्ध पाटील यांचे मार्गदर्शन

      अमरावती, दि. 24 (जिमाका): अहिल्यादेवी होळकर यांच्या तिनशेव्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशानातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली  नवरात्रोत्सवात महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन आणि तपासणी शिबिर घेण्यात येत आहे. आज या शिबिरामध्ये महिलांना कायदेविषयक बाबींबाबत माहिती देण्यात आली. 'महिला आणि कायदा ' या विषयावर कायदेतज्ज्ञ डॉ.  वर्षा देशमुख यांनी तर 'महिला सबलीकरण' या विषयावर  डॉ.अनिरुद्ध पाटील यांनी  मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रद्धा उदावंत, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा खणिकर्म अधिकारी प्रणिता चाफले, नायब तहसीलदार स्नेहल देशमुख, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा आदी उपस्थित होते.

              जिल्हा नियोजन सभागृहात जागर महिला आरोग्याचा उपक्रमामध्ये राबविण्यात येत आहे. यात कायदेविषयक मार्गदर्शन करतांना डॉ . वर्षा देशमुख म्हणाल्या, स्त्रियांचे सक्षमीकरण म्हणजे नुसता हक्क नसून कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे. बरेचदा स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या असून देखील घरातील निर्णय पुरुषप्रधान संस्कृतीमुळे पुरुष घेतात. यामुळे उच्चशिक्षित स्त्री ही सक्षम झाली आहे, असे म्हणता येणार नाही. तिला घरातील महत्त्वपूर्ण बाबींचा निर्णय घेण्याचा हक्क असणे गरजेचे आहे. तेव्हा स्त्री खऱ्या अर्थाने सक्षम होईल. स्त्रियांच्या संरक्षणासाठी शासनाने सर्व आवश्यक कायदे केलेले आहेत. परंतु या कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी स्त्रियांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.  प्रत्येक आईने आपल्या मुलाला अन्य मुलीचा आदर करायला शिकवायला हवे.  हे बाळकडू मुलांना घरातून मिळायला हवे, तेव्हाच सशक्त समाज तयार होईल.

            कार्यालयीन कामकाज करताना काही तक्रार असल्यास विशाखा समितीचा वापर करावा. कोणत्याही अन्यायविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कायदे आहे. महिलांनी कायद्याबाबत साक्षरता बाळगावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            डॉ.अनिरुद्ध पाटील म्हणाले, स्त्री पुरुष समानता ही केवळ कागदोपत्री नसावी. आज स्त्री तिच्या कर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. स्त्रियांना संधी उपलब्ध करून दिल्यास त्या नक्कीच यशस्वी होतात. मुलांप्रमाणे मुलींनाही प्रगतीसाठी वेळ द्यायला हवा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. स्त्री हक्क अबाधित राहावा यासाठी शासन विविध उपक्रम राबवित असतात. याबाबत समाजात सातत्याने जागृती निर्माण केल्या जाते. परंतु त्या कायद्याचा गैरवापर होणार नाही यासाठी प्रत्येक व्यक्तीने नैतिकता बाळगावी. आपल्यावर  होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी स्त्रियांनी स्वतः पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.

            कार्यक्रमाचे संचालन चैताली यादव यांनी तर आभार श्रीमती गांवडे यांनी मानले.  

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...