अमरावतीत रंगणार 'वैदर्भी महोत्सव - जागर स्त्री शक्तीचा'
*महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन
अमरावती, दि. 25 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेद अंतर्गत अमरावती येथे विभागीय मिनी सरस व जिल्हा प्रदर्शनी 'वैदर्भी महोत्सव - जागर स्त्री शक्तीचा'चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन येत्या दि. 4 ते 8 मार्च या कालावधीत सायन्स स्कोर मैदानात होणार आहे.
यात प्रदर्शनात अमरावती विभाग व जिल्ह्यातील महिला बचतगटांच्या उत्पादनांची विक्री व प्रदर्शनासाठी एकूण 150 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. दररोज अमरावती तसेच इतर जिल्ह्यांतील सुमारे एक हजार महिला महोत्सवात उपस्थित राहतील. या प्रदर्शनादरम्यान महिला सक्षमीकरणासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा या महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. या महोत्सवाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख यांनी केले आहे.
00000
सोमवारी जिल्हा लोकशाही दिन
अमरावती, दि. 25 (जिमाका) : मार्च महिन्याचा जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दि. 2 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी संबंधितांनी व्यक्तिश: उपस्थित राहावे, असे आवाहन अधीक्षक निलेश खटके यांनी केले आहे.
00000
कृषी पुरस्कारासाठी ऑनलाईन सुविधा
*शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 25 (जिमाका) : शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा कृषी विभागामार्फत दरवर्षी सन्मान करण्यात येतो. यावर्षीपासून या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासनातर्फे डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मची डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार देण्यात येतात.
यापूर्वी कृषी पुरस्कार प्रस्तावासाठी ऑफलाईन पद्धती होती. यात इच्छुक शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व प्रभावी करण्यासाठी कृषी विभागातर्फे पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर कृषी पुरस्कार टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुरस्कारासाठी एकदा अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा देण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच अर्जाच्या टप्प्याची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळणार आहे. कृषी आयुक्त यांनी सन २०२५ पासूनचे विविध कृषी पुरस्कार अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करण्याच्या सूचना केल्या आहे.
पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट यांनी कृषी पुरस्कार सन २०२५ करीता संकेतस्थळावरील कृषी पुरस्कार टॅबद्वारे तात्काळ अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी आवाहन केले आहे.
000000
सामाजिक न्यायच्या राज्यस्तरीय स्पर्धेत
अमरावती विभागाला सर्वसाधारण विजेतेपद
अमरावती, दि. 25 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राज्यस्तरीय क्रीडा व कला स्पर्धेत अमरावती विभागाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.
अमरावती विभागाच्या टेबल टेनिस महिलामध्ये प्रथम क्रमांक स्नेहल काळवाघे, बॅडमिंटन पुरुष दुहेरी मध्ये निरज चारोळे, प्रथम डुलगज, गोळा फेक महिलामध्ये प्रथम रुपाली अपराजित, गोळा फेक पुरुषमध्ये प्रथम ज्ञानेश्वर साळवे, कबड्डी पुरुष गटात अमरावती विभाग प्रथम, व्हॉलीबॉल महिला गटात अमरावती विभाग प्रथम, रस्सीखेच महिला गटात अमरावती विभाग प्रथम, क्रिकेट पुरुष व महिला गटात प्रथम क्रमांक, समूह नृत्य अमरावती विभाग प्रथम, भूमिका अभिनयात शिवचरित्र्य सादरीकरणामध्ये अमरावती विभाग प्रथम ठरला आहे. तसेच प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांनी अभिनयामध्ये साकारलेली राजमाता जिजाऊची भूमिका अत्यंत प्रभावी ठरली.
शिखा गरकल-केदार हिने बालशिवाजी, पवन साबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली. अमरावती विभागाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदिप कांबळे, आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे यांनी स्वागत केले आहे.
000000
वसतिगृह प्रवेशासाठी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
*इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 10 मार्च अंतिम मुदत
अमरावती, दि.25 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 10 मार्चपूर्वी अर्ज करावे लागणार आहे.
बारावीनंतरच्या बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय वसतिगृहामध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे.
मुलांनी इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, अग्रवाल टॉवर, जाफरीन प्लॉट, आदर्श होटेलजवळ, कॉटन मार्केट रोड, अमरावती. तसेच मुलींनी इतर मागास बहुजन कल्याण मुलींचे शासकीय वसतिगृह, ब्लॉक ए, राम लक्ष्मण संकुल, तिसरा मजला, रामपूरी कॅम्पजवळ, विलासनगर चौक, अमरावती या वसतिगृहामध्ये सादर करावेत.
12 वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांतीन विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी 11 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीतील पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत 12 मार्च ते 20 मार्च 2026 पर्यंत राहील.
अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण अमरावती, सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाचे मागे, चांदुर रेल्वे रोड, अमरावती, तसेच ई-मेल dobbwoamravati@gmail.com यावर संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक सरीता बोबडे यांनी केले आहे.
0000000
इतर मागास विकास विभागाच्या पुरस्कारांसाठी मुदतवाढ
*इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 25 (जिमाका) : इतर मागास विकास विभागांतर्गत कार्यरत इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या पुरस्कारांसाठी पात्र व इच्छुक व्यक्ती, तसेच संबंधित समाजाच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. यासाठी दि. 3 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
संचालनालयातर्फे महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार, क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार देण्यात येतात. यासाठी अर्जदार व्यक्ती, संस्था राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिकक आदी क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून अनुषंगिक सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्यांचा सविस्तर अहवाल, शिफारस पत्रे व प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण चुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्काराबाबत अंतिम निर्णय शासनस्तरावर घेण्यात येणार आहे.
संबंधित पुरस्कारासाठीचे प्रस्ताव इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना, अटी व शर्ती, तसेच अधिक माहितीसाठी इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे. पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.
000000
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment