Wednesday, February 4, 2026

DIO NEWS AMRAVATI 04-02-2026

                                             हरीसाल आरोग्य केंद्राच्या पथकाकडून मातेला जीवनदान

*प्रसूतीनंतरचा गंभीर रक्तस्त्राव रोखण्यात यश

अमरावती, दि. 04 (जिमाका): प्राथमिक आरोग्य केंद्र, हरीसाल येथील वैद्यकीय पथकाने दाखवलेली तत्परता आणि समन्वयामुळे एका मातेचे प्राण वाचले आहेत. प्रसूतीनंतर अचानक सुरू झालेला अतिरक्तस्त्राव पीपीएच नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांनी या महिलेला मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढले आहे.

            सोसोखेडा उपकेंद्रातील नांदुरी येथील सुशीला सावलकर, वय 28 वर्षे यांना प्रसूतीसाठी 1 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1.10 वाजता हरीसाल आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. कर्तव्यावर असलेल्या आरोग्य सेविका सोनिया कंडुलना यांनी तातडीने तपासणी केली  असता, प्रसूतीची वेळ जवळ असल्याचे लक्षात आले. डॉ. मोनिका कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने प्रसूती प्रक्रीया पार पाडली आणि अवघ्या 5 मिनिटांत म्हणजेच 1.15 वाजता महिलेने एका गोंडस कन्येला जन्म दिला.

            अचानक ओढवलेल्या प्रसूतीनंतर काही वेळातच मातेची प्रकृती खालावली आणि तिला प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाला. अतिरक्तस्त्रावामुळे रक्तदाब कमी होवून रूग्ण धापा टाकू लागला. ही स्थिती मातेच्या जीवासाठी अत्यंत धोकादायक होती.

            परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आरोग्य सेविका मंगला बोरकर आणि सुनिता खेडकर यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. संपूर्ण टीमने एकाच वेळी कामाला सुरवात केली. दोन्ही हातातून जीवनरक्षक औषधे आणि सलाईन वेगाने सुरू करण्यात आले. गर्भाशयाचा मसाज करून रक्तस्त्राव थांबविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. रूग्णाच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून तिला तातडीने धारणी उपजिल्हा रूग्णालय येथे संदर्भीय सेवा देण्याची तयारी केली.

            पहाटे 4.25 वाजता रूग्णाला पुढील उपचारासाठी धारणी येथे पाठविण्यात आले. विशेष म्हणजे, रूग्णवाहिकेतील प्रवासादरम्यानही आरोग्य सेविका सोनिया कंडुलना यांनी रक्तस्त्राव नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली. वेळेवर घेतलेला अचूक निर्णय आणि आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे  सुशीला सावलकर यांना जीवनदान मिळाले आहे. या यशस्वी कामगिरीबद्यल डॉ. मोनिका कोकाटे, सोनिया कंडुलना, मंगला बोरकर आणि सुनीता खेडकर यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

00000

सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

अमरावती, दि. 04 (जिमाका): जागतिक कर्करोग दिनानिमित्त सुपर स्पेशालिटी रुग्णालयात विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा उद्देश कर्करोगाविषयी जनजागृती करणे तसेच लवकर निदान व योग्य उपचारांचे महत्त्व रुग्ण व वैद्यकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा होता.

 

या कार्यक्रमात प्रसिद्ध कैंसर सर्जन डॉ. अतुल यादगिरे,  डॉ. रोहित मुंदडा , डॉ. माधुरी गाडेकर तसेच ऑन्को गायनॅकोलॉजिस्ट डॉ. भावना सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी कर्करोगाचे प्रकार, त्याची लक्षणे, प्रतिबंधक उपाययोजना आणि आधुनिक उपचारपद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली.

डॉ. अतुल यादगिरे यांनी कर्करोगाचे वेळेवर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात, असे नमूद केले. डॉ. रोहित मुंदडा यांनी बदलती जीवनशैली, तंबाखूचे सेवन व चुकीच्या आहारामुळे कर्करोगाचा धोका वाढत असल्याचे सांगितले. डॉ. माधुरी गाडेकर यांनी रक्तामधील कर्करोगांविषयी जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. तर डॉ. भावना सोनटक्के यांनी महिलांनी नियमित तपासणी करणे किती आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ आदित्य भागवत यांनी कीमोथेरेपी बद्दल मार्गदर्शन केले.

सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कर्करोग शस्त्रक्रिया मोफत होतात याबद्दल देखील माहिती देण्यात आली .

