हरीसाल आरोग्य केंद्राच्या पथकाकडून मातेला जीवनदान
*प्रसूतीनंतरचा गंभीर रक्तस्त्राव रोखण्यात यश
अमरावती, दि. 04 (जिमाका): प्राथमिक आरोग्य केंद्र, हरीसाल येथील वैद्यकीय पथकाने दाखवलेली तत्परता आणि समन्वयामुळे एका मातेचे प्राण वाचले आहेत. प्रसूतीनंतर अचानक सुरू झालेला अतिरक्तस्त्राव पीपीएच नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांनी या महिलेला मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढले आहे.
सोसोखेडा उपकेंद्रातील नांदुरी येथील सुशीला सावलकर, वय 28 वर्षे यांना प्रसूतीसाठी 1 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1.10 वाजता हरीसाल आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. कर्तव्यावर असलेल्या आरोग्य सेविका सोनिया कंडुलना यांनी तातडीने तपासणी केली असता, प्रसूतीची वेळ जवळ असल्याचे लक्षात आले. डॉ. मोनिका कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने प्रसूती प्रक्रीया पार पाडली आणि अवघ्या 5 मिनिटांत म्हणजेच 1.15 वाजता महिलेने एका गोंडस कन्येला जन्म दिला.
अचानक ओढवलेल्या प्रसूतीनंतर काही वेळातच मातेची प्रकृती खालावली आणि तिला प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाला. अतिरक्तस्त्रावामुळे रक्तदाब कमी होवून रूग्ण धापा टाकू लागला. ही स्थिती मातेच्या जीवासाठी अत्यंत धोकादायक होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आरोग्य सेविका मंगला बोरकर आणि सुनिता खेडकर यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. संपूर्ण टीमने एकाच वेळी कामाला सुरवात केली. दोन्ही हातातून जीवनरक्षक औषधे आणि सलाईन वेगाने सुरू करण्यात आले. गर्भाशयाचा मसाज करून रक्तस्त्राव थांबविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. रूग्णाच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून तिला तातडीने धारणी उपजिल्हा रूग्णालय येथे संदर्भीय सेवा देण्याची तयारी केली.
पहाटे 4.25 वाजता रूग्णाला पुढील उपचारासाठी धारणी येथे पाठविण्यात आले. विशेष म्हणजे, रूग्णवाहिकेतील प्रवासादरम्यानही आरोग्य सेविका सोनिया कंडुलना यांनी रक्तस्त्राव नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली. वेळेवर घेतलेला अचूक निर्णय आणि आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे सुशीला सावलकर यांना जीवनदान मिळाले आहे. या यशस्वी कामगिरीबद्यल डॉ. मोनिका कोकाटे, सोनिया कंडुलना, मंगला बोरकर आणि सुनीता खेडकर यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
00000
सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमअमरावती, दि. 04 (जिमाका): जागतिक कर्करोग दिनानिमित्त सुपर स्पेशालिटी रुग्णालयात विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा उद्देश कर्करोगाविषयी जनजागृती करणे तसेच लवकर निदान व योग्य उपचारांचे महत्त्व रुग्ण व वैद्यकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा होता.
या कार्यक्रमात प्रसिद्ध कैंसर सर्जन डॉ. अतुल यादगिरे, डॉ. रोहित मुंदडा , डॉ. माधुरी गाडेकर तसेच ऑन्को गायनॅकोलॉजिस्ट डॉ. भावना सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी कर्करोगाचे प्रकार, त्याची लक्षणे, प्रतिबंधक उपाययोजना आणि आधुनिक उपचारपद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली.
डॉ. अतुल यादगिरे यांनी कर्करोगाचे वेळेवर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात, असे नमूद केले. डॉ. रोहित मुंदडा यांनी बदलती जीवनशैली, तंबाखूचे सेवन व चुकीच्या आहारामुळे कर्करोगाचा धोका वाढत असल्याचे सांगितले. डॉ. माधुरी गाडेकर यांनी रक्तामधील कर्करोगांविषयी जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. तर डॉ. भावना सोनटक्के यांनी महिलांनी नियमित तपासणी करणे किती आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ आदित्य भागवत यांनी कीमोथेरेपी बद्दल मार्गदर्शन केले.
सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कर्करोग शस्त्रक्रिया मोफत होतात याबद्दल देखील माहिती देण्यात आली .
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला उपस्थित डॉ आयुष हेडा , डॉ रणजित मांढवे, डॉ भूषण मुंदडा, डॉ अमित बागडिया, डॉ तृप्ती जवादे, डॉ सत्यम सत्यार्थ, डॉ मनीष नाथणकर, डॉ तेजश्री कीनखेडे, डॉ अलकेश गुल्हाने, डॉ किरण परिसे, डॉ ऐश्वर्या , डॉ अभिनव, डॉ स्नेहल चव्हाण, डॉ सपना गुप्ता, नर्सिंग स्टाफ मंगल मगरदे, ज्योती काळे, कविता बेरड, शालू केवाळे, नंदा टेटु, एनसीडी विभागातील दिनेश हिवराळे यांनी मार्गदर्शन केले.
00000
जलयुक्त शिवारच्या कामांचे त्रयस्त संस्थांकडून ऑडिट
अमरावती, दि. 4 (जिमाका) : महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’अंतर्गत जिल्ह्यातील विविध जलसंधारण कामांची गुणवत्ता आणि परिणामकारकतेची त्रयस्त संस्थेमार्फत तपासणी करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या कामांच्या मूल्यांकनासाठी दोन अभियांत्रिकी संस्थांची निवड केली असून, प्रत्यक्ष स्थळपाहणीला सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात झालेल्या कामांचे निष्पक्ष मूल्यांकन व्हावे, यासाठी सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अमरावती आणि प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा या दोन संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थांचे तज्ज्ञ पथक जिल्ह्यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांचे ऑडिट करीत आहेत.
अभियानांतर्गत विविध शासकीय यंत्रणांमार्फत करण्यात आलेली कामे या मूल्यांकनाच्या कक्षेत आहेत. यात नाला खोलीकरण व रुंदीकरण, सिमेंट नाला बांध व त्यातील गाळ काढणे, विहीर पुनर्भरण व रिचार्ज शाफ्टची कामे, शेततळे, समतल चर आणि गॅबियन बंधारे, नदी पुनरुज्जीवन व खोलीकरणासह डोह निर्मिती यांचा समावेश आहे.
मूल्यांकन केवळ कामाची भौतिक स्थिती तपासण्यापुरते मर्यादित नसून, त्यात तांत्रिक बाबींना विशेष महत्त्व दिले जात आहे. यामध्ये मुख्यत्वे कामाची गुणवत्ता, कामाची भौतिक स्थिती. अभियानापूर्वीची भूजल स्थिती, अभियानानंतरची भूजल स्थिती, गाव जल परिपूर्ण झाले असल्याबाबत सविस्तर अहवाल शासनास सादर केला जाणार आहे, असे रोहयो उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी कळविले आहे.
00000000
योजनेच्या लाभार्थ्यांनी ह्यातीची नोंद घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 04 (जिमाका) : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांनी 31 मार्चपर्यंत ह्यातीची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरवर्षी 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत लाभार्थ्यांनी त्यांचे योजनेबाबतचे मासिक अनुदान ज्या बँक खाते, पोसट ऑफीसमध्ये जमा होते, अशा बँक मॅनेजर अथवा पोस्ट ऑफीसमध्ये पोस्ट मास्टर यांचे समक्ष हजर राहून स्वतः ह्यात असल्याची नोंद घ्यावी, अथवा विहीत नमुन्यात ह्यात असल्याची नोंद घेऊन मॅनेजर, पोस्टमास्टर यांच्या सही, शिक्का घ्यावा. सदर विहीत नमुना बॅंक, पोस्ट ऑफीस किंवा अमरावती तहसिल कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या तहसिलदार डॉ. प्रियंका मिसाळ यांनी केले आहे.
