उर्ध्व वर्धा कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न;
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची पाणी आरक्षणास मंजुरी
अमरावती, दि. 13 (जिमाका): जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समिती व पाणी आरक्षणाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सन 2025-26 या वर्षासाठी उर्ध्व वर्धा प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाणी आवर्तनाचे नियोजन आणि बिगर सिंचन पाणी आरक्षणाबाबत चर्चा करून विविध निर्णयांना मंजुरी देण्यात आली.
उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे लाभक्षेत्र अमरावती आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यांत असून, प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या दोन्ही कालव्यांमधून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अधीक्षक अभियंता मनीष राजभोज यांनी बैठकीत माहिती दिली की, रब्बी हंगाम 2025-26 साठी एकूण 31 हजार हेक्टर सिंचन क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत या दोन्ही कालव्यांद्वारे 3 पाणी पाळ्यांची आवर्तने पूर्ण झाली असून, त्यातून 10 हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन झाले आहे. उर्वरित 2 आवर्तने मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, जलसंपदा व कृषी विभागाने समन्वय साधून उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी यावेळी दिले.
या बैठकीत सन 2025-26 या वर्षासाठी बिगर सिंचन पाणी आरक्षणासही मंजुरी प्रदान करण्यात आली. यामध्ये पिण्यासाठी 61.911 दलघमी, औष्णिक वीज केंद्रासाठी 25.000 दलघमी आणि संभाव्य औद्योगिक पाणीपुरवठ्यासाठी 2.50 दलघमी असे एकूण 89.411 दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. बिगर सिंचन ग्राहक पाणीपुरवठा योजनेची थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, संबंधित यंत्रणांनी मार्च 2026 पूर्वी ही थकबाकी वसूल करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीला दूरदृष्य प्रणालीद्वारे विधानपरिषद सदस्य दादारावजी केचे उपस्थित होते. सर्व लाभधारकांना विहित वेळेत पाणी पोहोचण्याबाबत नियोजन करण्याचे त्यांनी निर्देश दिले. बैठकीस उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत, जिल्हा कृषी अधिकारी राहुल सातपुते, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक एस. पी. देशमुख, कार्यकारी अभियंता अमोल गुरव, गु. उमप यांच्यासह उर्ध्व वर्धा सिंचन मंडळाचे सर्व उपविभागीय अभियंता उपस्थित होते.
000000000
काटआमला येथे ‘गावभेट’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद;
ग्रामस्थांच्या समस्यांवर प्रशासनाचा थेट संवाद
अमरावती, दि. 13 (जिमाका): शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आणि प्रशासनाने थेट जनतेच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये 'गावभेट' उपक्रम राबविण्यात येत आहे. अमरावती तालुक्यातील काटआमला येथे 'गावभेट' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती प्रज्ज्वल मिलके होत्या. यावेळी प्रा. अनिरुद्ध पाटील यांनी महिलांच्या समस्या व कायदेविषयक मार्गदर्शन केले. शेतीतज्ज्ञ प्रा. आर. के. पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. महसूल व इतर विभागांच्या वतीने उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे, सुनील राणा, नायब तहसीलदार सुनील रासेकर यांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
या उपक्रमाची सुरुवात वृक्षदिंडीने झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर गावात 'शिवारफेरी' काढण्यात आली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांना भेटी देण्यात आल्या, तसेच 'मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता' योजनेअंतर्गत अडथळा असलेला एक पाणंद रस्ता मोकळा करण्यात आला.
सभेत ग्रामस्थांच्या विविध मागण्या व तक्रारी जाणून घेण्यात आल्या. उपस्थित अधिकाऱ्यांनी या समस्या प्राधान्याने सोडविण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. शाळेतील बालकलाकारांनी पर्यावरण संवर्धन, 'पाणी अडवा-पाणी जिरवा' आणि वृक्ष लागवड या विषयावर नाटक सादर केले. शासन आणि ग्रामस्थ यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्यासाठी आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा गावभेट उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
0000000
परतवाडा येथे ‘ॲडव्हान्स ब्युटी पार्लर’ प्रशिक्षण संपन्न; 32 महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप
अमरावती, दि. 13 (जिमाका): अचलपूर तालुक्यातील परतवाडा येथे 'ॲडव्हान्स ब्युटी पार्लर' प्रशिक्षण बॅचचा निरोप समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. 1 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या या एक महिन्याच्या विशेष प्रशिक्षणाचा समारोप प्रमाणपत्र वितरण सोहळ्याने करण्यात आला. या उपक्रमाचा एकूण 32 महिला लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमाला विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, उपव्यवस्थापक ऋषिकेश कथलकर, एमसीडी प्रकल्प अधिकारी राजेश सुने, आयोजक गणेश बहाड आणि प्रशिक्षिका जोत्स्ना राऊत उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व 32 महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले. तसेच, व्यवसाय उभारणीसाठी 'अमृत' आणि 'एमसीडी' मार्फत सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रकल्प अधिकारी राजेश सुने यांनी लाभार्थ्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची माहिती देऊन या योजनेच्या माध्यमातून अर्थसाहाय्य मिळवून आपला व्यवसाय यशस्वी कसा करावा, याचे तंत्र समजावून सांगितले.
कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढला असल्याचे सांगितले. प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.काही महिलांनी स्वतःचा व्यवसायदेखील सुरू केला आहे.