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाला उपस्थित डॉ आयुष हेडा , डॉ रणजित मांढवे, डॉ भूषण मुंदडा, डॉ अमित बागडिया, डॉ तृप्ती जवादे, डॉ सत्यम सत्यार्थ, डॉ मनीष नाथणकर, डॉ तेजश्री कीनखेडे, डॉ अलकेश गुल्हाने, डॉ किरण परिसे, डॉ ऐश्वर्या , डॉ अभिनव, डॉ स्नेहल चव्हाण, डॉ सपना गुप्ता, नर्सिंग स्टाफ मंगल मगरदे, ज्योती काळे, कविता बेरड, शालू केवाळे, नंदा टेटु, एनसीडी विभागातील दिनेश हिवराळे यांनी मार्गदर्शन केले.

00000





जलयुक्त शिवारच्या कामांचे त्रयस्त संस्थांकडून ऑडिट

अमरावती, दि. 4 (जिमाका) : महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’अंतर्गत जिल्ह्यातील विविध जलसंधारण कामांची गुणवत्ता आणि परिणामकारकतेची त्रयस्त संस्थेमार्फत तपासणी करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या कामांच्या मूल्यांकनासाठी दोन अभियांत्रिकी संस्थांची निवड केली असून, प्रत्यक्ष स्थळपाहणीला सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यात झालेल्या कामांचे निष्पक्ष मूल्यांकन व्हावे, यासाठी सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अमरावती आणि प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा या दोन संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थांचे तज्ज्ञ पथक जिल्ह्यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांचे ऑडिट करीत आहेत.

अभियानांतर्गत विविध शासकीय यंत्रणांमार्फत करण्यात आलेली कामे या मूल्यांकनाच्या कक्षेत आहेत. यात नाला खोलीकरण व रुंदीकरण, सिमेंट नाला बांध व त्यातील गाळ काढणे, विहीर पुनर्भरण व रिचार्ज शाफ्टची कामे, शेततळे, समतल चर आणि गॅबियन बंधारे, नदी पुनरुज्जीवन व खोलीकरणासह डोह निर्मिती यांचा समावेश आहे.

मूल्यांकन केवळ कामाची भौतिक स्थिती तपासण्यापुरते मर्यादित नसून, त्यात तांत्रिक बाबींना विशेष महत्त्व दिले जात आहे. यामध्ये मुख्यत्वे कामाची गुणवत्ता, कामाची भौतिक स्थिती. अभियानापूर्वीची भूजल स्थिती, अभियानानंतरची भूजल स्थिती, गाव जल परिपूर्ण झाले असल्याबाबत सविस्तर अहवाल शासनास सादर केला जाणार आहे, असे रोहयो उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी कळविले आहे.

00000000

योजनेच्या लाभार्थ्यांनी ह्यातीची नोंद घेण्याचे आवाहन

     अमरावती, दि. 04 (जिमाका) : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांनी 31 मार्चपर्यंत ह्यातीची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

      दरवर्षी 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत लाभार्थ्यांनी त्यांचे योजनेबाबतचे मासिक अनुदान ज्या बँक खाते, पोसट ऑफीसमध्ये जमा होते, अशा बँक मॅनेजर अथवा पोस्ट ऑफीसमध्ये पोस्ट मास्टर यांचे समक्ष हजर राहून स्वतः ह्यात असल्याची नोंद घ्यावी, अथवा विहीत नमुन्यात ह्यात असल्याची नोंद घेऊन मॅनेजर, पोस्टमास्टर यांच्या सही, शिक्का घ्यावा. सदर विहीत नमुना बॅंक, पोस्ट ऑफीस किंवा अमरावती तहसिल कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या तहसिलदार डॉ. प्रियंका मिसाळ यांनी केले आहे.

00000000

आज पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबिर

* आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधा

अमरावती, दि. 4 (जिमाका): पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी अमरावती जिल्हा पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवार, दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पत्रकार, प्रसारमाध्यम कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी शिबिर पूर्णतः मोफत असणार आहे.

या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना विविध तपासण्यांची सुविधा एकाच छताखाली मिळणार आहे. आरोग्यविषयक चाचण्यांमध्ये संपूर्ण रक्त तपासणीसाठी लिपीड टेस्ट, फुल बॉडी चेकअप, नेत्र तपासणी आणि दंत चिकित्सा यांचा समावेश आहे. याठिकाणी केवळ तपासणीच नाही, तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्याबाबत मार्गदर्शनही केले जाणार आहे. यासोबतच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिबिरात 'आयुष्मान कार्ड' काढण्याची विशेष सोय करण्यात आली आहे. यासाठी पत्रकारांनी आपले रेशन कार्ड, आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत आणणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या कुटुंबासह याचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी ९०२८६५५५५९, ९८२२४९६९७२ किंवा ९८८११०२०८० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

0000000

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

अमरावती, दि. 4 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवार, दि. 5 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्री. बावनकुळे यांचे सकाळी 11.30 वाजता अमरावती विमानतळावर आगमन होईल. दुपारी 12 ते 3.30 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात राखीव आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता अमरावती विमानतळावरून हेलिकॉप्टरने नागपूरकडे रवाना होतील.

000000




जिल्हाधिकाऱ्यांकडून चिया सिड उत्पादन, अन्नप्रक्रिया, मत्स्य व्यवसायाची पाहणी

*उत्पादनाच्या ब्रँडींगवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना

अमरावती, दि. 4 (जिमाका) : जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज भातकुली तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी चिया सिड उत्पादन, अन्नप्रक्रिया उद्योग आणि मत्स्य व्यवसाय प्रकल्पांना भेटी देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रकल्प उभारणीपासून ते होणाऱ्या फायद्याची माहिती घेतली.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी रामा, ता. भातकुली येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत अमोल पाठक यांनी उभारलेल्या दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योगाला भेट दिली. यावेळी त्‍यांनी प्रकल्प निर्मिती, उत्पादन क्षमता, विस्तार, प्रकल्पापासून होणारे फायदे याबाबत माहिती घेतली. खवा, पनीर या व्यतिरिक्त दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करावी, तसेच उद्योगाचा विस्तार करावा, उद्योगाला संस्थात्मक स्वरूप देऊन ब्रँडींगवर लक्ष देण्याची सूचना केली. तसेच शेतकऱ्यांना महाविस्तार - एआय मोबाईल अॅप्लीकेशनचा सक्रीय वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले

त्यानंतर टाकरखेडा, शंभु येथे आत्मा अंतर्गत 44 एकरमध्ये चिया सिडचे प्रात्यक्षिक राबविण्यात येत आहे. यातील योगेश देशमुख यांच्या दोन एकरवरील चिया सिड लागवडीची श्री. येरेकर यांनी पाहणी केली. सदर उत्पादनापासून शेतकऱ्यांना होणारे फायदे याबाबत त्यांनी माहिती घेतली. चिया सिड लागवडीबद्दल जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. प्रत्यक्ष उत्पादनानंतर झालेल्या लाभाची माहिती देण्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच कृषी मॅपर अॅपमध्ये पीक प्रात्यक्षिक तपशील माहिती ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच नांदगाव पेठ एमआयडीसीतील सावर्डी येथील ऑस्टेक प्रायव्हेट लिमिटेड या मत्स्य व्यवसाय प्रकल्पाची पाहणी केली.

या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, दादासाहेब दराडे, तहसीलदार विजय लोखंडे, अक्षय मंडवे, तालुका कृषी अधिकारी उत्कर्षा भोसले, प्रशांत गुल्हाने आदी उपस्थित होते.

000000



Tuesday, February 3, 2026

DIO NEWS AMRAVATI 03-02-2026

 शुक्रवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर

*'आयएफएस', 'आयपीएस' अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

अमरावती, दि. 3 (जिमाका) : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे शुक्रवार, दि. 6 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात विशेष स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नुकतेच यश संपादन केलेले दोन अधिकारी विद्यार्थ्यांना उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. 2022 बॅचचे भारतीय वन सेवेत निवड झालेले प्रांजल चोपडे आणि 2024 बॅचचे भारतीय पोलिस सेवेत निवड झालेले सागर भामरे मार्गदर्शन करणार आहेत. दोन्ही मार्गदर्शक अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे असून त्यांनी अत्यंत कमी वेळात यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेत यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव नवोदित विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.

जिल्हा प्रशासनाने हे शिबिर पूर्णतः विनामूल्य ठेवले असून, परीक्षेची रणनीती, अभ्यासाचे नियोजन आणि मुलाखतीची तयारी या विषयांवर शिबीरात सखोल चर्चा केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

00000

पत्रकारांसाठी गुरूवारी विशेष मोफत आरोग्य शिबिर

* आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधा

अमरावती, दि. 3 (जिमाका): पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी अमरावती जिल्हा पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवार, दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पत्रकार, प्रसारमाध्यम कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी शिबिर पूर्णतः मोफत असणार आहे.

या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना विविध तपासण्यांची सुविधा एकाच छताखाली मिळणार आहे. आरोग्यविषयक चाचण्यांमध्ये संपूर्ण रक्त तपासणीसाठी लिपीड टेस्ट, फुल बॉडी चेकअप, नेत्र तपासणी आणि दंत चिकित्सा यांचा समावेश आहे. याठिकाणी केवळ तपासणीच नाही, तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्याबाबत मार्गदर्शनही केले जाणार आहे. यासोबतच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिबिरात 'आयुष्मान कार्ड' काढण्याची विशेष सोय करण्यात आली आहे. यासाठी पत्रकारांनी आपले रेशन कार्ड, आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत आणणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या कुटुंबासह याचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी ९०२८६५५५५९, ९८२२४९६९७२ किंवा ९८८११०२०८० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

00000

ग्रामसेवकांसाठी 'जेंडर इक्वॅलिटी' प्रशिक्षण

अमरावती, दि. 3 (जिमाका) : महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे 'जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम' प्रकल्पांतर्गत ग्रामसेवकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण पार पडले. 'जेंडर सेन्सिटायझेशन' आणि 'जेंडर बजेटिंग' यावर हे प्रशिक्षण पार पडले.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांनी प्रशिक्षणाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस, विभागीय सल्लागार राजू इंगळे, पवन देशमुख, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखडे, साधन व्यक्ती. आनंद पवार आणि अकोलाचे जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे उपस्थित होते.

श्रीमती मोहपात्रा यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व सांगून ग्रामसेवकांनी 'जेंडर सेन्सिटायझेशन'साठी आपल्या कार्यक्षमतेचा वापर करावा, असे आवाहन केले. श्री. बायस यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीविषयी मार्गदर्शन केले.

डॉ. रंजन वानखडे यांनी प्रास्ताविक केले. राजू इंगळे यांनी माविमची पार्श्वभूमी सांगितली. आनंद पवार यांनी प्रशिक्षणाचा उद्देश आणि स्वरूप स्पष्ट केले. वर्षा खोब्रागडे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा समन्वय अधिकारी ऋषिकेश घ्यार यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी उपजीविका सल्लागार अभिजित काळमेघ यांनी सहकार्य केले.

00000

दहावी, बारावी परीक्षांसाठी ‘कॉपीमुक्त अभियान’

अमरावती, दि. 3 (जिमाका) : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हास्तरीय दक्षता समितीची सभा पार पडली. या सभेत या परीक्षा निकोप आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले.

या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिश मुघल, योजना शिक्षणाधिकारी सुरेश वाघमारे आदी उपस्थित होते.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ह्या दि. 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत करण्यात आल्या आहेत. दहावीच्या परीक्षेला 38,531 विद्यार्थी 187 केंद्रांवरून परीक्षा देणार आहेत. बारावीसाठी 35,934 विद्यार्थी 137 केंद्रांवरून परीक्षा देतील. परीक्षेच्या कामकाजासाठी एकूण 22 केंद्रे स्थापित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात पोलीस अधिनियम 37 (1) (3) लागू करण्यात आला आहे. केंद्राच्या 500 मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने परीक्षा कालावधीत बंद राहतील. सर्व केंद्रांवर हत्यारी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. मंडळाने जाहीर केलेल्या 'उपद्रवी' केंद्रांवर विशेष प्रभावी यंत्रणा राबविली जाईल.

परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीला विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, विद्यार्थ्यांनी केंद्रावर वेळेत पोहोचावे यासाठी परिवहन विभागाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

000000

शुक्रवारपर्यंत 'स्वाधार' योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी मुदत

अमरावती, दि. 03 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या, परंतु कागदपत्रांतील त्रुटींमुळे कार्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शुक्रवार, दि. 6 फेब्रुवारीपर्यंत त्रृटी पूर्ण कराव्यात, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

राज्य शासनाने शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अकरावी, बारावी, तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट आर्थिक मदत देण्यासाठी 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना' सुरू केली आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, त्यांच्यापैकी काही अर्ज कागदपत्रांतील कमतरतेमुळे कार्यालयात प्रलंबित आहेत. या प्रलंबित विद्यार्थ्यांची यादी कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आली आहे. कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना देऊनही अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप त्रुटी पूर्तता केलेली नाही, ज्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.

विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे प्रलंबित आहेत, त्यांनी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार आवश्यक कागदपत्रे कार्यालयात संबंधित शाखेकडे जमा करावीत. या मुदतीत त्रुटी पूर्ण केली नसल्यास, याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी, विद्यार्थ्यांची राहील. तसेच दि. 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत दुपारी 3 ते 5 यावेळेत स्वत: उपस्थित राहून त्रुटी पूर्तता करून घेणेसाठी कार्यशाळेचे आयोजन सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, अमरावती येथे करण्यात आले आहे.  याबाबत अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय किंवा दुरध्वनी क्र. ०७२१-२६६१२६१ वर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी केले आहे.

00000




निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांना सर्व सुविधा देणार

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 3 (जिमाका) : निम्न पेढी प्रकल्पात पाच गावांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. या मान्सून हंगामात प्रकल्पात पाणी साठविण्यास सुरूवात होणार आहे. त्यामुळे या गावातील स्थलांतरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित करण्यात येणाऱ्या ठिकाणी सर्व सुविधा देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

निम्न पेढी प्रकल्पातील पुनर्वसनाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रद्धा उदावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बयास यांच्यासह बाधित पाचही गावांचे सरपंच आणि सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या प्राधान्यक्रमातील निम्न पेढी प्रकल्पात हातुर्णा, गोपगव्हाण, कुंड खुर्द, अळणगाव, कुंड सर्जापूर ही पाच गावे बाधित होणार आहे. यासाठी या गावातील रहिवाशांचे स्थलांतर करण्यावर भर देण्यात येणार आहे. सध्यास्थितीमध्ये अळणगाव येथे 79 आणि कुंड सर्जापूर येथे 72 नागरीक वास्तव्यास आहेत. त्यामुळे या नागरिकांच्या स्थलांतरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पुनर्वसित गावात सहमती देऊन स्थलांतरीत झालेल्यांना प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत गावातील नागरिकांना स्थलांतरणासाठी भत्ता, घरकुल मंजूर करण्यात आले आहे. पुनर्वसित गावात नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

येत्या पावसाळ्यात प्रकल्पामध्ये पाणी साठणार असल्याने जुन्या गावातील नागरिक बाधित होणार आहे. यामुळे बाधित झाल्यानंतर त्यांचा बचाव करावा लागू नये, यासाठी पूर्व तयारी म्हणून आतापासून त्यांच्या स्थलांतरणासाठी प्रयत्न करावा. हातुर्णा येथे अंगणवाडीचे काम सुरू करण्यात आले आहे. गोपगव्हाण येथील पाणी पुरवठ्याची विजेची व्यवस्था सुरळीत राहावी, यासासाठी प्रयत्न करावेत. अळणगाव येथील स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढण्यात यावे. कुंड सर्जापूर प्रार्थनास्थळांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

00000

गुरूवारी पेंशन अदालतीचे आयोजन

अमरावती, दि. 03 (जिमाका) : नागपूर येथील महालेखापाल कार्यालय आणि कोषागार कार्यालयातर्फे पेंशन समाधान मोहिमेंतर्गत पेंशन अदालतीचे आयोजन गुरूवार, दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता कोषागार कार्यालयातील जिजाऊ सभागृहात करण्यात आले आहे.

यामध्ये निवृत्ती वेतनविषयक प्रणालीमध्ये निवृत्ती वेतन प्रस्ताव तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच दुपारी 2.30 वाजता सर्व निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना त्यांचे निवृत्ती वेतनाबाबत अडचणी असल्यास महालेखापाल यांचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. याची सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी, तसेच निवृत्ती वेतनधारक तथा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी उपस्थित राहून अडचणीचे निराकरण करावे, असे आवाहन कोषागार कार्यालयाचे सहायक संचालक अमोल इखे यांनी केले आहे.

00000000

वरुड परिक्षेत्रात वाघाचा मृत्यू

अमरावती, दि. 3 (जिमाका): अमरावती वनविभागांतर्गत येणाऱ्या वरुड वनपरिक्षेत्रात एक वाघ मृत अवस्थेत आढळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना वरुडमधील वाई वर्तुळ, पंढरी बीट येथील खंड क्रमांक 1010 मध्ये घडली असून, याबाबतची माहिती प्राप्त झाली आहे.

वाघाच्या मृत्यूची माहिती मिळताच वरुड येथील पशुधन अधिकारी यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासणीनुसार, या वाघाचा मृत्यू साधारणतः 15 दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मृत वाघाचे शवविच्छेदन 'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण'च्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आले. त्यानंतर, संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळीच वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या कार्यवाही दरम्यान वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी, डॉग स्कॉड, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि मानद वन्यजीव रक्षक उपस्थित होते.

सदर प्रकरणाचा तपास वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार केला जात आहे, अशी माहिती अमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन के. आर. यांनी दिली.

00000

Monday, February 2, 2026

DIO NEWS AMRAVATI 02-02-2026



                                 ‘ट्रॅक ॲण्ड ट्रेल’च्या माध्यमातून मेळघाटातील पर्यटनाचा विकास

जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 2 (जिमाका): मेळघाटमध्ये निसर्ग सौदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक येतात. याठिकाणी असलेल्या पर्यटनस्थळाशिवाय त्यांना जंगलातील भ्रमंती आणि निसर्गाशी एकरूप होण्याची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी ट्रॅक आणि ट्रेलसाठी मार्ग शोधण्यात येतील, यातून मेळघाटातील पर्यटनाचा विकास साधण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