00000000
आज पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबिर
* आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधा
अमरावती, दि. 4 (जिमाका): पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी अमरावती जिल्हा पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवार, दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पत्रकार, प्रसारमाध्यम कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी शिबिर पूर्णतः मोफत असणार आहे.
या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना विविध तपासण्यांची सुविधा एकाच छताखाली मिळणार आहे. आरोग्यविषयक चाचण्यांमध्ये संपूर्ण रक्त तपासणीसाठी लिपीड टेस्ट, फुल बॉडी चेकअप, नेत्र तपासणी आणि दंत चिकित्सा यांचा समावेश आहे. याठिकाणी केवळ तपासणीच नाही, तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्याबाबत मार्गदर्शनही केले जाणार आहे. यासोबतच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिबिरात 'आयुष्मान कार्ड' काढण्याची विशेष सोय करण्यात आली आहे. यासाठी पत्रकारांनी आपले रेशन कार्ड, आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत आणणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या कुटुंबासह याचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी ९०२८६५५५५९, ९८२२४९६९७२ किंवा ९८८११०२०८० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
0000000
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौराअमरावती, दि. 4 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवार, दि. 5 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यानुसार, श्री. बावनकुळे यांचे सकाळी 11.30 वाजता अमरावती विमानतळावर आगमन होईल. दुपारी 12 ते 3.30 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात राखीव आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता अमरावती विमानतळावरून हेलिकॉप्टरने नागपूरकडे रवाना होतील.
000000
जिल्हाधिकाऱ्यांकडून चिया सिड उत्पादन, अन्नप्रक्रिया, मत्स्य व्यवसायाची पाहणी
*उत्पादनाच्या ब्रँडींगवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना
अमरावती, दि. 4 (जिमाका) : जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज भातकुली तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी चिया सिड उत्पादन, अन्नप्रक्रिया उद्योग आणि मत्स्य व्यवसाय प्रकल्पांना भेटी देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रकल्प उभारणीपासून ते होणाऱ्या फायद्याची माहिती घेतली.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी रामा, ता. भातकुली येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत अमोल पाठक यांनी उभारलेल्या दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योगाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रकल्प निर्मिती, उत्पादन क्षमता, विस्तार, प्रकल्पापासून होणारे फायदे याबाबत माहिती घेतली. खवा, पनीर या व्यतिरिक्त दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करावी, तसेच उद्योगाचा विस्तार करावा, उद्योगाला संस्थात्मक स्वरूप देऊन ब्रँडींगवर लक्ष देण्याची सूचना केली. तसेच शेतकऱ्यांना महाविस्तार - एआय मोबाईल अॅप्लीकेशनचा सक्रीय वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले
त्यानंतर टाकरखेडा, शंभु येथे आत्मा अंतर्गत 44 एकरमध्ये चिया सिडचे प्रात्यक्षिक राबविण्यात येत आहे. यातील योगेश देशमुख यांच्या दोन एकरवरील चिया सिड लागवडीची श्री. येरेकर यांनी पाहणी केली. सदर उत्पादनापासून शेतकऱ्यांना होणारे फायदे याबाबत त्यांनी माहिती घेतली. चिया सिड लागवडीबद्दल जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. प्रत्यक्ष उत्पादनानंतर झालेल्या लाभाची माहिती देण्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच कृषी मॅपर अॅपमध्ये पीक प्रात्यक्षिक तपशील माहिती ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच नांदगाव पेठ एमआयडीसीतील सावर्डी येथील ऑस्टेक प्रायव्हेट लिमिटेड या मत्स्य व्यवसाय प्रकल्पाची पाहणी केली.
या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, दादासाहेब दराडे, तहसीलदार विजय लोखंडे, अक्षय मंडवे, तालुका कृषी अधिकारी उत्कर्षा भोसले, प्रशांत गुल्हाने आदी उपस्थित होते.
000000

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)


.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment