Saturday, February 7, 2026

DIO NEWS AMRAVATI 07-02-2026

                सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा एमएसएमई क्रेडिट आऊटरिच कार्यक्रम उत्साहात

अमरावती, दि. 7 (जिमाका) : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अमरावती क्षेत्रीय कार्यालयातर्फे एमएसएमई क्रेडिट आऊटरिच कार्यक्रम पार पडला.

एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे उप महाप्रबंधक हेमंत शर्मा, अभिनंदन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी देठे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून सीए आणि एमएसएमई सबसिडी विशेषज्ञ पंकज अग्रवाल उपस्थित होते. यावेळी एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी नेत्रदीप चौधरी, सुरेश जैन इंडस्ट्रीजचे संचालक सुरेश जैन, आरोग्यम् हॉस्पिटलचे संचालक किरण हातगावकर उपस्थित होते.

हेमंत शर्मा यांनी सेंट्रल बँक ग्राहकासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. शिवाजी देठे यांनी बँक एमएसएमई क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे असे सांगितले. किरण पातूरकर यांनी अमरावती वेगाने प्रगती करत असलेले शहर असून भविष्यात अमरावतीमध्ये येणारे विविध उद्योगाबद्दल  माहिती दिली. बँक आपल्या दारी आली असून सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

पंकज अग्रवाल यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध व्यवसाय योजना आणि त्या मध्ये मिळणारे अनुदान याबाबत चर्चा करून प्रश्नाची उत्तरे दिली.

यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि एमआयडीसी असोसिएशन अमरावती यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या कॅम्पमध्ये बँकेतर्फे 27 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडेय यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या सुविधा, तसेच सायबर गुन्ह्यापासून  वाचण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सावधानीबाबत मार्गदर्शन केले.

निलेश मुंदेकर यांनी सूत्रसंचालन केले. अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी आभार मानले.

00000





मेळघाटाच्या डोंगरदऱ्यांत रंगला जिल्हा प्रशासनाचा 'ट्रेकिंग' अनुभव

*ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

अमरावती, दि. 7 (जिमाका) : जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज, दि. 7 फेब्रुवारी रोजी गाविलगड किल्ल्याची पाहणी आणि पदभ्रमंती केली. त्यासोबतच जिल्हाधिकारी यांनी मोझरी पाँईट येथून गाविलगड किल्ला पायी चढण्याचा अनुभव घेतला. त्यांनी सुमारे सहा किलोमीटर ट्रेकिंग करत दरीतून चढण्याचा थरारक अनुभव घेतला.

जिल्ह्यातील प्रशासकीय कामाचा ताण हलका करण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी या विशेष 'ट्रेकिंग' मोहिम घेण्यात आली. निसर्गाच्या कुशीत एक अविस्मरणीय प्रवास असलेला 'मेळघाट ट्रेकिंग अनुभव' या मोहिमेत सहभागी झालेल्यांना मेळघाटातील घनदाट जंगले आणि हिरव्यागार दऱ्यांचा थरार जवळून अनुभवता आला. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट निसर्गाशी नाते जोडणे आणि दैनंदिन कामातून थोडा विरंगुळा मिळवणे असा होता.

आज सकाळी 6 वाजता मोझरी गावातून पदभ्रमंतीला सुरुवात करण्यात आली. सहभागी पदभ्रमंती करून सकाळी 9 वाजता किल्ल्यावर पोहोचले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी गाविलगड किल्ल्याचा इतिहास, भौगोलिक रचना व संवर्धनाबाबत सविस्तर माहिती घेतली.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह अचलपूरचे उपविभागीय अधिकारी बळवंत अरकराव, उपवनसंरक्षक अग्रिम सैनी, चिखलदऱ्याचे तहसीलदार जीवन मोराणकर, अचलपूरचे तहसीलदार सुदर्शन सहारे, जिल्हा प्रशासन अधिकारी विकास खंडारे, चिखलदराचे नायब तहसीलदार सुधीर धावडे, प्रवीण काळे व तुषार बुरघाटे, चिखलदरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धीरज गोहाळ, सहायक वनसंरक्षक अक्षय तळपे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. युवनाते, वनपाल विनोद कासदेकर, वनरक्षक मयूर सानप, श्री. मलवार, श्री. बोरकर, मनीष ढाकुलकर उपस्थित यांनी मोहिमेत सहभाग नोंदविला. या मोहिमेचे नियोजन विभागीय वन अधिकारी अनंत डिगोळे यांनी केले.

मेळघाटच्या कुशीत हरवायला, निसर्गाशी नाते जुळवायला आणि आठवणींचा ठेवा जमवायला हा एक सुवर्णक्षण असल्याची भावना सहभागींनी नोंदविली. यावेळी शिवा काळे यांनी गाविलगड किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, महत्त्व व संरक्षणाची गरज याबाबत सविस्तर माहिती दिली. ही पदभ्रमंती ऐतिहासिक वारसा जतन व पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली.

0000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 07-02-2026

                    सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा एमएसएमई क्रेडिट आऊटरिच कार्यक्रम उत्साहात अमरावती, दि. 7 (जिमाका) : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अम...