मेळघाटातील पर्यटनाबाबत मेळघाट ॲडव्हेंचर क्लबने जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण केले. विदर्भातील वन पर्यटनामध्ये मेळघाट हा उत्तम पर्याय आहे. याठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटनस्थळांच्या विकासासोबतच पर्यटनाचे विविध पर्याय देणे आवश्यक आहे. जंगल सफारी, साहसी पर्यटन यासह जंगल भ्रमंती हा पर्यायही देणे आवश्यक आहे. यासाठी वन विभागाने पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन ट्रेकिंगसाठी मार्ग निवडावेत. आवश्यकता पडल्यास याठिकाणी स्वतंत्र गेट उभारण्यात यावे. याप्रकारचे पर्याय दिल्यास पर्यटक मेळघाटात थांबण्यास तयार होतील.

मेळघाटातील पर्यटनाबाबत युवकांना लक्ष ठेऊन समाजमाध्यमांवरून प्रसिद्धी करावी. यामुळे मेळघाटबाबत माहिती होण्यास मदत मिळणार आहे. शालेय विद्यार्थी आणि समूहाने येणारे पर्यटकांवर लक्ष केंद्रीत करावे. त्यांच्यासाठी निवास, फिरणे आणि जेवणाची उत्तम व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था उत्तम दर्जाची असावी. याठिकाणी स्वच्छता आणि निटनेटकेपणा असणे आवश्यक आहे. सेमाडोह आणि कोलकास येथे राहण्याची व्यवस्था आहे. याठिकाणांची देखभाल, दुरूस्ती सातत्याने करावी. इतर ठिकाणी टेंटमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येते. हा पर्याययही तपासून पाहण्यात यावा. आमझरी येथे साहसी खेळाची सोय करण्यात आली आहे. येथेही पर्यटक येतील, याचे नियोजन करावे.

सुविधा आणि सवलती दिल्यास त्यांचा मेळघाटातील पर्यटनाकडे कल वाढू शकेल. यासाठी पर्यटनाचे क्षेत्र विस्तारण्याची गरज आहे. धबधबे, ऐतिहासिक वास्तू ही केंद्र ठरवून पर्यटकांना त्याठिकाणी पायी नेण्यासाठी मार्ग तयार करण्यात यावे. या वाटेत नाश्ता, जेवण आदी व्यवस्था झाल्यास पर्यटकांसाठी एक चांगली सुविधा निर्माण होऊ शकेल. वन विभागाने पर्यटकांना राहण्याच्या व्यवस्थेसोबतच जंगल भ्रमंतीसाठी रस्ता शोधावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.

000000

एमडी ड्रग्सबाबत कारवाई करावी

जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 2 (जिमाका): महसूल गुप्तचर संचालनालयाने पाच किलो एमडी ड्रग्स पकडून कार्यवाही केली आहे. शहराच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे. अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत प्रामुख्याने युवकांमध्ये जनजागृती करावी, तसेच स्थानिक पोलिस यंत्रणांनी संपर्क वाढवून एमडी ड्रग्सबाबत कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर जिल्हास्तरीय समितीची मासिक सभा पार पडली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखेडे यांनी अंमली पदार्थाबाबत माहिती दिली. अंमली पदार्थाबाबत प्रामुख्याने किशोरवयीन मुले लक्ष्य होत असल्याने त्यांच्यामध्ये जनजागृतीसाठी व्याख्याने आयोजित करण्यात यावे. येत्या 15 दिवसात समाज कल्याणमधील सर्व वसतिगृहे आणि शाळांमध्ये ही व्याख्याने आयोजित करण्यात यावीत. आऊटरिच कार्यक्रम राबवून समाजात जनजागृती करण्यात यावी. यासाठी एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. 'नशामुक्त भारत, खुशहाल भारत' या टॅगलाईनला अनुसरून व्यापक जनजागृती करावी.

अंमली पदार्थामुळे समाजावर दुष्परिणाम होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी संपर्क वाढवून सातत्याने कारवाई करावी. अमरावती येथील कारवाईच्या अनुषंगाने पोलिसांनी बंद घरे, फ्लॅट यांच्यावर निगराणी ठेऊन गोपनीय पोलिस यंत्रणा सतर्क करावी. आवश्यकता पडल्यास अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई प्रस्तावित करावी. तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाने रासायनिक कारखान्यांमध्ये अंमली पदार्थांचे उत्पादन होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रामख्याने औद्योगिक परिसरातील बंद कारखान्यात अंमली पदार्थांची निर्मिती होत असल्याचे काही ठिकाणी लक्षात आल्याने अशा परिसरावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिल्या.