0000000
सक्रीय बांधकाम कामगारांना वितरीत करण्याच्या
अत्यावश्यक संचाच्या वाटपाबाबत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन
अमरावती, दि. 13 (जिमाका): जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदणीकृत जिवंत (सक्रिय) बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच, सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी रेणुका बिहार, खसरा क्र. 29, एम. झेड. ढाबा, नांदगाव खंडेश्वर रोड, जि. अमरावती येथे सुरू करण्यात आले आहे. परंतु जिल्ह्यातील एकूण 14 तालुक्यांमधील कामगारांना या ठिकाणी येऊन गृहपयोगी संच, सुरक्षा संच व अत्यावश्यक संच घेऊन जाणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने सोयीचे नाही. वाटपाच्या ठिकाणी दररोज सुमारे 3 हजार कामगारांना संच वाटपासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट देण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी व गोंधळ होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यासाठी सक्रीय बांधकाम कामगारांना वितरीत करण्याच्या गृहपयोगी वस्तू, सुरक्षा व अत्यावश्यक संचाच्या वाटप तात्काळ बंद करण्यात येत आहे. याबाबत सर्व कामगारांना आपल्या स्तरावरून अवगत करण्यात यावे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केल आहे.
तसेच तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस विभाग यांच्याशी समन्वय साधून योग्य ते नियोजन करुन साहित्य वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात येईल. भविष्यात तालुका स्तरावर एका दिवशी जास्तीत जास्त 500 बांधकाम कामगारांना साहित्य वाटप करण्यात यावे, तसेच कोणतेही वाटप सुरू करण्यापूर्वी या कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य राहील.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 चे कलम 56 नुसार बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या गृहपयोगी वस्तू संच, सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप करतांना कोणतीही जिवीत व वित्त हानी होणार नाही, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. याबाबत कोणतीही कुचराई आढळून आल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी हे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 चे कलम 56 नुसार कार्यवाहीस पात्र राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केल आहे.
0000000
जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी
अमरावती, दि. 13 (जिमाका) : जिल्हा महिला लोकशाही दिन सोमवार, दिनांक 16 फेब्रुवारी, 2026 रोजी (महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
00000
सिपेट अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात
अमरावती, दि. 13 (जिमाका) : केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी एवं प्रौद्योगिकी संस्थान (सिपेट), रसायन व पेट्रोरसायन विभाग, रसायन व खते मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत असलेली राष्ट्रीय स्वायत्त संस्था असून महाराष्ट्रातील प्लास्टिक उद्योगांना तांत्रिक सहाय्य, कुशल मनुष्यबळ निर्मिती तसेच संशोधन व विकास कार्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथे सिपेट केंद्राची स्थापना सन 2006 मध्ये करण्यात आली आहे. सिपेट संस्था आयएसओ 9001:2015 मानांकन प्राप्त असून येथे एआयसीटीई, मान्यताप्राप्त व एमएसबीटीई समतुल्य प्लास्टिक इंजिनीयरिंगचे विविध अभ्यासक्रम राबविले जातात.
सिपेटमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी ऑल इंडिया लेव्हल सिपेट अँडमिनीस्ट्रेटर टेस्ट आयोजित करण्यात येते व गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून, सिपेट प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी
https://cipet26.
यावर्षी दहावी, बारावी, डिप्लोमा व बी.एस्सी. (अंतिम वर्ष)ची परीक्षा देणारे विद्यार्थी निकालाची प्रतीक्षा न करता प्रवेश अर्ज भरू शकतात. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिपेटचे प्रशिक्षण प्रमुख आर. जीवन राम यांनी केले आहे.
000000
जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीत अमरावतीची बाजी;
विजेत्यांच्या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते सत्कार
चार विजेत्यांनी उंचावला जिल्ह्याचा नावलौकिक
अमरावती, दि. 13 (जिमाका): जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीत जिल्ह्यातील चार उमेदवारांनी यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे कौशल्य विकास क्षेत्रात जिल्ह्याने गरुडझेप घेतली असून, ही बाब जिल्ह्यासाठी गौरवास्पद असल्याचे मत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते या यशस्वी उमेदवारांचा त्यांच्या पालकांसह गुणगौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
समाजात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी कौशल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आज अनेक नवीन संधी विद्यार्थ्यांना खुणावीत आहेत. तरुणांनी विविध क्षेत्रात आपली कौशल्ये विकसित करावीत, असे श्री. येरेकर म्हणाले. या विजेत्यांना पुढील प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवासासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी मार्गदर्शन व मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या स्पर्धेत अमरावतीला दोन प्रथम आणि दोन द्वितीय क्रमांकाची पारितोषिके मिळाली आहेत. यामध्ये फार्मसीची विद्यार्थिनी असलेल्या कु. सारथा (निशा) बंड हिने केवळ कुकिंग या छंदाच्या जोरावर राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच आदर्श लिहारे याने सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. पुण्या-मुंबईच्या स्पर्धकांसमोर सुरुवातीला मनात शंका होती, मात्र निकालानंतर आपणही कोणापेक्षा कमी नाही हा विश्वास मिळाल्याचे आदर्शने आपल्या मनोगतात सांगितले.
शशांक लोखंडे यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि विराज पुसदकर यांनी केमिकल लॅबोरेटरी असिस्टंट या विषयात द्वितीय क्रमांक पटकावून जिल्ह्याची शान वाढविली आहे.
'कौशल्यांचे ऑलिम्पिक' मानली जाणारी ही स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. 2026 ची जागतिक स्पर्धा शांघाई (चीन) येथे आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून राज्यभरात 63 क्षेत्रांत स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये अमरावतीच्या 15 उमेदवारांनी प्रतिनिधित्व केले होते. आता या चारही विजेत्यांची निवड पुढील प्रादेशिक फेरीसाठी झाली असून, जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाने घेतलेल्या विशेष मेहनतीबद्दल विजेत्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
0000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment