Tuesday, February 17, 2026

DIO NEWS AMRAVATI 17-02-2026












 

शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा

-खासदार बळवंत वानखडे

अमरावती, दि. 17 (जिमाका) : केंद्र शासनाच्या वतीने सर्व सामान्य नागरिकांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यात प्रामुख्याने मेळघाटातील आदिवासी भागातील जनतेचे जीव सुकर व्हावे, यासाठी त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ विनाव्यत्यय देण्यात याव्यात, असे निर्देश खासदार बळवंत वानखडे यांनी दिले.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा खासदार श्री. वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आमदार गजानन लवटे, प्रविण तायडे, महापौर श्रीचंद तेजवाणी, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, परीविक्षाधिन अधिकारी कौशल्या एम., अशासकीय सदस्य मोरेश्वर वानखडे, जिल्हा विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख यांच्यासह नगरपालिकेचे अध्यक्ष उपस्थित होते.

खासदार श्री. वानखडे म्हणाले, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कंत्राटी कर्मचारी संपावरून परत आले आहे. त्यामुळे येत्या काळात कामावरील मजूर परत येतील, याची काळजी घ्यावी. मेळघाटात होळी हा सण महत्त्वाचा असल्याने मजूरी वेळेवर करण्यात यावेत. धारणी परिसरातील मका खरेदीची रक्कम शेतकऱ्यांच्या हाती पडावी, यासाठी प्रयत्न करावेत. यासोबतच मेळघाटातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज, इंटरनेट यासारख्या सुविधा देताना वन विभागाच्या परवागींची अडसर येत आहे. त्यामुळे वन विभागाने पुढाकार घेऊन परवानगी आवश्यक असणाऱ्या विभागांशी समन्वय साधावा. तसेच या परवानगी तातडीने मिळावी, यासाठी पुढाकार घ्यावा.

केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्ती करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. ही कामे चांगल्या दर्जाचे होण्यासाठी प्रयत्न करावेत. इंटरनेटसाठी भारतनेट प्रकल्प राबविण्यात येत आहे. अविरत सेवा मिळावी, यासाठी केबल सुस्थितीत राखण्यात याव्यात. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी होऊ नये, यासाठी उपाययोजना कराव्यात. हल्ला झाल्यास तातडीने वैद्यकीय मदत पोहोचवावी. कौशल्य विकासाच्या योजनेत विश्वकर्मा योजनेत युवकांनी नोंदणी केली आहे. त्यांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा उत्कृष्ट दर्जाच्या देण्यात याव्यात. पल्लवी गुडधे हिच्या मृत्यूसारख्या घटना घडू नये. त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा. त्यासोबतच नगरपालिकांना शववाहिका देण्यात येणार असल्याने याबाबतची मागणी आरोग्य विभागाकडे नोंदवावी, असे सांगण्यात आले.

यासोबतच पाणंद रस्ते, खनीज क्षेत्र कल्याण योजना, कौशल्य विकास योजना, उज्ज्वला योजना, जलसंधारण, अमृत सरोवर, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मध्यान्ह भोजन, अटल भूजल, जलजीवन मिशन, रिचार्ज शाफ्ट, घरकुल योजना, जलयुक्त शिवार योजना आदींचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील नगरपालिकांच्या अध्यक्षांनी त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली.

00000

अमरावतीत 20 फेब्रुवारीपासून 'राज्यस्तरीय खादी प्रदर्शन व महोत्सवा'चे आयोजन;

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचा उपक्रम

अमरावती, दि. 17 (जिमाका): खादी आणि ग्रामोद्योग आयोग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय (भारत सरकार) यांच्यामार्फत  दि. 20 फेब्रुवारी 2026 ते 01 मार्च 2026 या कालावधीत अमरावती येथे 'राज्यस्तरीय खादी प्रदर्शन' आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन गाडगे नगर, वलगाव रोड येथील संत गाडगे बाबा समाधी स्थळ यात्री मैदान येथे संपन्न होईल.

खादी आणि ग्रामोद्योग आयोग ही संसदेच्या कायद्याद्वारे स्थापन झालेली वैधानिक संस्था असून, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे आणि लोकांना स्वावलंबी बनवणे हे आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ हे स्वप्न साकार करण्यासाठी दरवर्षी अशा प्रदर्शनांचे आयोजन केले जाते.

विभागीय कार्यालय, नागपूर यांच्या माध्यमातून आयोजित या प्रदर्शनात देशभरातील विविध खादी संस्था, स्फुर्ती क्लस्टर आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत  स्थापित लघु उद्योगांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतील. यामुळे कारागिरांना हक्काची बाजारपेठ मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

विदर्भातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन खादी वस्त्रे व ग्रामोद्योग उत्पादने खरेदी करावीत, जेणेकरून स्वदेशी उद्योजकांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत होईल, असे आवाहन आयोगामार्फत करण्यात आले आहे.

                                                                0000000 






             

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचा ऐतिहासिक विक्रम

मेळघाटात एकाच दिवशी 112 गावात 3 हजार 650 जात प्रमाणपत्रांचे वाटप

अमरावती, दि. 17 (जिमाका): मेळघाटातील दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ थेट त्यांच्या दारी मिळावा, या उद्देशाने राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आज धारणी तालुक्याने नवा इतिहास रचला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज धारणी तालुक्यातील 112 गावांमध्ये एकाच दिवशी विक्रमी 3 हजार 650 जात प्रमाणपत्रांचे यशस्वीरित्या वाटप करण्यात आले.

प्रशासकीय यंत्रणेने या मोहिमेसाठी गेल्या दोन महिन्यांपासून तयारी केली होती. तहसील कार्यालय धारणीच्या चमुने तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावात जात प्रमाणपत्रांचे अर्ज नि:शुल्क उपलब्ध करून दिले होते. नागरिकांकडून हे अर्ज परिपूर्णरित्या भरून घेतल्यानंतर त्यांची सर्व आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयात पडताळणी करण्यात आली.  अर्जदारांकडून कोणतेही शुल्क न आकारता ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. यासाठी लागणारा संपूर्ण निधी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, धारणी यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आला, ज्यामुळे सामान्य आदिवासी बांधवांवर कोणताही आर्थिक भार पडला नाही.

आज सकाळपासूनच महसूल विभागाचे कर्मचारी 112 गावांमध्ये पोहोचले आणि त्यांनी थेट लोकांच्या घरापर्यंत जाऊन प्रमाणपत्रांचे वाटप केले. यामध्ये मोगरदा (286), बेरदाबलडा (251), राणामलूर (239), काकरमल (179), ढोमणाडाणा (108), ढाकरमल (107), नांदुरी (102), भूलोरी (97), टोली (91), तातरा (90), घोटा (89), टिटबा (83) आणि कुटगा (80) यांसह दुर्गम भागातील बोथरा, हरिसाल, सादराबाडी, दुनी, चिपोली आणि लवादा अशा एकूण 112 गावांचा समावेश आहे.

यामध्ये बोथरा (74), पोटीलावा (72), बुलूमगव्हाण (69), दुनी (59), सादराबाडी (57), हरीसाल (55), नारदू (51), झिलांगपाटी (51), चिपोली (50), मानसुधावडी (47), झिल्पी (44), राणीगाव (40), लवादा (38), हिराबबई (38), गडगामालूर (37), घोटा (33), राणी तंबोली (31), मांडू (31), कुसुमकोट खुर्द (30), रबाग (30), केकदाबोड (29), राणापिसा (29), बोबदो (29), धोदरा (28), पाटिया (27), ऊकूपाटी (27), बीबामल (23), सुसरदा (22) आणि खोपमार (20) या गावांचा समावेश आहे.

तसेच बिजू धावडी (20), मांडवा (20), चौराकुंड (20), कारा (19), रेहटा (17), कावडाझिरी (18), धारणमहू (17), राजपुर (17), सावलखेडा (16), नागझिरा (16), चेथर (15), कोठा (15), चटवाबोड (15), सावलीखेडा (15), जांबु (14), चीचघाट (14), गोंडवाडी (14), कासमार (13), डापका (13), गंभेरी (13), चाकरदा (12), चोपन (12), शिरपूर (12), धुळघाट (11), सावरया (11), धारणी (11), धुळघाट (11), भोडीलावा (11), जाम पाणी (10), तांगडा (10), आकी (9), मोखा (9), नागझिरा (8), झापल (8), कढाव (8), काटकुभ (8), टेमली (7), लाकटू (7), नागोडाना (7), बेरदाभुरू (7), खारी (7), गोलाई (6), बोरी (6), भोकरबर्डी (6), टिंगऱ्या (6), बास पाणी (4), गोलांडोह (4), दादरा (4), जामपाणी (4), गोबरकहू (4), पोहरा (3), कारदा (3), गंभेरी (3), खारराटेमरू (3), निरगुडी (3), खापरखेडा (3), पानखाल्ल्या (3), रत्नापूर (2), कसाई खेडा (2), खिडकी (2), बीरोटी (2), चीचघाट (2), दाबिदा (2), बोड (2) आणि बारू (2) या गावांतही प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

मागील वर्षी देखील धारणी तालुक्यात अशाच प्रकारचे विक्रमी वाटप करण्यात आले होते. महसूल विभागाच्या सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्याच्या आणि पारदर्शकता जपण्याच्या दृष्टिकोनातून हे अभियान अत्यंत प्रभावी ठरले आहे. एकाच दिवशी संपूर्ण तालुक्यात राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे मेळघाटातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाचा आणि युवकांच्या नोकरीसाठी लागणाऱ्या दाखल्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

धारणी येथील महसूल उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला आणि तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या नेतृत्वाखालील चमुने राबवलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या यशस्वी नियोजनाबद्दल जिल्हा प्रशासनासह धारणी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

000000

शिवजयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे विशेष व्याख्यान आणि भव्य बाईक रॅलीचे आयोजन

अमरावती, दि. 17 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमरावती जिल्हा प्रशासनाच्या वतीने 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी शहरात विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने या सोहळ्याचे  आयोजन केले असून, शिवरायांची विचारधारा आणि व्यवस्थापन कौशल्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस व्यक्त केला आहे.

कार्यक्रमाची सुरुवात बुधवारी, दि. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे होणाऱ्या व्याख्यानाने होईल. यावेळी 'शिवश्री' प्रा. प्रेमकुमार बोके आणि प्रा. डॉ. वैभव मस्के हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व, त्यांचे शौर्य आणि आजही सुसंगत असलेली त्यांची विचारधारा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

शिवजयंतीच्या दिवशी, म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता भीमटेकडी येथून भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली यशोदा नगर चौक, कल्याण नगर चौक, राजापेठ उड्डाणपूल, राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक, चित्रा चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशा मुख्य मार्गावरून जात शिवटेकडी येथील शिवाजी महाराज पुतळ्यापाशी विसर्जित होईल. या रॅलीचे खास आकर्षण म्हणजे मार्गातील ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. राजकमल चौक, इर्विन चौक आणि माँ जिजाऊ पुतळा परिसर येथे शिवरायांच्या जीवनावर आधारित पथनाट्य सादर केले जाणार आहे. तसेच माँ जिजाऊंच्या पुतळ्याजवळ वीररसातील पोवाड्याचे सादरीकरण करून शिवरायांना मानवंदना दिली जाईल. या सर्व कार्यक्रमांमध्ये अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तहसिलदार विजय लोखंडे यांनी केले आहे.

0000000

जिल्ह्यात उत्सवांच्या काळात ध्वनीक्षेपकांना रात्री 12 पर्यंत मुभा;

जिल्हाधिकाऱ्यांचे 15 दिवसांच्या शिथिलतेचे आदेश

अमरावती, दि. 17 (जिमाका): आगामी विविध सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यात ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेच्या वापरासाठी वर्षभरातील एकूण 15 दिवसांची विशेष शिथिलता देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जारी केले आहेत. केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 मधील तरतुदींचा आधार घेत ही परवानगी देण्यात आली आहे.

या आदेशानुसार, निश्चित केलेल्या उत्सवांच्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरता येणार आहे. एरव्ही रात्री 10 वाजेपर्यंत असलेली ही मर्यादा आता काही विशेष दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. ज्या उत्सवांसाठी ही सवलत लागू असेल त्यात प्रामुख्याने 19 फेब्रुवारी रोजीची शिवजयंती, 26 मार्चला श्रीराम नवमी, 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि 1 मे रोजीच्या महाराष्ट्र दिनाचा समावेश आहे.

तसेच वर्षाच्या उत्तरार्धात 4 सप्टेंबरला श्रीकृष्ण जयंती, 14 सप्टेंबरला गणपती उत्सव, 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आणि 15 ऑक्टोबरला नवरात्र पंचमीसाठी ही सूट असेल. नवरात्रीचे मुख्य दोन दिवस म्हणजे 19 व 20 ऑक्टोबर, तसेच दिवाळीमध्ये 6 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आणि 8 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही रात्री 12 पर्यंत ध्वनीक्षेपक सुरू ठेवता येतील. वर्षाच्या शेवटी 25 डिसेंबर (नाताळ) आणि 31 डिसेंबर रोजीही ही सवलत लागू राहील.

मात्र, ही शिथिलता देताना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी काही कडक अटीही घातल्या आहेत. झोननिहाय ठरवून दिलेली ध्वनी मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ओलांडता येणार नाही. विशेषतः रुग्णालय, शैक्षणिक संस्था आणि न्यायालये यांसारख्या 'शांतता क्षेत्र' घोषित परिसरात ही सवलत लागू असणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित आयोजक आणि यंत्रणेवर राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी आणि उत्सव मंडळांनी प्रशासकीय नियमांचे पालन करून उत्सव शांततेत साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 18-02-2026

  अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये   बदल पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन अमरावती, दि. 18 (जिमाका): अमरावती    शहरात चित्रा चौक ते नागपू...