00000

सण उत्सव कालावधीत शहरात कलम 38 लागू

अमरावती, दि. 02 (जिमाका): जिल्ह्यात आगामी काळात सण, उत्सव साजरा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधिनियमांतर्गत शहरात कलम 38 लागू झाले आहे.

आगामी काळात विविध धर्मियांचे सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातील. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 38 नुसार सर्व ग्रामीण जिल्ह्यामध्ये परिसरातील व त्यांच्यावरील अधिकाऱ्यांना (पोलीस आयुक्तलांचे क्षेत्र वगळून) आजपासून, दि.   2 फेब्रवारी  ते 31 डिसेंबर 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत अधिकार प्रदान करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण विशाल आनंद  यांनी दिले आहे.

रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे, उपासनास्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळ्याचा संभव असेल तर अडथळा होऊ न देणे, सर्व मिरवणूकाच्या व जमावाच्या प्रसंगी व पूजा-अर्चा या ठिकाणी कोणताही रस्ता किंवा अडथळा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा न होवू देण्यासाठी याठिकाणी बंदोबस्त ठेवणे, सर्व रस्त्यांवर किंवा रस्त्यात, इतर सर्व सार्वजनिक किंवा लोकांच्या येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त राहण्यासाठी, वाद्यांबाबत नियम व नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत.

000000




शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘पीसीबी डिझायनिंग’वर कार्यशाळा संपन्न

अमरावती, दि. 2 (जिमाका):  इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी क्षेत्रात पीसीबीचे व्यावहारिक प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता, वास्तविक जगातील इलेक्ट्रॉनिक उत्पादने कशी बनतात हे समजण्यास मदत करते. हीच गरज ओळखून येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे नुकतेच 'पीसीबी डिझायनिंग' या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

स्मार्टफोनपासून ते वैद्यकीय उपकरणांपर्यंत सर्व गॅझेट्समध्ये पीसीबी हा त्यांचा पाया असतो. या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना पीसीबी बोर्डसाठी आवश्यक मूलभूत साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स घटक आणि त्यांची वैशिष्ट्ये, तसेच आधुनिक सॉफ्टवेअरमध्ये स्किमॅटिक आणि लेआउट डिझाइन करण्याची सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना तांत्रिक संकल्पनांवर आधारित 'हँड्स-ऑन' ट्रेनिंगही देण्यात आले. या उपक्रमात तृतीय वर्षातील ७० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या सॉफ्टवेअरवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळविली. विभागप्रमुख पी. आर. देशमुख यांनी या प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थी उद्योगांच्या गरजांनुसार तयार होतात. आजच्या काळात ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस आणि दूरसंचार क्षेत्रात कुशल पीसीबी डिझायनर्सना मोठी मागणी आहे.

0000000

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत तालुकास्तरावरील जनता दरबाराचे वेळापत्रक जाहीर

अमरावती, दि. 02 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आणि प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हे जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान  नागरिकांची जमीन मोजणी, नगर भूमापन, एकत्रिकरण याबाबत समस्या सोडविणार आहेत. तसेच या  कार्यालयाचे अधिनस्त असलेल्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधित दिवशी उपस्थित राहतील.

या जाहीर वेळापत्रकानुसार, 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते 1:30 या वेळेत चांदुर रेल्वे आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत तिवसा उपअधीक्षक कार्यालयात ते भेट देतील. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता नांदगांव खंडेश्वर आणि दुपारी 3 वाजता धामणगांव रेल्वे येथे दौरा नियोजित आहे. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत अमरावती मुख्यालय आणि दुपारी 3 ते 6 दरम्यान भातकुली उपअधीक्षक कार्यालयात आढावा घेतला जाईल.

दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात, 12 फेब्रुवारी रोजी सकाळी मोर्शी आणि दुपारी वरूड येथे, तर 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता चांदुर बाजार आणि दुपारी  3 वाजता अचलपूर येथे जिल्हा अधीक्षक उपस्थित राहतील. 16 फेब्रुवारी रोजी दर्यापूर सकाळी 10 वाजता आणि अंजनगांव येथे दुपारी 3 वाजता नागरिेांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल. दौऱ्याचा समारोप 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत चिखलदरा आणि 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत धारणी उपअधीक्षक कार्यालयातील भेटीने होईल. जनतेच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख महेंद्रकुमार शिंदे यांनी केले आहे.

00000

'पालवी' जिल्हास्तरीय प्रकल्पाचा प्रारंभ

अमरावती, दि. 02 (जिमाका): जिल्ह्यातील अंगणवाड्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा परिषद, आणि 'क्वेस्ट' संस्थेच्या वतीने 'पालवी'  या जिल्हास्तरीय प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. नुकतेच या तीन वर्षांच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. या प्रकल्पास टाटा ट्रस्ट आणि मोटिवेशन फॉर एक्सलन्स यांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे.

या प्रकल्पाचे स्वरूप त्रिसूत्रीवर आधारित आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील सर्व अंगणवाडी सेविकांना सहा-स्तरीय विशेष प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कामात ऑनसाइट सपोर्ट दिला जाणार आहे. दुसऱ्या महत्त्वाच्या घटकांतर्गत धारणी आणि चिखलदरा या आदिवासी पट्ट्यात 'बहुभाषिक शिक्षण' राबविले जाईल. यात कोरकू भाषिक मुलांच्या घरच्या भाषेचा वापर करून त्यांना मराठी माध्यमात शिकण्यास सक्षम केले जाणार आहे. तिसऱ्या घटकात तिवसा तालुक्यातील 75 शाळांमध्ये इयत्ता पहिली व दुसरीसाठी 'पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान' उपक्रम राबवण्यात येणार आहे.

उद्घाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी या प्रकल्पाला प्रशासकीय स्तरावर पूर्ण पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. त्या म्हणाल्या, अंगणवाडी ते प्राथमिक शाळा असा सलग शिक्षणप्रवाह निर्माण होणे गरजेचे आहे. या अंतर्गत 188 मॉडेल अंगणवाड्या विकसित केल्या जाणार असून, ग्रामपंचायतींच्या मदतीने भौतिक सुविधा आणि शैक्षणिक साहित्य पुरवले जाईल.

यावेळी 'गोष्टरंग' टीमने सादर केलेल्या नाटकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाला विलास मरसाळे, नितीन विशे, मिताली थत्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

0000000

 

धारणीत 8 फेब्रुवारीला विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा

अमरावती, दि. 02 (जिमाका): मेळघाटातील दुर्गम आणि वंचित भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना विविध शासकीय योजनांशी जोडण्यासाठी येत्या 8 फेब्रुवारी 2026 रोजी धारणी येथे 'विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा' आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा (मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात पार पडणार आहे. या महामेळाव्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर आणि अमरावती जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती प्रविण पाटील यांची उपस्थित राहतील.

या महामेळाव्याचा मुख्य उद्देश समाजातील दुर्बल घटक, कामगार, दिव्यांग आणि महिलांना विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनांची माहिती देणे आणि त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हा आहे. शिबिरामध्ये तज्ज्ञ कायदेतज्ज्ञांमार्फत मोफत कायदेशीर सल्ला दिला जाईल, तसेच नागरिकांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कायदेशीर सक्षमीकरण करण्यात येईल. या ठिकाणी विविध शासकीय विभाग आणि स्वयंसेवी संस्थांचे स्टॉल्स उपलब्ध राहणार असून, पात्र लाभार्थ्यांना जागेवरच योजनांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे.

000000


जिल्ह्यात ‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र’ अभियानाचा शुभारंभ

अमरावती, दि. 02 (जिमाका): कुष्ठरोग हा शाप नसून तो एक उपचारसाध्य आजार आहे, हा संदेश जनमानसांत रुजवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या उपस्थितीत 'स्पर्श' कुष्ठरोग जनजागृती आणि 'कुसुम' कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र अंजनगाव बारी (ता. अमरावती) येथे नुकताच हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुष्ठरोग निवारणाची सामुहिक शपथ घेतली.

     श्रीमती महापात्र यांनी स्वतः अंजनगाव बारी परिसरातील वीटभट्ट्यांवर जाऊन तेथील कामगारांशी संवाद साधला. त्यांनी तपासणीसह कुष्ठरोगाची लक्षणे ओळखण्याबाबत कामगारांचे समुपदेशन केले. कुष्ठरुग्णांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे आणि त्यांच्याबद्दलची अंधश्रद्धा दूर व्हावी, हा या 'स्पर्श' अभियानाचा मुख्य उद्देश आहे. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या पंधरवड्यामध्ये जिल्हाभरात विविध उपक्रम राबवून या आजाराविषयी शास्त्रोक्त माहितीचा प्रसार केला जाणार आहे.

            या आजारावरील'बहुविध औषधोपचार' सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत उपलब्ध आहे. वेळेवर उपचार घेतल्यास कुष्ठरोगामुळे येणारी शारीरिक विकृती पूर्णपणे टाळता येते. कुष्ठरुग्णांना संविधानाने दिलेला समानतेचा अधिकार मिळवून देणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणे हे समाजाचे कर्तव्य आहे. या कार्यक्रमाला सहायक संचालक डॉ. पूनम मोहोकार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा निंबाळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रिकुंजय केचे, डॉ. रसिका धर्मे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. ‘भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया’ असे आवाहन कीत हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

0000000

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आह...